जेव्हा किशोर कुमार यांची गाणी संजय गांधींच्या आदेशावरून आकाशवाणीवर बंद झाली...

किशोर कुमार

फोटो स्रोत, NIKITA PUBLICATION

फोटो कॅप्शन, पत्नी लीन चंदावरकर आणि मुलगी सुमीतसोबत किशोर कुमार
    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

किशोर कुमार खंडव्याहून मुंबईला अभिनेता होण्यासाठी आले होते, हा किस्सा बराच प्रसिद्ध आहे. त्या वेळी किशोर यांचे मोठे बंधू अशोक कुमार मुंबईतील चित्रपटउद्योगामध्ये आघाडीचे अभिनेता होते.

एकदा किशोर कुमार अशोक यांच्या बॉम्बे टॉकीजच्या कचेरीत गेले होते. तिथे बाहेरच्या बाजूला ते सहगलचं गाणं गुणगुणत थांबले होते. इतक्यात, 'जिद्दी' या चित्रपटाच्या संगीतावर काम करत असलेले विख्यात संगीतकार खेमचंद प्रकाश थोडे पाय मोकळे करायला इमारतीबाहेर आले, तर त्यांना किशोर कुमार गाताना दिसले.

त्यांनी लगेचच किशोर यांना आत येऊन भेटायला सांगितलं. आत आल्यावर खेमचंद यांनी किशोर कुमार यांच्या समोर हार्मोनियम ठेवली आणि बाहेर गात असलेलं गाणं गायला सांगितलं.

थोडा वेळ गाणं ऐकून झाल्यावर त्यांनी किशोर कुमार यांनी 'जिद्दी' या चित्रपटात गाण्याची ऑफर दिली.

किशोर कुमारांनी हा प्रस्ताव लगेच स्वीकारला. रेकॉर्डिंगच्या दिवशी खेमचंद यांनी अशोक कुमार यांना आणि 'जिद्दी' नायकाची भूमिका करणारे देव आनंद यांना गाणं ऐकण्यासाठी बोलावलं. पहिल्याच दिवशी किशोर कुमार यांच्या गाण्याला हिरवा कंदिल दाखवण्यात आला. हे वर्षं होतं- 1948

नौशाद आणि सी. रामचंद्र यांच्याकडून झालेली चूक

पण खेमचंद यांचे सहायक म्हणून काम केलेले नौशाद यांच्याकडून मात्र किशोर कुमार यांचं कौतुक झालं नाही.

किशोर कुमार यांच्या पार्श्वगायनाच्या कारकीर्दीतील पहिल्या 27 वर्षांमध्ये एकदाही नौशाद यांनी त्यांना गाण्यासाठी निमंत्रित केलं नाही. वास्तविक किशोर कुमार यांना नौशाद यांच्यासाठी एकदा तरी गाणं म्हणायची तीव्र इच्छा होती.

किशोर कुमार

फोटो स्रोत, NIKITA PUBLICATION

अखेरीस किशोर कुमार गायक म्हणून प्रसिद्धीच्या शिखरावर पोचले, त्यानंतर पाच वर्षांनी 1974 साली नौशाद यांनी 'सनुहरा संसार' या चित्रपटात त्यांच्याकडून एक गाणं गाऊन घेतलं. आशा भोसले यांच्यासोबतचं हे एक द्वंद्व गीत होतं.

दुसरे एक विख्यात संगीतकार सी. रामचंद्र यांनीही 'साजन' या चित्रपटत किशोर कुमार यांच्याकडून गाणं गाऊन घ्यायला नकार दिला होता. 'ज्या माणसाला चित्रपटसंगीताबाबत आणि एकंदरच गाण्याविषयी काहीच कळत नाही, अशा माणसावर मी माझा वेळ कशाला वाया घालवू,' असा शेरा रामचंद्र यांनी मारला.

पण नौशाद आणि सी. रामचंद्र यांच्यापेक्षा भिन्न दृष्टिकोन राखणाऱ्या सचिन देव बर्मन यांना 1952 सालीच किशोर कुमार यांच्या प्रतिभाशक्तीची जाणीव झाली होती.

बॉम्ब टॉकीजच्या कचेरीत असंच गाणं गुणगुणणाऱ्या किशोर कुमार यांच्याबद्दल आपला मुलगा पंचम याच्याशी बोलताना सचिन देव बर्मन म्हणाले होते, "हा दादामुनींचा छोटा भाऊ आभास आहे. थोडा सणकी आहे, पण जबर प्रतिभावान आहे. भविष्यात याचं मोठं नाव होईल, बघ."

किशोर कुमार यांच्यासाठी हेमंत कुमार यांनी पार्श्वगायन केलं

किशोर कुमार यांना मुंबईतील चित्रपटउद्योगात जम बसवण्यासाठी बरेच कष्ट करावे लागले. बिमल रॉय यांनी 1954 साली किशोर यांना 'नौकरी' या चित्रपटात अभिनेता म्हणून घेतलं. या चित्रपटातील गाणीही आपणच गाणार आहोत, असं किशोर यांनी गृहित धरलं होतं.

पण संगीतकार सलील चौधरी यांनी अभिनेता किशोर कुमार यांच्याकरता पार्श्वगायन करण्यासाठी हेमंत कुमार यांना बोलावल्याचं कळल्यावर किशोर चकित झाले.

ख्यातकीर्त पत्रकार राजू भारतन यांनी 'अ जर्नी डाउन मेमरी लेन' या पुस्तकात लिहिल्यानुसार, "किशोर यांना ही गोष्ट कळल्यावर ते सलील यांच्या म्युझिक रूममध्ये गेले आणि आपल्याला स्वतःच्याच चित्रपटात का गायला दिलं जात नाहीये याबद्दल विचारणा केली."

किशोर कुमार

फोटो स्रोत, HAY HOUSE INDIA

"सलील म्हणाले, की 'मी आधी कधी तुम्हाला गाताना ऐकलेलं नाही.' यावर किशोर त्रस्त होऊन म्हणाले, की 'सलील दा, कमीतकमी आता तरी तुम्ही माझं गाणं ऐकून घ्या.'

यानंतर किशोर यांनी गाणं म्हणायला सुरुवात केल्यावर सलील चौधरींनी त्यांना थांबवलं आणि ते म्हणाले, की 'तुम्हाला संगीताची साधी बाराखडीही येत नाहीये. तम्ही गेलात तरी चालेल. तुमच्यासाठी हेमंत कुमार गाणं गातील.' त्रासलेल्या किशोर कुमार यांनी निर्माते बिमल रॉय यांच्यापाशी आपली बाजू मांडली."

"रॉय यांनी याबाबतीत हस्तक्षेप करायला नकार दिला आणि ते म्हणाले, 'संगीताची बाजू सलील चौधरी सांभाळतायंत. गाणं कोण म्हणेल हे माझा संगीतदिग्दर्शक ठरवतो.' मग किशोर त्यांच्या दोन रेकॉर्डी घेऊन सलील चौधरी यांच्याकडे गेले. तरीही सलील यांनी त्यांचं ऐकलं नाही आणि अखेर किशोर कुमार यांच्यासाठी पार्श्वगायक म्हणून हेमंत कुमार यांचा आवाज वापरण्यात आला."

सलील चौधरी आणि मन्ना डे हेसुद्धा किशोर यांचे प्रशंसक झाले

सतरा वर्षांनी, 1971 साली सलील चौधरी यांनी गुलझार यांच्या 'मेरे अपने' या चित्रपटामध्ये किशोर कुमार यांच्या आवाजात 'कोई होता जिसको अपना हम कह लेते यारों' हे गाणं गाऊन घेतलं. हे गाणं बरंच गाजलं.

नंतर सलील चौधरी यांनी कबूल केलं की, "या मुलामधली चमक ओळखल्याबद्दल खेमचंदला मी सलाम करतो. बाकी आम्ही सगळ्यांनी किशोरची प्रतिभा न ओळखून चूक केली होती."

किशोर कुमार यांनी शास्त्रीय संगीताचं कुठलंही प्रशिक्षण घेतलं नव्हतं.

किशोर कुमार

फोटो स्रोत, INKING INNOVATION

परंतु, हिंदी चित्रपटांमध्ये शास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध असलेले आणि 2005 साली पद्मभूषण व 2007 साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित मन्ना डे यांनी 'मेमरीज कम अलाइव्ह: अॅ ऑटोबयॉग्रफी' या आत्मकथनात एक विलक्षण कबुली दिली होती. "शास्त्रीय संगीत न येणाऱ्या किशोर कुमारसोबत गाताना मी धास्तावलेलो असायचो," असं मन्ना डे यांनी लिहिलं आहे.

"त्यांच्या गाण्याचा एक खास ढंग होता. शास्त्रीय संगीतातील सूक्ष्म जागाही त्यापुढे फिक्या पडत असत. त्यामुळे युगुलगीतांमध्ये त्यांच्या सोबत गाणाऱ्या गायकाची अवस्था अवघडलेली व्हायची. मी 'अमीर गरीब' या चित्रपटात त्यांच्या सोबत 'मेरे प्याले मे शराब डाल दे' हे गाणं गायलं, तेव्हा मला हे स्पष्टपणे जाणवलं होतं."

देव आनंद आणि राजेश खन्ना यांच्यासाठी किशोर कुमार यांचा आवाज

देव आनंद यांनी सुरुवातीलाच किशोर कुमार यांचा आवाज आपल्यासाठी पार्श्वगायक म्हणून निवडला. 'रोमान्सिंग विथ लाइफ' या आत्मचरित्रात देव आनंद लिहितात, "किशोरने माझ्यासाठी गाणं म्हणावं, अशी गरज भासली की लगेचच तो रेकॉर्डिंग स्टुडियोत मायक्रोफोनसमोर उभा राहून देव आनंदची भूमिका निभावण्यासाठी तयार असायचा."

"मी एखादं गाणं पडद्यावर कसं गाणार आहे, असं तो मला नेहमी विचारायचा. मग तो त्या पद्धतीने गाणं म्हणायचा. मी त्याला सांगायचो की, तुला शक्य होईल तितकं मोकळ्या आवाजात गा. मी तुझ्या गाण्याच्या धाटणीनुसार अभिनय करेन."

'आराधना' हा चित्रपट 1969 साली प्रदर्शित झाल्यानंतर किशोर कुमार यांनी राजेश खन्ना यांच्यासाठीही पार्श्वगायन केलं.

किशोर कुमार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, देव आनंद आणि किशोर कुमार

किशोर कुमार यांचं चरित्र लिहिणारे शशिकांत किणीकर लिहितात, "गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यापूर्वी आपल्याला राजेश खन्ना यांना भेटायला आवडेल, असं किशोर यांनी 'आराधना'चे निर्माता-दिग्दर्शक शक्ती सामंत यांना सांगितलं."

"ते राजेश खन्नाला भेटले तेव्हा त्यांच्या भावभावनांचे कंगोरे किशोर यांनी जाणून घेतले आणि त्यानुसार मग राजेश खन्ना यांचा स्वभाव पडद्यावर उमटेल अशा सुरात गाणं म्हटलं."

किशोर कुमार

फोटो स्रोत, NIKITA PUBLICATION

फोटो कॅप्शन, राजेश खन्ना आणि किशोर कुमार

"शूटिंगच्या वेळी ही गाणी किशोर कुमार यांनी नव्हे तर आपणच गायली असावीत, असं आपल्याला वाटल्याचं राजेश खन्ना म्हणाले. या चित्रपटातील 'मेरे सपनो की रानी' आणि 'रूप तेरा मस्ताना' ही दोन गाणी राजेश खन्ना व किशोर कुमार यांना राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धीच्या शिखरावर नेणारी ठरली."

सचिन देव बर्मन आणि किशोर कुमार यांचं ट्युनिंग

किशोर कुमार यांच्या गाण्याला सचिन देव बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली सर्वाधिक तेज आलं. आर. डी. बर्मन यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितल्यानुसार, "दादा रेकॉर्डिंगच्या तीन दिवस आधी त्यांची सुरावट स्पूल टेपद्वारे किशोर यांना पाठवत असत."

"मग किशोर त्यांच्या स्टडी-रूममध्ये या सुरावटींचा रियाज करायचे. त्या वेळी कोणालाही त्या खोलीत जायची परवानगी नसायची आणि रियाजावेळी त्यांची खोली आतून बंद केलेली असायची. या सुरावटींचा अभ्यास केल्यावरच किशोर रेकॉर्डिंग स्टुडियोत यायचे."

किशोर कुमार

फोटो स्रोत, NIKITA PUBLICATION

फोटो कॅप्शन, किशोर कुमार आणि एस डी बर्मन

एकदा एस. डी. बर्मन यांची आठवण सांगताना किशोर कुमार म्हणाले होते, "एस. डी. बर्मन यांची एक विचित्र सवय होती- ते त्यांच्या गायकांना फोन करायचे आणि आवाज ऐकून काहीच न बोलतान फोन ठेवून द्यायचे."

"आपल्या गायकाच्या गळ्याची हालहवाल तपासण्याची त्यांची ही खास पद्धत होती. एकदा रात्री उशीरा त्यांनी मला फोन केला आणि 'मेरा कागज था ये मन मेरा' या गाण्याची धून ऐकवली. वास्तविक आम्हाला दोघांनाही लवकर झोपायची नि लवकर उठायची सवय होती."

"पण त्या दिवशी दादांनी माझा आवाज ऐकून फोन ठेवला नाही, तर मला ते गाणं गायला सांगितलं. मला प्रचंड झोप आली होती. त्यांना गाणं ऐकवतानाही मी जांभया देत होतो. पण त्यांचं पूर्ण समाधान झाल्यावरच त्यांनी मला झोपायची परवानगी दिली."

किशोर कुमार यांच्या खोडकरपणाने लता मंगेशकर त्रस्त व्हायच्या

कोणत्या गायकासोबत युगुलगीत गाताना सर्वाधिक मजा यायची, असा प्रश्न एकदा लता मंगेशकर यांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी किशोर कुमार यांचं नाव घेतलं होतं. पण किशोर यांच्यासोबत युगुलगीत गाताना अडचणही यायची, असंही त्यांनी सांगितलं.

किशोर कुमार

फोटो स्रोत, NIKITA PUBLICATION

फोटो कॅप्शन, किशोर कुमार आणि लता मंगेशकर

लता म्हणाल्या, "त्यांच्या सोबत गाताना संगीत आणि गायन याबाबतीत काही अडचण नसायची. पण ते इतकं हसवायचे की हसून-हसून शेवटी पोट दुखायला लागायचं. हे पेलणं खूप अवघड व्हायचं. आपण कितीही गंभीर असलो, अंतऱ्यामध्ये एखादी तान घेत असलो, की किशोर दा काहीतरी वेडगळ खाणाखुणा करून दाखवायचे, त्यामुळे गाणाऱ्याचं लक्ष विचलित व्हायचंच."

"अनेकदा आम्ही गाणं मधेच थांबवून त्यांना विनंती करायचो, दादा, आधी शांतपणे गाणं रेकॉर्ड करू द्या, मग हे सगळं करूया. विशेष म्हणजे ते कितीही टिवल्याबावल्या करत असले, तरी स्वतः मात्र त्यातून लगेच बाहेर पडत गंभीर मुद्रेने गाणं म्हणायचे."

अदृश्य मुलाशी संवाद

चित्रपटगायनाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीकडून किशोर कुमार यांच्या संदर्भातले अनेक किस्से ऐकायला मिळतात. आशा भोसले सांगतात, "किशोरदा अनेकदा एका अदृश्य मुलासोबत रेकॉर्डिंग करायला येत असत."

किशोर कुमार

फोटो स्रोत, NIKITA PUBLICATION

"ते सतत त्या मुलाशी बोलत, त्याला काहीतरी विनोद ऐकवत आणि एकदम हसत सुटत. कधी-कधी ते मलाही त्या दोघांच्या बोलण्यात सामील व्हायला बोलावत. मला हे जरा विचित्र वाटायचं, पण यातून आमची सगळ्यांची जोरदार करमणूक व्हायची."

असाच एक किस्सा आर. डी. बर्मन यांनी ऐकवला होता: "मी किशोर कुमार यांना बॉम्बे टॉकीजच्या कचेरीत पाहिलं होतं, पण 1952 साली मी पहिल्यांदा त्यांना भेटलो. एकदा माझे वडील मला कारदार स्टुडियोमधे घेऊन गेले. तिथे किशोरच्या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं."

"आम्ही मुख्य गेटातून आत गेलो, तेव्हा कुर्ता पायजमा घातलेला आणि गळ्याभोवती मफलर गुंडाळलेला एक माणूस बाउंड्री-वॉलपाशी उभा असल्याचं मला दिसलं. माझे वडील म्हणाले, हा माणूस मला खूप त्रास देतो. ते स्टुडियोच्या आत गेले."

किशोर कुमार

फोटो स्रोत, NIKITA PUBLICATION

फोटो कॅप्शन, किशोर कुमार, अशोक कुमार आणि अनुप कुमार

"मी किशोर कुमारजवळ जाऊन थांबलो आणि ते तिथे काय करतायंत असं विचारलं. त्यावर ते म्हणाले, 'मी कारदार साहेबांची नक्कल करतोय.' मी त्यांचं नाव विचारल्यावर त्यांनी पाय हलवत उत्तर दिलं, 'किशोर कुमार खंडवावाला.' त्यातच त्यांचा एक बूट खाली पडला."

"मी बूट त्यांना उचलून दिला. ते अशोक कुमार यांचे बंधू आहेत का, असं मी विचारलं. त्यावर ते म्हणाले, 'होय, म्हणून मला कोणी काम देत नाही.' मग ते अशोक कुमार यांची आणि माझ्या वडिलांची नक्कल करायला लागले. त्यांचं ते वागणं पाहून हसून-हसून माझ्या पोटात दुखायला लागलं."

'बढिया खा ले करारे गजक'

किशोर कुमार यांचे चरित्रकार डेरेक बोस यांनी 'किशोर कुमार- मेथड इन मॅडनेस' या पुस्तकामध्ये अनेक किस्से नोंदवले आहेत.

"किशोर कुमार त्यांच्या बागेतल्या झाडांशी बोलायचे. त्यांनी या झाडांना जनार्दन, रघुनंदन, बुद्धू राम, गंगाधर, अशी नावंही दिलेली होती. त्यांनी परसदारात झोपाळे बांधले होते आणि त्यावर ते लहान मुलांप्रमाणे झोके घ्यायचे.

किशोर कुमार

फोटो स्रोत, NIKITA PUBLICATION

एकदा अमित खन्ना यांनी किशोर कुमार यांना बॅटरीवर चालणाऱ्या खेळणी पसरून बसलेलं पाहिलं होतं. ही सगळी खेळणी एकाच वेळी स्विच-ऑन केलेली होती. किशोर यांना कोणी परिचित व्यक्ती भेटायची तेव्हा ते म्हणायचे, 'बढिया खा ले करारे गजक'. याचा अर्थ काय होता कोणास ठाऊक."

'कुत्रा असल्याचं नाटक करत'

ओ. पी. रल्हन यांनीही एक किस्सा सांगितला होता. 1959 साली 'शरारत' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान किशोर कुमार यांनी रल्हन यांच्यावर जवळपास वेड लागायची पाळी आणली होती.

"एकदा किशोर शूटिंगसाठी सेटवर आले नाहीत. मी काळजीपोटी त्यांच्या घरी जाऊन त्यांना घेऊन यायचं ठरवलं. मी त्यांच्या घरी गेलो तर, ते घरीच होते, पण त्यांनी कुत्र्याप्रमाणे स्वतःच्या गळ्यात पट्टा बांधला होता."

"त्यांच्या समोर एक ताटली ठेवलेली होती नि ताटलीत चपाती होती. जवळच पाण्याचं भांडंही होतं. बाजूला एक बोर्ड होता, त्यावर लिहिलेलं- 'कुत्ते को डिस्टर्ब मत करो.' मी त्यांना शूटिंगला येण्याबद्दल सांगितलं, तर ते कुत्र्यासारखं गुरगुरायला लागले."

किशोर कुमार

फोटो स्रोत, NIKITA PUBLICATION

"कुत्र्याच्या डोक्यावर हात ठेवतात तसा त्यांच्या डोक्यावर हात ठेवायचा मी प्रयत्न केला, तर त्यांनी माझ्या हाताचा चावा घेतला. मग मला गेटबाहेर हाकलेपर्यंत ते कुत्र्यासारखं भुंकत राहिले."

किशोर यांना कोणाला भेटायचं नसेल, किंवा विशेषतः त्यांचे पैसे दिलेले नसतील अशी माणसं भेटायला आली, तर ते अशा तऱ्हेने वागायचे, असं त्यांचे मित्र व निकटवर्तीय सांगतात.

सत्यजीत राय यांना पाच हजार रुपये दिले

किशोर कुमार त्यांचे पैसे खूप सांभाळून ठेवायचे, हे सर्वज्ञात आहे.

परंतु, गीतकार समीर सांगतात त्यानुसार, "माझे वडील अंजान यांच्यासाठी त्यांनी काहीच पैसे न घेता किमान दहा गाणी म्हटली होती. अनेकदा त्यांनी माझ्या वडिलांना स्वतःच्या कारमधून घरी सोडलं होतं. त्या वेळी आमच्याकडे कार घेण्यासाठी पैसे नव्हते."

किशोर कुमार

फोटो स्रोत, NIKITA PUBLICATION

"त्यांनी 'चलती का नाम गाडी' हा चित्रपट केला, तेव्हा माझ्या वडिलांना गाणी लिहायला सांगितली आणि तेव्हाच्या मार्केट-रेटपेक्षा खूप जास्त पैसे दिले."

विख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजीत राय 'पाथेर पांचाली' तयार करत होते, तेव्हा किशोर कुमार यांनी त्यांना पाच हजार रुपयांची मदत केली होती. त्यांनी राय यांच्या 'चारुलता' या चित्रपटासाठी दोन गाणीही म्हटली होती आणि त्यासाठी काहीच मोबदला घेतला नाही.

किशोर कुमार यांच्या गाण्यावर बंदी

1975 साली आणीबाणी वेळी संजय गांधी यांनी मुंबईतील प्रसिद्ध चित्रपटकर्त्यांना संगीतरजनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिल्लीला निमंत्रित केलं.

अनेक आमंत्रित दिल्लीला गेले, परंतु किशोर कुमार यांनी मात्र हे आमंत्रण नाकारलं, इतकंच नव्हे तर आपल्या कृतीचं काही स्पष्टीकरणही त्यांनी दिलं नव्हतं.

शशिकांत किणीकर किशोर कुमार यांच्या चरित्रात लिहितात, "संजय गांधी यांना यामध्ये स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटलं. त्यांनी माहिती व प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ल यांना बोलावलं आणि सांगितलं की, किशोर कुमार यांची गाणी कोणत्याही सरकारी माध्यमातून प्रसारित करू नयेत."

"परिणामी ऑल इंडिया रेडियोवरून किशोर कुमार यांची गाणी वाजायची बंद झाली. शिवाय, किशोर कुमार यांच्या गाण्यांचा समावेश असलेल्या चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्रं नाकारली."

आठ फिल्मफेअर पुरस्कारांचे विजेते

किशोर कुमार यांना तब्बल 27 वेळा सर्वोत्तम गायकाच्या पुरस्कारासाठी फिल्मफेअरचं नामांकन मिळालं. आठ वेळा त्यांनी हा पुरस्कार जिंकला.

किशोर कुमार

फोटो स्रोत, NIKITA PUBLICATION

फोटो कॅप्शन, किशोर कुमार आणि आर डी बर्मन

शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण नसतानाही त्यांनी राग शिवरंजनीमधील 'मेरे नैना सावन भादो' हे गाणं उत्कृष्टरित्या म्हटलं, 1981 साली राग यमनमधील 'छू कर मेरे मन को' हे गाणंही तितक्याच सहजतेने म्हटलं. ही एक अनन्यसाधारण बाब होती.

किशोर कुमार यांच्या चित्रपट क्षेत्रातील संगीतप्रवासाचा आलेख नोंदवताना 1977 सालातील 'अनुरोध' या चित्रपटामधील पुढील गाण्याचे बोल आठवतात:

आप के अनुरोध पर

मै ये गीत सुनाता हूँ

अपने दिल की बातों से

आप का दिल बहलाता हूँ

आपके अनुरोध पर...

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)