केके'चा मृत्यू: गुलजारांनी चित्रपटात दोन ओळी गाण्याची संधी दिली आणि आयुष्यच बदलले

फोटो स्रोत, Instagram
- Author, वंदना
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गाण्याची आवड पण मार्केंटिंगमध्ये काम करणारा तरुण. नंतर त्याला संधी मिळाली ती जाहिरातींसाठी जिंगल म्हणण्याची. पण नंतर त्याला हिंदी चित्रपटात दोन ओळी गाण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. या तरुणाचं नाव होतं कृष्णकुमार कुन्नथ अर्थात केके आणि संधी देणारे होते गुलजार.
गुलजार यांच्या माचिस चित्रपटात केकेंनी छोड आए हम वो गलियां हे गाणं म्हटलं होतं.
त्यानंतर अनेक दिवस, महिने गेले आणि केकेचं एक गाणं इतकं प्रसिद्ध झालं की आजही त्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.
'हम रहे या ना रहे कल कल.... याद आयेंगे ये पल.... पल ये है प्यार के पल...'
प्रेमाची गोष्ट असो किंवा मैत्रीची- आयुष्यातल्या अमूल्य अशा या गोष्टी गाण्याच्या माध्यमातून दाखवण्याचं काम केके यांनी केलं. त्यांची गाणं प्रेमाचं/मैत्रीचं जणू राष्ट्रगीतच झालं. उदाहरणार्थ हे गाणं
'यारों दोस्ती बडी ही हसीन है....'
1999 मध्ये आलेल्या पल नावाच्या अल्बमच्या माध्यमातून केके नावाच्या गायकाची ओळख आपल्याला झाली. कृष्णकुमार कुन्नथ अर्थात केके यांनी या गाण्याआधी हजारो जिंगल्स गायल्या होत्या. याद आयेंगे पल या गाण्याने त्यांनी थेट चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवलं.
स्निग्ध आवाजाने त्यांनी शब्दांना वेगळाच आयाम दिला. तडप तडप के इस दिल से आह निकलती रही या गाण्याने त्यांनी प्रेमभंग झालेल्या मंडळींच्या दु:खाला वाचा फोडली.
केके अशा गाण्यांद्वारे चित्रपट संगीतात आले. कधी त्यांच्या आवाज शाहरुख-दीपिकाचं (आँखो में तेरी अजब सी गजब सी अदाएँ है) प्रेमगीत झालं. कधी रणवीरच्या प्रेमाच्या आणाभाका (सजदे में यूँ ही झुकता हूँ, तुम पे आके रुकता है), प्रेमातलं अल्लडपण (दस बहाने करके के ले गई दिल) तर कधी तडप तडप
आपल्यातल्या गायकाला उलगडणारे 53 वर्षांचे केके फक्त गायक नव्हते. संगीतकार, खवैये, निसर्गप्रेमी, रोडी, भटकंतीकार असं बरंच काही होते. आपली ओळख अशी सांगायचे. दिल्लीत लहानाचे मोठे झालेल्या केके यांना सुरुवातीपासूनच संगीताची आवड होती. ते गायचेही. संगीताचं औपचारिक शिक्षण घेतलं नाही पण सुरांतालाचं अद्भुत ज्ञान त्यांना होतं.

फोटो स्रोत, Getty Images
53व्या वर्षीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. कोलकाता इथे एका कॉन्सर्टमध्ये गाण्यासाठी ते गेले होते. कार्यक्रमादरम्यानच त्यांची तब्येत बिघडली. कार्यक्रम ज्या ठिकाणी होता तिथून ते हॉटेलवर परतले. पण त्रास वाढल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांची प्राणज्योत मालवल्याचं घोषित केलं.
ऑगस्ट 2014 मध्ये लंडन इथे त्यांची भेट झाली होती. त्या मुलाखतीचा काही अंश
गायक व्हायचं तुम्ही कधी ठरवलं?
लहानपणापासूनच मला संगीताची आवड होती. जुन्या कॅसेट प्लेयरवर मी खूप गाणी ऐकत असे. कॉलेजमध्ये असताना मित्रांच्या बरोबरीने परफॉर्मन्स करत असे. लग्न होणार होतं तेव्हा एका मित्राने मार्केटिंगची नोकरी मिळवून दिली. पण त्या कामात मन रमेना. मग मी मुंबईला गेलो. मी जाहिरातींसाठी जिंगल्स तयार करू लागलो. हजारो जिंगल्स गायल्या.
बॉलीवूडचा प्रवास कसा सुरू झाला?
जाहिरातीत काम करता करता मला माचिस चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. छोड आये हम वो गलियाँ. तसं बघितलं तर दोन ओळी होत्या पण ते विशाल भारद्वाजांनी संगीतबद्ध केलं होतं. त्यानंतर ए.आर. रहमान यांनी सपने चित्रपटात गाण्याची संधी दिली. 1999 मध्ये टर्निंग पॉइंट आला.

फोटो स्रोत, Getty Images
हम दिल दे चुके सनम चित्रपटात संगीत दिग्दर्शक इस्माइल दरबार यांनी तडप तडप के इस दिल के हे गाणं दिलं. अशा गाण्यांसाठी संगीतकाराने एखाद्या ज्येष्ठ गायकाला निवडलं असतं. पण इस्माइल यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी जीव तोडून गायलो. हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. त्याच वर्षी माझा अल्बमही रिलीज झाला. त्यानंतर याद आयेंगे ये पल हे गाणंही चाहत्यांना आवडलं. आजही मी कॉलेजात गेलो तरी हे गाणं वाजत असतं.
गाण्याच्या शब्दांवरून आज वादाला तोंड फुटलं आहे. कधी असं झालं आहे की गाण्याचे शब्द न पटल्यामुळे तुम्ही गायला नकार दिला आहे?
एका नवीन संगीतकारासाठी गात होतो. अचानक मला वाटलं हे काय शब्द आहेत? मी गाणं सोडून निघून गेलो. मग त्यांचा फोन आली की गाण्याचे शब्द बदलण्यात आले आहेत. तुम्ही परत या. संगीतकाराचा पहिलाच चित्रपट होता आणि निर्मातेही मोठे होते. त्यामुळे संगीतकाराला नाही म्हणणंही अवघड होतं. पण आता संगीतकारांना कळलं आहे की मी अशा प्रकारची गाणी गात नाही.
चांगल्या गायकाची तुमची व्याख्या आहे?
संगीतकाराचं गाणं जो आपलं करू शकतो तो खरा गायक. गाणं आनंदी भावनेचं असेल आणि तुमचा मूड वेगळाच असेल. त्यामुळे मी एका दिवसात एकच गाणं रेकॉर्ड करतो. जोवर गायक स्वत: त्या गाण्याची अनुभूती घेत नाही तोवर श्रोत्यांना ते कसं आवडणार?
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








