MC तोडफोड: धर्मेश परमार कोण आहे? त्याच्या निधनानंतर रणवीर सिंह दुःखी का झाला?

फोटो स्रोत, Instagram swadesi movement
- Author, हर्षल आकुडे,
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.
धर्मेश परमार उर्फ MC तोडफोड याच्या निधनानंतर संपूर्ण रॅप आणि संगीत विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. बॉलिवुडमधील आघाडीच्या कलाकारांनीही MC तोडफोडच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केलं आहे.
MC तोडफोड हा फक्त 24 वर्षांचा होता. हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्याचं निधन झाल्याची माहिती त्याच्या आईने टाइम्स ऑफ इंडियाला दिली.
धर्मेशच्या निधनानंतर त्याच्या सहकाऱ्यांना तसंच आप्तस्वकियांना खूप मोठा धक्का बसला आहे. सध्या सोशल मीडियावर यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत असल्याचं दिसून येतं.
या पार्श्वभूमीवर MC तोडफोड नेमका कोण आहे, तो नेमका काय काम करायचा याबाबत आपण माहिती घेऊ -
दोन दिवसांपूर्वी सादरीकरणाचा व्हीडिओ व्हायरल
स्वदेसी मूव्हमेंटने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टनुसार, 'स्वदेसी मेळा' कार्यक्रमात एमसी तोडफोड' अर्थात रॅपर धर्मेश परमारने शेवटचा परफॉरमन्स दिला.
यात त्यांनी असंही म्हटलंय, "एमसी तोडफोडचा परफॉरमन्स पाहण्यासाठी तुम्ही तिथे हवे होतात, लाईव्ह संगीतासाठीचं त्याचं प्रेम तुम्हाला अनुभवता आलं असतं. तुला आम्ही कधीही विसरणार नाही, संगीताच्या माध्यमातून तू कायम आमच्या स्मरणात राहशील."
त्याच्या रॅपचे काही बोल सुद्धा 'स्वदेसी मूव्हमेंट'ने पोस्ट केले आहेत. 'कभी सोचू कहीं चले जाने की दूर, कोई ठिकाने बस जो जो न हो ज्यादा मशहूर, जहां ले जाती रहे मन को भाए वो में करू, ऐसा जीना रहना किया जाने यही से शुरू - तोडफोड'
धर्मेश परमार उर्फ MC तोडफोड कोण आहे?
धर्मेश हा मुंबईस्थित स्वदेसी मूव्हमेंट या हिप-हॉप ग्रुपचा सदस्य होता. MC तोडफोड नावानं तो प्रसिद्ध होता. गल्ली बॉयमधील 50 रॅपर्सपैकी एक धर्मेश होता.
MC तोडफोड हा गुजराती तसंच हिंदी भाषेत रॅप करायचा. किशोरवयातच त्याने रॅप करण्यास सुरुवात केली.
101 इंडिया या युट्यूब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत MC तोडफोड सांगतो, "आमच्या इथे एक ग्रुप रॅप करायचा. मी त्यांच्याकडे गेलो. त्यावेळी मी मला इंग्लिशमध्ये रॅप करायचं असल्याचं सांगितलं. पण त्यांनी मला गुजराती भाषेतच रॅप करण्याचा सल्ला दिला. गुजराती तुझी मातृभाषा असल्यामुळे तू गुजरातीत रॅप चांगलं करू शकतोस, असं ते म्हणाले."

फोटो स्रोत, INSTAGRAM/@TODFOD
"तेव्हा मी तिथंच बसून काही ओळी गुजराती भाषेत लिहिल्या. त्यांनाही ते आवडलं. असाच आणखी प्रयत्न करून लिहित राहा, असं त्यांनी मला तेव्हा म्हटलं. तेव्हापासून मी गुजरातीमध्येही रॅप करू लागतो."
MC तोडफोडने गुजराती भाषेत केलेल्या रॅप गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. द मुंबई सायफर, सू छे करवानू हे त्याचे रॅप गाणे आजही इंटरनेटवर लोकप्रिय आहेत.
'रॅप म्हणजे फक्त हनी सिंग नव्हे, इथे रोजच्या जगण्याची मारामार'
आपल्या इथे बहुतांश लोक अशिक्षित आहेत. त्यांना मुळात हिपहॉप काय आहे, हेच माहिती नव्हतं. लोकांना रॅप म्हणजे फक्त हनी सिंग आठवतो. लोकांचा माईंडसेटही तसाच बनला आहे. रॅप म्हणजे चार बोटल व्होडका म्हणत ते सगळे फक्त दिखावा करत आहेत. मी रोज पार्टी करतो, बिअर पितो, असं ते दाखवतात.
पण प्रत्यक्षात आम्ही काय करतो. तर लोकलमध्ये धक्के खातोय. आजूबाजूच्या गर्दीत मी घुसमटतोय. या स्थितीत मी व्होडका कुठून पिऊ?
लोकांकडूनच मिळते लिहिण्याची प्रेरणा
या मुलाखतीत MC तोडफोडने म्हटलं होतं, "मला लिहिण्याची प्रेरणा लोकांकडूनच मिळते. रस्त्यात फिरताना मी समाजातली परिस्थिती पाहतो. इथे श्रीमंत हा अतिश्रीमंत बनत चालला आहे. गरीब हा अधिक गरीब बनतोय. मुंबईत हेच सुरू राहणार आहे. आपल्या देशाचं नाव भारत असलं तरी माईंडसेट ब्रिटिश बनला आहे.
"मी जो रॅप करतो, त्याला कॉन्शस रॅप असं म्हटलं जातं. यामध्ये लोकांची विचारसरणी दर्शवली जाते. ते काय विचार करतात, कसं जगतात, हे सांगण्याचा यामध्ये प्रयत्न केला जातो."
आई-वडिलांचा मार खाण्यापासून कौतुकापर्यंत
MC तोडफोड-धर्मेशचं कुटुंब मुंबईतील दादर परिसरात नायगाव भागातील BDD चाळीत राहतं. धर्मेशच्या आईचं नाव रेखा परमार तर वडिलांचं नाव नरेश परमार.
101 इंडियाच्याच व्हीडिओमध्ये नरेश परमार सांगतात, "धर्मेश जसं लिहितो, ते खूपच क्रांतिकारी आहे. समाजावर परिणाम होईल, अशा प्रकारचं त्याचं लेखन आहे."
धर्मेश उर्फ MC तोडफोडने जेव्हा रॅप लिहिण्याची सुरुवात केली, त्यावेळी त्याने घरच्यांकडून बराच मारही खाल्लेला आहे, असं त्याची आई रेखा परमार यांनी सांगितलं.
त्या म्हणतात, "सुरुवातीच्या काळात त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या रॅप लिहिण्याला विरोध केला होता. पण मला रॅप करायला जायचं म्हणजे जायचं, अशीच धर्मेशची भूमिका असायची. तो प्रचंड जिद्दी होता. मी त्याला म्हणायचे, आधी तू तुझं शिक्षण पूर्ण कर, त्यानंतर तुला जे करायचं आहे, ते काहीही कर. मुलांनी आपल्या आई-वडिलांचं ऐकायला हवं.
MC तोडफोडच्या निधनानंतर त्याच्या आईने माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्याच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती दिली. त्या म्हणाल्या, "धर्मेश हा चार महिन्यांपूर्वी मित्रांसोबत फिरायला लडाखला गेला होता. त्यावेळी तिथ त्याला पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका बसला होता. यामुळे त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर काही महिन्यांनी त्याला पुन्हा दुसरा झटका बसला. गेल्या चार महिन्यांत त्याला दोनवेळा हृदयविकाराचा झटका बसला.
पण प्रकृती नाजूक असूनसुद्धा धर्मेश बिलकुल विश्रांती घेत नव्हता. त्याच्या डोक्यात नेहमी रॅप करण्याबाबत सुरू असायचं. याच कारणामुळे आमचा मुलगा आमच्या हातून निघून गेला. आम्ही काहीही करू शकलो नाही, असं म्हणत आई रेखा परमार यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
रणवीर सिंह, सिद्धांत चतुर्वेदी, झोया अख्तर यांच्याकडून श्रद्धांजली
रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 2019 सालच्या 'गल्ली बॉय' सिनेमात साऊंडट्रॅक आर्टिस्ट म्हणून धर्मेशनं काम केलं होतं.

फोटो स्रोत, INSTAGRAM/@RANVEERSINGH
रणवीर सिंगनं इन्स्टाग्राम स्टोरीत धर्मेचा फोटो ठेवून, त्यावर दु:ख व्यक्त करणारी इमोजी पोस्ट केलीय, तर सिद्धांत चतुर्वेदीने धर्मेशच्या फोटोवर #RIPbhai म्हटलंय.

फोटो स्रोत, INSTAGRAM/@SIDDHANTCHATURVEDI
तर झोया अख्तरनं धर्मेशचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलंय की, "तू खूप लवकर गेलास. या आयुष्यात आपण भेटल्याचं मला माझं भाग्य वाटतं."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 2

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








