झुंड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'त्या' फोटोविषयी नागराज मंजुळे म्हणाले...

झुंड चित्रपटातील दृश्य

फोटो स्रोत, T-Series

फोटो कॅप्शन, झुंड चित्रपटातील दृश्य

नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट शुक्रवारी 4 मार्चला प्रदर्शित झाला आहे.

पण, प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची फ्रेम असो की झोपडपट्टीतील कलाकारांचा सहभाग, या अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे हा चित्रपट चर्चेत होता.

या चर्चा आणि एकंदरीत हा चित्रपट बनवण्याचा नागराज मंजुळे यांचा अनुभव बीबीसीनं जाणून घेतला. बीबीसीसाठी सुप्रीया सोगळे यांनी नागराज मंजुळे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा संपादित अंश इथं देत आहोत.

डॉ. बाबासाहेबांची ती फ्रेम...

झुंड हा एका क्रीडा प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची कथा आहे. त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देऊन एक फुटबॉल टीम तयार केली होती.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक दृश्य आहे ज्यामध्ये अमिताभ बच्चन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर हात जोडून उभे आहेत. सोशल मीडियावर ह्या दृष्याबाबत खूप चर्चा आहे.

या दृष्याविषयी नागराज मंजुळे अधिक सांगतात, "बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरून मी चालतो."

ते पुढे म्हणतात, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपटात दिसले, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. असं पहिल्यांदाच झालं आहे की एक मोठे नायक बाबासाहेबांसमोर हात जोडून उभे आहेत. आपल्याकडे असे खूप महापुरूष आहेत ज्यांना आपण पूर्ण पाहत नाही, समजून घेत नाही.

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देश आणि जगासाठी खूप महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत. लेखक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी आहेत. ज्यावेळेस मी त्यांचे चित्र बघतो त्यावेळेस मला काहीतरी प्रेरणा मिळतेच."

अमिताभ बच्चनसोबत काम करण्याचे स्वप्न

नागराज मंजुळे स्वतःला अमिताभ बच्चन यांचे मोठे चाहते समजतात. त्यांच्याविषयी बोलताना नागराज म्हणतात, "मी त्यांचे सिनेमे बघत मोठा झालो आहे."

नागराज मंजुळे जेव्हा पहिल्यांदा झुंडची कहाणी ऐकवण्यासाठी अमिताभ यांच्याकडे गेले, तेव्हाचा अनुभव अविश्वसनीय असल्याचं ते सांगतात.

बच्चन यांच्याबरोबर काम करणं हे त्यांचं एक स्वप्न होतं, जे त्यांना करिअरच्या सुरुवातीच्या काळातच पूर्ण झालं. बच्चन यांच्यासोबत चित्रपट करण्याची संधी मिळाली, याचं श्रेय ते सैराट चित्रपटाला देतात.

नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, Universal PR

फोटो कॅप्शन, नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन

त्यांचं असं मत आहे की, सैराटमुळे त्यांना सगळीकडे प्रसिद्धी मिळाली आणि लोक त्यांना ओळखायला लागले.

सैराटमुळे त्यांना काम करायला सोपं गेलं. सैराटमुळे त्यांच्या आयुष्यात खूप बदल झाला आणि यामुळेच झुंड सारखा चित्रपट बनवला गेला.

नागराज सांगतात, "तुमचं काम चांगलं असेल तर लोक तुमचं काम बघण्यास इच्छुक असतात. सैराटमुळेच झुंडचे निर्माते आणि अमिताभ बच्चन यांना आमच्यावर विश्वास बसला की सैराटप्रमाणे यानंतरही नागराज भविष्यात चांगले चित्रपट बनवतील."

चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला झुंड हा चित्रपट अभिनेता आमिर खान यांनाही खूप आवडला. त्यांनी भरपूर कौतूक करून दाद दिली. आमिर खान यांच्यासोबत काम करण्याची इच्छा नागराज मंजुळे यांना खूप दिवसांपासून होती. पण आजपर्यंत एकदाही योग आलेला नाही.

असं असलं तरी नागराज मंजुळे यांनी आयुष्यात एकदा तरी आमिर खान यांच्याबरोबर काम करण्याचं मनाशी पक्कं केलं आहे.

पुरस्कार आणि त्यांचा अर्थ

नागराज मंजुळे म्हणतात की, "पुरस्कार मिळणं म्हणजे कौतुक मिळण्यासारखं आहे."

नागराज मंजुळे यांना त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार 'पिस्तूल्या' या चित्रपटासाठी मिळाला. तो पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला की ते चांगले चित्रपट बनवतात.

त्यांच्यातसुध्दा एक आत्मविश्वास वाढीस लागून फॅन्ड्री सारखा चित्रपट नंतरच्या काळात बनवला गेला आणि त्या चित्रपटाला देखील 'राष्ट्रीय पुरस्कार' मिळाला.

नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, Universal PR

चार राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या नागराज मंजुळे यांना आणखी पुरस्कार हवे आहेत. पण, काम करत राहणं त्यांच्यादृष्टीनं महत्त्वाचं आहे. मग तुम्हाला पुरस्कार मिळो किंवा न मिळो.

पुरस्काराकडे डोळे लावून बसणं चुकीचं ठरेल, असंही त्यांना वाटतं.

पॅन इंडिया चित्रपट आणि मराठी चित्रपट

बाहुबली चित्रपटाच्या यशानंतर पॅन इंडिया चित्रपटांची दक्षिण भारतीय चित्रपटांमधून सुरुवात झाली.

पुष्पा, के. जी. एफ ही त्याची उदाहरणं ठरली आहेत.

मराठी पॅन इंडिया चित्रपटाविषयी बोलताना नागराज मंजुळे म्हणतात, "चांगलं काम केलं तर मराठी चित्रपसृष्टीदेखील आपल्या सीमेबाहेर जाईल. मला खूप आनंद होईल की, ज्यावेळेस मराठी चित्रपट संपूर्ण भारतात बघितल्या जातील, जसे आपण इतर राज्यातील चित्रपट पाहतोय."

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, Universal PR

फोटो कॅप्शन, अमिताभ बच्चन

ते पुढे म्हणतात, "नटसम्राटसारखे खूप चांगले मराठी चित्रपट बनत आहेत. किल्ला, नाळ या मराठी चित्रपटांमध्ये क्षमता आहे, परंतू आपण काही गोष्टींमध्ये थोडं दुर्लक्ष करतो. मराठी चित्रपटांची व्याप्ती वाढेल याची मला खात्री आहे आणि मराठी चित्रपट संपूर्ण जग बघेल, असा विश्वासही आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)