मी वसंतराव : शेजाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून वसंतराव देशपांडे कसा रियाज करायचे?

फोटो स्रोत, Rahul Deshpande/ Facebook
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"माझे वडील गेल्यानंतर आमच्या घरची परिस्थिती बेताची झाली होती. एके दिवशी आईने मला बाजारात पाठवलं. बाजारातून येता येता पाऊस पडू लागला. मी एका इमारतीखाली आसरा घेतला होता. त्या इमारतीतून गाण्याचे स्वर ऐकू येत होते. नागपुरातली श्रीराम संगीत विद्यालयाची ती इमारत होती. वरून राग भुपाळीचे स्वर ऐकू येत होते. मी ते स्वर आणि शब्द ऐकून तसं गाण्याचा प्रयत्न करू लागलो. मी गाणं म्हणण्यात इतका गुंग झालो होतो की मागून एक व्यक्ती आली आणि माझ्या मागे उभी राहिली ते कळलंही नाही.
ती व्यक्ती म्हणजे त्या संगीत विद्यालयाचे शिक्षक शंकरराव सप्रे होते. माझं गाणं ऐकलं आणि म्हणाले की तुला माझ्याकडून गाणं शिकायचं आहे का? ते माझ्याबरोबर घरी आले. माझ्या आईची समजूत घातली, तिची परवानगी घेतली आणि मला मोफत गाणं शिकवायला सुरुवात केली."
वसंतराव देशपांडे आपल्या गायनाची सुरुवात कशी झाली हे सांगताना हा किस्सा उद्धृत करतात. वसंतराव देशपांडे हे नाव शास्त्रीय संगीताशी समानार्थी झालं आहे. त्यांचं गाणं महाराष्ट्राच्या घराघरात ऐकलं जातं. त्यांच्या गाण्याशिवाय गणेशोत्सवाची सुरुवात होत नाही. त्यांचं 'दाटून कंठ येतो' या गाण्याच्या सुरावटीशिवाय महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला विवाह सोहळा अपूर्ण असतो. हे गाणं ऐकल्यावर डोळ्याचा कडा ओलावल्या नाहीत अशी व्यक्ती महाराष्ट्रात सापडणं दुर्मिळात दुर्मिळ आहे. ही गाणी फक्त वानगीदाखल आहे. त्यांच्या गाण्याचा कॅनव्हास मोठा आहे. या कॅनव्हास वरची काही रेखाचित्रांवर एक नजर टाकूया.
वसंतराव देशपांडेंचा जन्म शेतकरी कुटुंबात 2 मे 1920 ला झाला. त्यांच्या जन्मानंतर सहा वर्षानंतरच दारिद्र्याला सामोरं जावं लागलं. त्यांचे आजोबा गोविंदराव देशपांडे व्यावसायिक गायक होते. त्यांचे वडील बाळकृष्णबुवा पंत तबलावादक होते. त्यामुळे संगीत वसंतरावांकडे आपसूकच चालत आलं. त्यांनी भक्तिगीतं म्हणायला सुरुवात केली.
वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईने नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांनी शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. आता परिस्थिती बेताची झाली होती. त्यामुळे लहानग्या वसंताला तुलनेने स्वस्त शाळेत घालण्यात आलं होतं. मात्र संगीत आणि अभिनय काही त्यांची पाठ सोडायला तयार नव्हतं.
एकदा भालजी पेंढारकर वसंतरावांच्या गाण्याने इतके प्रभावित झाले की ते वसंतरावांना कोल्हापूरला घेऊन गेले. त्यांच्या 'कालियामर्दन' या चित्रपटात वसंतरावांना कृष्णाची भूमिका देण्यात आली. हा चित्रपट 1933 साली प्रदर्शित झाला आणि चांगलाच गाजला. मात्र वसंतरावांना एका वेगळ्याच कारणाने त्याचा फायदा झाला. सिनेलेखिका सुशीला मिश्रा यांच्याशी बोलताना ते सांगतात, "माझं कोल्हापूरातलं वास्तव्य अनेक अर्थाने संस्मरणीय होतं. त्यावेळी मला उस्ताद अल्लादिया खान, भुर्जी खान, घम्मन खान शंकरराव सरनाईक, गोविंदराव टेंभे यांच्यासारख्या अनेक लोकांचा सहवास लाभला. मास्टर दीनानाथ मंगेशकरांसारख्या लोकांकडून मला गाणं शिकण्याची संधी मिळाली."
मास्टर दीनानाथांचा प्रभाव
गाण्याचा स्टेज दिवसेंदिवस वसंतरावांना भुरळ घालत होता. त्यांच्यावर मास्टर दीनानाथ मंगेशकरांचा खूप प्रभाव होता. त्यांचं गाणं ऐकण्यासाठी ते नागपूरहून अमरावतीला जायचे.वसंतरावांना अशा अनेक प्रथितयश गायकांचं गाणं ऐकण्याची संधी मिळाली. त्यांचे गुरू शंकरराव सप्रे यांनीही वसंतरावांना हवी ती गाणी ऐकण्याची मुभा दिली.

फोटो स्रोत, Rahul Deshpande/facebook
वसंतरावांच्या मामांनी त्यांना काही काळ लाहोर ला नेले. तेथेही त्यांच्यावर गाण्याचे संस्कार झाले. अनेक थोर गायकांना ऐकायची संधी मिळाली. मात्र हे विश्व कितीही समृद्ध असलं तरी संसार, पैसा या गोष्टी कुणालाही चुकल्या नाही. वसंतरावही त्याला अपवाद नव्हते.
वाटेवर काटे वेचित चाललो….
उत्तमोत्तम संगीत ऐकून वसंतरावांचे कान श्रीमंत झाले तरी प्रत्यक्ष आयुष्यात त्यांची परिस्थिती अगदीच हलाखीची होती. त्यामुळे पुण्यात त्यांनी अरुण पिक्चर्स या संस्थेत नोकरी स्वीकारली. पगार अवघा 30 रुपये. पुढच्याच वर्षी त्यांना सरकारी नोकरी मिळाली. आता त्यांचा पगार होता 300 रुपये. वसंतरावांच्या आईला प्रचंड आनंद झाला.
मात्र ही नोकरी वसंतरावांना अजिबातच पसंत पडलेली नव्हती. तरीही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी तब्बल 24 वर्षं ही नोकरी केली. नोकरीबरोबरच संगीताची साधना सुरू ठेवली. नोकरीत त्यांचं मन लागत नव्हतंच पण रियाजालाही त्यांना वेळ मिळत नव्हता.
संध्याकाळी सात ते नऊ ते रियाज करत असत. ते झाल्यानंतर डोक्यावरून चादर घेत आणि हार्मोनियमला कापडाने झाकून पहाटेपर्यंत रियाज करत. घरच्यांना आणि शेजारच्यांना त्रास होऊ नये हा त्यामागचा त्यांचा उद्देश होता.
आपल्या आवाजाबद्दल बोलताना वसंतराव एके ठिकाणी म्हणतात, "माझा आवाज खरंतर जाड होता. खर्जाचा रियाज आणि साधनेमुळे मी माझ्या आवाजावर ताबा मिळवला आणि मग मी अवघड तानाही सहज गाऊ लागलो."
1950 मध्ये ते उस्ताद अमन अली खान यांचे गंडाबंद शिष्य झाले आणि त्यांचं आयुष्य बदललं. वसंतरावांना अमन अली खान यांच्या अनेक मैफिलींना साथ देण्याची संधी लाभली. तिथे त्यांना बेगम अख्तर यांचा सहवास लाभला. त्यांनी वसंतरावांना अनेकदा नोकरी सोडून पूर्णवेळ गायकी करण्याचा सल्ला दिला. त्याचा फारसा परिणाम झाला नाही. बेगम अख्तर यांनी ही मोहीम आणखी तीव्र केली आणि अखेर 1966 मध्ये वसंतरावांनी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ गायक झाले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. एक वेळ अशी आली की वसंतरावांच्या तारखा मिळवण्यासाठी महिनोंमहिने वाट पहावी लागायची.
खयाल, ठुमरी, दादरा, तराणा, टप्पा, गझल, भजन, मराठी गाणे अशा गाण्यांच्या अनेक प्रकारांत त्यांनी मुशाफिरी केली. भारताबरोबरच त्यांनी रशिया, इंग्लंड या देशातही गाण्याचे कार्यक्रम केले. संगीत नाटकाच्या क्षेत्रात 'कट्यार काळजात घुसली' या संगीत नाटकातली खान साहेबांची भूमिका वसंतरावांची सगळ्यात विशेष होती.
'मी ज्या संगीतकारांचा आदर करतो त्यांचा मी शिष्य होतो' असं ते म्हणायचे.
एकदा एका कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक आणि नाटककार विजय तेंडुलकर वसंतरावांबद्दल बोलताना म्हणाले, "जगण्याची आणि आणि माणसाकडे पाहण्याची जी आरपार नजर वसंतरावांकडे होती ती पु.ल. देशपांडे कडेही नव्हती. वसंतरावांकडे जगण्याचा मजकूर होता. माणसाच्या भावभावनांकडे पाहण्याकडे त्यांच्याकडे ताकद होती. त्यांनी गाण्याबरोबर लिहावं अशी माझी फार इच्छा होती. त्यांनी ते केलं नाही."
सुरांची बरसात पुढच्या पिढीतही.
वसंतराव देशपांडेचे नातू राहुल देशपांडे यांनी हा गाण्याचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. वसंतरावांची गाणी आताच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आजोबांबद्दल बोलताना राहुल देशपांडे एका लेखात म्हणतात, "गाण्याचा साधक म्हणून मी जेव्हा त्यांच्याकडे पाहतो तेव्हा मला त्यांच्या मोठेपणाची जाणीव होते. रुढार्थाने मी त्यांच्यासमोर बसून गाणं शिकलेलो नाही, तरीही तेच माझे गुरू आहेत. कोणताही राग सादर करताना, बंदिश गाताना, त्यांच्यातील सौंदर्य उलगडताना ते सांगितिक विचारांची बैठक सोडत नव्हते. कित्येक गायकांना ते जमतंच असं नाही. परंतु वसंतराव ते करत असत."

फोटो स्रोत, Rahul Deshpande/Facebook
गाण्याच्या सर्व प्रकारांवर त्यांचं मनापासून प्रेम केलं. मधुकर वृत्तीने त्यांनी सर्व घराणांच्या गायकीतील सुंदर ते वेचलं. त्यांचं गाणं घराणेदार असलं तरी कुठल्या एका चौकटीत बसणारं नाही. म्हणून माझं घराणं माझ्यापासून सुरू होतं असं ते म्हणत असत.
"वसंतराव गाणं काळाच्या 50 ते 70 वर्षं पुढचं होतं. त्यामुळे वसंतराव हे आताच्या काळात जन्माला यायला हवे होते. माझा गळा गात होता तेव्हा दारं बंद केली. आता नरडं झालं तर सगळे वसंतराव गा असं म्हणणारे रसिकच कमनशिबी म्हणायला हवेत. गळ्यांमध्ये सुरांची दौलत आहे ना. मग गळ्यामध्ये हार नाही पडले म्हणून बिघडलं कुठे असं वसंतराव नेहमी म्हणायचे." राहुल पुढे लिहितात.
वसंतरावांच्या शेवटच्या दिवसात त्यांना हृदयरोगाने ग्रासलं होतं. त्यांना लखनौला जाऊन संगीतात काही संशोधन करायचं होतं मात्र ते त्यांना जमलं नाही. जुलै 1981 मध्ये एका वर्तमानपत्राने त्यांच्या मृत्यूची खोटी बातमीही छापली.
पुढे त्यांचा हृदयरोग आणखी बळावला आणि 30 जुलै 1983 हा दैवी स्वर कायमचा शांत झाला. त्यांची गाणी आजही विविध प्रसंगात म्हटली जातात, वाजवली जातात. वसंतरावांच्या सुरांचा वसंत ऋतू वर्षभर फुललेला असतो.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








