नागराज मंजुळे : 'झुंड' पाहा आणि मग ठरवा त्यात काय चुकीचं आहे ते...

फोटो स्रोत, Instagram
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा झुंड चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची, समीक्षकांची, इंडस्ट्रीतल्या कलाकारांचीही पसंती मिळत आहे. पण त्याचबरोबर सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटत आहेत. यातील काही प्रतिक्रिया या जातीय अंगाने जाणाऱ्याही होत्या.
एकीकडे झुंडला मिळणारा प्रतिसाद आणि दुसरीकडे सोशल मीडियावरील चर्चा याबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळेंना काय वाटतं? झुंडमधल्या व्यक्तिरेखा नागराज यांनी कशा निवडल्या? अभिनयाची पार्श्वभूमी नसलेल्या कलाकारांना घेऊन चित्रपट बनविण्यामागची नागराज यांची भूमिका काय असते? या आणि अशा मुद्द्यांवर नागराज मंजुळे यांच्याशी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी अमृता कदम यांनी संवाद साधला. या मुलाखतीचा हा संपादित अंश.
झुंडला प्रेक्षक, समीक्षक, सहकलाकारांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल काय वाटतंय?
सगळ्यांना सिनेमा आवडतोय याचा खूप आनंद वाटतोय. अनुराग कश्यप, आमीर खान, धनुष यांच्यासारख्या दिग्गजांच्या प्रतिक्रिया आल्या. रणबीर कपूर यांचा मेसेज आला. हा प्रतिसाद पाहून एक फिल्ममेकर म्हणून आनंद वाटतोय.
चित्रपटात एकीकडे महानायक अमिताभ बच्चन आहेत, तर दुसरीकडे अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली मुलं आहेत. हा सगळा मेळ कसा घातला? त्यांना एकत्र घेऊन काम करतानाची प्रोसेस कशी होती?
ही फिल्म करणार आहे, असं ठरल्यानंतर मी रिसर्च केला, लिहायला लागलो. सिनेमा लिहायला घेतला तेव्हाच अमिताभ बच्चन यांना घेऊन करायचं हे नक्की होतं. त्यांना ही कथा ऐकवली, त्यांनाही आवडली. मग ही झोपडपट्टीतील मुलं शोधायची होती. त्यांच्यावरच ही गोष्ट आधारित होती आणि अशीच मुलं शोधायचीयेत म्हटल्यावर नागपुरात जाऊन आम्ही त्यांचं कास्टिंग केलं. यातली बहुमतांशी मुलं नागपूरची आहेत. फिल्मची भाषाही नागपूरचीच आहे.

फोटो स्रोत, UNIVERSAL PR
आपली गोष्ट नागपूरमध्येच घडते, त्यामुळे ही सगळी मुलं गोळा केली. शूटच्या आधी जवळपास दीड वर्षं ही मुलं माझ्यासोबत होती. शूट लांबल्यामुळे आम्हाला अधिक वेळ मिळाला. आमचा सेट पुण्यातून काढला. नाहीतर आधी आम्ही फिल्म पुण्यात करणार होतो. त्यातही वेळ गेला आणि आम्हाला वर्षं-दीड वर्षं मिळालं.
नाहीतर आधी तीन-चार महिने ही मुलं माझ्यासोबत असणार होती, ती पुढे दीड वर्षं राहिली.
अमिताभ बच्चन यांना जेव्हा तुमचे सहकलाकार ही नवखी मुलं असणार आहेत, हे सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती?
बच्चनसाहेबांना जेव्हा मी कल्पना सांगितली तेव्हा त्यांची काही हरकत नव्हती. तुला जसं वाटतंय तसं कर असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना सांगितलं की, मला वाटतंय तुम्ही एकटेच असावं आणि दुसऱ्या बाजूला ही नवीन मुलं असावीत. त्यांनी ते मान्य केलं, त्यांनाही ते आवडलं.
झुंडप्रमाणेच तुमच्या सैराट, फँड्रीमध्येही असे चेहरे दिसतात, जे गर्दीतले असतात. आपल्या आजूबाजूला दिसणारे असतात. अशाप्रकारे कलाकार निवडण्यामागची भूमिका काय आहे?
एकतर जे कॅरेक्टर आहेत, त्यांची गरज जशी असते तसे चेहरे दिसले पाहिजेत. दुसरं म्हणजे मी स्वतः गावाकडे राहायचो, तेव्हा वाटायचं की आपल्यालाही काम करायला मिळेल. आपल्या इंडस्ट्रीमध्ये तेवढं तेवढंच वर्तुळ आहे. पुण्यामुंबईतच सगळ्या गोष्टी घडतात. आमच्या लातूर, सोलापूरसारख्या ठिकाणी ही गंगा वाहतच नव्हती. असं नाही की आधी काही घडलं नव्हतं. बरेच लोक गावाकडूनही या क्षेत्रात आलेत. पण जब्यासारखं पात्र निवडायचं असेल, तर कोणत्याही फिल्म स्कूलमध्ये असं पोरगं सापडलं नसतं. त्यामुळे मग ही पात्रं तुम्हाला गावात जाऊन, ज्या मातीत ही गोष्ट घडलीये तिथेच ती शोधावी लागतात.

फोटो स्रोत, Instagram/ Nagraj Manjule
झुंडमधली मुलं, त्यांची भाषा, जी माझ्या डोक्यात होती, तिथे जाऊनच कास्टिंग केलं. शिवाय ठराविक वर्तुळाबाहेरही चान्स मिळायला हवा.
या चेहऱ्यांच्या सिनेमातल्या व्यक्तिरेखाही अशाच असतात, ज्यांचं अस्तित्व पांढरपेशा समाजात दबून राहिलं आहे.
माझ्या लिखाणाचाच कदाचित हा पोत आहे. माझ्या कथा, माझी पात्रं तशीच आहेत. म्हणून कास्टिंगही तसंच होत आहे. ते खूप स्वाभाविक आहे. तुमचं जे एक्सप्रेशन आहे, तेच तुम्ही लिहिता आणि त्याच पद्धतीचे लोक शोधता, तसंच कास्टिंग करता.
पूर्वी एक समज असायचा की, वास्तववादी सिनेमा म्हणजे कंटाळवाणा आणि मनोरंजन असलं की तो सिनेमा वास्तवाशी फटकून. पण तुमच्या सिनेमात दोन्हीचा मेळ असतो. सिनेमाची सगळी परिमाणं वापरत असताना तुम्हाला जे सांगायचंय त्यावरची पकड सुटत नाही…
खरं आहे. तुम्ही सिनेमा बनवता तेव्हा वास्तव जसं आहे तसं दाखवू शकत नाही. फिल्म हे तुमच्या हातातलं माध्यम आहे. त्याच्या फॉर्ममध्येच तुम्हाला जे सांगायचं आहे ते सांगू शकता. कारण माणसांना मजाही यायला हवी. ते फिल्म पाहायला येतात, मी खरंखुरं जगणं जसंच्या तसं दाखवू शकत नाही.

फोटो स्रोत, Instagram/Nagraj Manjule
फिल्म बनवताना त्याच्या सगळ्या अंगांचाही वापर करायला हवा आणि मी तो तसा करतो.
तुमच्या सिनेमातून जातीय भान देण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो. पण सध्या आपलं इतकं ध्रुवीकरण झालंय, इतकी मतमतांतरं असतात. अशावेळी आपल्याला जे सांगायचं आहे, ते सांगणं किती आव्हानात्मक वाटतं?
तुमच्या मेसेजपेक्षाही तुमचा हेतू महत्त्वाचा असतो. माझ्या फिल्ममधून तुम्ही शोधून काढला तर तुम्हाला तो हेतू कळेल. माझा संदेश हा कधीच नाही की एकमेकांचा द्वेष करावा. मी म्हणतोय म्हणून नाही, पण तुम्हीही शोधून पाहा माझ्या चित्रपटात. तुमचा हेतू जर करुणेचा, प्रेमाचा असेल तर घाबरायची गरज नाही. आपण बसल्या बसल्या लोकांना शिव्या देतो, भेदभाव करतो त्याला घाबरायची गरज आहे. फिल्ममधून किंवा कोणत्याही एक्सप्रेशनमधून जोपर्यंत तुम्ही जातीच्या पलिकडे जाऊन माणूस म्हणून माणसाच्या चांगल्यासाठी बोलत असाल तर घाबरायची गरज नाही.
हेतू महत्त्वाचा असतो, पण त्याचा चुकीचा अर्थही काढला जाऊ शकतो. झुंडच्या निमित्तानं तुम्हालाही हा अनुभव आला आहे.
हो, पण असे लोक कमी आहेत. हे बिनचेहऱ्याचे लोक आहेत. सोशल मीडियावर जे बोलताहेत, त्याला मी काही फार गांभीर्यानं घेत नाही, घ्यायची गरजही नाही. कारण तिथं लोक जास्त लाऊड असतात. कौतुक करतानाही लाऊड असतात आणि टीका करतानाही.
पण कधीकधी हा आवाज इतका मोठा होतो की आपली बाजू मांडावी लागते. झुंडच्या बाबतीतही असं झालंय? लोक हा 'आमचा' सिनेमा, हा 'तुमचा' सिनेमा इथपर्यंत जाऊन लोक बोलतात.
हे गंमतीशीर आहे. हे फक्त झुंडच्या बाबतीत नाही, तर अनेक बाबतीत घडतंय. सोशल मीडिया कोणता गाळ वर आणेल हे सांगता येत नाही.

फोटो स्रोत, T-SERIES
आपलं टेम्परामेंटही कमी झालंय. वीस सेंकद, दहा सेकंदाचे व्हीडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहता आणि पुढे जाता. प्रत्येक जण इथे बोलतोय. आणि त्या गोंगाटात कोण खरं, कोण खोटं हे कळत नाही.
पण चांगल्या कलाकृतीला असं जातीय चौकटीत बांधल जातं तेव्हा काय वाटतं?
'झुंड' पाहा आणि मग सांगा काय चुकीचं आहे त्यात. माझ्या कोणत्याही फिल्ममध्ये स्वार्थाचा हेतू नाहीये. आपण जे बोलतोय ते प्रेमाचं, मूल्याचं आहे हे मला चांगलं माहितीये.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








