झुंड, पावनखिंड: ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला का फुटलंय तोंड?

फोटो स्रोत, T-Series
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी
'झुंड' या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. पण त्या चर्चेनं जातीभेदाचं वळणंही घेतल्याचं सोशल मीडियावर दिसत आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रातल्या ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशा वादावरही त्यातून पुन्हा चर्चा होते आहे.
नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखा अभिनेता असल्यानं प्रदर्शित होण्याआधीपासूनच 'झुंड'विषयी उत्सुकता ताणली गेली होती.
तसं कुठलाही चित्रपट आला, की तो आवडलेले आणि न आवडलेले असे दोन गट पडतात. पण झुंडच्या बाबतीत लोकांच्या प्रतिक्रियांची जातीनुसार वर्गवारी करण्याचा प्रयत्न काहींनी केला.
कट्टर चाहत्यांच्या फिल्मविषयीच्या भावना तीव्र असतात आणि ते त्या तीव्रतेनं मांडतातही. मात्र 'आपला' आणि 'परका' अशी विभागणी सोशल मीडियावर होताना दिसू लागली.
झुंड, पावनखिंड, गंगूबाई काठियावाडी, यापैकी कुठल्या कुठल्या चित्रपटाला सपोर्ट करायचं हे ठरवताना हे लोक दिग्दर्शकाच्या जातीचा आधार घेत आहेत.
जातीच्या आधारे झुंड पाहावा की पावनखिंड यावरूनही सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. पावनखिंडमधलं मुख्य पात्र असलेले बाजीप्रभू देशपांडे हे जातीनं कायस्थ होते आणि या चित्रपटातले अनेक कलाकार कोकणस्थ ब्राह्मण आहेत, अशी किनारही या चर्चेला आहे.
जात वास्तवावरचं भाष्य
एरवी गावकुसाबाहेर, 'भींतीपलीकडे' असलेल्या लोकांना नागराज मंजुळेंनी फँड्री, सैराट आणि अन्य चित्रपटांमधून प्रकाशझोतात आणलं.
त्यांचे चित्रपट समाजातल्या जात वास्तवावर भाष्य करणारे आणि लोकांच्या डोळ्यात एकप्रकारे अंजन घालणारे म्हणून नावाजले गेले. झुंडचाही त्याला अपवाद नाही.
ट्रेलरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभे असलेल्या अमिताभ यांची एक फ्रेम दिसली, तिच्यातही याच गोष्टीचं प्रतिबिंब पडलं. बाबासाहेबांचं हे चित्रण आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं नागराज मंजुळे बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.

फोटो स्रोत, Universal PR
पण नागराज असे पूर्वग्रह मोडून काढत असताना, त्यांच्या काही चाहत्यांनी त्याच पूर्वग्रहातून आपली मतं व्यक्त होत आहेत.
दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांना काहीसा असाच अनुभव आला आणि त्याविषयी त्यांनी फेसबुकवर लिहिलंही आहे.
झुंडच्या ट्रेलरवर शुभेच्छा दिल्या, तेव्हा एका व्यक्तीनं 'तुम्ही आणि सुमित्रा भावे 'झुंड' सारखा चित्रपट करू शकला नाहीत, कारण तुमची ती लायकीच नाही' अशा आशयाची कमेंट केल्याचं सुकथनकर सांगतात.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 1
ते म्हणतात, "प्रत्येक चित्रपट आपापलं जातवास्तव घेऊनच येत असतो. विषय-आशय मांडणी सगळ्यांत एक राजकारण दडलेलं असतं, असायलाच हवं. अगदी टाईमपास म्हणून बनवले गेलेले चित्रपटही यापासून दूर राहू शकत नाहीत. प्रश्न एवढाच उरतो की त्या त्या जातीतल्या प्रस्थापित व्यवस्थेतल्या हिणकस गोष्टींना तो चित्रपट सवाल करतो की फक्त त्या त्या जातीची खोटी फुगवलेली 'अस्मिता' गोंजारतो!"
ते पुढे म्हणतात, "चित्रपट दुनियेची जाती-पोटजातीत विभागणी करायला टपलेल्या विविध भक्तांनो, आधी उठा आणि निरनिराळे चित्रपट आळस न करता पहा… मग बोला !"
ही वर्गवारी कशासाठी?
उजव्या विचारसरणीच्या स्तंभलेखिका शेफाली वैद्य यांची एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली. "इतका राग होता 'उच्चवर्णीय प्रस्थापितांवर' तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?" असा प्रश्न त्यांनी विचारला आणि जातीचा मुद्दा आणखी चर्चेत आला.

फोटो स्रोत, Universal PR
चित्रपटसृष्टीशी निगडीत अनेकांनी याविषयी खंत व्यक्त केली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, "जात जात नाही, तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही. झुंड सिनेमा म्हणून पाहा."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ म्हणतात, "हिंदीबद्दल शेअर केलं तर मराठीबद्दल का नाही केलं? मराठी केलं तर 'त्यांचं' च केलंस 'आमचं' का नाही केलं! आडनावं पाहिली जातायेत! अरे!!! म्हणजे सगळं येऊन शेवटी 'तिथंच' अडतंय!"
हेमांगी पुढे लिहितात "किती काळ आणि वर्ष जाणार आहेत अजून त्यांचं आमचं मिटवायला? मग कशासाठी आणि कोणासाठी बनतायेत सिनेमे? ज्यांनी खरंच बघायची गरज आहे ते चाललेत आपले कट्टरतेच्या दिशेने. ज्याचा शेवट भयंकरच आहे. बरं हे भयंकर आहे हे कुणाला वाटतंय? तर मधल्या लोकांना! मस्त!"
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 2
लेखक-दिग्दर्शक आणि समीक्षक गणेश मतकरी फेसबुकवर लिहितात, "झुंड, बॅटमॅन, पावनखिंड, गंगूबाई यांचे सोशल मिडियावर एवढे गट का पडलेत? गेल्या वर्षी काहीच पाहाता येत नव्हतं. आता येतंय तर पहा मजेत सगळेच किंवा कोणतेही."
मतकरी यांनी आणखी एका पोस्टमध्ये झुंडचं समीक्षण करणारे मुद्दे मांडले आहेत. "ते म्हणतात, चित्रपट म्हणून झुंड मधे निश्चितच काही त्रुटी आहेत. पण तरीही तो जरुर चालावा आणि अधिकाधिक लोकांनी तो पाहावा. कारण तो जे सांगतोय ते दुर्लक्ष करण्यासारखं नाही."
एखाद्या कलेचा आस्वाद न घेता, चित्रपट न पाहताच त्याविषयी आपलं मत बनवणं योग्य नसल्याचं लेखक आणि माजी संपादक गणेश कनाटे सांगतात.
ते लिहितात "आता कलाकृती बघण्याआधीच ती निर्माण करणाऱ्या कलावंताची जात, धर्म, लिंग, राष्ट्रीयता बघून काही मंडळी कलाकृतीबद्दल स्वतःची ठाम मतं बनवून ती समाजमाध्यमांवर पेरून इतरांची मतं कलुषित करण्याचे काम करू लागली आहेत."

फोटो स्रोत, Universal PR
"कलेच्या क्षेत्रात जात, धर्म, प्रादेशिकता, राष्ट्रीयता आणि हीन दर्जाचे राजकारण घुसविणाऱ्यांना आपण काहीतरी महान काम करून आपापल्या जातींची, धर्मांची, प्रदेशांची, देशांची आणि शेवटी आपापल्या राजकीय विचारधारांची सेवा करत आहोत, असे जर वाटत असेल तर त्यांना स्पष्टपणे सांगितले पाहिजे की तुम्हाला वाटते ती सेवा तर यातून घडत नाहीच उलट नुकसान होत आहे."
महाराष्ट्राचे मुख्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी मांडलेली प्रतिक्रियाही बोलकी आहे. सुनील सुकथनकर यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना ते लिहतात, "समाजाचे जातीय ध्रुवीकरण इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेले आहे की झुंड सारखा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर सोशल मीडियावर जे काही घडते तो खरं म्हणजे आणखी एका चित्रपटाचा विषय ठरावा. लोक ज्या पद्धतीने आपला आणि त्यांचा चित्रपट असा भेदभाव करू लागतात, हे खरोखरच आपल्या चांगल्या सामाजिक आरोग्याचे लक्षण नाही आणि हे दोन्ही बाजूंनी होते आहे.
"माझ्या जगण्याच्या पलीकडील एक जगणे एक माणूस म्हणून समजून उमजून घेण्याची आपली कुवतच आपण हरवत चाललो आहोत का असे वारंवार वाटू लागते. वरवर पाहता एकत्र राहणारा जगणारा आपला समाज जातीय छावण्यांमध्ये विभागला गेला आहे की काय या कल्पनेनेही अंगावर काटा येतो."
चित्रपटांमधला ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर दृष्टीकोन
मराठी मनोरंजन क्षेत्राचा चेहरामोहरा शहरी, मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय असल्याची चर्चाही नवी नाही. दिग्दर्शक सुजय डहाकेनं दोन वर्षांपूर्वी हा मुद्दा मांडला होता, तेव्हाही असे प्रश्न विचारले गेले होते.
बीबीसी मराठीच्या अमृता कदम यांनी या लेखात त्याचा आढावा घेतला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








