अनिता दाते: 'किरण मानेंनी काही वेळा असभ्य भाषा वापरली, पण म्हणून ...'

फोटो स्रोत, Facebook/Anita Date
किरण माने यांना स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतून अचानक काढण्यात आले. राजकीय पोस्ट लिहिल्यामुळे या मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.
अभिनेता किरण माने यांच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाला आता सुरुवात झाली.
अभिनेत्री अनिता दाते यांनी किरण माने यांच्याबद्दल एक पोस्ट लिहिली. किरण मानेंना का पाठिंबा देत आहोत, हे त्यांनी या पोस्टमध्ये स्पष्ट केलं. त्यानंतर अनिता यांना काही जणांनी ट्रोलही केलं.
या प्रकरणाबद्दल तसंच कलाकारांनी आपली भूमिका मांडताना कोणतं भान ठेवावं? सोशल मीडियावरून होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल, आपल्या गैरसोयीचे विचार नाकारणाऱ्या मानसिकतेबद्दल काय वाटतं? या आणि अशा प्रश्नांबद्दल अभिनेत्री अनिता दातेंशी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी अमृता कदम यांनी साधलेला संवाद.

अभिनेते किरण माने यांना एका मालिकेतून अचानकपणे काढून टाकल्यानंतर खूप चर्चा सुरू झाल्या आहेत. पण या सगळ्या गदारोळात निर्मिती संस्थेनं केलेली कारवाई आणि कलाकाराची राजकीय-वैचारिक भूमिका हा मूळ मुद्दा मागे पडला का? तुम्ही स्वतःही किरण मानेंना पाठिंबा देताना जी पोस्ट लिहिली त्यात हाच मुद्दा मांडला होता...
बरोबर आहे. कलाकार म्हणून मला वाटतं की, कोणत्याही कलाकाराला त्याच्या कामावरून कमी करताना किमान त्याचं काय चुकलं हे निर्मिती संस्थेनं सांगायला हवं. याच कारणासाठी मी किरण मानेंची बाजू घेतली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
त्याने कोणती राजकीय पोस्ट करावी, कोणाची बाजू घ्यावी याबद्दल मला काहीही बोलायचं नाही. पण मला का काढलं, हे विचारायचा हक्क कलाकाराला आहे आणि निर्मिती संस्थेनं हे सौजन्य दाखवायला हवं.
आमचं जे कॉन्ट्रॅक्ट असतं, त्यामध्ये एक दिवस तुम्हाला अचानक काढण्यातही येऊ शकतं, असं म्हटलेलं असतं. पण मग त्यावेळी कलाकाराला आपल्याला का काढलं यासंबंधी त्याचे त्याचे अर्थ काढायला वाव राहतो.
मग अशावेळी तो कलाकार म्हणत असेल की, मला राजकीय पोस्टमुळे काढल्याची शक्यता आहे, तर त्याला तिथेच थांबवायला हवं. त्याला का काढलं याचं नेमकं कारण द्यायला हवं.
नाहीतर माझ्यासारख्या एखाद्या अभिनेत्रीच्या मनात अशी शंका येऊ शकते की, अशा प्रकारची दडपशाही होऊ शकते. म्हणून आपण कोणाच्या विरोधात असता कामा नये, कुठलीही राजकीय भूमिका घेता कामा नये. म्हणूनच निर्मिती संस्थेनं कारण द्यायला हवं होतं, असं मी म्हटलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
प्रत्येक व्यक्तीनं आपलं मत मांडलं पाहिजे, त्याला त्याचे विचार असायला हवेत आणि त्यानं ते योग्य शब्दांत मांडले पाहिजेत यावर मी ठाम आहे.
एकीकडे आपण कलाकारांनी भूमिका घ्यावी, असं म्हणतो. पण दुसरीकडे जर कलाकारानं घेतलेली भूमिका आपल्या सोयीची नसेल तर मात्र त्याला ट्रोलिंग, असभ्य भाषेत प्रत्युत्तर दिलं जातं...
हल्ली लोकांना त्यांच्या विरुद्ध विचारांचं बोललेलं आवडत नाही. खूप वेगळ्या पद्धतीनं घेतात ते. जातीयता अधिक तयार होते. आपण ट्रोल करणाऱ्यांना, विचित्र भाषेत बोलणाऱ्यांना थांबवू शकत नाही.
पण आपली ही भूमिका नक्की असली पाहिजे की, आपण योग्य शब्दांमध्ये आपलं मत समाजमाध्यमांतून किंवा कोणत्याही व्यासपीठावरून मांडलं पाहिजे. मग तुमची विचारसरणी डावी असो की उजवी असो...ते महत्त्वाचं नाहीये.
ती भूमिका मांडता येण्याचं स्वातंत्र्य असणं आणि कलाकाराची तशी वैचारिक भूमिका तयार होत जाणं महत्त्वाचं आहे. कलाकाराला किंवा कोणत्याही व्यक्तीला ती भूमिका मांडण्याचा अधिकार आवश्यक आहे.
सोशल मीडियाच्या जगात सध्या कलाकारांनाही राजकीय,सामाजिक भूमिका असू शकते, त्यांची विशिष्ट विचारधारा असू शकते हे स्वीकारणं जड जातं का?
एक्झॅक्टली. म्हणजे आता मी ब्राह्मण आहे तर मी विशिष्ट वर्गाचंच प्रतिनिधीत्व करते असं लोकाना वाटतं आणि तसं मी नाही केलं तर धक्के बसतात.
मग लोक मला वाईट शब्दांत बोलू शकतात. समाजमाध्यमांनी हल्ली हे स्वातंत्र्यच दिल्यासारखं झालंय. तुम्ही कोणालाही काहीही बोलू शकतात.
आता अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की, किरण मानेनं अनेकदा असभ्य भाषा वापरली आहे. हे खरं आहे. त्यांनी अनेक ठिकाणी असभ्य भाषा वापरली आहे.

फोटो स्रोत, Facebook/Anita Date
माझं म्हणणं आहे की, आपण योग्य भाषा वापरली पाहिजे, सभ्यतेनंच बोललं पाहिजे, पण आपण सभ्यतेने बोलूनदेखील समोरचा माणूस असभ्यपणे कमेंट्स करत असेल तर मीसुद्धा माझा मुद्दा तसाच व्यक्त करावं असं माझं अजिबात मत नाहीये. मी सभ्यता ठेवूनच माझे विचार मांडले पाहिजेत.
किरण माने प्रकरणाला राजकीय वळण तर मिळालंच आहे, पण हळूहळू त्याला जातीय वळण आणि अधिक स्पष्ट बोलायचं तर ब्राह्मण-ब्राह्मणेतर वळण मिळतंय का? तुमच्या पोस्टवर तशा कमेंट आल्या आहेत..
हे खरंच खूप वाईट आहे, की आपण या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने घेऊ शकत नाही. पूर्वीही विविध जातीपातीचे लोक होते, त्यांना योग्य वाटतील त्या राजकीय भूमिका, निर्णय घ्यायचे.
ब्राह्मण लोक फक्त भाजपचंच समर्थन करायचे असं नव्हतं. त्यावेळेला समोरच्याच मुद्दा ऐकून घेण्याची, समजून घेण्याची ताकद समाजात होती. ती आता हरवत चाललीये असं मला वाटतं.
मला गोंधळून जायला होतं, अशा भूमिका कशा असू शकतात असं वाटतं. आपण दिवसेंदिवस निर्बुद्ध होत चाललोय का असं वाटत राहतं.
या प्रकरणात एक मुद्दा अजून मांडला गेला, तो म्हणजे किरण मानेंची सहकलाकारांशी विशेषतः महिला कलाकारांसोबतची भाषा, गैरवर्तन...त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली गेली असं सांगण्यात आलं. मग आता तुम्ही महिला कलाकार आहात, तर महिला कलाकारांची बाजू का घेत नाही असंही विचारलं जातं...
किरण मानेनी महिला कलाकाराशी गैरवर्तन केलं असेल, तर ती अत्यंत वाईट गोष्ट आहे. मी किरण मानेबरोबर दोन प्रोजेक्ट केले. त्यावेळी मी ओळखत असलेल्या किरण मानेनं कोणतंही गैरवर्तन सेटवर केलं नव्हतं.
तो त्याच्या आयुष्यात कदाचित विविध पद्धतीनं चुकीचा असेल, पण त्याचं सेटवरचं वर्तन कधीही चुकीचं नव्हतं. मी पहिल्यांदा हे ऐकलंय.

फोटो स्रोत, Facebook
अर्थात, त्या मुलीचं म्हणणं चुकीचं असेल असं नाही. पण जर त्या सेटवर मी असते आणि किरण माने तिच्याशी चुकीचा वागला असता तर मी तिला म्हटलं असतं की, मी तुझ्या बाजूने उभं राहिलेलं तुला चालेल का? मी तुझ्या बाजूने उभं राहिलं तर चालेल का?
तिला मी असंही समजावलं असतं की, मी तुझ्या बाजूने एक व्यक्ती म्हणून, महिला म्हणून किरण मानेला समज देते. आपण यासंदर्भात सगळे मिळून प्रॉड्युसरशी बोलू आणि कारवाई करू. मी तिच्या बाजूने उभी राहिले असते.
अजूनही किरण मानेनं गैरवर्तन केलं असं समोर आलं तर मी त्या मुलीच्या बाजूने आहे. मग मी किरण मानेचं समर्थन करणार नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








