किरण मानेंवर महिलांशी गैरवर्तणुकीचे आरोप, त्यावर माने म्हणतात...

फोटो स्रोत, Facebook/Kiran Mane
अभिनेता किरण माने यांच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाला आता सुरुवात झाली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असलेल्या राजकीय भूमिकेमुळे आपल्याला लक्ष्य करून या मालिकेतून काढून टाकण्यात आलं, असा आरोप किरण माने यांनी केला आहे.
त्यानंतर किरण माने यांना राजकीय क्षेत्रातून पाठिंबा आणि विरोध होत असून राजकीय पक्ष आता याप्रकरणी आमने-सामने उभे राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
किरण माने यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पाठिंबा देत ट्वीटही केले आहे, तसंच किरण माने यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. निर्मात्यांनीही त्यांची बाजू पवारांकडे मांडल्याचं समजत आहे.
तर शिवसेना आणि मनसेनं मात्र माने यांच्याविरोधात भूमिका घेतल्याचं चित्र आहे.
एकूणच या प्रकरणाला लागलेल्या राजकीय वळणाबाबत जाणकारांचं काय मत आहे, तसंच किरण माने यांच्या पावलावर जाणकार काय म्हणतात हेही महत्त्वाचं आहे.
नेमकं प्रकरण काय?
किरण माने हे स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेमध्ये विलास पाटील या भूमिकेत आहेत. मात्र त्यांना या मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सोशल मीडियावर मांडत असलेल्या भूमिकेच्या कारणामुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आलं, असा आरोप किरण माने यांनी केला आहे.

फोटो स्रोत, StarPravah/ Facebook
किरण माने यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. अशा दबावापुढे कधीही झुकणार नाही. यापुढेही भूमिका मांडत राहणार असं किरण माने यांनी म्हटलं आहे.
मात्र, किरण मानेंना राजकीय भूमिकेमुळं नव्हे तर इतर कारणांमुळं काढण्यात आलं आणि त्याची त्यांना कल्पनाही होती, असा दावा निर्मात्या सुझाना घई यांनी केला आहे.
किरण माने यांना अनेकवेळा सूचना केल्या होत्या. पण तरीही समाधान न झाल्याने त्यांना काढण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं निर्मात्यांनी म्हटलं.
किरण मानेंचं गैरवर्तनाच्या आरोपांवर उत्तर
महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर अभिनेते किरण माने यांनी कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नाहीये. पण त्यांनी फेसबुकवर एक काल्पनिक पोस्ट लिहिली आहे.

फोटो स्रोत, Facebook
त्यात त्यांनी म्हटलं आहे, की अपशब्द वापरत होता तर त्याला त्याचवेळी थोबाडला का नाही त्याचवेळी? पोलीस कम्प्लेन्ट का नाही केली? या महिलांसाठी त्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षभर स्टॅंड का घेत नव्हत्या?
या उपरोधिक पोस्टमध्ये ते म्हणतात, " टीव्हीवर त्या महिला सांगू लागल्या की "किरण माने स्वत:ला हिरो समजायचा.".. तन्मय वैतागून म्हणाला,"अगं होताच तो हिरो... तू पुढे मुद्याचं बोल.".. नंतर त्या तिघींचे आरोप सुरू झाले... "आम्हाला टोमणे मारायचा.. ॲरोगन्ट वागायचा... वगैरे वगैरे.." प्रद्युम्न आणि मंडळींची चुळबूळ सुरू झाली.."मुद्याचं कुणीच बोलेना रे ! आपण इयत्ता पाचवी ड मध्ये अशा तक्रारी करायचो." ... तेवढ्यात हिराॅईन म्हणाली,"मला अपशब्द वापरायचा."... प्रद्युम्न आणि गॅंग सरसावून बसली... पण ती त्यापुढे काही सांगेचना ! "अगं... अपशब्द वापरत होता तर त्याला त्याचवेळी थोबाडला का नाही त्याचवेळी??? पोलीस कम्प्लेन्ट का नाही केली ?? शेजारी ज्या वयोवृद्ध लढवय्या अभिनेत्री उभ्या आहेत त्या हे सगळं ऐकून कसं घेत होत्या?? या महिलांसाठी त्या वर्षभर स्टॅंड का घेत नव्हत्या??? आणि मग हे सांगायला पन्नास तास का लावले????तोवर किरण माने फेमस झाला ना.. छ्या!! काही दमच नाही रे आरोपांमध्ये..."
किरण मानेंना सहकलाकारांचा पाठिंबा
मुलगी झाली हो मालिकेतील काही सहकलाकारांनी किरण माने यांना पाठिंबा दिला आहे.
अभिनेत्री श्वेता आंबीकर, प्राजक्ता केळकर व शीतल गीते यांनी किरण मानेंचं सेटवरचं वर्तन आक्षेपार्ह नसल्याचं म्हटलं होतं.
किरण माने हे माणूस म्हणून खूप चांगले आहेत. ते आमच्याशी खूप चांगलं वागतात, को-आर्टिस्ट म्हणूनही खूप उत्तम आहेत. या दीड वर्षांत मी कधीही त्यांना शिवी देताना, अपशब्द वापरताना पाहिलं नाहीये, असं श्वेता आंबीकर हिने म्हटलं आहे.
राजकीय वळण
किरण माने यांना मालिकेतून काढून टाकल्याच्या प्रकरणानं राजकीय वळण घेतलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यावर आक्रमक भूमिका घेत किरण मानेंच्या पाठिशी असल्याचं सांगितलं. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्वीट केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
"याद राखा, हा महाराष्ट्र वैचारीक वारसा जोपासत तुमच्या विरोधात लिहीले म्हणून तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही," असं आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले.
तर धनंजय मुंडे यांनी तर हा प्रकार म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद असल्याचं म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर अशा नेत्यांनीही किरण माने यांना पाठिंबा दर्शवणारे ट्वीट केल्याचं पाहायला मिळालं.
मराठी कलाकारांबाबत भूमिका घेणाऱ्या मनसेच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचं लक्ष होतं.
'मात्र किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला. मनसे योग्यवेळी यावर भूमिका मांडेल,' असं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर टीव्ही 9 मराठीबरोबर बोलताना म्हणाले.
तर किरण माने यांना मोठं व्हायचं आहे त्यामुळे ते असा वाद निर्माण करत आहेत, असा आरोप शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी केल्याचं वृत्त लोकमतने दिलं आहे.
चित्रा वाघ यांचा आरोप
दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी किरण मानेंना शिक्षा झालीच पाहिजे, असं म्हणत त्यांच्यावर महिला सहकलाकाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी गैरवर्तन करणा-या किरण मानेला प्रॉडक्शन हाउसनं हाकलून दिलयं. मग मानेनं नवं नाट्य उभं केलं. महिलांचा विनयभंग व PM वर विखारी टीका करणाऱ्यांना सत्ताधारी पाठिशी घालत आहेत. कोण आहेत मानेचे बोलवते धनी?
शरद पवारांची भेट
किरण माने यांनी रविवारी (16 जानेवारी) या प्रकरणी शरद पवार यांची भेट घेतली. आपल्या विरोधात झालेल्या अन्यायाची बाजू पवारांकडे मांडल्याचं किरण माने म्हणाले.
शरद पवारांनी आपली बाजू ऐकून घेतली असून त्यांनी लगेचच याबाबत काही प्रतिक्रिया दिली नाही, असंही माने यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, मालिकेच्या निर्मात्यांनीही त्यांची बाजू शरद पवारांकडे मांडली असल्याचं टीव्ही 9 च्या वृत्तात म्हटलं आहे. किरण माने सेटवर कलाकारांना त्रास देत होते, असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
सहकलाकार काय म्हणतात?
दुसरीकडे किरण माने यांच्यावर मालिकेतल्या सहकलाकारांनीच आरोप केले आहेत. किरण माने यांचं वर्तन सेटवर फारसं चांगलं नव्हतं असे आरोप बहुतांश कलाकारांनी केले आहेत. एबीपी माझानं घेतलेल्या मुलाखतीत या सर्वांनी किरण मानेंवर आरोप केले आहेत.
मालिकेत किरण माने यांच्या पत्नीच्या भूमिकेत असलेल्या शर्वणी पिल्लई यांनी त्यांना राजकीय भूमिकेमुळं नव्हे तर त्यांच्या वर्तनामुळंच काढून टाकण्यात आल्याचं सांगितलं आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही किरण मानेंची सेटवरची वागणूक योग्य नसल्यानं त्यांना काढल्याचं म्हटलं आहे. किरण माने कायम स्वतःबद्दल बोलायचे, असा आरोपही त्यांनी केलाय.
इतरही सहकलाकारांनी त्यांच्या विरोधातच बाजू मांडली आहे. किरण माने यांनी अनेकदा मालिकेतून काढून टाकेन अशाप्रकारे धमकावल्याचंही सहकलाकारांनी सांगितलं.
किरण मानेंनी कलाकारांना विरोधात बोलायची सक्ती केल्याचा आरोप केला आहे.
'अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे. करुद्या आरोप, जाऊद्या झाडून, ते बिचारे 'पोटार्थी' हायेत. प्रॉडक्शन हाऊसविरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल, असं मानेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं.

फोटो स्रोत, Facebook/kiran Mane
काही कलाकारांनी किरण माने यांचं वर्तन वाईट नसल्याचं सांगितलं आहे. त्याबाबतची एक पोस्ट त्यांनी सायंकाळी केली आहे.
'दुसरी बाजूही महत्त्वाची'
वरिष्ठ सिनेपत्रकार सौमित्र पोटे हे अनेक वर्षांपासून मनोरंजन सृष्टीतील घडामोडींचं वार्तांकन करत आहेत. त्यांनी याबाबत मत मांडलं आहे. राजकीय दबावातून काढून टाकण्यात आलं, हा किरण मानेंनी केलेला दावा आहे. मात्र प्रत्येक गोष्टीला नेहमी दोन बाजू असतात असं सौमित्र पोटे म्हणाले.
"किरण माने परखड राजकीय भूमिका असलेले कलाकार आहेत. ते कायम त्यांची भूमिका मांडत असतात. गेल्या दोन तीन वर्षांपासून ते अशा प्रकारच्या भूमिका मांडत आलेले आहेत."
"पण त्यांच्या या भूमिकेविषयी सर्वांना माहिती होतं, तरीही स्टार प्रवाहनं त्यांना कास्ट केलंच होतं. मराठी इंडस्ट्रीमध्ये असा प्रकार कधीही झालेला नाही. वेगवेगळ्या राजकीय भूमिका असलेले कलाकार, इथे काम करतात पण त्यांच्यावर कधीही असा दबाव आलेला नाही, मग किरण मानेंवरच दबाव का आला," असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
स्टार प्रवाह ही मोठी वाहिनी आहे, त्यामुळं अशा कारणावरून ते असं करण्याची शक्यता कमी आहे. शिवाय एखाद्या कलाकाराला मालिकेतून काढल्याचा फटका हा वाहिनीला आणि मालिकेलाही बसणार असतो, असं पोटे यांना वाटतं.
'राजकीय भूमिका सेटवर नेऊ नये'
निर्मात्यांनी त्यांच्या वर्तणुकीबद्दल सांगितलंच आहे. मात्र मनोरंजन क्षेत्रातले पत्रकार म्हणून सेटवरून जी चर्चा आम्ही ऐकतो तीही फारशी चांगली नव्हती, असंही पोटे म्हणाले.
"तुमची राजकीय भूमिका काहीही असली तरी ती कुठं मांडायची याचं एक बंधन असतं. सेटवर तुम्ही ती मांडू शकत नाही. त्यामुळं नकारात्मकता निर्माण होते. नकारात्मकता नको म्हणून त्या कलाकाराला काढलं जातं. किरण मानेंच्या बाबतीतही तसंच झालं असावं."
कदाचित राजकीय कारणामुळं हे झालेलं जरी असलं, तरी इतर कलाकारांनी तरी तुमच्या बाजूनं असावं पण किरण मानेंच्या बाबतीत तसं नाही, असं ते म्हणाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








