झुंड: अमिताभ बच्चन यांनी झुंडमध्ये साकारलेले विजय बारसे प्रत्यक्षात कसे आहेत?

फोटो स्रोत, Praveen mudholkar/bbc
- Author, प्रवीण मुधोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी, नागपूरहून.
19 वर्षीय सेजल सोनारे नेपाळ येथे आयोजित फुटबॉल स्पर्धेत पदक मिळवून आली. तिच्या या यशाबद्दल नागपूरच्या बोखाऱ्यातील नागरिकांनी तिचा सत्कारही केला. पण फुटबॉल ग्राऊंडवर येण्यासाठी तिला प्रचंड कष्ट घ्यावे लागले.
शॉर्ट्स घालून फुटबॉल खेळावं लागतं म्हणून आधी आई-वडिलांनीच तिच्या खेळण्याला विरोध केला. आता तेच अभिमानानं सांगतात, 'आमची मुलगी इंटरनॅशनल प्लेअर आहे.'
बोखाऱ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये सेजलचे झोपडीवजा घर आहे. तिचे वडील हातमजुरी करतात.
"आधी फुटबॉल काय आहे हे मला माहित नव्हतं. पण नागपूरच्या स्लम सॉकर अर्थात झोपडपट्टी फुटबॉलच्या माध्यमातून मी फुटबॉल शिकले. आई-वडिलांचा फुटबॉल खेळण्यास विरोध असल्याने मी कुणाला न सांगताच फुटबॉलचा खेळ पाहायला गेले. मग स्लम सॉकरच्या कोचेसनी माझ्या घरी येऊन आई वडिलांना फुटबॉल खेळाविषयी समजावले. अशी मी फुटबॉलच्या खेळात आली," सेजल सोनारे तिच्या या प्रवासाबद्दल बीबीसी मराठीला सांगत होती.
नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजचे प्राध्यापक विजय बारसे यांनी 22 वर्षांपूर्वी स्लम सॉकर म्हणजेच झोपडपट्टी फुटबॉलची स्थापना केली. आतापर्यंत देशभरात जवळपास अडीच लाख झोपडपट्टीतील मुलामुलींना या मोहिमेतून फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
स्लम सॉकरची स्थापना करणारे प्राध्यापक विजय बारसे यांनी बीबीसी मराठीला त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल काही आठवणी सांगितल्या.

फोटो स्रोत, Praveen mudholkar/bbc
"मी नागपूरच्या सिव्हिल लाईन्स येथील हिस्लॉप कॉलेजमध्ये क्रीडा-शिक्षक होतो. तेव्हा एक दिवस मी कॉलेजच्या कामासाठी विद्यापीठात जायला निघालो आणि पाऊस आला. पावसापासून रक्षण व्हावे म्हणून रस्त्याच्या कडेला झाडाखाली मी उभा होतो. पण तेव्हा मागे काही विचित्र आवाज येत होते. मी मागे वळून पाहिले तेव्हा फाटलेले, मळलेले कपडे घालून प्लास्टिकची बकेट पायाने मारुन काही मुलं शेजारच्या मैदानात खेळत होते.
"ही मुलं माझ्या हिस्लॉप कॉलेजसमोरील वसंतराव नाईक झोपडपट्टीतील होती. आधी यापैकी काही मुलांना मी पाहिले होते, पण त्यांना मी बोले पेट्रोल पंपाजवळील खाजगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांच्या बॅग लुटताना पाहिले होते. चोरलेल्या वस्तुंतून विकण्याजोग्या वस्तू वेगळ्या करुन उरलेले सामान माझ्या कॉलेजच्या मागील भागात फेकतांना पाहिले होते. पण मी जेव्हा त्यांना बकेटने खेळतांना पाहिले तेव्हा मला क्लिक झाले की ते फुटबॉल खेळतील. दुसऱ्या दिवशी मी त्यांना फुटबॉल दिला, ते माझ्या कॉलेजच्या ग्राऊंडवर खेळायला येऊ लागले."

फोटो स्रोत, Praveen mudholkar/bbc
"यापैकी अनेक जणांना गांजा ओढणे, दारू पिणे, जुगार खेळणे, मारामाऱ्या करणे अशा सवयी होत्या. पण ते जेव्हा फुटबॉल खेळायला मैदानावर यायचे तेव्हा त्यांच्यापैकी कुणालाही त्यांच्या वाईट सवयींबद्दल आठवायचेही नाही. यातूनच पुढे नागपूरात 2001 साली झोपडपट्टी फुटबॉलच्या सामन्यांचे आयोजन आम्ही केले.
"पहिल्याच आयोजनात पहिल्याच आठवड्यात 128 टिम्स तयार झाल्या. शेवटी आम्हाला लोकांना थांबवावं लागलं. पुढे हे सामने आम्ही भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली पर्यंत नेले. पुढे काही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा झोपडपट्टी फुटबॉल 130 देशात गेला. परदेशात झोपडपट्टी फुटबॉल कुणाला कळणार नाही म्हणून स्लम सॉकर असे त्याचे नामकरण आम्ही केले. कारण परदेशात फुटबॉलला सॉकर म्हणतात."
झोपडपट्टी फुटबॉलला कुणी-कुणी विरोध केला?
"कुछ भी आयडिया लाते क्या? हे होणे शक्य आहे का? तुम्ही असं सांगताहेत की जसे काही फुटबॉलचे नियमित सामने झोपडपट्टी फुटबॉलमध्ये घ्यावे. हे शक्य नाही," असे फुटबॉल संघटनांचे प्रतिनिधी मला सुरुवातीला म्हणाले होते, असे विजय बारसे सांगत होते.
"कोणत्याही झोपडपट्टीतील मुलाने किंवा त्यांच्या नातेवाईकांनी झोपडपट्टी फुटबॉलला विरोध कधीही केला नाही. पण फुटबॉल संघटनांनीच झोपडपट्टीतील मुले फुटबॉल ग्राउंडवर येता कामा नये, अशी भूमिका घेतली होती. त्यांची भूमिकाही त्यांच्या जागी बरोबर होती कारण त्यांनी नागपूरच्या कस्तुरचंद ग्राऊंडवरचा फुटबॉलचा सामना पाहिला होता, NDFA चा फुटबॉल सामना त्यांनी पाहिला होता. VFA चा फुटबॉल सामना त्यांनी पाहिला होता.
"हा झोपडपट्टी फुटबॉल त्यांनी कधी ऐकला नव्हता. यातच पुढे आमच्या टुर्नामेंट सुरू झाल्यावर फुटबॉलच्या अधिकृत संघटनांनी आम्हाला रेफरी वैगेरे देण्यास विरोध केला होता. रेफरी काय खेळाडू ते पाठवत नव्हते. मग रेफरी कसे पाठवणार? त्यानंतर त्यांनी जाहीर केले होते की झोपडपट्टी फुटबॉलच्या सामन्यात कोणीही NDFA चा सदस्य जाणार नाही."
स्लम सॉकरला जगात कुणाकुणाची मान्यता आहे?
स्लम सॉकरला जगभरातील महत्वाच्या फुटबॉल संघटनांची मान्यता आहे. यात खालील संघटनांचा समावेश आहे.
- FIFA International Federation of Association Football (इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल)
- UEFA The Union of European Football Associations ( द युनियन युरोपियन फुटबॉल असोसिएशन्स)
- UNI Football - युएनआय फुटबॉल
- United Nations - संयुक्त राष्ट्रे
- Homeless World Cup - होमलेस वर्ल्ड कप
- Street football world - स्ट्रीट फुटबॉल वर्ल्ड
या झोपडपट्टी फुटबॉलमुळे यात खेळणारी मुले वाईट मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ लागली.

फोटो स्रोत, Praveen mudholkar/bbc
"मी चोरी करायचो, लोकांना मारायचो, लहान मुलांना धमकवायचो. आमच्या घरासमोर रेल्वेलाईन होती. त्यावरुन जाणाऱ्या रेल्वेत चढून आम्ही प्रवाशांच्या बॅगा लुटायचो आणि आपल्या गरजा पूर्ण करायचो. पुढे मला आणखी वाईट मित्र मिळाले. त्यांच्या सहवासामुळे गुन्ह्यात सहभागी आढळलो.
"त्यामुळे सहा महिने जेलमध्ये राहिलो. त्यानंतर विजय बारसे सरांच्या स्लम सॉकरमध्ये आलो. फुटबॉल शिकलो. दोन वर्षांपूर्वी Homeless World Cup, Mexico मध्ये गेलो आणि फुटबॉल खेळलो," विकास मेश्राम स्लम सॉकरचा आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या प्रवासाबद्दल माहिती देताना सांगत होता.
स्लम सॉकरमुळे आयुष्य असं बदललं...
नागपूरच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या या मुलींना कधीकाळी साधं घराच्या बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. दहा वर्षीय ध्रुविका मून सांगते, "मी इथे स्लम सॉकर मध्ये जेव्हा आली तेव्हा माझ्या आजूबाजूचे लोक मला म्हणत होते की काय हे चड्ड्या घालून कुठे चालली आहे. आमच्या आजुबाजूचे लोक काही चांगले नाही. त्यांना मुलींनी घरीच राहावं असं वाटतं."
खुशी हरिंद्रवार सांगते, "ये मेरी टीम है. लेकिन हमारे घर की कंडीशन ऐसी थी की घरवाले हमे ग्राउंड पर आने नहीं देते थे."
या मुलींना फुटबॉल ग्राऊंडपर्यंत आणण्यासाठी या मुलींच्या पालकांना समजावण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली असे विजय बारसे सांगतात.
"मुलींना फुटबॉल खेळण्यासाठी प्रवृत्त करणे तेवढे सोपे नव्हते. काही धर्मात तर महिलांनी मैदानावर पाय ठेवणेही चालत नाही. मग आम्ही मुलींच्या पालकांना समजावले की फुटबॉलच्या माध्यमातून मुलींना जगाची ओळख होऊ द्या. तेव्हा पालकांना ही गोष्ट समजली."
जगाच्या कानाकोपऱ्यात एका देशात दरवर्षी झोपडपट्टी फुटबॉलच्या टीम्सचा Homeless World Cup ही होतो.
विजय बारसे यांच्या जीवनावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी 'झुंड' हा चित्रपट तयार केलाय. अमिताभ बच्चन यात मुख्य भुमिकेत आहेत. 'झुंड' चित्रपटाचे शुटिंग नागपूर शहरात झाले. या शुटिंगनंतर अमिताभ बच्चन आणि विजय बारसे यांची भेट झाली.
"तुम्ही आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. आतापर्यंत तुमचे कित्येक चित्रपटात नाव विजय आहे. कदाचित हे पहिल्यांदाच होत असेल की प्रत्यक्ष जीवनात विजय असलेल्या व्यक्तीचं पात्र तुम्ही रुपेरी पडद्यावर साकारत आहात," असं विजय बारसेंनी अमिताभ बच्चन यांना म्हटल्यावर त्यांनी आपल्या स्मितहास्याने याला दुजोरा दिला होता.
यावर विजय बारसे सांगतात, "झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन यांचे नाव विजयच आहे. खऱ्या आयुष्यातील विजयवर अमिताभ बच्चन यांचा हा पहिलाच चित्रपट आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








