डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पुतळ्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा.

फोटो स्रोत, Matin Shaikh/BBC

फोटो कॅप्शन, बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा.
    • Author, नितिन सुलताने
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

लहानपणी छत्रपती संभाजीनगरहून (तेव्हाचं औरंगाबाद) 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या मूळ गावी कुटुंबाबरोबर जायचो तेव्हाच्या काही आठवणी आजही अगदी स्पष्ट आहेत. त्या आठवणींमधील काही दृश्य आजही लख्खपणे डोळ्यासमोर उभी राहतात.

त्यातलं असंच एक चित्र म्हणजे रस्त्याने जाताना लागणाऱ्या काही प्रमुख गावांच्या वेशीवरच असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे.

प्रत्येक गावाची ओळख जणू त्या पुतळ्यानेच होत असावी. घराजवळही असा पुतळा होता, पण त्याच्या सानिध्यात जाण्यासाठी आम्हाला 14 एप्रिलचीच वाट पाहावी लागायची.

बालपणी एवढीच माहीत होतं की हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. पण वयाच्या ओघात, अनुभवांबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची भव्यता हळूहळू उलगडत गेली. आणि जसे त्यांचे पुतळे पाहू लागलो त्यातून फक्त एक व्यक्ती नव्हे, तर एका संपूर्ण विचारविश्वाचा, एका जाज्वल्य संघर्षाचा आणि असंख्य स्वप्नांचा ठेवा दिसू लागला.

शिवाय हे पुतळे कसे सर्वसामन्यांना या महामानवाच्या आणखी जवळ आणतात हेही समजत होतं.

खरं तर हे पुतळे फक्त विशिष्ट आकारातील धातूचे-पाषाणाचे शिल्प किंवा प्रतिकृती नसतात तर ते प्रत्यक्षात इतिहास आणि स्वाभिमानाची प्रतीकं असतात. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष' करा हा डॉ. बाबासाहेबांचा विचार मागे पडू द्यायचा नाही, याची जाणीव ते सातत्यानं करून देत असतात.

पण आज ठिकठिकाणी पुतळे पाहिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा कोणता असेल? तो कोणी घडवला असेल? किंवा या पुतळ्याच्या उभारणीची गोष्ट काय? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? हीच गोष्ट आपण आज जाणून घेणार आहोत.

सुरुवात करुयात या पुतळ्यासाठी पुढाकार घेतलेल्या भाई बागल यांच्यापासून.

कोण होते 'भाई' बागल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पुतळ्याची गोष्ट अतिशय खास आहे. भाई बागल म्हणून ओळखले जाणारे कोल्हापुरातील विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक आणि कलाकार माधवराव खंडेराव बागल यांना त्याचं श्रेय जातं.

कोल्हापूरमधूल खंडेराव आणि कमलाबाई बागल यांचे माधवराव बागल हे पुत्र होते. खंडेराव बागल यांना राजर्षी शाहू महाराजांचा सहवास लाभला होता. तसंच सत्यशोधक विचारांचे ते पाईक होते. तोच प्रभाव माधवराव बागल यांच्यावरही होती. पुढं शेतकरी कामगार पक्षाचे नेते बनल्यानंतर माधवराव बागल यांना लोक 'भाई' म्हणून ओळखू लागले.

भाई माधवराव बागल

फोटो स्रोत, Maharashtra Govt

भाई बागल स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर सामाजिक क्षेत्रात विशेषतः अस्पृश्यतेविरोधात आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात त्यांनी अत्यंत महत्त्वाचं असं काम केलं आहे. कामगार चळवळीतही भाई बागल यांनी मोलाचं योगदान दिलं.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कोल्हापूर जिल्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं. महाराष्ट्र राज्याची स्थापना होईपर्यंत त्यांनी अनेक सत्याग्रह करत या चळवळीचा प्रसार केला होता. महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढा चळवळीतही भाई बागल आघाडीवर होते.

पण या सर्वाबरोबरच भाई बागल कलाप्रेमी आणि स्वतः कलाकारही होते. त्यांचं शिक्षण प्रामुख्यानं कला क्षेत्रात झालेलं होतं. जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी पेंटिंग, मॉडेलिंग आणि म्युरल डेकोरेशनचं शिक्षण घेतलं होतं. चित्रकार म्हणून त्यांनी काही चित्रंही रेखाटली आहेत.

भाई बागल यांनी लेखन केलेल्या चरित्रातून कोल्हापूर आणि तत्कालिन स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासही मांडला आहे. तसंच इतरही काही पुस्तकंही त्यांनी लिहिली आहेत.

बिंदू चौकात आता अशा प्रकारचं स्मारक तयार केलं आहे.

फोटो स्रोत, Matin Shaikh

फोटो कॅप्शन, बिंदू चौकात आता अशा प्रकारचं स्मारक तयार केलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबरोबरच शाहू महाराज, महात्मा गांधींच्या पुतळ्यांच्या निर्मितीसाठीही भाई बागल यांनी पुढाकार घेतला होता.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजीनगर यांनी त्यांचा डी.लिट पदवीने त्यांचा गौरव केला आहे. महाराष्ट्र शासनानं त्यांना 'दलितमित्र' पदवी दिली आहे तर भारताच्या पंतप्रधानांकडून 'ताम्रपट' आणि राष्ट्रपतींकडून 'पद्मभूषण'नं त्यांचा गौरव झाला आहे.

भाई बागल यांना देव ही संकल्पना मान्य नव्हती. देव आणि धर्म ही संकल्पनाच त्यांनी जीवनातून ठोकरून लावली होती. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच त्यांच्यासाठी 'दैवत' होते, असं महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळानं प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या लेखसंग्रहात म्हटलं आहे.

कोणाची होती कल्पना?

भाई बागल यांनी त्यांच्या 'जीवन प्रवाह' या आत्मचरित्रामध्ये या पुतळ्याच्या उभारणीची कथा अगदी थोडक्यात वर्णन केलेली आहे.

कोल्हापूरच्या बिंदू चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पहिला पुतळा उभारण्यात आला होता आणि आजही तो त्याठिकाणी आहे. विशेष म्हणजे बाबासाहेब हयात असताना हा पुतळा उभारण्यात आला होता.

पण या पुतळ्याची कल्पना एका लग्नामध्ये सुचली होती, असं भाई बागल यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितलं आहे. "गंगाराम कांबळे यांनी त्यांच्या एका नातेवाईकाच्या लग्नाच्या वेळी हा पुतळा बसवण्याची कल्पना सुचवली होती," असं भाई बागल यांनी सांगितलं आहे.

राजर्षी शाहू महाराज गंगाराम कांबळे यांच्याकडून चहा घेतानाचे म्युरल कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं आहे.

फोटो स्रोत, BBC/Swati Patil Rajgolkar

फोटो कॅप्शन, राजर्षी शाहू महाराज गंगाराम कांबळे यांच्याकडून चहा घेतानाचे म्युरल कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं आहे.

आता गंगाराम कांबळे यांचंही इतिहासात नाव कायमचं कोरलं गेलं आहे ते म्हणजे राजर्षी शाहू महाराजांमुळं. तत्कालीन सवर्णांच्या हौदाला स्पर्श केल्यामुळं गंगाराम कांबळेंना चाबकाचे फटके देण्यात आले होते. शाहू महाराजांच्या अनुपस्थितीत घडलेला हा प्रकार त्यांना समजला तेव्हा हा प्रकार करणाऱ्यांना राजर्षी शाहू महाराजांनी अक्षरशः फोडून काढलं.

पण एवढ्यावरच न थांबता गंगाराम कांबळेंना, "तू नोकरी सोडून दुसरं काहीही काम कर, तुला हवी ती मदत करेन", असं राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं होतं. याच प्रेरणेतून गंगाराम कांबळेंनी चहाचं हॉटेल सुरू केलं होतं. राजर्षी शाहू महाराज स्वतः त्यांच्या हॉटेलवर जाऊन चहा प्यायले आणि प्रत्यक्ष कृतीतून अस्पृश्यतेसारख्या अनिष्ट प्रथा संपवण्याचा संदेश दिला.

तर कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारावा अशी कल्पना या गंगाराम कांबळेंच्या मनात आली होती आणि त्यांनी ती भाई बागलांसमोर मांडली आणि भाईंनीही अगदी तातडीनं त्याबाबत निर्णयही घेतला होता.

कसा तयार झाला पुतळा?

"गंगाराम कांबळे यांनी कल्पना सुचवली आणि त्यावेळी तेथेच मी ती कल्पना पुरी करण्याचे जाहीर करून कामास लागलो आणि लवकरच ती इच्छा पार पडली," असं भाई बागल यांनी 'जीवन प्रवाह' पुस्तकात म्हटलं आहे.

पुतळा तयार करण्याची जबाबदारी ही शिल्पकार बाळ चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली. आज कोल्हापूरच्या बिंदू चौकात उभा असलेला पुतळा त्यांनीच घडवलेला आहे. अत्यंत रेखीव असा पुतळा बाळ चव्हाण यांनी तयार केला होता.

पण हा पुतळा उभारण्यासाठी सर्वात मोठं आव्हान होतं ते निधी उभारण्याचं. पुतळा उभारण्याचा अंतिम निर्णय झाल्यानंतर पुतळा प्रतिमा समितीची स्थापना करण्यात आली आणि कामाला सुरुवात झाली. या पुतळा समितीचे अध्यक्ष स्वतः भाई बागल हेच होते.

या पुतळ्यासाठी लागणारा बहुतांश निधी हा भाई बागल यांनी पुतळा समितीतील सहायक व्ही.जी.चव्हाण यांच्या साथीने फिरून-फिरून गोळा केला होता. चव्हाण यांची मोटार नसती तर हा निधी उभारण्यासाठी फिरणं शक्य झालं नसतं असं भाई बागल यांनी म्हटलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह भाई बागल (डावीकडे).

फोटो स्रोत, Matin Shaikh

फोटो कॅप्शन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह भाई बागल (डावीकडे).

अशा प्रकारे पुतळ्यासाठी लागणारा निधी गोळा करून पुतळा उभारण्याच्या कामाला गती देण्यात आली. पण तत्कालीन काँग्रेस सरकार आणि स्थानिक प्रशासनानं मात्र या कामात अडथळे आणल्याचा उल्लेख भाई बागलांनी केला आहे.

"म्युनिसिपालिटीने या पुतळ्यासाठी जी देणगी मंजूर केली होती आणि जागा ठरवली होती, त्या दोन्ही गोष्टींची मंजुरी रद्द केली," असं भाई बागल सांगतात.

पुतळ्यासाठी सरकारच्या ताब्यात पडून असलेलं संगमरवली पॅडेस्टलची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी पैसे द्यायची तयारी दाखवली होती, तरीही त्यांनी त्याला मंजुरी दिली नाही.

पण अखेर शहरातील तेव्हाची मध्यावरची आणि रहदारी असलेली जागा या पुतळ्यासाठी मिळाली आणि पुतळा उभारणीचा पुढचा मार्ग मोकळा झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबरच महात्मा फुलेंचा पुतळा उभारण्याचंही ठरलं. बाबूराव पेंटर यांनी ब्राँझच्या किंमतीत तो पुतळा दिला. त्यासाठी लागणारी सर्व किंमत भाऊसाहेब पाटील शाहीर आणि तेव्हाचे त्यावेळचे सत्यशोधक समाजाचे सेक्रेटरी यांनी जमवली.

उद्घाटनासाठी 'खास' पाहुणे

बाळ चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रेखीव असा पुतळा तयार केला होता. पुतळ्यांसाठी कोल्हापूरच्या मध्यभागी बिंदू चौकामध्ये जागाही मिळाली होती, त्यामुळं पुतळ्यांची उभारणी आणि अनावरणाचा कार्यक्रम यांची रुपरेषा आखण्यात आली.

त्यानुसार 9 डिसेंबर 1950 रोजी दोन्ही पुतळ्याचं अनावरण करण्याचं ठरलं.

पुतळ्याच्या अनावरण किंवा स्मारकाच्या उद्घाटनाचा विषय आला की ते कोणाच्या हस्ते होणार यावर बरीच चर्चा केली जाते. समाजातील एखादा मोठा व्यक्ती, सरकारी हुद्द्यावर असणाऱ्या व्यक्तीच्या हस्ते पुतळ्यांचं अनावरण करायची प्रथा भाई बागलांना मात्र पटत नव्हती.

 कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्वसामान्य लोकांमधील दोन जणांना भाई बागल यांनी हाताला धरून पुढं आणलं आणि त्यांच्या हस्तेच त्या पुतळ्यांचं अनावरण करण्यात आलं.

फोटो स्रोत, Matin Shaikh

फोटो कॅप्शन, कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्वसामान्य लोकांमधील दोन जणांना भाई बागल यांनी हाताला धरून पुढं आणलं आणि त्यांच्या हस्तेच त्या पुतळ्यांचं अनावरण करण्यात आलं.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तहहयात सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी झटत होते, त्यामुळं त्यांच्या पुतळ्याचं उद्घाटन सामान्य व्यक्तीच्या हस्ते व्हावं असं भाई बागल यांचं स्पष्ट मत होतं.

त्यांनी केलंही तसंच, 9 डिसेंबर 1950 रोजी कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्वसामान्य लोकांमधील दोन जणांना भाई बागल यांनी हाताला धरून पुढं आणलं आणि त्यांच्या हस्तेच त्या पुतळ्यांचं अनावरण करण्यात आलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्याची संधीही भाई बागल यांना मिळाली होती. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं प्रसिद्ध केलेल्या निवडक लेखसंग्रहात त्यांनी याबाबत उल्लेख केला आहे.

"अशा थोर व्यक्तीच्या सान्निध्यात थोडा वेळ मी बसलो. त्यांनी मला मुद्दाम माणूस पाठवून बोलावले. काही इच्छा व्यक्त केली. त्या वेळी ती पूर्ण करता आली, हे मी भाग्य समजतो. त्यांच्याबरोबर मुंबईला सेंट्रल स्टेशनच्या डब्यात जेवणही केलं. दिल्लीहून आले की ते या डब्यातच मुक्काम करीत," असं भाई बागल सांगतात.

"माधवराव, या लेकाच्यांना भिता कशाला? तुमच्यावर ते जातिवादाचा आरोप करतील एवढंच ना? करू देत. माझ्यावर नाही करत? एवढा प्रचंड बहुजन समाज जातीवादी असूच शकत नाही. संघटना मजबूत होऊ द्या. ते तुमच्या पाया पडत येतील," असा सल्लाही त्यांना डॉ. आंबेडकरांनी दिला होता.

"एक अत्यंत पवित्र गोष्ट माझ्या हातून झाली. त्याचा मला अभिमान वाटतो. त्यांचा पुतळा माझ्याच अध्यक्षतेखाली, भारतात त्यांच्याच हयातीत प्रथम बसवला आणि तो ते स्वतः पाहूही शकले," असं माधवराव बागल यांनी बहुजन समाजाचे शिल्पकारमध्ये म्हटलं आहे.

आजही कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये हे पुतळे इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.