काही लोकांच्या कानात सतत विशिष्ट आवाज का येत राहातो? या आजारावर काय उपचार आहेत?

काही लोकांच्या कानात सतत विशिष्ट आवाज का येत राहातो? या आजारावर काय उपचार आहेत?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जेमी मॉरीस
    • Role, बीबीसी

पहिल्यांदा कानात जोरात आवाज येऊ लागला तेव्हा ऑलिवर मोझेझी घरूनच काम करत होते.

"मला चिंता विकाराचा म्हणजे अँझायटीचा झटका आला होता. एकदम व्यवस्थित ऐकू येत असताना अचानक ऐकू येणं बंद झालं आणि टिनिटसचा त्रास सुरू झाला. मी खूप नैराश्यात होतो," ते म्हणाले.

या आजारावर योग्य ते उपचार मिळवण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागले. स्व-शोधाचा लांबलचक प्रवास असं ते या अनुभवाचं वर्णन करतात.

'टिनिटस युके' या संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या नव्या अहवालानुसार, 2025 च्या अखेरपर्यंत युनायटेड किंगडम मधली 80 लाख लोक टिनिटस या आजारानं त्रस्त असणार आहेत.

टिनिटस काय आहे?

बाहेरून कुठूनही असा आवाज येत नसताना कानात किंवा डोक्यात एक प्रकारचा आवाज येत राहतो त्याला टिनिटस (tinnitus) म्हणतात.

असा आवाज एकाच कानातून किंवा दोन्ही कानातून किंवा डोक्याच्या मध्यभागातून येऊ शकतो.

मेंदूच्या एका बाजूच्या कामकाजाचा समतोल ढळल्यामुळे असा आवाज येतो. काही लोकांना तात्पुरत्या काळासाठी असा आवाज येतो. काहींना सतत येत राहतो. तर काही लोकांना त्याची तीव्रताही कमी जास्त झाल्याचं जाणवतं.

ओलिवर मोझेझी

फोटो स्रोत, ओलिवर मोझेझी

फोटो कॅप्शन, टिनिटसशी झगडणाऱ्या लोकांसाठी जगजागृती फार महत्त्वाची असल्याचं ओलिवर मोझेझी सांगतात.

टिनिटस कोणालाही होऊ शकतो. तीनपैकी एका व्यक्तीला आयुष्यात कधीतरी टिनिटस होतो.

ऐकण्याची क्षमता गेल्यामुळे, खूप मोठा आवाज खूप जास्त वेळासाठी कानावर पडल्यामुळे किंवा कोणतंही कारण नसतानाही असा आवाज येऊ शकतो.

टिनिटसवर पूर्णपणे बरा करण्यासाठी सध्या कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. पण रुग्णाला आराम मिळावा यासाठी मास्किंग किंवा कॉग्निटिव्ह बिहेविरल थेरपी (सीबीटी) सारख्या काही उपचार पद्धतींचा वापर केला जातो.

टिनिटसमध्ये नक्की काय होतं?

मोझेझी सांगतात, नशीब चांगलं असेल तर फक्त 'हिस्स' असा आवाज कानात येतो. नाहीतर कोणीतरी उच्च पट्टीतल्या स्वरात जोरात ओरडतंय असा त्रासदायक आवाज टिनिटसमध्ये येतो.

मोझेझी इंग्लडमधल्या हँपशायर नावाच्या शहरात आयटी सल्लागार म्हणून काम करतात.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

सुरूवातीला याबद्दल डॉक्टरांशी बोलल्यावर त्यांना फार हतबल झाल्यासारखं वाटलं असं ते सांगतात. त्यांचा त्रास नेमका किती तीव्र आहे हेच डॉक्टरांना कळत नव्हतं.

त्यामुळे टिव्ही आणि मोबाईलवरच्या काही ॲप्सचा वापर करून तो आवाज किती मोठा असतो हे मोजण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

ओलिवर मोझेझी

फोटो स्रोत, ओलिवर मोझेझी

फोटो कॅप्शन, टिव्ही आणि मोबाईलवरच्या काही ॲप्सचा वापर करून तो आवाज किती मोठा असतो हे मोजण्याचा प्रयत्न मोझेझी यांनी केला.

टिनिटसमुळे येणारा आवाज झाकण्यासाठी रुग्ण पावसाचा किंवा वाऱ्याचा असे व्हाईट नॉईज ऐकतात. त्यालाच साऊंड मास्किंग म्हणतात.

घरातल्या टिव्हीवर मोझेझी यांनी व्हाईट नॉईज लावला. टिनिटसमुळे येणारा आवाज व्यापला जात नाही तोपर्यंत टिव्हीचा आवाज ते वाढवत राहिले.

मग टिव्हीतून येणारा आवाज किती मोठा आहे हे त्यांनी मोबाईलवरून डेसिबल मीटरच्या मदतीनं मोजलं.

"एका वेळी तो आवाज 90 डेसिबल्स इतका मोठा करण्याची गरज पडली. साधारणपणे 40 ते 67 डेसिबल्स यामध्ये तो कमी जास्त होत असे," बीबीसीशी बोलताना ते सांगत होते.

40 ते 90 डेसिबल्सचा टिनिटस जवळपास अडीच महिने अनुभवला असल्याचं ते सांगतात.

टिनिटसवर काय उपाय करता येतील?

टिनिटसवर काय उपाय करता येतील याचा त्यांनी स्वतःच अभ्यास केला. त्यातून तो आवाज जरा मध्मम पातळीपर्यंत आणणं त्यांना शक्य झालं. नंतर आवाज आणखी जास्त आटोक्यात आला.

"ऑनलाईन याबद्दलची भरपूर माहिती मला सापडला. कितीतरी प्रसिद्ध लोकांनाही हा त्रास होत असतो हे कळाल्यावर ते त्यासोबत रोज कसं जगतात ते समजलं. हळूहळू ते मलाही जमू शकतं असं वाटू लागलं," ते म्हणाले.

सोन्जा जोन्स या ऑडिओलॉजिस्ट 'टिनिटस युके' संस्थेच्या वैज्ञानिक सल्लागार समितीवर आहेत. संस्थेच्या अहवालाच्या त्याही एक लेखक आहेत.

या क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिलं जाणारं टिनिटसचं प्रशिक्षण पुरेसं नाही आणि अनेक खासगी दवाखान्यांमध्ये टिनिटसला फारसं महत्त्वंही दिलं जात नाही, असं त्या सांगत होत्या.

"ऑडिओलॉजी क्षेत्रात जमिनी स्तरापासूनच ही समस्या दिसून येते. ऑडिओलॉजी शिकताना अगदी पहिल्या दिवसापासून ते संपूर्ण शिकून झाल्यानंतर करायच्या प्रशिक्षणांमध्येही त्याचा फारसा उल्लेख आढळत नाही. याचे कोणतेही सर्वमान्य निकष नाहीत. त्यामुळे प्रत्येकजण एकाच पद्धतीने विचार करेल असंही नाही," त्या म्हणाल्या.

कोल्डप्ले या म्युझिक बँड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोल्डप्ले या म्युझिक बँडचा मुख्य गायक क्रिस मार्टिन यानेही टिनिटसचा त्रास होत असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दोन्ही कानांची ऐकण्याची क्षमता जरा कमी झाली आहे असं काही दिवसांनी तपासण्या केल्यानंतर मोझेझी यांना सांगण्यात आलं.

असा आवाज ऐकू येणाऱ्या इतर लोकांप्रमाणेच तेही त्यामागच्या कारणाचा शोध घेऊ लागले.

"मी घरूनच काम करतो. कधीही मोठ्या आवाजात जात नाही."

"माझी काही अँटीबायोटिक औषधं ओटोटॉक्सिक म्हणजे कानाला इजा पोहोचवणारी होती असं मला समजलं. ते कारण असण्याची शक्यता आहे पण तसं सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नाही असं मला माझ्या कान-नाक-घसा तज्ज्ञांनी सांगितलं," असंही ते पुढे म्हणाले.

डॉन मॅकफेरन हे टिनिटस युके या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते स्वतः कान-नाक-घसा तज्ज्ञ आहेत. ओटोलॉजी, त्यातही टिनिटसमधले ते तज्ज्ञ आहेत.

"बहुतेक औषधं ही ओटोटॉक्सिक नसतात. त्यामुळे टिनिटस होत नाही. पण याला काही अपवाद आहेत. प्लॅटिनम असणारी काही औषधं काही अँटीबायोटिक औषधं आणि इतरही काही औषधांचा ओटोटॉक्सिक परिणाम होऊ शकतो," ते म्हणाले.

आपले कान किती महत्त्वाचे आहेत याचा लोकांमध्ये प्रसार करणं हेच मोझोझी यांच्या आयुष्याचं लक्ष्य बनलंय.

"लोकांनी स्वतःच संरक्षण करावं एवढाच संदेश मला द्यायला आहे. सगळेच त्यापासून लांब पळू शकत नाहीत हे खरं आहे.

पण जसं व्यायाम केल्यानं शरीराचं संरक्षण होतं तसे प्रतिबंधात्मक उपाय करून यापासून लांब राहता येऊ शकतं," मोझोझी सांगतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.