आधी घरच्यांनी मग समाजानं नाकारलं, कुष्ठरोग बरा होऊनही या महिला 'आपल्या' माणसांच्या प्रतीक्षेत

- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
"वर्षभरातून एखाद्या वेळी घरी जाते. माहेरी गेल्यावरच दोन चार दिवस राहते, आणि परत येते. घरी मुलगा, सून, नातू असल्यामुळे त्यांच्या आयुष्यात कशाला अडचणी निर्माण करायच्या? आपलं नशीबच फुटकं असल्यावर कुणाला दोष द्यायचा? कुटुंबात राहायची इच्छा कुणाची नसते हो?"
अत्यंत कठोर मनाने आपल्या नशिबाला दोष देत स्वतःला सावरणाऱ्या आशा बंडू वाजोळकर. आशा यांना कुष्ठरोग झाला आणि त्यांचं संपूर्ण आयुष्यचं बदलून गेलं.
त्या सध्या अमरावतीच्या तपोवन कुष्ठरोगी पुनर्वसन केंद्र भूमीत राहतात. पायाला जखम झाली तेव्हा दीर आणि मुलाने त्यांना इथं आणून सोडलं आहे. आता त्या सत्तर वर्षांच्या आहेत.
"माझ्या पायाला जखम झाली होती. कुटुंबानं अकोल्यात उपचारासाठी नेलं. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं. ऑपरेशन न करता तपोवनात भरती झालो. मुलगा दोन वर्षांचा होता तेव्हाच तपोवनात दाखल झाले. आता मला इथं 10 वर्षं झालीत. औषध-पाणी घेऊन बरीही झाले. आता कुटुंबाची ओढ लागली पण कुटुंब इथून नेत नाही," आशाताई आपल्या दुःख व्यक्त करत होत्या.
तपोवन कुष्ठरोगी पुनर्वसन केंद्रात अशा अनेक महिला आहेत ज्यांना कुटुंबाची ओढ लागली आहे. वर्षानुवर्षे तपोवन भूमीत राहिल्यानंतर त्यांना आता कुटुंबात राहायचंय.

गिरजा व्यवहारे यांना आठवतही नाही की त्या इथे कधी आल्या. कपाळावर कुंकू, हातात बांगड्या आणि लुगडं घालून त्या आपल्या 'आपल्या माणसांची' वाट बघत असतात. लहान असताना मुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या पाठोपाठ त्यांनीही विहिरीत उडी घेतली. पण त्या बचावल्या आणि तपोवनात पोहोचल्या.
आशा वाजोळकर, गिरजा व्यवहारे यांच्यासह 100 पेक्षा अधिक महिला तपोवनात राहातात. आधी त्यांना समाजानं नाकारलं आणि नंतर कुटुंबीयांनीही नाकारलं. गिरजा व्यवहारे त्यापैकीच एक आहे. हाताची बोटं निकामी झालीत. तरीही त्या इथं विणकाम करतात.
कुष्ठरोग्यांप्रती समाजाचा दृष्टीकोन अद्यापही बदललेला नाही. पुष्पा खानापुरे यांचीही कहाणी अशीच आहे. पायाच्या जखमेनं इथंवरचा प्रवास गाठला. आणि आता त्या इथल्याच होऊन गेल्यात. या संस्थेत त्या आता अकाउंटंट म्हणून काम सांभाळतात.


पुष्पा खानापुरे कुष्ठरुग्ण आहेत. त्यांच्या भावाने त्यांना इथं आणून सोडलं आहे. लग्न झाल्यानंतर सासरी असताना त्यांना कुष्ठरोगानं ग्रासलं. सामाजिक भीतीपोटी सासरच्यांनी उपचार न करता आजार लपवला. कुटुंबीय औषध-पाणी करून घरातच ठेवायचे; त्यामुळे शरीरावर इन्फेक्शन झालं.
पुष्पा सांगतात, "संपूर्ण शरीरावर इन्फेक्शन झाल्याने मी माहेरी आली. माझ्या भावाने इकडे आणून सोडलं. इथे माझी तब्येत लवकरच चांगली झाली. पण एखाद्या वेळी घरी भेट दिली तर शेजारी घरच्यांना बोलतात, 'तिला इथे का ठेवता, दवाखान्यात का ठेवत नाही.' ते योग्य वाटत नाही म्हणून आई-वडील होते तेव्हा जायची घरी. आता जात नाही."

पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी 1950 मध्ये कुष्ठरोग्यांसाठी तपोवनची स्थापना केली. कुष्ठरोग्यांवर उपचार आणि त्यांच्याप्रती असलेला भेदभाव दूर करण्याचा त्यांचा उद्देश होता. त्याचबरोबर त्यांना उपजीविकेचं साधन उपलब्ध करून देणंही महत्वाचं होतं. त्याच दिशेनं तपोवनाचं काम चालतं. कुष्ठरोगी असणाऱ्या 100 महिला आणि 60 पुरुषांसह बरे झालेले 360 कुष्ठरोगी याठिकाणी काम करतात. याच संस्थेत भास्कर शेटे मोची काम बघतात. ते सुद्धा कुष्ठरोगी आहेत.
त्यांच्या मांडीवर चट्टा होता. तेव्हा त्यांच्या आईनं त्यांना इथं आणलं. याच संस्थेत त्यांचं लग्न पार पडलं. त्यांना दोन मुलं आहेत. इथेच त्यांचं शिक्षण झालं. ते इथेच नोकरी करतात.
तपोवनात आज जवळपास 100 कुष्ठरुग्ण महिला आहेत. त्यापैकी अनेकजण बऱ्या झाल्या असल्या तरी कुटुंबीय त्यांना स्वीकारायला तयार नाहीत.

तपोवन संस्थेत ऋषिकेश देशपांडे उपसचिव आहेत.
ते सांगतात "आमच्याकडे स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे आणि ते सगळे कुष्ठरुग्ण आहेत. इथले कुष्ठरुग्ण इथंच काम करतात. त्यांच्या आवडीनुसार ते काम करतात. त्यांना प्रतिष्ठेचा रोजगार मिळत असेल तर तो तपोवनातच मिळतो. आजही समाजाची परिस्थिती बदललेली नाही. त्यांना स्वीकारायला कुणी तयार नाही."
पुढे ते सांगतात, "कुष्ठरोगी पुरुष जर आला तर त्यांच्यासोबत कुटुंब-बायको येते. पुरुष संस्थेत काम करतो, सोबत त्याची पत्नीही इथंच काम करते. पण महिलांची स्थिती जरा वेगळी आहे. एखाद्या महिलेला जर कुष्ठरोग झाला तर तिचा नवरा, मुलगा, आप्तजन त्या महिलेला इथं आणून सोडतात आणि म्हणतात बरी झाली की आठ-दहा दिवसांत तुला घेऊन जाईन."
"परंतु तसं होत नाही. सोडून दिल्यानंतर ते परत कधीच येत नाही. आले तर तिला मिळालेले योजनेचे पैसे किंवा संस्थेकडून मिळालेला मोबदला घेण्यासाठी येतात. पैसे घेतात आणि निघून जातात. त्या महिलेला ते कधी घरी घेऊन जात नाहीत. अनेक जण आहेत ज्यांचं वय पन्नाशीच्या पार आहे. परंतु, तिला घ्यायला ना नवरा आला, ना पती."

इथं उपचार घेत असलेल्या रुग्णांना शासनाकडून दोन हजार रुपयांचं अनुदान मिळतं. बरे झालेल्या रुग्णांची सगळी व्यवस्था संस्थेमार्फतच केली जाते. सन्मानानं जगण्याचा अधिकार तपोवन संस्था त्यांना मिळवून देते.
त्यासाठी संस्थेत विविध उपक्रम राबवले जातात. स्वयंपाक करण्यापासून ते विनाकामापर्यंत सगळं काही कर्मचारी बघतात. संस्थेत अजूनही आठवड्याला चार ते पाच रुग्ण येत असतात.
तपोवनात येणाऱ्या व्यक्तीला गावबंदी किंवा सामाजिक बहिष्कार टाकला जायचा. त्यामुळे कुष्ठरुग्ण तपोवनमध्ये उपचारासाठी येणं टाळायचे. एकदा इकडे आला की त्याला गावात प्रवेश टाळला जायचा.
तपोवनात जाऊन बदनामी होईल, या भीतीपोटी रुग्ण इथे येतच नव्हते. जे आले ते इथलेच होऊन गेले. जाण्याचे मार्ग खुले असले तरीही कुटुंबाचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद झाले आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











