तांड्यावरच्या मुली कोरियाला का निघाल्या होत्या? बीटीएसचा बँड त्यांच्यापर्यंत असा पोहोचला

बीटीएस

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, धाराशिव

"मी आमच्या घरातल्या टीव्हीवर काहीच 'घाण' बघायचे नाही. मला फक्त बीटीएस बघायला आवडायचं. पण, लोक म्हणाले तू काहीतरी चुकीचं बघत होतीस म्हणून असं केलंस. बीटीएसमधला व्ही खूप छान डान्स करतो. आम्हाला दक्षिण कोरियाला जाऊन फक्त त्यांना डान्स करताना बघायचं होतं. म्हणून आईने ठेवलेले पाच हजार रुपये गुपचूप उचलले, सोबत दोन मैत्रिणी होत्या आणि त्यांना घेऊन मी निघाले दक्षिण कोरियाला.."

मुंबईपासून सुमारे पाचशे किलोमीटरवर असणाऱ्या सत्तर उंबऱ्यांच्या तांड्यात राहणारी, आठवीत शिकणारी साक्षी (नाव बदलले आहे) सांगत होती.

मुंबई-हैद्राबाद महामार्गावर, धाराशिव जिल्ह्यातल्या एका छोट्या तांड्यात तिचं घर आहे.

त्या तांड्यात दवाखाना, माध्यमिक शाळा असं काहीही नसलं तरी तिच्या घरी वडिलांनी घरात वायफाय कनेक्शन लावलंय. याच वायफायला घरातला टीव्ही जोडला आहे. त्या टीव्हीवरच साक्षी आणि तिच्या मैत्रिणींनी दक्षिण कोरियाच्या बीटीएस म्हणजेच बांगतान बॉईज या म्युजिक बँडचे कार्यक्रम बघितले.

शाळेत शिकणाऱ्या तांड्यातल्या या मुलींना बीटीएस बँडचे सदस्य घालतात ते कपडे, ते गातात ती गाणी हे सगळं प्रचंड आवडलं. नुकत्याच वयात येऊ लागलेल्या या मुलींना कोरियन संगीताची भुरळ पडली होती.

बीटीएसच्या या प्रेमापायी या तीन अल्पवयीन मुलींनी एक निश्चय केला, 'घरात आईने ठेवलेले काही पैसे घ्यायचे आणि पुण्याला जायचं.. पुण्यात मिळेल ते काम करायचं, पैसे कमवायचे आणि त्यांच्या स्वप्नातल्या बीटीएस म्युजिक बँडच्या सदस्यांना याची देही याची डोळा बघायचं बस्स.'

भारताच्या खेडोपाडी पोहोचलेल्या इंटरनेटमुळे आपला देश बदलतो आहे. या बदलाला अनेक सकारात्मक आणि नकारात्मक पदर आहेत. याच इंटरनेटमुळे तांड्यात राहणाऱ्या या तीन मुलींनी बघितलेल्या कोरियन स्वप्नाची ही गोष्ट.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

कोण आहेत या मुली?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बीटीएस या कोरियन म्युझिक बँडची भाषा या मुलींना कळत नसली तरी ते काय गातात ते त्यांना चांगलंच उमजलंय. या बँडमध्ये सात सदस्य आहेत - जिन, सुगा, जे-होप, आरएम, जिमिन, व्ही आणि जुंगकुक. या सातही जणांची नावं, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे आवाज साक्षीला तोंडपाठ आहेत यातला व्ही तिचा फेव्हरेट आहे.

बीटीएसच्या याच वेडातून या मुलींनी दक्षिण कोरियाला जाण्यासाठी राहतं घर सोडायचं धाडस केलं. घरापासून शंभर किलोमीटर दूरवर गेल्यावर पुण्याच्या बसमध्ये बसलेल्या या मुली घाबरल्या. त्यातली सगळ्यात लहान मुलगी रडायला लागली. मग त्यांनी तिघींपैकी एकीच्या वडिलांना फोन केला.

शाळेत शिकणाऱ्या तीन मुली अचानक गायब झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि अर्ध्या तासाच्या आत या मुलींचा शोध लागला.

अनेक माध्यमांसाठी ही गोष्ट तिथेच संपली. 'तीन अल्पवयीन मुली घरातून पळाल्या,' 'घरातल्या पैश्यांची चोरी केली', 'अपहरणाचा बनाव केला' अशा मथळ्याखाली त्यावेळी बातम्या प्रकाशित झाल्या. पण यानंतर या मुलींचं संपूर्ण आयुष्यच बदललं.

पोटच्या मुली अचानक घरातून निघून गेल्याने भेदरलेल्या अशिक्षित पालकांनी त्यांना टीव्ही बघण्यास मनाई केली. यातल्या सहावीत शिकणाऱ्या मुलीच्या आईने तर एक महिना तिला शाळेतच पाठवलं नाही.

यातल्या एका मुलीला वडील नाहीत. तर एकीचे वडील ट्रक चालवतात तर एका मुलीची आई ऊसतोडणीला जाते. आपल्या मुलींनी मोबाईलवर नेमकं काय बघितलंय हे त्यांना कळतही नव्हतं. पण समाजात मात्र 'मुली मुलांसोबत पळून गेल्या,' 'घरातले पैसे घेऊन गेल्या' अशा अफवा पसरल्या होत्या.

ऊस तोडायला जाणारी आई म्हणते, "बीटीएस हे काहीतरी खायचं आहे की काय असं मला वाटलं. माझ्या मुलीला ते खावं वाटलं म्हणून ती दुसऱ्या मुलींसोबत गेली असेल असं वाटत होतं. पण पोलिसांनी बीटीएसचे व्हीडिओ दाखवले आणि मग मला कळलं बीटीएस काय आहे ते.

माझी मुलगी लहान आहे, तिला डान्स बघायचा होता म्हणून ती गेली होती. पण लोकांना कोण सांगणार? कुणीही काहीही बोलतंय. कुणी म्हणतंय मुलांसोबत पळून गेल्या, कुणी म्हणतंय आणखीन काही केलं, लोक तोंडाला येईल ते बोलतायत. आता आमच्याच मुलींची चूक आहे आम्ही तरी कुठवर भांडणार? मला काही कळत नव्हतं म्हणून माझ्या मुलीला अजून शाळेत पाठवलं नाही.

खरंतर मला तिला खूप शिकवायचंय, माझ्यासारखी ती उन्हात कामाला जाऊ नये असं वाटतंय पण शेवटी तिला शिकायचंय की नाही हे तिला ठरवायचंय."

बीटीएस
फोटो कॅप्शन, धाराशिव जिल्ह्यातल्या तांड्यात राहणाऱ्या या मुलींच्या घरी वायफाय पोहोचलाय.

सध्या या मुलींवर प्रचंड दबाव आहे, कुटुंबातले लोक उठता बसता रागवत आहेत. शाळेतल्या मुली 'बीटीएस बीटीएस' म्हणून चिडवतायत. इन्स्टाग्राम, फेसबुक यांची फक्त तोंडओळख असलेले शिक्षक या मुलींना समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. पण खरी गोष्ट यापलीकडे आहे.

या मुली ज्या तांड्यात राहतात तिथे इंग्रजी बोलू शकणारी एकदोन माणसं असतील. शाळासुद्धा चौथीपर्यंतच आहे. बरं अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या कुटुंबांमध्ये या मुलींची आवड समजू शकेल असंही कुणी नाही. त्यामुळे दक्षिण कोरियातला हा बँड या तांड्यावर कसा पोहोचला? कोरियन भाषेतली गाणी या मुलींना कशी आवडली? आणि हे सगळं घडण्याची कारणं काय आहेत याचा शोध घेणं महत्त्वाचं आहे.

याच प्रश्नांची उत्तरं शोधत आम्ही त्या तांड्यात पोहोचलो. बाहेरून पत्रकार आलेत हे बघून अख्खा तांडा तिथे जमला. मुलींच्या आजी आजोबांनी आधी आम्ही काहीही बोलणार नाही, आमच्या मुलींनी खूप मोठी चूक केली आहे. असं म्हणायला सुरुवात केली. सुरुवातीला आमच्याशी बोलायलाही ते तयार नव्हते.

शेवटी आम्ही त्यांना विश्वासात घेतलं. आमच्या मनात पडलेले प्रश्न त्यांना सांगितले आणि मग मुलींची ओळख सार्वजनिक न करता आमच्याशी बोलायला ते तयार झाले.

अतिशय अल्लड वयातल्या या चिमुकल्या मुलींना कोरियन गाण्यांची आवड कळत होती. फक्त बीटीएसला बघण्यासाठी किती मोठं धाडस केलंय हे त्यांच्या गावीही नव्हतं.

व्हीडिओ कॅप्शन, कोरियन गाणी आवडणाऱ्या मुली, थेट दक्षिण कोरियाला जाण्यासाठी घर सोडलं

भारतात किंवा विशेषतः मराठी माध्यमात 13 ते 23 या वयोगटातील मुलांना खिळवून ठेवू शकेल असे चित्रपट, गाणी, नाटकं, संगीत फारसं उपलब्ध नाहीये. या मुलांची भाषा समजून त्यांचं मनोरंजन करण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय.

आपल्या शिक्षणव्यवस्थेत माध्यम शिक्षणाच्या नावावर काहीही शिकवलं जात नाही आणि कदाचित यामुळेच भारतात राहणाऱ्या या वयोगटातील मुलांना त्यांच्यासाठी बनवलेल्या कोरियन भाषेतील केपॉप संगीत आणि केड्रामाचं खूप आकर्षण आहे. याच आकर्षणातून तांड्यावर राहणाऱ्या या मुलींनी हा प्लॅन बनवला होता.

भारतातली बीटीएस आणि के-पॉप म्युझिकची क्रेझ

तारीख होती 10 जुलै 2018, दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे-इन भारतात आले होते.

त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या भाषणात भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, "अत्यंत लोकप्रिय असलेल्या कोरियन संस्कृतीने आमच्यावर भुरळ घातली आहे. गंगनाम स्टाईलपासून ते बीटीएस पर्यंत कोरियन पॉप ग्रुप्सच्या संगीताने भारतीय तरुणांना वेड लावलंय. यापैकी अनेकजण कधीही गंगनामला गेलेही नाहीत."

भारताच्या राष्ट्रपतींनी केलेलं कोरियन संगीताचं कौतुक बरच काही सांगून जातं.

2018 नंतर कोरियन संगीताची आणि संस्कृतीची लोकप्रियता अनेकपटींनी वाढली आहे. आता भारतातल्या तरुणांनाच नाही तर लहान लहान मुलांना देखील कोरियन संगीत आवडू लागलं आहे.

याबाबत बोलताना सायबर व समाजमाध्यम विषयाच्या अभ्यासक तथा 'सायबर मैत्र'च्या संस्थापक मुक्ता चैतन्य म्हणतात, "मला असं वाटतं की दक्षिण कोरियाने हेतूपुरस्सर त्यांचं जेवण, त्यांची संस्कृती जगभरात निर्यात केली आहे. त्या देशाने अत्यंत धोरणात्मक पातळीवर हे केलं आहे. जगावर प्रभाव टाकण्यासाठी किंवा जगात स्वतःच असं स्थान बनवण्यासाठी प्रत्येक देश काही तरी करत असतो. त्यामुळे कोरियाने सुनियोजित प्रयत्न केले आहेत आणि जग यासाठी तयार नव्हतं.

एखादा देश त्यांची संस्कृती, त्यांच्या देशातील मनोरंजन, वेशभूषा यांची अशापद्धतीने निर्यात करू शकतो हे कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. एक असं संगीत ज्याची भाषा कुणाला कळत नाही ते जगभर लोकप्रिय होऊ शकतं हे कुणालाही माहीत नव्हतं आणि अशापद्धतीने केलेला हा एकमेव प्रयोग म्हणायला हवा."

बीटीएस

2020च्या कोरोना लॉकडाऊननंतर भारतात कोरियन संगीत आणि मालिकांची लोकप्रियता वाढली.

युरोमॉनिटरच्या आकडेवारीनुसार 2020साली भारतात कोरियन ड्रामा बघणाऱ्यांची संख्या तब्बल 370 टक्क्यांनी वाढली.

जानेवारी 2020पूर्वी जिओसावन या म्युझिक अ‍ॅपवर बीटीएस हा कोरियन बँड 68 व्या स्थानावर होता आणि त्याचवर्षीच्या ऑक्टोबरपर्यंत बीटीएसने त्या यादीत आठव्या स्थानावर धडक मारली.

कोरियन संस्कृतीची भारतातली वाढती लोकप्रियता या आकड्यांवरून स्पष्ट होते. पण कोरियन संगीतावर असणारं प्रेम आता केवळ ती गाणी आणि मालिका पाहण्यापुरतं राहिलेलं नाही.

बीटीएस आर्मी काय आहे?

बीटीएस म्युझिक बँडच्या चाहत्यांना 'बीटीएस आर्मी' असं म्हणतात. बीटीएसने त्यांच्या चाहत्यांना एक रंगही दिलाय. बीटीएसचे कपडे, बीटीएसशी संबंधित वस्तू या सगळ्या 'जांभळ्या' रंगाच्या असाव्यात असा या आर्मीचा नियम आहे.

बीटीएसच्या या प्रेमाला पूर्णवेळ व्यवसायात बदलण्याचा प्रयत्नही अनेकांनी केलाय. केवळ मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता अशा मोठ्या शहरांमध्येच नाही तर नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर अशा छोट्या शहरांमध्येही बीटीएसच्या थीमवर आधारित कॅफे सुरु झालेत.

कोल्हापूरच्या नागला पार्क येथे बीटीएस कॅफे चालवणाऱ्या सारिका नलावडे

कोल्हापूरच्या नागला पार्क येथे बीटीएस कॅफे चालवणाऱ्या सारिका नलावडे म्हणतात, "इथे आलं ना की तुम्ही कितीही परके असाल, कधी एकमेकाना भेटले नसाल पण जर तुम्ही बीटीएस आर्मी असाल तर दोनच मिनिटात तुम्ही कनेक्ट होता. बीटीएस आर्मीचे सदस्य एकमेकांशी जुनी ओळख असल्यासारखे बोलू लागतात. एकमेकांना इन्स्टा आयडी दिले जातात, ग्रुप जॉईन केले जातात.

3-4 वर्षांच्या मुलांपासून 60 ते 65 वर्षांच्या ज्येष्ठ लोकांपर्यंत बीटीएस आर्मीचे सदस्य आहेत. माझी मुलगी चार वर्षांची आहे, तीसुद्धा बीटीएस आर्मीत आहे. मी तिला मराठी, इंग्रजीसोबत कोरियन देखील शिकवणार आहे."

कोरियन संगीत लहान मुलांना एवढं का आवडतं?

दक्षिण कोरियाला निघालेल्या या तीन मुलींपैकी दोघी आठवीत शिकतात तर एक मुलगी सहावीत शिकते. त्यांच्या वस्तीत लहान मुलांसाठी मनोरंजनाची कसलीच साधनं उपलब्ध नाहीत. खेळायला मैदान नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलगी असल्यामुळे इतर काही करायला कुटुंबाची परवानगीसुद्धा नाही.

फावल्या वेळात घरातला टीव्ही आणि मोबाईल हेच त्यांचे साथीदार. घरात इंटरनेट आहे आणि त्या इंटरनेटवर जगभरातल्या मनोरंजनाची दारं सताड उघडी आहेत.

विशेषतः या वयोगटातील मुलांचा विचार केला तर आपल्या हिंदी किंवा मराठी भाषेत पौगंडावस्थेतील अस्वस्थतेला शमवू शकेल, त्या वयात पडलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देऊ शकेल, या मुलांना त्यांच्या भाषेत बोलू शकेल असं साहित्य उपलब्ध नाही. दक्षिण कोरियाने नेमकं हेच हेरलंय.

मुक्ता चैतन्य म्हणतात, "आपण वयात येणाऱ्या मुलांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. आपण त्यांच्यासाठी काहीही करत नाही. त्यांच्यासाठी कसलीही पुस्तकं नाहीयेत. या वयोगटासाठी बनवलेल्या वेब सिरीज किंवा मालिका नाहीत. त्यांच्यासाठी नाटकं, चित्रपट काहीही नाही.

बीटीएस

आपल्याकडे जे काही साहित्य आहे ते मोठ्यांचं साहित्य असतं ज्यामध्ये मुलांनी स्वतःहून सामावून घ्यावं लागतं. मनोरंजनाची साधनं देखील प्रौढांचीच आहेत आणि त्याचाच वापर या मुलांना करावा लागतो.

बालनाट्य असतात पण ती खूप लहान मुलांसाठी असतात. म्हणजे 13 ते 23 या वयोगटासाठी आपण काहीच करत नाही. मग ही मुलं त्यांच्या मनोरंजनासाठी देशाबाहेर, जगाबाहेर डोकावतात. त्यानंतर त्यांना के-पॉप सापडतं, के-ड्रामा सापडतं.

त्या गोष्टींचं आकर्षण तयार होतं. त्यात जे पदार्थ, कपडे दिसतात ते पदार्थ खावेसे, तसे कपडे घालावेसे वाटतात. मग त्याचा एक स्वतंत्र उद्योग तयार होतो. या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात."

सारिका नलावडे यांच्या कॅफेमध्ये रामेन, किम्बाप सारखे कोरियन पदार्थही मिळतात. त्यांच्याकडे येणारा ग्राहक बीटीएसच्या संबंधित वस्तूंची, कपड्यांची मागणी करतो. म्हणूनच त्यांनी कोरियन फॅशनमध्ये देखील स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.

थोडक्यात काय तर आपण या लहान मुलांसाठी फारसं काही केलं नाही आणि त्यातून निर्माण झालेली पोकळी कोरियन संगीत आणि मालिकांनी भरल्याचं पाहायला मिळतं.

माध्यमांच्या महापुरात विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी शिक्षण व्यवस्था तयार आहे का?

बीटीएस आर्मीचा भाग असणाऱ्या या मुली ज्या शाळेत शिकतात ती शाळा एका छोट्या गावात आहे. तिथे शिकवणाऱ्या शिक्षकांना मोबाईल वापरण्यासाठी अनेकदा लहान मुलांचाच आधार घ्यावा लागतो.

साक्षी आणि तिच्या मैत्रिणींना शिकवणारे शिक्षक म्हणतात, "बीटीएस तर सोडा आम्हाला नीट फेसबुक वापरता येत नाही. मी गावातल्या लहान मुलांना विचारलं तेव्हा त्यांनी मला वेड्यात काढलं. त्यांनी उघडून दिलेलं बीटीएसचं जग खरोखर माणसाला गुंतवून ठेवणारं आहे.

त्यात दाखवलेली गाणी, नाच, कपडे हे सगळंच आकर्षक आहे. खेड्यात राहणाऱ्या मुलांच्या तळहातावर त्यांना जग मिळालंय आणि त्यांची जबाबदारी असणाऱ्या आम्हा शिक्षकांना मात्र यासाठीचं कसलंही प्रशिक्षण मिळालेलं नाही.

या मुलांची भाषा आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण ते सहज जमत नाही. तेवढा वेळही आम्हाला मिळत नाही. मोबाईलमुळे जग खूप बदललं आहे आणि शिक्षकांकडे हे सगळं सांभाळण्यासाठी काहीही नाही."

मुक्ता चैतन्य
फोटो कॅप्शन, "आपण वयात येणाऱ्या मुलांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. आपण त्यांच्यासाठी काहीही करत नाही. त्यांच्यासाठी कसलीही पुस्तकं नाहीयेत. या वयोगटासाठी बनवलेल्या वेब सिरीज किंवा मालिका नाहीत."

मुक्ता चैतन्य म्हणतात, "माध्यमशिक्षण हा घटक खूप महत्त्वाचा आहे. आपण रेडिओ, टीव्ही, पूर्णवेळचा टीव्ही, केबल नेटवर्क, मोबाईल, स्मार्टफोन, इंटरनेट ही सगळी माध्यमं खूप पटापट स्वीकारली. पण, या माध्यमांचा वापर आपण कसा केला पाहिजे, या सगळ्याकडे एक तिऱ्हाईत म्हणून कसं बघितलं पाहिजे. आपल्या हातात जी आयुधं आली आहेत त्यांचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो? या सगळ्याबाबत शिक्षण देण्याचा प्रयत्न कधीही केलेला नाही.

या शिक्षणाच्या अभावामुळे झालेले परिणाम आपल्याला आता दिसत आहेत. डिजिटल माध्यम शिक्षण हा विषय जर तुमच्या मूळ शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये आला तरच हे शिक्षण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू शकतं. मुळात आता माध्यमाशिक्षण देणाऱ्या व्यवस्थाच कमी आहेत. सध्याच्या अभ्यासक्रमात देखील डिजिटल शिक्षणाबद्दलचा उल्लेख आहे पण तो केवळ चार ओळींपुरताच आहे.

आता एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भात विचार केला, तर ही मुलं हे नव्या कंपन्यांचा 'नवीन ग्राहकवर्ग' आहेत. ही मुलं पुढची पन्नास ते साठ वर्षं ग्राहक असणार आहेत. आणि या सगळ्या कंपन्या याच मुलांना समोर ठेवून कन्टेन्ट आणि वस्तू बनवणार आहेत. यासाठी आपण त्यांना तयार करणार आहोत का? हा सगळ्यात मोठा मुद्दा असणार आहे."

डिसेंबर महिन्यात धाराशिव जिल्ह्यात ही घटना घडली.

त्याआधी 10 जानेवारी 2024 रोजी तामिळनाडूतल्या तीन अल्पवयीन मुली बीटीएससाठी घरातून पळून गेल्या होत्या. या सगळ्या घटना इंटरनेटमुळे सामान्य माणसांच्या आयुष्यावर होणारे बहुआयामी परिणाम दाखवतात.

अशिक्षित कुटुंबातील मुलांनी इंटरनेटवर काही बघून काहीतरी केलं तर त्याचे परिणाम जास्त वाईट होतात. कारण ते सगळं समजून घेण्यासाठी आपला समाज अजूनही तयार नाही. येणाऱ्या काळाच्या उदरात, अल्गोरिदमची पुसटशीही कल्पना नसलेल्या समाजात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे काय काय होईल? याची कल्पनाही न केलेली बरी.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.