बीटीएस : या कोरियन बँडचे सदस्य गिटार बाजूला ठेवत थेट लष्करात चाललेत, कारण...

BTS

फोटो स्रोत, IFPI

फोटो कॅप्शन, कोरियापासून अमेरिकेपर्यंत बीटीएसचे जगभरात चाहते आहेत.
    • Author, जाह्नवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी

बीटीएस हा जगप्रसिद्ध कोरियन बँड काही काळासाठी गिटार बाजूला ठेवणार आहे!

जगातल्या कोट्यावधी फॅन्ससाठी ही धक्कादायक बातमी असली तरी, त्यामागचं कारणही तितकंच आश्चर्यचकित करणारं आहे - BTS सक्तीच्या लष्करी सेवेसाठी जाणार आहेत.

पण बीटीएस कोण आहेत? ते एवढे लोकप्रिय का झाले? आणि त्यांना दक्षिण कोरियात सक्तीची लष्करी सेवा का करावी लागणार आहे?

बीटीएस कोण आहेत?

तुम्ही के-पॉप म्हणजे कोरियन पॉप म्युझिकचे चाहते असाल किंवा नसाल, सोशल मीडियावर बीटीएसविषयी तुम्ही ऐकलं किंवा वाचलं असेल.

बीटीएसचं पूर्ण नाव आहे बँग्टन सोनियोंदन (Bangtan Sonyeondan) म्हणजे बुलेटप्रुफ बॉय स्काऊट्स. 'बँग्टन बॉईज' नावानंही ते ओळखले जातात.

या बँडमध्ये सात सदस्य आहेत - जिन, सुगा, जे-होप, आरएम, जिमिन, व्ही आणि जुंगकुक. या सात जणांची निवड बांग सीह्यूक या एका संगीतकारानं ऑडिशन्समधून केली होती.

2010 साली या ग्रुपची स्थापना झाली आणि 2013 साली त्यांचा पहिला अल्बम रिलीज झाला. तेव्हापासूनच ते लोकप्रिय होऊ लागले, आणि कोरियापाठोपाठ जपान आणि इतर आशिया देशांमध्ये BTSची चर्चा होऊ लागली.

BTS at the White House

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 31 मे 2022 रोजी बीटीएसनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं अधिकृत निवासस्थान व्हाईट हाऊसला भेट दिली.

गेल्या काही वर्षांत तर आशियाबाहेर जगभरात, अगदी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसपर्यंत बीटीएसनं धुरळा उडवून दिला. अगदी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही त्यांना भाषण करण्याची संधी मिळाली.

अमेरिकेत बीटीएसनी आशियाई वंशाच्या नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या वर्णद्वेष आणि त्रासावरही भाष्य केलं.

यंदा आयएफपीआय या संगीतक्षेत्रातल्या नावाजलेल्या संस्थेनं बीटीएसला ग्लोबल रेकॉर्डिंग आर्टिस्ट ऑफ द इयर म्हणून नावाजलं.

जगभरात त्यांचे चाहते बीटीएस आर्मी म्हणून ओळखले जातात.

BTS एवढे लोकप्रिय का झाले?

एक म्हणजे मुळातच कोरियन पॉपची लोकप्रियता वाढली आहे. त्यातलं संगीत, गायन, नृत्य यात नाविन्य आहे. हटके स्टाईल, जोरदार मार्केटिंग आणि पैशाच्या जोरावर के पॉपची, आणि त्यातल्या त्यात बीटीएसची क्रेझ जगभरात पसरली.

पॉप, हिपहॉप, ऱ्हिदम अँड ब्लूज अशा मिश्र संगीतामुळे आणि खास डान्स रुटिन्समुळेही हा बँड ओळखला जातो.

BTS performs onstage at the 2017 American Music Awards

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बीटीएसचा 2017 सालच्या अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्स सोहळ्यातला परफॉर्मन्स

अवघ्या विशीतल्या तरुणांचा हा ग्रुप जगभरात तरुणाईच्या मनाला भिडू लागला. यामागचं आणखी एक कारण म्हणजे, बीटीएसने निवडलेले विषय. तरुणांच्या मानसिक आरोग्यापासून ते राजकारणापर्यंत, वेगवेगळ्या विषयांवर ते आपली मतं परखडपणे मांडत असतात.

बीटीएस सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी सतत जोडलेले राहतात. सोशल मीडियावरचा त्यांचा वावर काहीसा विनम्र असा असतो, जे इतर सेलिब्रिटीजच्या तुलनेत उठून दिसतो. अनेकांना त्यांच्यात स्वतःचं प्रतिबिंबही दिसतं.

अलिकडेच या बँडनं काही काळासाठी आपण विश्रांती घेत असल्याचं जाहीर केलं होतं. बँडचे काही सदस्य वैयक्तिक प्रोजेक्ट्सवर काम करणार आहेत. ती घोषणा झाल्यावर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

पण आता सगळेजण सक्तीच्या लष्करी सेवेत दाखल होणार आहेत, असं बँडच्या मॅनेजर्सनी जाहीर केलं आहे.

सक्तीची लष्करी सेवा कशी असते?

काही काळापूर्वी भारतात अग्निपथ योजना लागू झाली, तेव्हा कोरियातल्या सक्तीच्या लष्करी सेवेचा दाखला अनेकांनी दिला होता.

दक्षिण कोरियात सर्व शारीरिकदृष्ट्या सक्षम पुरुषांना वयाच्या तिशीपर्यंत राष्ट्रीय लष्करी सेवेत सुमारे दोन वर्षं काम करणं बंधनकारक असतं. महिला स्वेच्छेनं त्यात सामील होऊ शकतात. तांत्रिकदृष्ट्या उत्तर कोरियासोबत युद्ध संपलेलं नसल्यानं दक्षिण कोरियात ही व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

त्याअंतर्गत 18 ते 28 वयोगटातले तरुण लष्करात 21 महिने, नौदलात 23 महिने किंवा हवाई दलात 24 महिने सेवा, या तीनपैकी एकाची निवड करू शकतात. याव्यतिरिक्त पोलीस, तटरक्षक दल, अग्निशमन सेवा आणि काही विशेष प्रकरणांमध्ये सरकारी विभागात काम करण्याचा पर्यायही त्यांच्यासमोर असतो.

ऑलिम्पिक किंवा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणाऱ्या खेळाडूंना सैन्यातील सक्तीच्या सेवेतून सूट दिली जाते. ज्या खेळाडूंना पदक मिळत नाही, त्यांना परत येऊन सैन्यात सेवा बजावावीच लागते.

BTS poses for a portrait during the 2017 American Music Awards at Microsoft Theatre

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बीटीएस

आज के-पॉप आणि BTS दक्षिण कोरियाची जागतिक ओळख बनले आहेत. त्यांच्या या ब्रँडचा देशाच्या अर्थव्यवस्थेला कोट्यवधींचा फायदा होतोय, आणि हेसुद्धा एक प्रकारचं राष्ट्रीय कार्यच आहे, म्हणून बीटीएसला सक्तीच्या मिलिट्री सर्व्हिसमधून सूट दिली जावी, अशी मागणी अगदी त्या देशाच्या संसदेतही केली गेली.

पण ती मागणी मान्य झाली नाही. अर्थात या सेवेच्या काळातही त्यांना एकत्र येऊन प्रॅक्टिस करण्याची मुभा संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)