गणेशोत्सव: महाराष्ट्रात मराठी लोक शिवाजी महाराजांच्या काळातही लेझीम खेळायचे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी
गुढीपाडव्याची शोभायात्रा असो किंवा गणपतींचे आगमन-विसर्जन मिरवणुका यामध्ये सध्या हमखास दिसतं ते लेझीम पथक. पण लेझीम हा लोककला - क्रीडा प्रकार किती जुना आहे?
1982च्या एशियन गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यात शेकडो मुलामुलींना सादर केलेली लेझीम कला अनेकांना आठवत असेल.
गेल्या काही वर्षांमध्ये गुढीपाडव्याला शोभायात्रा काढायला सुरुवात झाली. फेटा बांधलेले तरुण, नऊवारी साडी नेसून फेटा - गॉगलसह मोटरसायकलवर आरूढ तरूणी, अनेक दिवसांच्या सरावाने तयार झालेली ढोल पथकं - ध्वज पथकं या सगळ्यासोबतच या मिरवणुकांमध्ये लेझीम पथकंही दिसतात. गणपती विसर्जन, विविध संमेलनांच्या स्वागत मिरवणुका, देवस्थानांच्या - उत्सवांच्या पालख्या यामध्येही लेझीम पथकं असतात.
महाराष्ट्रातला लेझीम हा क्रीडाप्रधान लोककला प्रकार आहे.
Lazium (लेझम किंवा लेझियम) या फारशी शब्दावरून लेझीम हा शब्द प्रचारात आला असावा असं मराठी विश्वकोशात म्हटलं आहे. याचा अर्थ होतो तार लावलेलं धनुष्य.
पूर्वीपेक्षा आता लेझीमच्या आकारात आणि वजनात काळानुरूप बदल झाले असून वजनाला लेझीम हलकं झाल्याचं लेझीम खेळणारे सांगतात.
लेझीम कसं असतं?
लाकडी दांडा आणि त्या दांड्याला लोखंडी साखळीने जोडलेल्या लहान लहान चकत्या असं या लेझीमचं स्वरूप असतं. या साखळीला धरण्यासाठी मध्यभागी एक लाकडी मूठ असते.
एका हातात लाकडी दांडा आणि दुसऱ्या हातात लाकडी मूठ धरून केलेल्या हातांच्या हालचालींमुळे लोखंडी साखळीच्या चकत्यांमधून नाद तयार होतो.
एका लेझीमचं वजन एक साधारण एक किलोच्या आसपास असतं.
हलगी, ढोल-ताशा, किंवा झांजांच्या ठेक्यावर लेझीम खेळलं जातं. रांगांमध्ये उभं राहून एका ठेक्यावर तालबद्ध हालचाली करणं, गोलाकार उभं राहत एकमेकांच्या जागा घेत फेर धरणं, ठेका कायम ठेवत विविध रचना तयार करणं, बसून लेझीम खेळणं असे प्रकार लेझीम खेळताना सादर केले जातात.

फोटो स्रोत, Getty Images
लेझीम खेळण्याच्या रचनांचा 'डाव' म्हटलं जातं. विविध रचना करण्याला 'डावं टाकणं' म्हटलं जातं.
लेझीमचे बडोदा लेझीम, घाटी लेझीम, एन. डी. एस. लेझीम असे प्रकार असल्याचं मराठी विश्वकोशात म्हटलंय.
लेझीमचा इतिहास काय आहे?
लेझीमविषयी बोलताना लोककलांचे अभ्यासक प्रकाश खांडगे यांनी सांगितलं, "छत्रपती शिवरायांच्या काळापासून लेझीमची प्रथा सुरू झाली. लेझीम हे वाद्य आपल्याकडे विवाह प्रसंगी, मिरवणुका, ग्रामोत्सवांमध्ये, यात्रा - जत्रांमध्ये वाजवलं जातं. जेव्हा ग्रामोत्सवात छबिना निघतो त्यावेळी ते वाजवलं जातं. लेझीमचे प्रकार आहेत. प्रदेशानुसार लेझीम खेळण्याची पद्धत बदलते. लेझीम हे महाराष्ट्रातलं असं वाद्य आहे जे साधारणतः इतरत्र दिसत नाही. "
'लेझीम हा खास महाराष्ट्रीय खेळ असून पेशवाईच्या पूर्वकाळापासून तो रूढ आहे' मराठी विश्वकोशात म्हटलंय. याविषयी आम्ही इतिहास तज्ज्ञांशी चर्चा केली.
पण शिवकालीन इतिहासातल्या बखरींमध्ये वा दस्तावेजांमध्ये लेझीमचा उल्लेख नसल्याचं इतिहास तज्ज्ञ सांगतात.
दिल्ली विद्यापीठातले इतिहासाचे प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "17व्या आणि 18व्या शतकातली कागदपत्रं मी अभ्यासलेली आहेत. लेझीम या शब्दाचा कोणताही संदर्भ यामध्ये नाही. याकाळामध्ये कुस्ती - दंड - बैठकांचे उल्लेख आढळतात. सैनिक वैयक्तिकरित्या आपलं बळ वाढवण्यासाठी दंड बैठका काढत, मुद्गल फिरवत, मल्लखांब, कुस्ती, तलवारबाजी, भालाफेक करत याचे उल्लेख आहेत. पण लेझीम खेळणं ही एक समूह क्रिया आहे. अशा प्रकाराने सामुदिय लेझीमचा उल्लेख कागदपत्रांत नाही. "
शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाईन एज्युकेशनमध्ये इतिहासाचे सहाय्यक प्राध्यापक असणारे मुफिद मुजावर सांगतात, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तसंच महाराज व भागानगरकर कुतुबशाह भेटीच्या प्रसंगासंबंधी सभासद बखर मधील वर्णनात लेझीमचा उल्लेख आढळत नाही. शिवपूर्वकालिन 'महिकावतीच्या बखरी' मध्ये रणभेरी, डफ, काहाळा इत्यादींचे उल्लेख आहेत. मराठेकालीन बखरीमध्ये रणवाद्यांमध्ये शाहदाने, नौबती, नगारे इत्यादींचा उल्लेख आढळून येतो. मात्र लेझिमचा उल्लेख दिसत नाही. व्यायामाबद्दल दंडबैठकांचा उल्लेख आहे. "
प्रसिद्ध मराठी लेखक गो. नी. दांडेकर यांच्या 'महाराष्ट्र दर्शन' या ग्रंथातल्या बैल पोळ्याच्या मिरवणुकीच्या उल्लेखात शिंगे (फुंकून वाजवली जाणारी वाद्यं), तुतारी, डफडी आणि मशाली यांचा उल्लेख आहे.

फोटो स्रोत, पुस्तक - पेशवेकालीन महाराष्ट्र
मानसिंग कुमठेकर मिरज इतिहास संशोधक मंडळाचे संस्थापक आहेत. लेझीम विषयी बोलताना ते सांगतात, "सवाई माधवरावांच्या काळातले काही उल्लेख मिळतात. मिरजेच्या वासुदेवशास्त्री खरे यांनी नाना फडणवीसांचं चरित्र लिहीलंय. त्यामध्ये सवाई माधवराव जे खेळ खेळत होते त्यामध्ये लेझीम खेळत असत असा उल्लेख आहे. मुद्गल पेलणे आणि लेझीम खेळणे असा हा उल्लेख आहे. 1780 ते 90 दरम्यानचा हा काळ असावा. त्याआधीचे कोणतेही संदर्भ पेशवाईतले किंवा शिवकालीन दिसत नाहीत."
"दत्तात्रय चिंतामण मुझुमदार म्हणून होते. ते 'व्यायामज्ञानकोशा'चे कर्ते होते. त्यांनी या कोशात लेझीमचा उल्लेख केलेला आहे. हे 1939चं पुस्तक आहे," कुमठेकर सांगतात.
1938 साली प्रसिद्ध झालेल्या व्यायाम ज्ञानकोशात लेझीमविषयी माहिती आहे. यामध्ये त्याचा 'जड लेझीम' असा उल्लेख आहे.

फोटो स्रोत, व्यायामज्ञानकोश खंड ४
लेझीमचा उगम वा मूळ हेतू काय असावा याविषयी व्यायामज्ञानकोशात ( साल 1938) म्हटलंय, "जुन्या काळात धनुष्यबाणाचा उपयोग लढाईत होत असे. त्यावेळी धनुष्यानें बाण लांब पल्ल्यावर मारतां यावा म्हणून जाड कांब असलेलें धनुष्य वापरीत असत. असें धनुष्य वाकवितां यावे म्हणून हातांचे स्नायू विशेष रीतीनें तयार करण्याची जरूर भासत असे. यामुळे तशा प्रकारचें सामर्थ्य हातांत आणण्यासाठीं लेजीमची मेहनत वसविली असावी असें वाटतें. लेजीम हा फारशी भाषेचा शब्द असून त्याचा अर्थ लोखंडी तार लावलेलें धनुष्य असा आहे."
याच व्यायामज्ञानकोशामध्ये काशीमधल्या कोंडभटनाना गोडबोलेंच्या आखाड्याचा उल्लेख आहे. या आखाड्यात जड लेझीम पहायला मिळाल्याचं कोशात म्हटलंय.

फोटो स्रोत, व्यायामज्ञानकोश
लेझीमचा आणखी एक पेशव्यांच्या काळातला उल्लेख याच व्यायामज्ञानकोशात आहे. दौलतराव शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या कॅप्टन ब्राऊटन या ब्रिटीश अधिकाऱ्याने Letters written in a Mahratta camp during the year 1809 या ग्रंथात एका पत्रात लेझीमचा उल्लेख केलाय.
स्थानिक सैनिक कोणत्या प्रकारचा व्यायाम करतात याविषयी माहिती ब्राऊटन यांनी या पत्रात लिहीली आहे. भारतीय सैनिक दंड, कुस्ती, मुद्गल आणि लेझीम यांचा सराव करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. यातच त्यांनी लेझीम कसं आहे, याविषयी लिहीलंय.
ते म्हणतात, "लेझीम म्हणजे बांबूचं धनुष्य, ज्याला वाकवून जड लोखंडी साखळी लावलेली असते. याचं वजन वाढवण्यासाठी साखळीला याच धातूच्या अनेक लहान - गोल चकत्या लावलेल्या असतात. ज्यांचा आवाजही होतो. या व्यायामामुळे छाती खुली होते, शरीर तयार होतं आणि स्नायू बळकट होतात."
लेझीम एक क्रीडा प्रकार
लेझीम हा सांघिक खेळ वा कला प्रकार नव्हता.
1938 साली प्रसिद्ध झालेल्या व्यायाम ज्ञानकोशात लेझीमविषयी माहिती आहे. यामध्ये त्याचा 'जड लेझीम' असा उल्लेख आहे.

फोटो स्रोत, व्यायामज्ञानकोश
अनेक शाळांमध्ये लेझीम खेळायला शिकवलं जातं. वर्गासाठीच्या कवायतीचा हा एक भाग असतो.
तालबद्ध लेझीम खेळणं हा शरीरासाठीचा एक अतिशय चांगला व्यायाम असल्याचं जाणकार सांगतात.
संतोष लोखंडे गेली अनेक वर्षं पुण्यामध्ये लहान - मोठ्यांना लेझीम खेळायला शिकवतात, मोठ्या पथकांच्या रचना बसवून घेतात.
बीबीसी मराठीशी बोलताना संतोष लोखंडेंनी सांगितलं, "फिटनेसचा आणि लेझीमचा जवळचा संबंध आहे. यामध्ये हालचाली होतात, उड्या मारल्या जातात. लेझीमला एक ताल असतो त्यामुळे चार तास लेझीम खेळलं जाऊ शकतं. यामुळे तुमची चिकाटी - Endurance वाढतो. सगळ्यांच्या हातांच्या आणि पायांच्या तालबद्ध हालचाली एकत्र - Synchronized पद्धतीने होतात. सायकॉलॉजीच्या दृष्टीने पाहिलं तर एक संघभावना - Team Spirit तयार होते. एक शिस्त लागते. "
गावांमध्ये मनोरंजनाचा एक भाग म्हणून, सामूहिक लोककला म्हणून लेझीम जास्त रूळलेलं होतं. नंतर या लोककलेला मिरवणुकांमध्ये स्थान मिळालं.
कवी श्रीधर बाळकृष्ण रानडे (1892-1984) यांच्या 'लेजीम चाले जोरांत' या कवितेत म्हटलंय,
दिवस सुगीचे सुरू जाहले,
ओला चारा, बैल माजले,
शेतकरी मन प्रफुल्ल झाले,
छन् खळ-खळ छन्, ढुम ढुम पट ढुम
लेजीम चाले जोरांत!
संदर्भ :
मराठी विश्वकोश - लेझीम - https://vishwakosh.marathi.gov.in/32073/
मराठी विश्वकोश - प्रयोगात्म लोककला - https://marathivishwakosh.org/17123/
प्रकाश खांडगे
प्रा. अनिरुद्ध देशपांडे
प्रा. मुफिद मुजावर
मानसिंग कुमठेकर, मिरज इतिहास संशोधक मंडळ
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








