तात्या टोपे: अखेरचे पेशवे पुण्यातून उत्तर प्रदेशात या ठिकाणी रहायला गेले

फोटो स्रोत, Sharad badhe/bbc
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी, बिठूर, उत्तर प्रदेश
बिठूर शांत आहे. गंगेच्या संथ प्रवाहासारखं कोणतेही भाव चेह-यावर न आणता पहुडलं आहे. पण तिच्यासारखंच पोटात खूप काही साठवून आहे. आत डुबकी मारलीत की ते जाणवतं.
एखाद्या पुराणवस्तीतून उत्खननं हुडकत शोधावीत, तसं बिठूरच्या गल्ल्यागल्ल्यांमधून फिरावं लागतं. तसं केलं की समजतं की इथल्या गंगेच्या पाण्याला अजूनही महाराष्ट्राची, मराठी चव आहे.
निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही उत्तर प्रदेशमध्ये फिरत असतो, पण बिठूर रस्त्यात येताच एका ओढीनं खेचले जातो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासातला न पुसता येणारा एक महत्वाचा कालखंड इथं घडला आहे.
ज्यांना ओलांडून इतिहासाची पानं उलटता येणार नाही अशी काही व्यक्तिमत्वं इथल्या मातीशी एकरुप झाली आहेत. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई हे सगळं 1857च्या समरातलं तारकामंडळ, त्यांचा संबंध बिठूरशी आहे.
बिठूरला ब्रम्हावर्तही म्हणतात. त्याला पुराणकाळाशी जोडणा-या अनेक अख्यायिका आहेत. मुघलांच्या काळात, नंतर मराठ्यांच्या उत्तरेकढच्या चढाईत आणि नंतर ब्रिटिशकाळातही कानपुरजवळच्या या गंगाकाठीच्या मोक्याच्या ठिकाणानं अनेक घटना पाहिल्या आहे. मात्र 1818 नंतर महाराष्ट्राशी बिठूरचा संबंध आला आणि तो कायमचा जोडला गेला.
दोन शतकं उलटली आहेत. गंगेतनं बरचसं पाणी वाहून गेलं आहे. पण ब्रम्हावर्ताच्या घाटावर आजही मराठी ऐकू येते. इथंल्या मातीला चिकटून असणारी मराठी कुटुंब आजही आहेत. पिढ्या सरल्या, तरी या कुटुंबांमुळे उत्तर प्रदेशमध्ये मराठी घरोबा टिकून आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशात येऊन त्यांना न भेटणं शक्य नव्हतं. पण त्या अगोदर इथं मराठी येऊन रुजायची पूर्वपीठिका समजायला हवी.
पेशवे बिठूरला आले
बिठूरच्या आयुष्यात महाराष्ट्र आला तो पेशवाईचा अस्त झाल्यावर. 1817 मध्ये पुण्यातल्या शनिवारवाड्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला. 1818 मध्ये भीमा कोरेगावच्या लढाईत पेशव्यांच्या सैन्याचा पराभव झाला. त्यानंतर पदावर असलेल्या दुस-या बाजीराव यांनी जून 1818 मध्ये ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
तेव्हा जनरल माल्कम या अधिका-यासोबत तो त्यांचा करार झाला, त्यात म्हटलं आहे की बाजीराव त्यांच्या सगळ्या अधिकारांचा त्याग करतील आणि दख्खनेत शांती रहावी या उद्देशानं एकाही दिवसाचा विलंब न करता हिंदुस्थान, म्हणजे, उत्तरेकडे प्रयाण करतील.
त्यांच्या कुटुंबातले जे कोणी मागे राहतील त्यांना लवकरात लवकर बाजीरावांकडे पोहोचवले जाईल. त्यात असंही म्हटलं गेलं की माल्कम बाजीरावांचं आदरानं स्वागत करतील आणि त्यांना वाराणसी किंवा उत्तरेतल्या कोणत्याही पवित्र स्थळी निवासाची सोय करतील.

फोटो स्रोत, Sharad badhe/bbc
पण बाजीरावांनी वाराणसी निवडलं नाही, त्यांनी निवडलं बिठूर म्हणजेच ब्रम्हावर्त. त्याबद्दल बिठूरच्या भौगोलिक स्थानापासून अनेक कारणांची चर्चा केली जाते.
कानपूरमध्ये अनुप शुक्ला नावाचे एक इतिहास अभ्यासक आहेत. त्यांनी या काळातल्या कानपूर आणि परिसराच्या इतिहासावर अभ्यास केला आहे.
बाजीरावानं वाराणसी सोडून बिठूर का निवडलं याबद्दल ते म्हणतात, "दुसरे बाजीराव जेव्हा वाराणसीला आले तेव्हा तिथं बाकीचेही बरेच राजे होते जे आता पदच्युत होते. त्यांच्यात स्वत:चं महत्व कमी होईल म्हणून स्वतंत्र स्थान असावं असं त्यांना वाटलं, ते त्यांना बिठूरमध्ये मिळालं. शिवाय तीर्थयात्रेसाठी आलेले काही मराठी परिवार इथे होते."
पेशवेकालाचे एक महत्वाचे इतिहास अभ्यासक प्रमोद ओक त्यांच्या 'पेशवे घराण्याचा इतिहास' या पुस्तकात नोंदवतात: 'बाजीराव ब्रम्हावर्तला गेल्यावर तेथे त्यास इंग्रज सरकारने छावणीसाठी भागीरथीच्या किना-यावर सुमारे सहा मैल परिघाची जागा नेमून देऊन तिच्या चोहोबाजूंस हद्दीचे खुणांसाठी 16 दगडी खांब रोवले होते. तेथे बाजीराव पेशव्यांनी आपली छावणी स्थापन केली. त्यांचे लष्कर, स्वार, शिबंदी, हत्ती, घोडे, नोकरचाकर, बाजारबुणगे वगैरे मिळून मोठे नवीन गावच तिथे वसले होते.'

फोटो स्रोत, Sharad badhe/bbc
'इंग्रज सरकारने बाजीरावांच्या छावणीमध्ये त्यांचे राजकीय हक्क कायम ठेवून त्यांच्या बंदोबस्तासाठी एक वेगळा युरोपिअन लष्करी अंमलदार कमिशनर म्हणून नेमला होता. तो बाजीराव हयात असेपर्यंत कायम होता, असंही ओक नोंदवतात.
करारानुसार बाजीरावांना मरेपर्यंत पेन्शनही इंग्रजांनी द्यायची होती. ती रक्कम सहा हजार सहाशे सहासष्ठ रुपये प्रति महिना एवढी होती असं इतिहास अभ्यासक मंदार लवाटे सांगतात. त्याकाळाच्या तुलनेनं ही प्रचंड रक्कम होती आणि ती श्रीमंती बिठूरच्या पेशव्यांच्या विविध कार्यक्रमांमध्येही दिसायची अशा नोंदी आहेत.
बिठूरचा 'शनिवारवाडा'
आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा आजच्या 'नानासाहेब पेशवे पार्क'च्या मोठ्या बुरुजाची तटबंदी दिसते. मोठ्या लाल लाल चि-यांची. मोठा वाडा असावा पुण्याच्या शनिवारवाड्यासारखा असं वाटतं. पण हा पेशव्यांचा वाडा नव्हे. हे आजचं पार्क आहे जिथे आत एक संग्रहालयसुद्धा आहे.
पण या पार्कच्या बाजूला कपाऊंडपलिकडे नजर जाते. शहराच्या मध्यात असूनही या जागेवर दाट जंगल माजलंय. त्या झुडपांतून एक जुनी, भग्नावस्थेतली इमारत बाहेर डोकं काढायचा प्रयत्न करत असते. इमारत मोठी असणार असं त्या अवशेषांवरहूनही ध्यानात येईल. त्यावर चढलेल्या वेलींनी तिला घट्ट पकडून ठेवलंय. हाच तो बिठूरचा पेशव्यांचा शनिवारवाडा.

फोटो स्रोत, Sharad badhe/bbc
तिथं आत जाता येत नाही. जमिनीच्या मूळ मालकीवरुन न्यायालयात प्रकरण चालू असल्याचं स्थानिकांकडून समजतं. पण भग्नावस्थेत पेशव्यांचा वाडा पडून आहे.
1857 च्या उठावानंतर जेव्हा ब्रिटिशांनी बिठूर परत ताब्यात घेतलं तेव्हा नानासाहेब पेशवे पळाले होते, पण वाडा ब्रिटिशांच्या ताब्यात सापडला. तोफांनी ते पाडून टाकण्यात आला असं सांगण्यात येतं. त्याबद्दल इथल्या खजिन्यापासून इतर अनेक अख्यायिकाही प्रसृत आहेत.
पण हा वाडा मोठा भव्य होता हे नक्की. पहिल्यांदा इथे आल्यावर बाजीराव पेशव्यांनी एक निवास बांधला होता असं सांगून प्रमोद ओक त्यांच्या पुस्तकात लिहितात, की 'पण बाजीरावांना तिथे समाधान वाटत नसे. म्हणून त्यांनी लवकरच आपल्या वैभवाला साजेल असा भव्य वाडा बांधला. या नव्या वाड्याला पुण्याच्या शनिवारवाड्याचेच नाव देण्यात आले.
वाड्यात प्रशस्त दिवाणखान्यामधून गालिचे, पडदे, नक्षीदार आरसे, हस्तिदंत, कलात्मक जिनसा, चिनी काचसामान, मोठी झुंबरे असे खूप सामान होते. वाड्याभोवती भव्त तट असून वाड्याच्या पटांगणात भव्य व खोल सात विहिरी खणल्या होत्या. या वाड्याला 'पेशवे वाडा' असेही म्हणत.'
1857 चा उठाव, नानासाहेब आणि बिठूर
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातलं हे एक सुवर्णपान आहे. हे बंड जरी मोडलं गेलं तरीही त्याकडे ब्रिटिशांकडून देश परत मिळवण्याचा पहिला प्रयत्न म्हणून बघितलं गेलं. मेरठपासून सुरु झालेलं बंडाचं हे केंद्र कानपूरकडे सरकलं आणि पाहता पाहता बिठूरच्या नानासाहेब पेशवेंकडे त्याचं नेतृत्व आलं.
नानासाहेबांचं नावं खरं धोंडोपंत आणि त्यांना दुस-या बाजीरावांनी दत्तक घेतलं होतं. "बाजीरावांनी त्यांना भट घराण्यातून दत्तक घेतलं. तेच पुढे 'बंडातले नानासाहेब' म्हणून प्रसिद्ध पावले.
दुस-या बाजीरावांच्या भावाचं नावंही चिमाजी होतं आणि ते वाराणसीत रहायचे. त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांचे दिवाण तांबे हे बाजीरावांकडे बिठूरला आले. त्यांचीच मुलगी ती प्रसिद्ध झाशीची राणी. तिचं लग्न बाजीरावांनीच लावलं होतं," असं मंदार लवाटे सांगतात.

फोटो स्रोत, Sharad badhe/bbc
नानासाहेब इथेच मोठे झाले, झाशीची राणी झालेल्या लक्ष्मीबाईंचं बालपण इथेच बिठूरमध्ये गेलं आणि या समराचा तिसरा चेहरा तात्या टोपे चार वर्षांचे असतांना बिठूरमध्ये आले. बिठूरचं या संग्रामाशी असं जवळचं नातं आहे आणि नेतृत्व करणारं रक्त मराठी. सैनिकांचा उठाव पहिल्यांदा झाल्यानंतर नानासाहेबांनी कानपूर जिंकायचं ठरवलं आणि जिंकलंही. तिथून या प्रांतातला कारभार ते हाकणार होते.
या उठावेळचं बिठूरचं वर्णन आढळतं विष्णुभट गोडसे भटजींच्या 'माझा प्रवास' या प्रवासवर्णनात. गोडसे भटजी तेव्हा इथे प्रत्यक्ष हजर होते.
कानपूर जिंकल्यावर नानासाहेब जेव्हा बिठूरला परत आले तेव्हा गोडसे भटजी लिहितात: 'मोठ्या थाटाने घोडेस्वार व उंटावरचे स्वार हजारो बरोबर होते. रोहिले व आरब सिद्धी व पायदळ वगैरे सर्व लोक होते. वाद्ये बहुत वाजत होती. चौघडा, वाजंत्री, तासे, नगारे, कर्णे, सिंगे वगैरे अनेक वाद्ये वाजू लागली. अशा बेताने स्वारी येता येता ब्रम्हावर्ती रात्र जाहली. वाटेने सेकडो चंद्रज्योती लावल्या होत्या. ब्रम्हावर्त क्षेत्र सर्व शोभिवंत केले होते. प्रत्येक वाड्याचे दारात तोरणे उभविली होती. नानासाहेब पालखीत बसले होते व बाळासाहेब व रावसाहेब हत्तीचे हवद्यात बसले होते.'
पण काहीच दिवसांमध्ये ब्रिटिशांनी कानपूर जिंकून घेतले. बंड मोडले. त्यानंतर बिठूरलाही त्याचे परिणाम भोगावे लागले. नानासाहेबांनाही गंगातीर ओलांडून बिठूर सोडून जावे लागले. त्यानंतर बिठूरमध्ये जी कत्तल झाली त्याचं वर्णनही गोडसे भटजींनी लिहून ठेवलं आहे.
ते लिहितात: 'श्रीमंत गंगापार गेल्यावर तिसरे दिवशी सकाळी चार घटका दिवसास ब्रम्हावर्ती हाला सुरु झाला. क्षेत्रामध्ये गोरे लोक येताच रस्त्यावर जो पुरुष सापडेल त्यास मारावा. त्याप्रमाणे बहुत लोक मारले गेले व गोरे घरात शिरुन रुपे व सोने सापडले तेवढे लुटून नेले.'
1857 ची वर्णनं बिठूरच्या जुन्या गल्ल्यांमधून फिरतांना डोळ्यासमोर घडल्यासारखी वाटतात. लोकांशी बोला, त्यांना हा दोन शतकांपूर्वीचा इतिहास जसा काही पाठ असतो. नानासाहेब आणि राणी लक्ष्मीबाईंच्या नावाचे फलक, प्रतिमा सगळीकडे दिसतात. इतिहास शोधत शोधत असाच एक रस्ता आम्हाला तात्या टोपेंच्या घराकडे घेऊन जातो.
तात्या टोपेंच्या घरी
इथली सगळीच घरं जुन्या छोट्या विटांची आहेत. बरीचशी डागडुजी करु उभी आहेत. अशाच एका पुराणगल्लीतून आम्ही पुढे जात जात एका घरासमोर येऊन थांबतो. 'तात्या टोपे भवन'. हे 1857 च्या उठावाचे हिरो तात्या टोपेंचं खानदानी घर. बाहेरच एका मोठ्या संगमरवरावर तात्यांच्या आणि त्यांच्या परिवाराचं या समरातलं योगदान काही वाक्यांमध्ये कोरलेलं.
तात्या 4 वर्षांचे असतांना वडलांसोबत बिठूरला आले. इथलेच झाले. इथेच युद्धनीति शिकले, शस्त्रं शिकले. नानासाहेब आणि राणी लक्ष्मीबाई हे जणू बिठूरचेच सवंगडी. तात्यांनी कानपूरपश्चात हे युद्ध मध्य भारतात ग्वाल्हेर, झांसी इथपर्यंत नेलं. ब्रिटिश त्यांच्या मागे लागले होते. त्यांच्या परिवाराला कैदेत टाकलं होतं. तात्यांना नंतर पकडून फाशी दिलं गेलं. पण खरे तात्या सापडले का हे आजही अनेक जण इथं कोडं मानतात.

फोटो स्रोत, Sharad badhe/bbc
विनायकराव टोपे आणि त्यांच्या पत्नी सुमती आजही तात्या टोपेंच्या जुन्या घरी इथं राहतात. हे घर आता एका प्रकारचं संग्रहालयच झालं आहे. आत प्रवेश करताच दिवाणखान्यात मोठी चित्रं आहेत, शस्त्रं मांडली आहेत. विनायकराव अगत्यानं बोलायला लागतात. या वाड्याचा बराचसा भाग आता नव्यानं बांधला आहे, पण जुना नाजूक भाग अजूनही मागच्या बाजूला आहे.
"तात्या टोपे स्वत:ही याच जागेत रहायचे. हीच त्यांची कर्मभूमी," विनायकराव सांगतात. "त्यांचा जन्म येवल्याचा, पण इकडे चार वर्षांचे असतांना आले. पेशव्यांचा वाडा इथून जवळ होता म्हणून ही जागा आम्हाला दिली. तेव्हापासून आतापर्यंत टोपे इथून कधीच बाहेर पडले नाहीत. कार्यक्रमानिमित्त इकडे तिकडे जातो, पण मुक्काम पोस्ट बिठूरच," ते म्हणतात.
आनंदानं तात्या टोपेंच्या काळातली शस्त्र दाखवतात. "इथं आमच्या या घरात खोदकाम केलं होतं. तेव्हा ही शस्त्रं मिळाली. घराचे नवीन भाग बांधतांना भिंतीमध्येही निघाली. ब-याचशा वस्तू आम्ही संग्रहालयाला दिल्या आहेत," विनायकराव सांगतात.
टोपेंचं कुटुंब इथलं एक पेशव्यांनंतरचं मुख्य कुटुंब. ते इथं थांबलं. पण आता हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच मराठी कुटुंब इथं उरली आहेत. बाकी बरेचसे बिठूर सोडून गेले आहेत.

फोटो स्रोत, Sharad badhe/bbc
"1857 नंतर पेशवे तर निघून गेले. ज्या मराठी लोकांच्या जमिनी होत्या तेच इथे राहिले. हळूहळू ते आपल्या जमिनी विकायला लागले. मुलांना इथे नोकरी धंदा नाही म्हणून ती बाहेर पडली. त्यांच्याबरोबर त्यांचे आईवडीलही थोड्या वेळानं गेले. असं करता करता मराठी लोक कमी होत गेले," सुमती टोपे सांगतात. "आता फक्त पाच मराठी कुटुंब उरली आहेत.
"पेशवे आले होते तेव्हा हजार-दीड हजार होती. माझ्या समोरच कितीतरी कुटुंबं होती ती गेली. रिसबूड होते, बसवापट्टणकर होते. तेही गेले. म्हातारे झाले आणि मग जमिन विकून बाहेर पडले," सुमती सांगतात.
सातारचे मोघे, पण मु.पो.बिठूर
जी पाच मराठी कुटुंबं शिल्लक आहेत त्यापैकी एक आहेत मोघे. ब्रम्हावर्तचा घाट संपला की गंगेच्या काठानं एक असा टेकडीवर रस्त्या वर गेला आहे. त्याला म्हणतात ध्रुवटिला. तिथं गेलं की बाजूला गंगेकडे तोंड करुन एक जुनी विटांचं कोट असलेलं प्रशस्त घर आहे. घरा मुख्य मोठ्या दरवाजातून आत एक मंदीर दिसतं. दारात मधुकरराव मोघे उभे असतात.
"आम्ही मूळचे सातारचे. पेशव्यांसोबतच इथे आलो. तेव्हापासून हे दत्ताचं मंदिर आहे आणि आम्ही आहोत. इथे जे लोक आले तेव्हा त्यांना एकच काम होतं. पौरोहित्य करणं, वेदाध्ययन आणि गरज पडेल तेव्हा युद्ध करणं. आमच्या पण ब-याच पिढ्या हेच करत होत्या," मधुकरराव सांगतात.

फोटो स्रोत, Sharad badhe/bbc
मोघेंच्या छोट्या मुलाचं आम्ही गेलो तेव्हा आदल्या दिवशीच लग्न झालं होतं. घरी पाहुण्यांची वर्दळ होती. सगळेच उत्तर मराठी बोलत होते. पण कोणीही महाराष्ट्रातलं नाही. सगळे उत्तरेकडचे. ग्वाल्हेर, जबलपूर, इंदूर इथले. या मराठी कुटुंबांच्या सोयरिकी या पिढीतही उत्तरेतच होतात. मोघेंना तर आता सातारा जिल्ह्यातलं त्यांचं मूळ गाव कोणतं हेही आठवत नाही.
या लोकांचे इथे व्यवसाय, शेती असा पसारा दोन शतकांमध्ये वाढत का गेला नाही?
"असं काहीच झालं नाही. तिकडनं आम्ही इकडे आलो. पण इकडच्या लोकांना आम्ही थोडेच परवडणारे होतो. इथले लोक इथलंच पाहतात. त्यांना वाटत नाही की तुम्ही इथे रहावं. पण आता आम्ही इतके वर्षं इथं राहिलो आहोत की आता जायचं कुठे?" मधुकरराव विचारतात.

फोटो स्रोत, Sharad badhe/bbc
या कुटुंबांना दुसरीकडे जाण्याचा मार्गही नाही आणि त्यांची ती इच्छाही नाही. ते इथलेच झाले आहेत. त्यांना विचारलं की परत महाराष्ट्रात यावसं वाटतं का तर आता तिथे काहीच नाही तर कशाला यायचं असा प्रश्न.
इथल्या मातीशी ते आता एकरुप झालेत. पण मूळ विसरत नाही. आणि बोलतांना जाणवतं की त्यांचीही केवळ एकच अपेक्षा आहे, की त्यांच्या मुळानं, महाराष्ट्रानं, त्यांना विसरु नये.

फोटो स्रोत, Ravindra Bhor
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








