गीता प्रेस गोरखपूर: पुस्तकांच्या माध्यमातून 'मानवतेची सेवा' की 'हिंदू भारता'साठी प्रयत्न?

गीता प्रेस

फोटो स्रोत, Geet press Gorakhpur Logo

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी

गीता प्रेस गोरखपूरला 2021 सालचा गांधी शांतता पुरस्कार देण्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी टीका केली आहे. "गीता प्रेसला मिळालेला गांधी शांतता पुरस्कार म्हणजे सावरकर आणि गोडसे यांना पुरस्कृत केल्यासारखं आहे," असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

जयराम रमेश यांनी ट्वीट करून लिहिलंय की, "अक्षय मुकुल यांनी या संस्थेचं सुरेख चरित्र लिहिलं आहे. ज्यामध्ये या संस्थेचे महात्मा गांधींसोबत असलेले वादळी नाते, तसंच संस्थेच्या राजकीय, धार्मिक आणि सामाजिक अजेंड्याबाबत गांधींसोबत असलेली लढाई याविषयी माहिती मिळते."

जयराम रमेश यांनी लिहिलंय की, "हा निर्णय खरे तर सावरकर आणि गोडसे यांना पुरस्कार देण्यासारखा आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

भारत सरकारकडून दरवर्षी गांधी शांतता पुरस्कार दिला जातो. महात्मा गांधींच्या 125व्या जयंतीनिमित्त 1995 मध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आला.

पुरस्कार का दिला गेला?

'अहिंसा आणि गांधीवादी मार्गाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात बदल घडवून आणण्यात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल' गीता प्रेसला हा पुरस्कार दिला जात आहे.

सांस्कृतिक मंत्रालयाने रविवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

गीता प्रेसची स्थापना 1923 मध्ये झाली असून आतापर्यंत 14 भाषांमधील 41.7 कोटी पुस्तके येथून प्रकाशित झाली आहेत. यात 16.21 कोटी श्रीमद भागवत गीतेचा समावेश आहे.

या पुरस्कारासोबत एक कोटी रुपयांची रक्कम दिली जात असल्याचे मंत्रालयाने सांगितले. यापूर्वी हा पुरस्कार इस्रो, रामकृष्ण मिशन, बांगलादेश ग्रामीण बँक यांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचे दिवंगत नेते नेल्सन मंडेला आणि बाबा आमटे यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं एकमतानं हा पुरस्कार गोरखपूर येथील गीता प्रेसला देण्याचा निर्णय घेतला.

लाईन

उत्तर प्रदेशच्या राजकारणात गोरखपूरला विशेष महत्त्व आहे. योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर हा मतदारसंघ आहे. पण त्याचबरोबर गोरखपूर आणखी एका गोष्टीसाठी ओळखलं जातं. ती गोष्ट म्हणजे 'गीताप्रेस.'

26 जानेवारी 2022 ला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. देशातील केवळ चार जणांना यावर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात एक नाव होते ते म्हणजे राधेश्याम खेमका यांचे.

राधेश्याम खेमका कोण आहेत आणि त्यांना भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार का देण्यात आला असावा असा प्रश्न अनेकांना पडला होता.

गीता प्रेस

फोटो स्रोत, Geeta Press/Gorakhpur

राधेश्याम खेमका यांचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं नसेल पण ते ज्या प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आणि संपादक होते त्या प्रकाशन संस्थेचं नाव न ऐकलेली व्यक्ती कदाचित तुम्हाला सापडणार नाही. ते नाव म्हणजे गीता प्रेस गोरखपूर.

राधेश्याम खेमका हे गीता प्रेस गोरखपूरचे संपादक होते. त्यांचे एप्रिल 2021 मध्ये निधन झाले होते.

राधेश्याम खेमका

फोटो स्रोत, All india Radio

फोटो कॅप्शन, गीता प्रेसचे माजी संपादक राधेश्याम खेमका

तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले होते आणि त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता, "सनातन साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे आणि विविध सामाजिक उपक्रमांत सहभाग घेणाऱ्या राधेश्याम खेमका यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले," असं पंतप्रधानांनी म्हटले होते."

गीता प्रेसद्वारे प्रकाशित होणाऱ्या 'कल्याण' या मासिकाचे सध्याचे संपादक प्रेमप्रकाश लक्कड सांगतात की "राधेश्याम खेमका हे अत्यंत सरळ मार्गाने चालणारे आणि आपली उक्ती व कृती एक असावी यावर भर देणारे गृहस्थ होते."

राधेश्याम खेमका हे कल्याण मासिकाचे अंदाजे 40 वर्षं संपादक राहिले.

'गीता प्रेस' या प्रकाशन संस्थेबाबत दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह असा आहे जो हे म्हणतो की गीता प्रेस ही केवळ सनातन हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणारी संस्था आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी ही संस्था अत्यंत माफक दरात पुस्तके उपलब्ध करून देते. या संस्थेचा राजकारणाशी काही संबंध नाही, असे म्हणणारा एक गट आहे.

तर एक मतप्रवाह असं म्हणतो की 'गीता प्रेस गोरखपूर' ही एक पुरोगामी प्रकाशन संस्था आहे. त्यांचा उद्देश हिंदूंचे राजकीय वर्चस्व स्थापित करणे हा आहे. ते सोयीनुसार राजकीय भूमिका देखील घेतात ज्यामुळे हिंदुत्ववादी पक्ष जसं की हिंदू महासभा, जनसंघ आणि भाजप यांना फायदा देखील झाला आहे.

'गीता प्रेस अॅंड मेकिंग ऑफ हिंदू इंडिया' हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर गीता प्रेसचा उद्देश 'हिंदू भारताची निर्मिती' आहे का? यावर बरीच चर्चा झाली होती.

गीता प्रेस

फोटो स्रोत, Geeta press

गीता प्रेसने हे आरोप नेहमीच फेटाळले आहे, "अशा प्रकारच्या आरोपांना उत्तर देणं म्हणजे चिखलात दगड मारण्यासारखे आहे," असं कल्याणचे सध्याचे संपादक प्रेम प्रकाश लक्कड यांनी बीबीसी मराठीला सांगितले.

ऐन उत्तर प्रदेश निवडणुकीची धामधूम सुरू असताना कल्याण सिंह आणि राधेश्याम खेमका यांना पद्मविभूषण देण्यात आल्यानंतर हा केवळ योगायोग नाही याकडे देखील अनेकांनी लक्ष वेधले.

या निमित्ताने गीता प्रेस गोरखपूर ही संस्था नेमकं काय काम करते, तिची स्थापना का झाली, कशी झाली आणि ते खरंच राजकीय आहेत का, त्यांच्यावर प्रतिगामी हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याचे आरोप का झाले, आणि या आरोपांबाबत गीता प्रेसला काय वाटते या गोष्टींची चर्चा आपण या लेखात करणार आहोत.

गीताप्रेस काय करते?

गीता प्रेसच्या संकेतस्थळावर या संस्थेचा उद्देश देण्यात आला आहे. तो असा आहे, '1923 पासून सत्य आणि शांतीसाठी मानवतेच्या सेवेत समर्पित संस्था.'

गीता प्रेस

फोटो स्रोत, Geeta Press

1923 साली जयदयाल गोयंदका यांनी आपल्या काही मित्रांसोबत मिळून गीता प्रेसची स्थापना केली होती.

गीता प्रेसचा मुख्य उद्देश स्वस्त दरात हिंदूंचे (वैदिक सनातन धर्म) साहित्य जनसामान्यांना उपलब्ध करून देणे हा आहे. गीता प्रेसकडून भगवद्गीता, रामचरित्र मानस, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध, पुराण, उपनिषद, आरती संग्रह, नित्य पूजाविधी अशा विविध पुस्तकांची निर्मिती केली जाते.

दरवर्षी विविध विषयांना समर्पित असे अंक देखील छापले जातात. गो-अंक, महिला अंक, बालक अंक इत्यादी विषयांवर हे अंक येतात.

गीता प्रेसची जास्त पुस्तकं हिंदी आणि संस्कृतमध्ये आहेत. त्याचबरोबर गुजराती, मराठी, तेलुगु, बंगाली, तामिळ, कन्नड तसेच इंग्रजी या भाषांमधून गीता प्रेसचे साहित्य उपलब्ध आहे.

संस्थेचा असा दावा आहे की निर्मिती मूल्याहून कमी दरात ते पुस्तकांची विक्री करतात. हे नुकसान भरून काढण्यासाठी ते कधीही कुणाकडे दान स्वीकारत नाहीत. संस्थेच्या माध्यमातून इतर वस्तूंची विक्री होती त्यातून हे नुकसान भरून काढले जाते.

गीता प्रेसद्वारे कल्याण आणि युग कल्याण ही दोन नियतकालिके प्रसिद्ध केली जातात. वेबसाईटनुसार, "गीता प्रेसची 1923ला स्थापना झाल्यापासून आतापर्यंत एकूण 71 कोटी पुस्तकांच्या प्रती विकल्या गेल्या आहेत. तर कल्याण मासिकाच्या 1 लाख 65 हजार प्रती दर महिन्याला देशभरात पोहचतात."

याबरोबरच पुराण आणि हिंदू धर्म ग्रंथांमध्ये असलेल्या वर्णनाहून गीता प्रेसने देवी-देवतांची चित्रे रेखाटली आहेत. ही चित्रं संपूर्ण उत्तर भारतात घरोघरी पोहोचली आहेत तर काही प्रमाणात महाराष्ट्रात देखील ही चित्रं पाहायला मिळतात.

गीता प्रेस प्रकाशन गोविंद भवन कार्यालय या संस्थेद्वारे चालवले जाते. गोविंद भवन कार्यालयकडून सत्संगाचे, गीता पाठाचे आयोजन केले जाते.

त्याचबरोबर गीताभवन आयुर्वेद संस्थेमार्फत आयुर्वेदिक औषधींची निर्मिती केली जाते. देशातील 49 रेल्वे स्टेशनवर गीता प्रेसचे स्टॉल आहेत तसेच वितरकांच्या माध्यमातून देशभरात गीताप्रेसच्या पुस्तकांची विक्री केली जाते.

गीताप्रेसची स्थापना कशी झाली?

गीताप्रेसचे तत्कालीन संपादक राधेश्याम खेमका यांनी एनडीटीव्हीला 2017 दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, "गीताप्रेसची स्थापना कोलकत्याचे व्यापारी जयदयाल गोयंदका यांनी केली. गोयंदका हे धार्मिक प्रवृत्तीचे होते. भगवद्गीतेची मूळ प्रत आणि त्याचा अर्थ असलेल्या भगवद्गीतेची उपलब्धतता त्या काळात नव्हती.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

"दुसरीकडे त्यांनी हे पाहिले की बायबल सोसायटी सारख्या संस्था मोफतमध्ये बायबल वाटत आहेत, पण भगवद्गीता सर्वसामान्यांना विकत सुद्धा लवकर मिळू शकत नाही. त्यामुळे त्यांनी भगवद्गीता छापण्याचा निर्णय घेतला," खेमका सांगतात.

गीता प्रेस गोरखपूरमध्ये कशी सुरू झाली, याबाबत गीता प्रेसचे व्यवस्थापक डॉ. लाल मणी तिवारी यांनी शेखर गुप्तांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की "दुसऱ्याच्या प्रेसमध्ये भगवद्गीता छापताना त्यांना हवे तसे शुद्ध संस्करण मिळत नव्हते. जर शुद्ध संस्करण हवे असेल तर तुम्ही तुमचीच प्रेस का उघडत नाही असा सल्ला त्यांना देण्यात आला.

"हा भगवंताचाच आदेश आहे असं मानून त्यांनी स्वतःची प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. गोरखपूर येथे 10 रुपये महिना असलेली जागा संस्थेनी भाड्याने आणि त्याच ठिकाणी 1923 मध्ये प्रेस सुरू करण्यात आली. 1926 मध्ये 'कल्याण' मासिक सुरू करण्यात आले," तिवारी सांगतात.

गीताप्रेसची पुस्तकं घराघरांत कशी पोहोचली?

गीता प्रेसची पुस्तकं संपूर्ण भारतात कशी पसरली, याबाबत 'गीता प्रेस अँड द मेकिंग ऑफ हिंदू इंडिया'चे लेखक अक्षय मुकुल यांनी बीबीसी मराठीला सांगितले, "गीता प्रेस गोरखपूर' ही संस्था केवळ पुस्तक प्रकाशनापुरतीच मर्यादित राहिली नाही तर या संस्थेने त्या पलीकडे जाऊन हिंदू संघटनाची जबाबदारी पार पाडली.

"या कार्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची देखील त्यांनी मदत घेतल्याचे पुरावे आहेत."

अक्षय मुकुल यांनी 2015 साली हे पुस्तक लिहिले आहे.

अक्षय मुकुल सांगतात की "गीता प्रेसने भगवद्गीता, रामचरित्र मानस या विषयावर परीक्षा आयोजित केल्या आहेत. गीता प्रेसने राम नाम बॅंक सारखे उपक्रम देखील चालवले आहेत. कल्याण, कल्याण कल्पतरू आणि विविध धार्मिक पुस्तके या माध्यमांतून ते घरोघरी पोहचले."

गीता प्रेस

फोटो स्रोत, Geeta Press

'कल्याण'साठी लिहिणाऱ्या लोकांची संख्या विलक्षण आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन, पट्टाभी सीतारामय्या, लाल बहादुर शास्त्री, प्रेमचंद, काकासाहेब कालेलकर, विनोबा भावे, गोळवलकर गुरूजी यांनी कल्याणसाठी लिहिले आहे.

विविध विचारधारेच्या लोकांनी कल्याणसाठी आपले लेख पाठवले आहेत. याबाबत मुकुल सांगतात की "तटस्थतेनी पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की, कल्याणचे संपादक हनुमान प्रसाद पोद्दार यांच्यात चिकाटी होती. ते सातत्याने विविध लोकांकडे लेखासाठी पाठपुरावा करत असत."

गीता प्रेस

फोटो स्रोत, Harper Colin/Akshay Mukul

"त्यांची उठबस अनेक मोठ्या लोकांमध्ये होती आणि ते त्यांच्याकडे लेखासाठी विचारणा करत, त्यांना विषय सुचवून ते काम पूर्ण देखील करून घेत असत. पं. नेहरूंचा अपवाद वगळता त्या काळातील सर्व महत्त्वपूर्ण व्यक्तींनी कल्याणसाठी लिहिल्याचे आपल्याला दिसते," मुकुल सांगतात.

नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचे आजोबा क्षितीमोहन सेन हे संस्कृतचे पंडित होते. त्यांनी देखील कल्याणसाठी चार लेख लिहिले होते. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, हरिवंशराय बच्चन यांनी देखील कल्याणसाठी लिहिले आहे.

"कल्याणसाठी लिहिणारे सर्वच लोक गीता प्रेसच्या किंवा कल्याणच्या पूर्ण विचारांशी सहमत होते असं नाही. पण लेखकांच्या आवडीनुसार लिहिण्याचे स्वातंत्र्य त्यांना दिले जात असे. कल्याणच्या वाचकांना वैविध्यपूर्ण मजकूर मिळत असे त्यातून कल्याणचे वाचक वाढले," असं मुकुल सांगतात.

महात्मा गांधी आणि हनुमानप्रसाद पोद्दार यांच्यात सलोख्याचे संबंध होते, "कल्याणमध्ये कधी जाहिराती घेऊ नका अथवा त्यात पुस्तकाचे समीक्षण छापू नका. त्यामुळे संपादकीय स्वातंत्र्यावर मर्यादा येतात असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. हा सल्ला आतापर्यंत पाळला जात आहे," असे गीताप्रेसचे तत्कालीन संपादक राधेश्याम खेमका यांनी शेखर गुप्तांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

गीता प्रेस राजकीय विचारधारेशी संबंधित आहे का?

गीता प्रेसने नेहमीच म्हटले आहे की ते कोणत्याही राजकीय विचारधारेशी निगडित नाहीत. भारतीय संस्कृतीचे उत्थान आणि अध्यात्मिक साहित्याचा प्रसार हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. पण अक्षय मुकुल सांगतात की गीता प्रेसने वेळोवेळी राजकीय भूमिका घेतली आहे.

रावण आणि राम

फोटो स्रोत, Getty Images

गोवंश हत्या प्रतिबंध, हिंदू कोड बिल यावर, भारत-पाकिस्तान फाळणी, हिंदू मुस्लीम संघर्ष या विषयांवर थेट राजकीय भूमिका घेतली होती असं मुकुल सांगतात.

1947 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. स. गोळवलकर (गुरूजी) यांचा 'सच्चा राष्ट्रवाद' हा लेख कल्याणमध्ये प्रकाशित झाला होता. तसेच 'हमारी संस्कृती की अखंड धारा' या त्यांच्या भाषणाचा सारांश देखील कल्याणमध्ये छापण्यात आला होता.

गीता प्रेसच्या राजकीय भूमिकेबाबत मुकुल सांगतात, "गीता प्रेसवाले वारंवार सांगतात की राजकीय भूमिकेशी आम्ही संबंधित नाहीत. कल्याणमध्ये देखील असंच लिहिलेलं असतं भक्ती, ज्ञान आणि वैराग्याला समर्पित मासिक. पण जर ऑगस्ट 1926 मध्ये आलेला कल्याणचा पहिला अंक पाहिला तर आपल्या लक्षात येईल त्यात लिहिलेलं आहे, की हिंदू संघटनाची आवश्यकता आहे असा उल्लेख आहे. त्यात असं लिहिलं आहे की ज्याप्रमाणे मुस्लीम एकजूट होऊन काम करतात, एकसारखं राहतात तसं हिंदूंमध्ये नाही.

मुकुल पुढे सांगतात, "एरवी आपण राजकारणापासून चार हात लांब आहोत, असं सांगणाऱ्या गीता प्रेसने वेळोवेळी राजकीय भूमिका घेतली आहे. त्याला मी फ्लॅश पॉइंट ऑफ हिस्टरी म्हणतो. तीसचे दशक असो, चाळीसचे दशक असो, गोहत्या प्रतिबंध, हिंदू कोड बिल, रामजन्मभूमी आंदोलन या सर्व वेळी त्यांनी राजकीय भूमिका घेतली आहे. धर्माची जी राजकीय बाजू असते त्यासोबत ते सातत्याने जोडले गेलेले आहेत."

'कल्याणमुळे सामान्य लोकांचा संघाच्या विचारधारेशी परिचय'

1920 चे दशक हिंदुत्वाच्या दृष्टीने फारच महत्त्वपूर्ण ठरले. त्याच काळात वि. दा. सावरकरांचे हिंदुत्व हे पुस्तक आले होते. हिंदू महासभेचे कार्य चालू होते.

1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थापना झाली. 1923 मध्ये गीता प्रेस गोरखपूरची स्थापना तर 1926 मध्ये कल्याण मासिक सुरू करण्यात आले.

गीता प्रेस

फोटो स्रोत, Geeta press

या सर्वांचा ताळमेळ कसा होता याबाबत मुकुल सांगतात, "हे सर्व घटक एकमेकांशी पूरक होते. पोद्दार यांनी गोळवलकर यांना पत्र लिहून सांगितले होते गोहत्या प्रतिबंध आंदोलनात संघाच्या लोकांनी आम्हाला मदत केली.

मुकुल पुढे सांगतात, "हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी कल्याण याकरता महत्त्वाचं होतं की RSSची भाषा, त्यांची विचारधारा इतर हिंदूपर्यंत पोहोचणं थोडं अवघड होतं, पण कल्याण असं मासिक होतं की ते राजकीय हेतूने प्रेरित नसलेल्या लोकांच्या घरी देखील येत असे. कल्याण वाचणारे सर्वच लोक 'कम्युनल' होते असं मी कधीच म्हणणार नाही.

"अनेक घरांमध्ये पुराण रामायण, महाभारत वाचत होते ते लोक देखील कल्याण वाचत होते. पण या लोकांना हिंदू अस्मिता, हिंदुत्ववादी विचारधारा या गोष्टींचा परिचय करून देण्याचं महत्त्वाचं काम कल्याणने केलं," मुकुल सांगतात.

या आरोपांबाबत गीताप्रेसची काय भूमिका आहे?

शेखर गुप्तांना एनडीटीव्हीसाठी गीता प्रेसचे तत्कालीन संपादक राधेश्याम खेमका यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा त्यांनी अक्षय मुकुल यांच्या पुस्तकाबाबत तुम्हाला काय वाटतं असं विचारलं होतं. तेव्हा खेमका म्हणाले होते की, "अक्षय मुकुल यांनी जे लिहिलं आहे ते अयोग्य आहे. त्यांनी नाव तर पुस्तकाला चांगलं दिलं आहे पण त्यात ज्या गोष्टी आहेत त्या तथ्यहीन आहेत."

कल्याणचे संपादक प्रेमप्रकाश लक्कड यांच्याशी बीबीसी मराठीने त्यांच्याशी बातचीत केली आणि गीता प्रेसवर होणारे आरोपांबाबत विचारले.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

लक्कड सांगतात, "की गीताप्रेस आणि राजकारणाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. राजकारणाच्या कार्यप्रपंचापासून दूर राहून, लोकांना अध्यात्मिक मार्गावर आणणे हाच आमचा मूळ उद्देश आहे. लोकांनी सन्मार्गावर चालावे यासाठी गीता प्रेसच्या परिसरात सत्संगाचे आयोजन केले जाते. राजकारण म्हटलं तर प्रदूषण येणं अटळ आहे. राजकारणाचे उद्दिष्ट सत्ताप्राप्ती हे असते आमचे उद्दिष्ट ते नाही."

अक्षय मुकुल यांच्या पुस्तकाबाबत लक्कड यांना विचारले असता ते म्हणाले, "अक्षय मुकुल यांच्या पुस्तकाबाबत बोलणे म्हणजे चिखलात दगड मारण्यासारखे आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपात पडणे ही आमची प्रवृत्तीच नाही. आम्ही जे काम करत आहोत, जी पुस्तकं छापत आहोत ती लोकांना पवित्र आणि शुद्ध वाटत असतील तर ती वाचली जातील आणि नाही वाचली गेली तर ती परमेश्वराची इच्छा समजू."

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)