स्मार्टफोनमधून आपली नजर का हटत नाही? या व्यसनापासून दूर व्हायचंय?

फोटो स्रोत, Science Photo Library
- Author, टीम बीबीसी हिंदी
- Role, नवी दिल्ली
'तेरे चेहरे से नजर नहीं हटती...'
1970 च्या दशकातल्या या प्रसिद्ध गाण्यात 'चेहरे' या शब्दाऐवजी 'स्मार्टफोन' शब्द टाकल्यास कुणालाही वावगं वाटणार नाही.
म्हणजे, 'स्मार्टफोन से नजर नहीं हटती...'
तुम्ही सुद्धा स्मार्टफोन वापरत असाल, तर तुम्हालाही याचा अनुभव आलाच असेल. तुम्हीही खूप वेळ स्मार्टफोनच्या स्क्रीनसमोर राहत असाल.
खरंतर हे अनेकांच्या बाबतीत होतं. तुम्ही अशा बऱ्याच जणांना ओळखत असाल, जे बघावं तेव्हा फोनमध्ये डोकं टाकून बसलेले असतात आणि त्यांना दुसरं कसलं भानच उरलेलं नसतं.
स्मार्टफोन क्रांती
स्मार्टफोनसोबतचं हे नातं गेल्या दीड दशकांचं आहे. अॅपल कंपनीच्या आयफोनच्या एन्ट्रीनंतर तर स्मार्टफोनविश्वात क्रांतीच झाली. तेव्हापासूनच खरंतर स्मार्टफोन आपल्या रोजच्या आयुष्यात अधिक वापरात आला. इतरांशी जोडून राहण्यापासून शिक्षणापर्यंत सर्व गोष्टीत स्मार्टफोनचा वावर वाढला.
बऱ्याच लोकांच्या हातात किंवा खिशात स्मार्टफोन दिसतो, मात्र त्यांना हे कळत नाही की गरजेपेक्षा अधिक स्मार्टफोनचा वापर आपण करतोय.

फोटो स्रोत, APPLE
कॅलिफोर्निया स्टेट यूनिव्हर्सिटीचे मानसशास्त्राचे प्राध्यापक लॅरी रोजन हे एका घटनेचा उल्लेख करतात. ते म्हणतात, "एकदिवस माझ्या वर्गात गेस्ट लेक्चरर आले होते आणि त्यांना ऐकण्यासाठी मी विद्यार्थ्यांमध्ये बसलो होतो. तिथं माझ्यासोबत एक विद्यार्थी बसला होता. तो संपूर्ण लेक्चरदरम्यान स्मार्टफोनमध्ये गुंतला होता. तो टेक्स्ट मेसेजना रिप्लाय देत होता आणि फेसबुक स्क्रोल करत होता."
दिवसात किती वेळ स्मार्टफोनचा वापर होतो?
लॅरी रोजन यांनी 'द डिस्ट्रॅक्ट माईंड : अॅन्सिएन्ट ब्रेन्स इन हायटेक वर्ल्ड' नावाचं एक पुस्तक लिहिलंय. या पुस्तकाचा विषय तंत्रज्ञान आणि त्याचा परिणाम असा आहे.
तुम्हाला माहितीये का, की एखादी व्यक्ती दिवसातून कितीवेळा फोन हाताळते? लॅरी रोजन यांनी 200 हून अधिक विद्यार्थ्यांसोबत केलेल्या प्रयोगाअंती या प्रश्नाचं उत्तर दिलंय.
लॅरी रोजन सांगतात, "आम्ही हे शोधत होतो की, लोक कितीवेळा फोन अनलॉक करतात आणि कितीवेळ अनलॉक ठेवतात. आम्हाला मिळालेली माहिती धक्कादायक होती. एक तरुण दिवसभरात सरासरी साठवेळा आपला फोन अनलॉक करतो आणि जवळपास 220 मिनिट फोन अनलॉक राहतो."
म्हणजेच, साडेतीन तासांहून अधिक वेळ आणि या वेळेत स्मार्टफोनचा वापर जवळपास साठवेळा होतो.

- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
- वाचा-कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?
- वाचा-लस घेण्यासाठी Co-Win वर नोंदणी कशी करायची?
- वाचा- कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेले 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

यापुढे जात लॅरी रोजन सांगतात, आणखी काही अभ्यासात आम्हाला कळलं की, मूळ संख्या याहून अधिक आहे. अभ्यासादरम्यान असेही काही लोक सापडले, जे दिवसभरात 80, 90 किंवा 100 वेळा फोन अनलॉक करतात.
फोनला चिकटून राहण्याची सवय अनेक नात्यांवरही परिणाम करत आहे.
स्मार्टफोन करतोय नात्यांवर परिणाम
लॅरी रोजन म्हणतात, "अभ्यासाचे निष्कर्ष असं सांगतात की, पती किंवा पत्नीची, कुणाचीही एकाची अशी तक्रार असते की, त्यांचा जोडीदार नेहमी फोनमध्ये गुंतलेला असतो. जोडीदाराचं आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यास त्यांना अडचण येते."
काही लोक असेही आहेत, जे गाडी चालवतानाही फोन वापरतात. असं करणं खरंतर धोक्याचं आहे. काही लोक झोपताना फोन जवळ ठेवतात आणि वारंवार पाहतही राहतात. याचा झोपेवर थेट परिणाम होतो. मात्र, प्रश्न असा आहे की, फोनला चिकटून राहण्याची एवढी ओढ का लागते?

फोटो स्रोत, Reuters
लॅरी रोजन सांगतात, "संवादाचे जितकी माध्यमं आहेत, लोक त्या सर्व माध्यमांशी जोडून राहू पाहतात. टेक्स्ट मेसेज, ईमेलचाही समावेश आहे. मात्र, सर्वांत महत्त्वाचा म्हणजे सोशल मीडिया. कंटाळा येणं किंवा उदास राहाणं याबद्दल आम्ही अभ्यास करत आहोत आणि निष्कर्ष असे सांगतात की, कंटाळा आणि उदासपणा लोकांना सहनच होत नाही."
प्रश्न अनेक आहेत. मुद्दा असा आहे की, आपण फोनशी किती जोडलेले आहोत आणि जेव्हा आपण फोनपासून दूर असतो तेव्हा काय होतं?
लॅरी रोजन आपल्या प्रयोगांच्या आधारावर सांगतात की, "फोनला सतत चिकटून राहणाऱ्या लोकांकडून जेव्हा त्यांचा फोन घेऊन, त्यांना दुसरं काम करण्यास सांगितलं गेलं, तेव्हा फोनवर वाजणारी प्रत्येक रिंगटोन किंवा फोनचा आवाज त्यांच्यातील चलबिचल वाढवत होती आणि हृदयाची धडधडही वाढत होती. प्रत्येकाबाबत असं होत नाही. मात्र, हे एक सत्य आहे की, स्मार्टफोनमुळे फोनशिवाय राहणाऱ्यांची संख्या घटली आहे. फोनपासून जेव्हा हे लोक दूर असतात, तेव्हा त्यांच्यात एकप्रकारची चलबिचल असते."
फोनचं व्यसन
न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक नताशा शुल यांनाही वाटतं की, लोक गरजेपेक्षा जास्त फोनचा वापर करतात.
नताशा शुल म्हणतात, "कुठल्याही महत्त्वाच्या बैठकीदरम्यान मी पाहते की, माझ्या सहकाऱ्यांची नजर तर माझ्याकडे आहे, पण त्यांची बोटं फोनवर असतात, त्यांना त्यापासून रोखता येत नाही."
कुठल्याही गोष्टीच्या बनवण्यात असं काय खास असतं, ज्यामुळे लोकांना त्या गोष्टीचं व्यसन लागतं. नताशा शुल हीच गोष्टी नीट समजावून सांगू पाहतात.
त्या म्हणतात, "कुणाही व्यक्तीला आकर्षित करणाऱ्या गोष्टींचा विचार केल्यास त्यात सेक्स, त्यांच्या आवडीची दुसरी व्यक्ती आणि चांगलं जेवण यांचा समावेश करता येईल. मात्र, यात आता कॉम्प्युटर तंत्रज्ञानही जोडलं गेलंय. हेही आकर्षित करतं आणि त्याचं व्यसन लागतं."
व्यसनामागचं मानसशास्त्र काय आहे?
व्यसन का लागतं, हा मोठा प्रश्न आहे. यावर नताशा 'फादर ऑफ बिहेवियरिझम' म्हटलं जाणाऱ्या बीएफ स्किनर यांच्या प्रयोगांकडे लक्ष वेधतात.
स्किनर अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. बक्षीस आणि शिक्षेचा एखाद्यावर काय परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी स्किनर यांनी अनेक प्रयोग केले.

फोटो स्रोत, Getty Images
स्किनर यांच्या प्रयोगांबाबत नताशा सांगतात, "1950 आणि 1960 च्या दशकात स्किनर यांनी केलेल्या प्रयोगत असं आढळलं की, बक्षीसाचं व्यसन तेव्हाच लागतं, जेव्हा बक्षीस किती आणि कधी मिळेल हे कळतं तेव्हा."
खोक्यात बंद केलेल्या कबुतराचा स्किनर यांचा प्रयोग याबाबत उदाहरणादाखल नताशा सांगतात.
या खोक्यात कुठे स्पर्श केल्यावर अन्न येतं, हे कबुतराला कळल्यावर तो वारंवार तिथं स्पर्श करताना दिसला. जेव्हा अन्न बाहेर येत नाही, तेव्हा स्पर्श करण्याच्या ठिकाणी चिकटून राहिल्याचं दिसून आलं.
बक्षीसाची आशा
नताशा शुल यांनी 'अॅडिक्शन बाय डिझाईन' नावाचं पुस्तकही लिहिलंय. त्यांचं म्हणणं आहे की, माणूस असो किंवा इतर प्राणी, त्यांना जर कळलं की बक्षीस काय मिळेल, तर त्याकडे आकर्षित होतात. स्किनर यांचं संशोधन हेच सांगतं की, बक्षीस देण्याच्या पद्धतीतून तुम्ही लोकांवर प्रभाव टाकू शकतात. स्लॉट मशीन बनवणारेही हे जाणतात.
जुगार खेळला जाणाऱ्या ठिकाणी स्लॉट मशीनच्या मार्फतच अधिकचा फायदा होतो. हे जाहीर आहे की, इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा जुगाराचं व्यसन अधिक वेगानं लागतं.
मशीनचं आकर्षण
नताशा म्हणतात की, स्लॉट मशीनची नफा मिळवण्यासाठीच निर्मिती करण्यात आलीय. मात्र, स्लॉट मशीन किंवा आधीचं कबुतरांचं उदाहरण याचा स्मार्टफोनशी काही संबंध आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
यावर नताशा शुल म्हणतात, "अन्न बाहेर येण्याच्या आशेनं चोच मारणारी कबुतरं किंवा कसिनोमध्ये वारंवार स्लॉट मशीनचं बटन दाबणारे जुगारी किंवा ट्रेनमधून प्रवास करणारे वारंवार आपल्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज पाहणं असो किंवा अगदी फेसबुक टाईमलाईन वारंवार स्क्रोल करणं असो... यात एक गोष्ट एकसारखीच असते. त्यांना जाणून घ्यायचं असतं पुढे काय होईल."
प्रसिद्ध लेखक आणि उद्योजक नीर एयाल सुद्धा गरजेपेक्षा अधिक फोन वापरामुळे त्रस्त आहेत.
नीर एयाल सांगतात, "काही वर्षांपूर्वी मलाही हा त्रास होता. रात्री उशिरापर्यंत फोन पाहत राहिल्यानं उशिरा झोपायचो. माझ्याकडे तांत्रिक उपकरणं असायची. झोप पूर्ण करण्यासाठी हे योग्य नव्हतं. हे माझ्या सेक्स लाईफसाठीही चांगलं नव्हतं."
तंत्रज्ञानाचं जाळं
नीर एयाल यांच्याकडे एक टेक स्टार्टअप चालवण्याचाही अनुभव आहे. ते सांगतात की, ती गेमिंग आणि जाहिरातींशी संबंधित कंपनी होती. 2007 साली ती कंपनी त्यांनी सुरू केली होती.
नीर एयाल सांगतात, "हे दोन्ही उद्योग युजर्सच्या वर्तनावर आधारित आहेत. मला लक्षात आलं की, तंत्रज्ञानाचा वापर अधिक आहे. मात्र, कुणाचाच मानसशास्त्राच्या सिद्धांतांशी संबंध नव्हता."
नीर एयाल यांनी स्किनरसारख्या लोकांच्या सिद्धांतांना तंत्रज्ञान क्षेत्राशी जोडलं आणि निष्कर्षांना एका वहीत नोंदवून ठेवलं.

फोटो स्रोत, Getty Images
नीर एयाल म्हणतात की, सवयीचा भाग बनणाऱ्या या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा वाटा ईमेलकडे जातो. ईमेल कधी कधी चांगल्या गोष्टी सांगतात, पण वाईट आहे की, त्याची सवय लागते. मग नवीन कोणतं ईमेल आलंय हे पाहत राहण्याचं व्यसन लागतं.
ते सांगतात, "फोनवर येणारे नोटिफिकेशन आपल्याला कायमच प्रोत्साहित करतात. फेबसुक, ट्वीटर आणि स्नॅपचॅट यांसारखे अॅप्स उत्सुकतेने उघडतो. आपल्याला हे माहित असतं की आपल्याला त्यातून काय मिळणार आहे."
नीर एयाल म्हणतात, "आपण चुकून फोन पाहतोय, असं होत नाही. आपण जाणूनबुजून फोन पाहतो. हे यामुळे होतं, कारण आपण तंत्रज्ञान आपल्या खिशात घेऊन फिरत असतो."
कंपन्या विणतायेत जाळं
रिवॉर्ड आणि फीचर हे लक्षात घेऊन कंपन्या वेगवेगळे प्रयोग करू शकतात. अॅप्सना सतत वापरत असल्यानं आपला फोन पूर्ण डेटा संपवून टाकतो. नीर एयाल सांगतात की, कंपन्यांना वाटतं की, लोकांना या उत्पादनाची सवय लागावी.
ते सांगतात, "मी कंटाळा दूर करण्यासाठी ईमेलसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करू लागलो. जेव्हा आपल्याला एकटं वाटतं, तेव्हा फेसबुक चेक करतो. जेव्हा एखाद्या गोष्टीबाबत खात्री वाटत नाही, तेव्हा गूगलवर सर्च करतो. जेव्हा कंटाळा येतो, तेव्हा यूट्यूब पाहतो. आपण आपल्या गरजेनुसार या गोष्टींचा वापर करतो."

फोटो स्रोत, Getty Images
तंत्रज्ञानतज्ज्ञ ट्रिस्टान हॅरिस हे फोनच्या व्यसनापासून मुक्त होण्याच्या गोष्टींवर चर्चा करतात. त्यांना तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याचा मोठा अनुभव आहे.
हॅरिस सांगतात की, "मी तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक वर्षे काम केलंय. मी 18 वर्षांचा असल्यापासून अॅपल कंपनीसाठी काम करत होतो. तिथं मी सॉफ्टवेअर इंजिनिअर होतो."
परिवर्तनाचा मार्ग
जवळपास एक दशकापूर्वी त्यांच्या स्टार्टअपने याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली की, लोक वेबवर काय वाचत आहेत. त्यांनी बीबीसी आणि न्यूयॉर्क टाईम्सची चाचणी घेतली.
हॅरिस सांगतात की, "या गोष्टी नीट समजून घेण्यास मदत झाली. मात्र, बीबीसी आणि न्यूयॉर्क टाईम्ससारखे आमचे ग्राहक तेव्हा खुश होते, जेव्हा आम्ही अधिकाधिक लोकांना त्यांच्या वेबसाईटवर कायम ठेवत होतो. मात्र, यातून आमचा उद्देश आणि आम्ही जे करतोय, यात मोठा फरक जाणवला. आमचा उद्देश लोकांना शिकवण्यास मदत करणं होतं. मात्र, आम्ही त्यांना वेबसाईटवर कायम ठेवण्याचे प्रयत्न करत होतो."
हॅरिस सांगतात, "शिक्षणाशी संबधित वेबसाईट असो किंवा मेडिटेशन अॅप असो, किंवा फेसबुक असो, हे सर्व लोकांना आकर्षित करण्यासाठीच बनवलं गेलंय. आपल्या उत्पादनाच्या माध्यमातून कंपन्या लोकांना आकर्षित करत असतात. मात्र, तंत्रज्ञान या गोष्टीला एका वेगळ्याच स्तरावर घेऊन गेलंय. तंत्रज्ञानाच्या व्यसनाला लोक स्वत:ची चूक मानतात. मात्र, त्यांना माहित नसतं की, स्क्रीनच्या बाजूनं शेकडो किंवा हजारो लोक असतात, जे याच प्रयत्नात असतात की, तुम्ही तिचा प्रॉडक्ट अधिकाधिक वेळ वापरावा."

फोटो स्रोत, Getty Images
"यशस्वी होण्याची आपली व्याख्या आणि दृष्टिकोन बदलायला हवेत. टाइम स्पेंटला टाइम वेल स्पेंट बनवण्याची गरज आहे. अॅप्सच्या रेटिंगकडे नव्यानं पाहायला हवं. रेटिंग अॅपवर घालवलेल्या वेळेची तिच्या उपयुक्ततेशी तुलना व्हावी," असं ते सांगतात.
हे जाहीर आहे की, स्मार्टफोनच्या प्ले स्टोअरला गूगल आणि अॅपल नियंत्रित करतात आणि जर बदल आणायचा असल्यास त्यांनाही मोठे बदल करावे लागतील.
हॅरिस म्हणतात की, "जर तुम्ही अन्नपदार्थांच्या उद्योगाच्या ऑर्गेनिक मूव्हमेंटकडे पाहाल, तर स्वस्त गोष्टी उपलब्ध करण्यासाठी चढाओढ असते. मात्र, मूव्हमेंटने दाखवलं की, खेळाचे नियम कसे बदलले जाऊ शकतात."
ऑर्गेनिक मूव्हमेंटच्या लोकांनी कीटकनाशकमुक्त सामानासाठी जास्त किंमत देण्याची तयारी दाखवली. हॅरिस तंत्रज्ञान क्षेत्रातही अशाच बदलाची अपेक्षा करतात.
हॅरिस म्हणतात, "जर आपण आज असं केलं तर म्हणाल की, ते प्रॉडक्ट आवडतं, म्हणून असं करतो. मात्र, वेळेच्या योग्य वापरासह त्याची रेटिंग केल्यास आपल्याला ही माहिती मिळू शकेल की, तुम्ही किती योग्य स्तरावर आहात."
हे स्पष्ट आहे की, फोन केवळ आपला उपयुक्त फीचर नाही, तर टेक कंपन्या त्यांच्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याकडे आकर्षित करण्यासाठीही त्याचा वापर करतात.
आता प्रश्न असा आहे की, या पद्धती किती ताकदीच्या आहेत. यांचा सामना करण्यासाठी आपल्याला कशाची मदत लागेल की आपली इच्छाशक्ती पुरेशी आहे? याचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. कारण जर तुम्हाला फोनच्या व्यसनापासून वाचायचं असेल, तर तुम्हाला नीर एयाल यांचा एक सल्ला आहे - फोनच्या नोटिफिकेशन्स सेटिंग बदला, तुम्ही बऱ्याच गोष्टींपासून वाचू शकता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








