कोरोना लस: COWIN अॅपवर नोंदणी कशी कराल?

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

कोव्हिड 19साठीची लस नोंदणी प्रक्रिया भारतात आता 18 वर्षांवरील सगळ्यांसाठी खुली आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठीचं लसीकरण सुरू झालेलं आहे.

18 वर्षांवरील सर्वांना केंद्र सरकारकडून मोफत लस देण्यात येतेय. तर खासगी हॉस्पिटल्स थेट लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून लशीचे डोस विकत घेत आहेत.

नोंदणीशिवाय लसीकरण

आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ऑनलाईन नोंदणीशिवायही लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येते.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 44 या वयोगटातील नागरिक नोंदणीशिवाय थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात.

तेथे पोचल्यानंतर त्यांची नोंदणी कोविन ॲपवर cowin.gov.in केली जाईल.

मुंबईतल्या एका लसीकरण केंद्राबाहेर लागलेली रांग

फोटो स्रोत, Getty Images / Hindustan Times

फोटो कॅप्शन, मुंबईतल्या एका लसीकरण केंद्राबाहेर लागलेली रांग

ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर काही लोक दिलेल्या दिवशी आणि वेळी अनुपस्थित राहतात. ग्रामीण भागात वीजपुरवठा, इंटरनेट यांचाही प्रश्न असतो. त्यामुळे कोव्हिन अॅपवर लशीसाठी नोंदणी करताना अडचण जाणवते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे.

मात्र, ही सुविधा केवळ सरकारी कोव्हिड लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल.

सध्या ही सुविधा खासगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार नाही. खासगी केंद्रांमध्ये लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीद्वारेच स्लॉट बुक करावे लागतील.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा निर्णय लागू करायचा की नाही हे संबंधित राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांवर अवलंबून असेल. ऑनलाईन नोंदणीची सुविधा राबविण्यासाठी आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यांना जिल्हा प्रशासनाबरोबर काम करण्याचे आदेश दिले आहेत.

लशीसाठी नोंदणी कशी करायची?

कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन अॅपवरून लसीकरणासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. जेणेकरून लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवलं जाईल.

नोंदणीसाठी https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जा.

कोविन लस नोंदणी

वेबसाईट उघडल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील Register / Sign in yourself या पिवळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.

त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल.

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना लस घेण्यासाठी नोंद कशी कराल?

त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील. एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. एखादं नाव डिलिट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.

संकेतस्थळ

फोटो स्रोत, Gov.in

लसीकरणासाठी तुम्हाला नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र स्लॉट बुक करावा लागेल.

पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला तिथल्या लसीकरण केंद्रांची यादी दिसेल.

तुम्ही जिल्हावार यादीही शोधू शकता.

तुम्हाला एखाद्या लसीकरण केंद्रावर स्लॉट उपलब्ध आहेत वा नाहीत, हे दिसेल. स्लॉट्स उपलब्ध असल्यास ते कोणत्या वयोगटासाठी आहेत, कोणती लस उपलब्ध आहे, हे देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.

कोरोना, लस

तुमच्या वयोगटासाठी हा स्लॉट उपलब्ध असल्यास तुम्ही तो बुक करू शकता. तसा मेसेज तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर येईल.

आरोग्य सेतू अॅपवरूनही तुम्हाला ही नोंदणी प्रक्रिया करता येईल. त्यासाठी वाचा - कोविन किंवा आरोग्य सेतू अॅपवरून लशीसाठी नोंदणी कशी करायची?

लसीकरण केंद्रावर जाताना कुठली कागदपत्रं सोबत हवीत?

लसीकरणासाठी जाणाऱ्या प्रत्येकाला काही कागदपत्रे सोबत आणणं बंधनकारक आहे.

आधार कार्ड, छायाचित्र असलेले मतदान कार्ड, ऑनलाइन नोंदणीच्या वेळी जर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या व्यतिरिक्त अन्य फोटो आयडी वापरले असेल तर ते सोबत आणावे लागतील.

पहिला डोस घेतल्यानंतर तुम्ही कोविनला लॉग-इन केल्यावर पहिला डोस घेतलेल्या व्यक्तीचा स्टेटस 'पार्शली व्हॅक्सिनेटेड' (Partially Vaccinated) असा दिसेल.

लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर 6 ते 8 आठवड्याच्या अंतराने तुम्हावा दुसरा डोस घेण्यासाठी स्लॉट बुक करावा लागेल.

लशीचा दुसरा डोस देण्याआधी तुमच्या पहिल्या डोसचे तपशील तपासले जातील आणि त्यानंतरच त्या व्यक्तीला दुसरा डोस देण्यात येईल.

लस घेतल्याचं सर्टिफिकेट कसं डाऊनलोड करायचं?

लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर त्या व्यक्तीला QR कोडच्या स्वरूपातलं सर्टिफिकेट दिलं जाईल.

हे सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या कोविन लॉगिनमध्येही पाहता येईल आणि तिथून डाऊनलोड करता येईल.

व्हॅक्सिन सर्टिफिकेट

पहिला डोस घेतल्यानंतर या सर्टिफिकेटवर 'Partially Vaccinated' असा स्टेटस असेल आणि दुसरा डोस घेताना हे सर्टिफिकेट दाखवावं लागेल.

दोन्ही डोस झाल्यावर हा स्टेटस Fully Vaccinated असा दिसेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)