BTS च्या नादात धाराशिवच्या शाळकरी मुली निघाल्या दक्षिण कोरियाला, अपहरणाचा केला बनाव

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
धाराशिव (पूर्वीचं उस्मानाबाद) जिल्ह्यातील तीन अल्पवयीन मुलींनी बीटीएस (Bangtan Boys) या कोरियन बँडच्या सदस्यांना भेटण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे या तिन्ही मुलींना अर्ध्या तासाच्या आत शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातल्या एका छोट्या तांड्यात राहणाऱ्या तीन मुलींनी बीटीएस या कोरियन म्युजिक बँडला भेटण्यासाठी भारतातून पळून दक्षिण कोरियाला जाण्याची योजना बनवली.
यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर या बँडचे रिल्स पाहण्याची सवय या मुलींना लागली होती. या रिल्स पाहून पाहून त्यांना बँडची गाणी खूपच आवडू लागली होती.
उमरगा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पळून गेलेल्या तीनपैकी दोन मुली 11 वर्षांच्या आहेत तर यातली एक मुलगी 13 वर्षांची आहे.
या तिन्ही मुली बीटीएस बँडच्या फॅन असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे.


नेमकं काय घडलं?
या घटनेबाबत बोलताना उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "शुक्रवारी (27 डिसेंबर) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास उमरगा तालुक्यातील एका तांड्यात राहणाऱ्या तीन अल्पवयीन शाळकरी मुलींचं अपहरण झाल्याची माहिती आम्हाला मिळाली.
यापैकी एका मुलीने तिच्या पालकांना फोन करून सांगितलं होतं की, शाळा सुटल्यानंतर एका पिवळ्या रंगाच्या स्कुलबसमधून आलेल्या काही लोकांनी आमच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि चाकूचा धाक दाखवून बळजबरीने गाडीत बसवलं.
अपहरण झाल्याचा कॉल पालकांना मुलींनीच केला होता. आम्ही तातडीने त्यांना ज्या नंबरवरून कॉल आला त्या मोबाईलचं लोकेशन काढलं. हा नंबर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळजवळ असल्याचं दिसत होतं."

फोटो स्रोत, dharashivlive
अश्विनी भोसले म्हणाल्या की, "आम्ही सदरील नंबरवर कॉल केला आणि समोरून एका महिलेने कॉल उचलला. त्या महिलेने सांगितलं की, त्या पुण्याला जाणाऱ्या एसटी बसमधून प्रवास करत आहेत आणि त्याच्याशेजारी बसलेल्या एका लहान मुलीने 'मला घरी कॉल करायचा आहे' असं सांगून मोबाईल घेतला."
त्यानंतर उमरगा पोलिसांनी बसस्थानक गाठून पुण्याला जाणाऱ्या बस किती वाजता सुटतात? याची चौकशी केली आणि त्या अनुषंगाने बसस्थानकातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्या फुटेजमध्ये तीन अल्पवयीन मुली दुपारी दोन वाजता सुटणाऱ्या बसमध्ये चढताना दिसल्या.
उमरगा तालुक्यातील हजारो लोक रोजगारासाठी पुण्याला जात असतात. पुण्याला जाण्यासाठी उमरगा येथून थेट बस आहेत आणि अशाच एका बसमध्ये या मुली चढल्या होत्या. आधी पुणे आणि नंतर थेट दक्षिण कोरिया गाठण्याची योजना त्यांनी बनवली होती.
हातगाडीवाल्या महिलेनं मुलींना रोखलं
पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी त्यांच्या परिचयाच्या एका महिलेला कॉल करून अशा तीन मुली मोहोळ बसस्थानकात दिसल्या तर त्यांना थांबवून ठेवण्याची विनंती केली.
आश्विनी भोसले यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "मोहोळ बसस्थानकावर काम करणाऱ्या आदम भाभी यांनी आम्हाला सांगितलं की, तीन मुली एका बसमधून उतरल्या आहेत आणि त्या पंढरपूरला जाणाऱ्या रस्त्याबाबत विचारपूस करत आहेत. आम्ही आदम भाभी यांना एका व्यक्तीची मदत घेऊन या मुलींना तिथेच थांबवण्यास सांगितलं."
मोहोळ येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी बसस्थानकावर जाऊन तिन्ही मुलींना ताब्यात घेतलं. त्यानंतर उमरगा येथून तिन्ही मुलींचे पालक आणि पोलीस कर्मचारी या मुलींना सुखरूप परत घेऊन आले.
बीटीएसच्या लहानग्या फॅन
मुलींना उमरगा पोलीस स्थानकात आणल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, "आम्ही बीटीएस या कोरियन म्युझिक बँडच्या फॅन आहोत आणि त्यामुळे या बँडमधील सदस्यांना आम्हाला भेटायचंच होतं. त्यासाठी आम्ही दहा दिवसांपासून योजना बनवत होतो आणि शेवटी आम्ही घरातून पुण्याला पळून जायचं ठरवलं. पुण्याला जाऊन पैसे कमवायचे आणि तिथून दक्षिण कोरिया गाठायचं असा आमचा प्लॅन होता."

फोटो स्रोत, Getty Images
लहान मुलांसाठी मोबाईलमधून जगाची दारं खुली झाली आहेत. मात्र त्याच मोबाईलच्या माध्यमातून मिळणारी माहिती लहान मुलांच्या आयुष्यावर काय परिणाम करू शकते हे आपल्याला या घटनेतून दिसून येतं.
अश्विनी भोसले म्हणाल्या की, "या अत्यंत कमी वयाच्या मुली आहेत. तिन्ही मुली गरीब कुटुंबातील आहेत आणि यापैकी एका मुलीच्या घरी वायफाय कनेक्शन आहे. त्यामुळे परिसरातील लहान मुलींना एकत्र करून मोबाईल आणि इंटरनेटवरच्या विविध गोष्टी या मुली पाहायच्या आणि यातूनच ही घटना घडली आहे."
बीटीएस कोण आहेत?
तुम्ही के-पॉप म्हणजे कोरियन पॉप म्युझिकचे चाहते असाल किंवा नसाल तरीही सोशल मीडियावर बीटीएसविषयी तुम्ही ऐकलं किंवा वाचलं असेलच.
बीटीएसचं पूर्ण नाव आहे बँग्टन सोनियोंदन (Bangtan Sonyeondan) म्हणजे बुलेटप्रुफ बॉय स्काऊट्स. 'बँग्टन बॉईज' नावानंही ते ओळखले जातात.
या बँडमध्ये सात सदस्य आहेत - जिन, सुगा, जे-होप, आरएम, जिमिन, व्ही आणि जुंगकुक. या सात जणांची निवड बांग सीह्यूक या एका संगीतकारानं ऑडिशन्समधून केली होती.
2010 साली या ग्रुपची स्थापना झाली आणि 2013 साली त्यांचा पहिला अल्बम रिलीज झाला. तेव्हापासूनच ते लोकप्रिय होऊ लागले, आणि कोरियापाठोपाठ जपान आणि इतर आशिया देशांमध्ये बीटीएसची चर्चा होऊ लागली.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या काही वर्षांत तर आशियाबाहेर जगभरात, अगदी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसपर्यंत बीटीएसनं धुरळा उडवून दिला. अगदी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही त्यांना भाषण करण्याची संधी मिळाली.
अमेरिकेत बीटीएसनी आशियाई वंशाच्या नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या वर्णद्वेष आणि त्रासावरही भाष्य केलं.
यंदा आयएफपीआय या संगीतक्षेत्रातल्या नावाजलेल्या संस्थेनं बीटीएसला ग्लोबल रेकॉर्डिंग आर्टिस्ट ऑफ द इयर म्हणून नावाजलं. जगभरात त्यांचे चाहते बीटीएस आर्मी म्हणून ओळखले जातात.
BTS एवढे लोकप्रिय का झाले?
एक म्हणजे मुळातच कोरियन पॉपची लोकप्रियता वाढली आहे. त्यातलं संगीत, गायन, नृत्य यात नाविन्य आहे. हटके स्टाईल, जोरदार मार्केटिंग आणि पैशाच्या जोरावर के पॉपची, आणि त्यातल्या त्यात बीटीएसची क्रेझ जगभरात पसरली.
पॉप, हिपहॉप, ऱ्हिदम अँड ब्लूज अशा मिश्र संगीतामुळे आणि खास डान्स रुटिन्समुळेही हा बँड ओळखला जातो.
अवघ्या विशीतल्या तरुणांचा हा ग्रुप जगभरात तरुणाईच्या मनाला भिडू लागला. यामागचं आणखी एक कारण म्हणजे, बीटीएसने निवडलेले विषय. तरुणांच्या मानसिक आरोग्यापासून ते राजकारणापर्यंत, वेगवेगळ्या विषयांवर ते आपली मतं परखडपणे मांडत असतात.
बीटीएस सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी सतत जोडलेले राहतात. सोशल मीडियावरचा त्यांचा वावर काहीसा विनम्र असा असतो, जे इतर सेलिब्रिटीजच्या तुलनेत उठून दिसतो. अनेकांना त्यांच्यात स्वतःचं प्रतिबिंबही दिसतं.
मोबाईलच्या अतिवापरामुळे काय परिणाम होतात?
खरंतर मोबाईलमुळे 'लहान मुलांचे मैदानी खेळ कमी झाले,' 'मुलांची एकाग्रता कमी झाली' या आणि अशा अनेक परिणामांची सतत चर्चा होत असते. पण मोबाईलच्या आणि त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या माध्यमातून होणारे परिणाम आता अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत. लहान मुलांवर मोबाईल आणि गॅजेट्सच्या अतिवापरामुळे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होतात असं तज्ज्ञांना वाटतं.
याबाबत बोलताना बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ला यांनी बीबीसी मराठीला सांगितलं होतं की, "आतापर्यंत मुलांच्या हातात थेट मोबाईल किंवा अन्य गॅजेट दिले जात नव्हते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात शाळाच ऑनलाईन सुरू झाल्याने पालकांकडे पर्याय उरला नाही. डिजिटल गॅजेटच्या वापरामुळे नवनवीन व्हीडिओ पाहणं, गेम खेळणं इत्यादींमुळे उत्तेजनांची सवय लागते. त्यामुळे जेव्हा इंटरनेट बंद होतं किंवा अन्य कारणांनी हीच मुलं सामान्य आयुष्यात परततात तेव्हा तिथं अशी तातडीनं उत्तेजनं देणाऱ्या गोष्टी नसल्यानं त्यांना सामान्य आयुष्याचा कंटाळा येतो."

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. भूषण शुक्ला सांगतात की, "मुलं ऑनलाईन प्रतिमेच्या प्रेमात पडत आहेत. त्यामुळे त्या अनावश्यक अभासी प्रतिमेसाठी अनावश्यक धडपड सुरू होते. इतरांच्या प्रतिमा पाहून स्वत:ची तुलना करून स्वत:चं खच्चीकरण करणं वाढलंय."
शहरी भागात मोबाईलच्या अतिवापराबाबत सल्ला देणाऱ्या संस्था आणि समुपदेशक आहेत. मात्र ग्रामीण भागात अशा पद्धतीची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. सरकारतर्फे केलं जाणारं समुपदेशन काही ठिकाणी उपलब्ध असलं तरी, त्याबाबतची माहिती ग्रामीण पालकांना नाही.
मुंबईपासून उमरगा हे शहर 482 किलोमीटरवर आहे. या शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका छोट्याशा तांड्यात राहणाऱ्या या तीन मुलींपर्यंत दक्षिण कोरियातल्या म्युजिक बँडचं संगीत पोहोचतं. त्या हे संगीत ऐकतात आणि भारतातून थेट दक्षिण कोरियाला जाण्याचं ठरवतात.
काही वर्षांपूर्वी भविष्यात असं काही होईल असा विचारही कोणी केला नसेल. पण हातोहाती आलेल्या मोबाईलनं आता काहीही होऊ शकतं, असंच या घटनेनंतर म्हणता येईल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











