स्मार्टफोनमुळे लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय का?

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, सुशीला सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अगदी कोवळ्या वयातच मुलांच्या हातात स्मार्टफोन किंवा टॅबलेट देऊन त्यांच्या ज्ञानात भर पडेल किंवा त्याला डिजिटल जगाची ओळख होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खूप चुकीचा विचार करताय.

हे मत आहे अमेरिकन स्वयंसेवी संस्था 'सेपियन लॅब्स'चं. ही संस्था 2016 पासून लोकांचं मानसिक आरोग्य समजून घेण्यावर भर देत आहे.

कोव्हीडच्या काळात दूरस्थ (ऑनलाईन) शिक्षण सुरू झालं. याच दरम्यान एक चर्चा सुरू झाली की, लहान मुलांचा मोबाईलवरील स्क्रीन टाईम किती असावा?

त्यांनतर याच्या फायदया- तोट्यांवर चर्चा सुरू झाली. त्याचवेळी सोशल मीडियावरही व्हीडिओंचा पूर येऊ लागला होता.

व्हीडिओ कॅप्शन, स्मार्टफोनच्या व्यसनामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो? सोपी गोष्ट

अहवालात काय म्हटलंय?

सॅपियन लॅब्सच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, लहान मुलांना खूप लवकर स्मार्टफोन दिला जातो. त्यामुळे वयात येईपर्यंत त्यांच्या मेंदूवर विपरीत परिणाम दिसून येतात.

हा अहवाल 40 देशांतील 27 हजार 969 तरुणांशी बोलून तयार करण्यात आला आहे. हे सर्वेक्षण 2023च्या जानेवारी ते एप्रिल महिन्यात करण्यात आलं होतं. या 40 देशांमध्ये भारताचाही समावेश होता.

मुलामुलींना कोणत्या वयात स्मार्टफोन मिळाले, त्यानुसार त्यांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम झाला, हे या आलेखातून कळतं.

फोटो स्रोत, Sapien Labs

फोटो कॅप्शन, मुलामुलींना कोणत्या वयात स्मार्टफोन मिळाले, त्यानुसार त्यांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम झाला, हे या आलेखातून कळतं.

या अहवालात अभ्यास करण्यात आलेल्या तरुणांची मानसिक स्थितीच्या 47 वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करून त्याचं मोजमाप मानसिक आरोग सूचकांक (Mental Health Quotient किंवा MHQ) या आकड्याने करण्यात आलं.

या अहवालातले काही मोठे निष्कर्ष पाहू या –

  • वयाच्या 6व्या वर्षी स्वतःचा स्मार्टफोन देण्यात आलेल्या 74 टक्के मुलींना त्यांच्या तारुण्यात मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या. या महिलांचा MHQही कमी आढळला.
  • ज्या मुलींना 10व्या वर्षी स्मार्टफोन देण्यात आला, त्यापैकी 61 टक्के मुलींचा MHQ वाईट होता.
  • 15 वर्षांच्या 52 टक्के मुलींचीही काहीशी अशीच स्थिती होती.
  • 18व्या वर्षी ज्या मुलींना स्वत:चे स्मार्टफोन मिळाले, त्यांच्यापैकी 46 टक्के मुलींना मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या.
  • दुसरीकडे, जेव्हा मुलांना 6व्या वर्षी स्मार्टफोन हाती देण्यात आले, तेव्हा त्यापैकी 42 टक्के मुलांना मानसिक समस्या होत्या, ज्यांना 10व्या वर्षी स्मार्टफोन देण्यात आले, त्यांच्यापैकी फक्त 43 टक्के मुलांचा MHQ खालावलेला दिसला.
  • आणि ज्या मुलांना 18व्या वर्षी फोन देण्यात आले होते, त्यांच्यापैकी 36 टक्के मुलांना मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या.

याशिवाय, Social Self म्हणज समाजात वावरण्याचा आत्मविश्वास त्या तरुणांमध्ये जास्त दिसला ज्यांना फोन मोठे झाल्यावर देण्यात आले होते.

आत्महत्येचे विचार, चिडचिडेपणा, वास्तवापासून दुरावणे तसंच भास होणे, या गोष्टीही त्या तरुणांमध्ये जास्त दिसल्या ज्यांना फार कमी वयातच फोन सोपवण्यात आले होते.

सफदरजंग हॉस्पिटलमध्ये करणारे माजी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पंकज कुमार वर्मा सांगतात की याला कोणताही शास्त्रीय आधार नाहीये. पण याचा अद्याप म्हणावा तसा उलगडाही झालेला नाही.

त्यांनी सांगितलं की, यामागे एक कारण असू शकतं, ते म्हणजे मुलांच्या तुलनेत मुली लवकर किशोरावस्थेत पोहोचतात. यात त्यांच्या मानसिक आणि शारीरिक बदल घडून येतात.

जेव्हा मुलींना कमी वयातच जास्त माहिती मिळते तेव्हा मुलांच्या तुलनेत त्या जास्त प्रभावित होतात.

या अहवालात असंही म्हटलंय की, ज्या मुलांना लहान वयातच स्मार्टफोन देण्यात आलेत त्यांच्यात आत्महत्येचे विचार, इतरांबद्दलचा राग, वास्तवापासून दूर राहणे आणि भ्रमात राहणे आदी गोष्टी वाढलेल्या दिसून येतात.

मुलांवर परिणाम

छवी आज दोन मुलांची आई आहे. तिच्यासमोर देखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती.

ती नेहमीच घरकामात गुंतलेली असायची. काम करताना मुलीचा त्रास होऊ नये म्हणून तिने तिच्या 22 महिन्यांच्या मुलीला स्मार्टफोन खेळायला दिला.

छवी तिच्या मुलीला यूट्यूबवर कार्टून लावून द्यायची आणि स्वतः घरची कामं करायची.

मोठी मुलगी शाळेतून परत येईपर्यंत हाच दिनक्रम सुरू असायचा.

पण नकळतपणे मुलीच्या हातात दिलेला फोन आपल्यासाठी डोकेदुखी ठरेल हे छवीच्या लक्षातच आलं नाही.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पूजा शिवम सांगतात की, छवी तिच्या मुलीला घेऊन आली तेव्हा ती बोलायला लागली होती. तिची नीट वाढही झाली होती, पण तिच्यात तणाव वाढलेला दिसला.

त्या सांगतात की, "ती दिवसाचे सात ते आठ तास स्मार्टफोनवर घालावयाची. छवी यूट्यूबवर तिला कार्टून लावून द्यायची. पण त्यानंतर ती यूट्यूबवर काय काय पाहायची याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो."

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

''ती घाबरु लागली, तिचा त्रास वाढला होता. घरात एखादी नवीन व्यक्ती आली की ती ओरडायची, घाबरायची. शिवाय ती अबोल आणि हट्टी झाली होती. त्यानंतर आम्ही हळूहळू तिच्यापासून स्मार्टफोन दूर केला. तिचं समुपदेशन सुरू केलं."

आजकाल पालक लहान वयातच मुलांच्या हातात पॅसिफायर फोन देत असल्याचं तज्ज्ञाचं मत आहे.

मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, सिग्नलच्या माध्यमातून हजारो गोष्टी आपल्या मेंदूपर्यंत पोहोचत असतात.

आपण स्मार्टफोन वापरू लागल्यावर आपल्याला त्यात व्हीडिओ आणि ऑडिओ तर मिळतोच, शिवाय अशा काही गोष्टी समजतात ज्यामुळे तुमच्या मनात उत्साह आणि कुतूहल निर्माण होतं. आणि ते चुंबकासारखं काम करतं.

त्यामुळे मुलांना जर असं एक्सपोजर मिळालं तर काय होईल? याचा विचार करावा लागेल.

डॉ. पंकज कुमार वर्मा यांचा रिजुवेनेट माइंड क्लिनिक नावाचा दवाखाना आहे.

ते यावर सांगतात की, कोव्हिडच्या काळात मुलांचा मोबाईल स्क्रीन टाईम वाढला होता, मुलं घरात बंद होती. त्यामुळे त्यांच्यात चिडचिड वाढलेली दिसून आली. शिवाय त्यांच्यात चिंता आणि नैराश्यदेखील वाढलं होतं.

ते पुढे स्पष्ट करतात की, "लहान मुलांमध्ये मेंदूचा विकास सुरूच असतो. ते जे बघत असतात ते त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही हे त्यांना समजत नाही. दुसरं म्हणजे कार्टून पाहिल्यानंतर जर त्यांना बरं वाटत असेल तर त्यांच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं एक रसायन स्त्रवत असतं. यातून त्यांना आनंद मिळतो."

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

डिजिटल एक्सपोजमुळे मुलं एकप्रकारे व्यसनाधीन झाली आहेत. याचा परिणाम असा होतो की जेव्हा त्यांनी वाचायला हवं, खेळायला हवं, मित्रांमध्ये मिसळायला हवं तेव्हा त्यांना फक्त स्मार्टफोनची आठवण येत असते. ते यात मग्न होतात आणि डोपामाइन स्त्रवू लागतं. अशाने ते एका आभासी जगात जगू लागतात.

यामुळे ते भीती, संभ्रम, चिंता अशा मन:स्थितीत गुरफटून जातात आणि त्याचा दीर्घकाळ परिणाम होतो. दुसरीकडे मुलांचा विकास सामाजिक जडणघडणीतून व्हायला हवा. पण असं होत नाही आणि भविष्यात त्याचा वाईट परिणाम होतो.

अशावेळी काय कराल?

गेल्या वर्षी केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांवर नवीन आणि कठोर मार्गदर्शक तत्त्वे लागू केली होती.

या दरम्यान केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, "भारतात 53 कोटी व्हॉट्सअॅप वापरकर्ते आहेत. यूट्यूबचे 44.8 कोटी, फेसबुकचे 41 कोटी आणि 1.75 कोटी ट्विटर वापरकर्ते आहेत."

2025 मध्ये भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 90 कोटींपर्यंत वाढू शकते.

तंत्रज्ञानाला दोन बाजू असल्याचं तज्ञ सांगतात. तंत्रज्ञानामुळे आपल्यासमोर माहितीचा एक मोठा स्रोत खुला होऊ शकतो. पण तसेच त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. त्यामुळे याच्या वापरावर मर्यादा असणं आवश्यक आहे. पण लोक या गोष्टी विसरतात.

तज्ञ पालकांना काही गोष्टींचा सल्ला देतात.

  • लहान मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवा.
  • मुलांच्या हातात स्मार्टफोन किंवा टॅबलेट कधी द्यायचा ते ठरवा.
  • आपल्या मित्राकडे स्मार्टफोन आहे पण आपल्याकडे नाही म्हणून मुलं हुज्जत घालत असतील तर त्यांच्याशी बोलून त्यांना समजावा.
  • जर मुलांना त्यांच्या मित्रांसोबत संपर्क करायचा असेल तर घरी लँडलाईन बसवा किंवा मग असा मोबाईल फोन द्या ज्यात केवळ बोलणं होईल, मॅसेज येतील.
  • मुलाच्या अभ्यासासाठी मोबाईल आवश्यक असेल तर स्क्रीन टाइमवर मर्यादा हवी.
  • आजकाल शाळांमध्ये ऑनलाइन असाइनमेंट दिल्या जातात. अशावेळी प्रिंटर खरेदी करा, कारण मुलाच्या नुकसानापेक्षा प्रिंटर तुमच्यासाठी स्वस्त असेल.

या अहवालात पुढे असंही म्हटलंय की, लहान मुलांच्या हातात जितका वेळ स्मार्टफोन राहील तितकाच त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत राहील.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)