'त्या घोटाळेबाजांना OTP दिला हे आठवलं की आजही शरमल्यासारखं होतं'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
31 मे 2018 ला दिवस नेहमीप्रमाणे सुरू झाला होता. सकाळी एक फोन आला. फोन करणारी व्यक्ती हिंदीत बोलत होती.
“मी स्टेट बँकेतून बोलतो आहे. तुमचं क्रेडिट कार्ड आम्ही नवीन सुविधांसह तुम्हाला देतो आहे. त्यासाठी तुम्हाला काही माहिती आम्हाला द्यावी लागेल.”
ती माहिती म्हणजे डेबिट कार्डची सगळी माहिती त्यांनी घेतली आणि महत्त्वाचं म्हणजे मी ती दिली.
पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे असल्या भूलथापांना बळी पडायचं नसतं, आपली कोणतीच माहिती अशी शेअर करायची नसते हा सगळा शहाणपणा अंगात होता. पण त्याक्षणी काय झालं होतं मला आजपर्यंत कळलेलं नाही. एका क्षणात अकाऊंट मधून 58 हजार रुपये गेले.
जेव्हा पैसे गेल्याचा मेसेज आला तेव्हा सगळा प्रकार लक्षात आला. कार्यालयातल्या सहकाऱ्यांनी काही नंबर्स दिले. सायबर क्राईमकडे तक्रार केली. स्टेट बँकेत तक्रार केली.
तिथे गेल्यावर नाव गाव विचारल्यावर काय व्यवसाय करता हे विचारल्यावर जेव्हा पत्रकार असं सांगायचो तेव्हा तिथले अधिकारी, “काय येडा का खुळा?” या नजरेने पहायचे.
त्यांची ती नजर आजही डोळ्यासमोर आली की मेल्याहून मेल्यासारखं होतं. या घटनेला पाच वर्षं झाली तरी त्याक्षणी मी असं का केलं याचा उलगडा होत नाही.
आपण केलेल्या मूर्खपणाची लाज वाटते. यथावकाश त्यातले 45 हजार रुपये परत मिळाले आणि आयुष्यात एक मोठा धडा मिळाला.
आताही त्या लोकांचे फोन येतात. मग मी मुद्दाम त्यांची मजा घेतो. मी त्यांची मजा घेतोय हे कळल्यावर ते लोक आपले खरे रंग दाखवतात, मग बाचाबाची होते.
एकदा तर एकाला, “अरे बरेच दिवसांनी फोन केलास, काय डिटेल्स पाहिजे सांग” असं म्हटलं आणि मीच फोन करून सतावण्याचा प्रयत्न केला. माझे पैसे गेल्याचा सूड मी अशा पद्धतीने घेतो.
हल्ली ऑनलाईन स्कॅम, फ्रॉड हे शब्द निघाले की गप्पांमध्ये एक ना एक बळी पडलेलल्याचं उदाहरण समोर येतंच.
प्रत्येकवेळी पद्धत निराळी असते. कधी एखादी लिंक क्लिक केली जाते, कधी माहिती शेअर केली जाते, कधी काही दोष नसताना कष्टाने कमावलेले पैसे एका क्षणात जातात आणि हतबल होण्यावाचून पर्याय नसतो.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार 2019-20 साली 185 कोटींचे घोटाळे झाले, 2020-21 या वर्षांत हा आकडा 160 कोटी झाला तर, 2021-22 मध्ये हा आकडा 128 कोटी झाला अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी संसदेत दिली होती.
तसंच नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्यूरोने दिलेल्या माहितीनुसार 2018-2020 या काळात ATM कार्ड, डेबिट कार्ड, ओटीपी यांच्याशी निगडीत 16,450 केसेस दाखल करण्यात आल्या होत्या त्यापैकी 8,981 केसेसचा निपटारा झाला होता.
ऑनलाईन स्कॅम होतात तरी कसे?

फोटो स्रोत, AFP
ऑनलाईन पद्धतीने पैसे लुटायच्या अनेक कल्पना या घोटाळेबाजांकडे आहेत. रिझर्व्ह बँकेने त्याबदद्ल एक मार्गदर्शक पुस्तिका काढली आहे. यातला पहिला प्रकार असा आहे की एखाद्या बँकेची किंवा पतसंस्थेची किंवा ऑनलाईन शॉपिंग पोर्टलची हुबेहुब वेबसाईट तयार करणं.
मग या लिंक ग्राहकांना पाठवल्या जातात. त्यावर ग्राहकर नेहमीचीच साईट म्हणून सगळी माहिती शेअर करतात आणि तिथेच घात होतो. तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारची कोणतीही साईट उघडू नये.
दुसरा प्रकार हा फोन करून छळण्याचा आहे. बँकेचे प्रतिनिधी असल्याचं भासवून माहिती मागवतात आणि पैसे काढून घेतात. हा मोठ्या प्रमाणात आढळणारा प्रकार आहे. त्यामुळेच कोणत्याही पद्धतीची माहिती शेअर करू नका अशी विनवणी सातत्याने बँका करत असतात.
ऑनलाईन सेलिंग प्लॅटफॉर्म तयार करून ते तुमचं उत्पादन विकत घेण्याची इच्छा प्रदर्शित करतात. मग Pay money असा पर्याय वापरण्याऐवजी Request money असा पर्याय वापरतात आणि बँकेतून पैसे काढतात.

त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना अतिशय काळजी घेणं अत्यावश्यक ठरतं. अनेकदा ग्राहकांना एखादी अप डाऊनलोड करायला सांगतात. एकदा ही अॅप फोनवर आली की सगळी माहिती अॅप गोळा करते आणि ग्राहकांचे पैसे लुबाडले जातात.
ज्येष्ठ नागरिक हाही ऑनलाईन घोटाळेबाजांचा सोपा सावज असतो.
रिस्पॉन्सिबल नेटिझन्स या संस्थेच्या संस्थापक सोनाली पाटणकर याविषयी अधिक माहिती देताना म्हणाल्या,
“हल्ली हे घोटाळेबाज सोशल इंजिनिअरिंगचा वापर करून एखाद्या कुटुंबातल्या कमावत्या व्यक्तीला हेरतात. अनेकदा निवृतीच्या आसपास किंवा नुकतेच निवृत्त झालेल्या व्यक्तींना हेरतात. या व्यक्ती बऱ्याचदा डिजिटली साक्षर नसतात. त्यामुळे त्यांच्या भूलथापांना बळी पडतात. एकदा गेलेले पैसे परत कसे मिळवायचे याची माहिती त्यांना नसते. तसंच मुलांना हे सगळं कसं सांगायचं याबद्दलही ते साशंक असतात.”
घोटाळेबाज लोक अतिशय प्रशिक्षित असल्याचा मुद्दाही सोनाली पाटणकर अधोरेखित करतात. एखाद्यावर गारूड करणं, त्याला भूलवणं, माहिती देण्यास भाग पाडणं, अशा अनेक गोष्टी ते एकाच वेळी करत असतात. या सगळ्यापासून बचाव करणं आवश्यक आहे

फोटो स्रोत, Getty Images
गेलेले पैसे परत मिळतात का?
अत्यंत कळीचा मुद्दा. एखाद्या वेळी चुकून पैसे गेलेच तर ते कसे मिळवायचे हा लोकांना पडलेला प्रश्न असतो. पैसे तर गेलेले असतात. त्या पाठोपाठ येणारा अपमान, अपराधी भावना या सगळ्या असतात.
त्यामुळे अनेकदा तक्रार करायला उशीर होतो आणि पैसे मिळत नाही.
सोनाली पाटणकर यांच्या मते पैसे परत मिळायचं प्रमाण अतिशय कमी आहे. तरीही पैसे गेल्याचं लक्षात येताच 1930 क्रमांकावर फोन करावा, जेणेकरून पुढचे व्यवहार थांबतील. तसंच बँकेला फोन करून तात्काळ कळवावे आणि Redressal चा फॉर्म भरावा. त्यामुळे पैसे मिळायची शक्यता वाढते.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काहीतरी घोटाळा झाल्याचं लक्षात येताच 14440 या नंबरवर मिस कॉल द्यावा. अकाऊंटमधून पैसे गेल्यावर तातडीने बँकेला त्याची माहिती द्या.

फोटो स्रोत, Getty Images
बँकेला माहिती दिल्यावर त्याची पोचपावती घ्या. अशा प्रकारची तक्रार केल्यावर बँकेला 90 दिवसांच्या आता तिचा निपटारा करावाच लागतो.
जर तुमच्याकडून दुर्लक्ष झाल्यामुळे, ओटीपी, किंवा पिन सांगितल्यामुळे पैसे गेले असतील तर बँकेकडे तक्रार करेपर्यंत हे नुकसान तुम्हाला सहन करावं लागतं. बँकेकडे तातडीने तक्रार केल्यावर बँक ते पैसे तुम्हाला परत करते. जर तक्रार नोंदवायला उशीर झाला तर नुकसान आणखी वाढतं.
मग करायचं तरी काय?
सोनाली पाटणकर यांच्या मते अशा प्रकारचे घोटाळे झाल्यानंतर काय करायचं याबदद्ल आपल्या समाजात कमी माहिती आहे. त्यामुळे अनेक केसेस रिपोर्टच होत नाही.
उदा.5000 रुपये गेले तर पाचच हजार गेलेत म्हणून त्याची वाच्यता होत नाही. अपराधीपणा, नैराश्य या सगळ्या गोष्टी असल्याने अनेकदा त्या आप्तेष्टांना सांगितल्या जात नाही.
ऑनलाईन स्कॅम टाळायचे असतील तर कोणत्याही प्रकारच्या लिंका, ओटीपी, पिन शेअर करू नये. आपण इंटरनेटवर जे पाहतो ते सगळं खरं आहे ही धारणा कमी करणं अतिशय महत्त्वाचं आहे.
कोणतीही माहिती देताना, ती फॉर्वर्ड करताना दहावेळा विचार करावा. एखाद्या अॅपबद्दल माहिती नसेल तर ती डाऊनलोड करू नये. पैशाच्या व्यवहारांबद्दल आत्मविश्वास नसेल तर ते करू नयेत.
ऑनलाईन व्यवहार करताना, पेट्रोल पंप किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी कार्ड वापरताना अतिशय काळजी घ्यावी. ऑनलाईन व्यवहार शक्यतो आपल्याच फोनवर करावेत.
फुकटचं वायफाय, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज करणं टाळावं. त्यातूनही डेटा आरामात काढता येतो.
लॅपटॉप किंवा मोबाईल रिपेअरला देताना तो फॅक्टरी सेटिंगवर आणून मग द्यावा.
ऑनलाईन स्कॅमबद्दल चारचौघात बोलायला हवं. जर आपले पैसे गेले आणि त्याचा मानसिक त्रास होत असेल तर त्या अपराधीपणाच्या भावनेतून निघण्यासाठी समुपदेशन घ्यावं.
हल्ली सेक्स्टॉर्शन हाही ऑनलाईन स्कॅमचा नवीन यशस्वी प्रकार आहे. या प्रकरणी पुण्यात दोन मुलांनी आत्महत्या केली होती. यावरून या प्रकरणाची व्यापकता लक्षात यावी.
“आपल्याकडे डिजिटल साक्षरता म्हणजे फोन वापरता येणं इतकंच आहे असं वाटतं. मात्र त्याची व्याप्ती मोठी आहे,” पाटणकर सांगतात.
घरी एखाद्या अनोळखी व्यक्तीने दार वाजवलं किंवा रस्त्यात एखाद्या अनोळखी व्यक्तीने स्मितहास्य केलं तर आपण इतके सावध असतो हीच सावधगिरी ऑनलाईन वागणुकीतही असंच सावध असायला हवं असंही त्या पुढे म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








