KYC: ई-वॉलेटचा वापर सुरू ठेवण्यासाठी आधी 'हे' करा

फोटो स्रोत, Getty Images
तुम्ही जर आर्थिक व्यवहार करत असाल, तर तुम्हाला KYC म्हणजेच Know Your Customer अपडेट करावाच लागेल. अन्यथा, तुम्हाला तुमच्या ई-वॉलेटवरुन कुठलेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.
KYC ची प्रक्रिया पूर्ण कशी करता येईल, त्यासाठी कोणती कागदपत्रं गरजेची आहेत, याची माहिती घेण्यापूर्वी आपण KYC म्हणजे काय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आता नेमकं काय सांगितलंय, हे आपण पाहूया.
ई-वॉलेटद्वारे (उदा. पेटीएम, अमेझॉन पे, गूगल पे इ.) आर्थिक व्यवहार करत असाल, तर KYC शिवाय आर्थिक व्यवहार करण्यासाठी आजचा (28 फेब्रुवारी) शेवटचा दिवस आहे. म्हणजेच, एक मार्चपासून तुम्ही ई-वॉलेटवर KYC ची माहिती दिली नसेल, तर तुम्हाला आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्याच या सूचना असल्यानं तुम्हाला KYC ची माहिती देणं करणं बंधनकारक आहे.
KYC म्हणजे काय?
Know Your Customer (KYC) म्हणजेच मराठीत ज्याला आपण 'आपला ग्राहक जाणून घ्या' असं म्हणू शकतो. आर्थिक व्यवहार करण्यासाठी KYC महत्त्वाचं असतं. त्यासाठी संबंधित संस्था, मग ती बँक असेल किंवा ई-वॉलेट कंपनी असेल, त्या एक फॉर्म उपबल्ध करुन देतात, त्यातील माहिती ग्राहकांना भरावी लागते आणि आवश्यक कागदपत्रं जोडावी लागतात.

फोटो स्रोत, Getty Images
ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा अशी दोन प्रकारची कागदपत्रं KYC साठी द्यावी लागतात. शिवाय, तुमचा फोटोही अपडेट करावा लागतो.
केवायसीचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे गैरव्यवहार रोखण्यास किंवा गैरव्यवहार झाल्यास गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यास केवायसीची मदत होते.
बँकांसाठी केवायसी अनिवार्य होतीच, आता RBI नं ई-वॉलेटसाठीही KYC अनिवार्य केलंय. ई-वॉलेट म्हणजे फोन पे, अमेझॉन पे किंवा इतर ऑनलाईन आर्थिक व्यवहाराचे वॉलेट.
ई-वॉलेटचा वाढता वापर लक्षात घेता केवायसी महत्त्वाचं आहे.
KYC साठी कोणती कागदपत्रं आवश्यक असतात?
आधी सांगितल्याप्रमाणे, KYC साठी दोन प्रकारची कागदपत्रं आवश्यक असतात - ओळख पुरवा आणि पत्त्याचा पुरावा. त्यासाठी RBI ने पर्याय दिले आहेत.
ओळखी पुराव्यासाठी -
- पासपोर्ट
- वाहन चालवण्याचा परवाना
- मतदार ओळखपत्र
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- NREGA जॉब कार्ड
पत्त्याच्या पुराव्यासाठी -
- वीज बिल
- गॅस बिल
- बँक पासबुक
- लँडलाईन बिल
- जीवन विमा पॉलिसी
- नोंदणीकृत भाडे करार
ई-वॉलेटवरच तुम्हाला KYC ची माहिती देण्यासाठी नोटिफिकेशन दिसेल. उदाहरणादाखल आपण ओला कॅबच्या अॅपवरील नोटिफिकेशन आणि त्याची प्रक्रिया खाली फोटोंद्वारे पाहू शकतो.

ओला कॅबच्या अॅपवर या युजरला 'केवायसी पेंडिंग'चं नोटिफिकेशन आलेलं दिसतंय. त्याचप्रमाणे, जर तुम्ही तुमच्या कुठल्याही ई-वॉलेट अॅपवर केवायसीची माहिती भरली नसेल, तर तुम्हाला असं नोटिफिकेशन येईल. तिथं आवश्यक माहिती दिली नाहीत, तर तुम्हाला त्या ई-वॉलेटवरुन कुठलाच आर्थिक व्यवहार करता येणार नाही.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









