अर्थव्यवस्थेतल्या मंदीतसुद्धा मुकेश अंबानींचं स्थान अढळ आहे

फोटो स्रोत, Getty Images
भारतातील सर्वात श्रीमंताची यादी जाहीर करतांना 'फोर्ब्स इंडिया'ने भारतीय अर्थव्यवस्थेवरसुद्धा टिप्पणी केली आहे.
'अर्थव्यवस्थेत मंदी असतांनाही श्रीमंत अधिकच श्रीमंत झाले आहेत,' असं शीर्षक देत फोर्ब्स इंडियाच्या वेबसाईटने भारताच्या अर्थव्यवस्थेत मंदी असतांना देखील भारताच्या टॉप 100 श्रीमंतांच्या संपत्तीत 25 टक्क्यांनी वाढ झाल्याचं म्हटलं आहे.
नोटबंदी आणि जीएसटीचा फटका
फोर्ब्स इंडियाने ही यादी जाहीर करताना नोटाबंदी आणि जीएसटी अर्थव्यवस्थेच्या या अवस्थेसाठी कारणीभूत असल्याचं सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Forbes India Screenshot
फोर्ब्स इंडियाने लिहिलं आहे, "मागच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या नोटबंदीमुळे आणि जीएसटीवर अनिश्चिततेमुळे जूनमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये भारताची अर्थव्यवस्था तीन वर्षांत सगळ्यात कमी, म्हणजे 5.7 टक्क्यांवर आली आहे.
अशी अवस्था असतांनासुद्धा देशातल्या पहिल्या 100 श्रीमंतांचे भाग्य शेअर बाजारात उजळले आहे. त्यांच्या संपत्तीत 25 टक्क्यांची वाढ होत ती 47,990 कोटीवर पोहोचली आहे."
मुकेश अंबानी आघाडीवर
फोर्ब्सच्या यादीत रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आघाडीवर आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
"मुकेश अंबानींना झाला तितका फायदा मात्र कोणालाच झालेला नाही. आपल्या संपत्तीत एक लाख कोटींची वाढ करून त्यांनी आपलं प्रथम स्थान कायम ठेवलं आहे.
मुकेश अंबानींच्या संपत्तीची एकूण किंमत 2.47 लाख कोटी इतकी आहे.
दुसऱ्या क्रमांकावर विप्रोचे संस्थापक अध्यक्ष अझीम प्रेमजी यांचं नाव आहे. त्यांची एकूण संपत्ती 1.2 लाख कोटी इतकी आहे.
फोर्ब्स इंडिया ही फोर्ब्स या जागतिक मासिकाची भारतीय आवृत्ती आहे, जी भारतात मुकेश अंबानींच्या कंपनीतर्फेच प्रकाशित केली जाते.
जियोचा परिणाम
फोर्ब्स इंडियाच्या मते मुकेश अंबानींचा आता जगातील पाच सर्वश्रेष्ठ श्रीमंतामध्ये समावेश झाला आहे. त्यांच्या जियो टेलेकॉम कंपनीमुळे हा परिणाम झाल्याचे फोर्ब्स इंडियाने म्हटलं आहे.
"मुकेश अंबानीच्या रिलायंस इंडस्ट्रीजच्या शेअरने जिओमुळे उसळी मारली आहे."
या सूचीत आठव्या क्रमांकावर कुमारमंगलम बिर्लांचा समावेश आहे. फोर्ब्स इंडियाच्या मते "वोडाफोनमध्ये विलिनीकरण झाल्यामुळे आयडिया सेल्युलरचे मालक कुमारमंगलम बिर्ला यांना मोठा फायदा झाला आहे."
27 जणांच्या संपत्तीत वाढ
फोर्ब्स इंडियाच्या मते 27 लोक असे आहेत जे मागच्या वर्षीसुद्धा या यादीत होते. आणि त्यांच्या संपत्तीत 100 कोटींची वाढ झाली आहे.
ही यादी 15 सप्टेंबरपर्यंत शेअरच्या किंमती आणि एक्सचेंज दरांच्या आधारावर तयार करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Forbes India Screenshot
यादीत अझीम प्रेमजींनंतर तिसऱ्या क्रमांकावर 'अशोक लेलॅंड'चे हिंदुजा बंधू, चौथ्या क्रमांकावर आर्सेलर मित्तलचे लक्ष्मीनिवास मित्तल आणि पाचव्या क्रमांकावर शापूरजी पालोनजी समुहाचे पालोनजी मिस्त्री यांचा समावेश आहे.
उद्योगपती गौतम अदानी या यादीत 10व्या क्रमांकावर आहेत.
आचार्य बालकृष्ण यांचा समावेश
पतंजली आयुर्वेदचे आचार्य बालकृष्ण या यादीत 19व्या क्रमांकावर आहेत. 45 वर्षीय बालकृष्ण इतर 20 श्रीमंतांमध्ये सगळ्यात कमी वयाचे उद्योगपती आहेत.
त्यांची संपत्ती 43000 कोटी इतकी आहे. शंभर श्रीमंताच्या यादीत ते सगळ्यांत तरुण उद्योगपती आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
याच यादीत युवा उद्योगपती शमशीर वायलील यांचाही समावेश आहे. केरळमध्ये जन्मलेल्या 40 वर्षीय शमशीर यांनी अबुधाबी येथे रेडिओलॉजिस्ट म्हणून कारकिर्दीस सुरुवात केली होती. त्यांची 'वीपीएस हेल्थकेअर' ही कंपनी संयुक्त अरब अमिराती, युरोप, ओमान आणि भारतात काम करते.
इंडियाबुल्सचे समीर गहलोत यांचा या यादीत सगळ्यांत तरुण उद्योजकांमध्ये दुसरा क्रमांक लागतो. ते फक्त 43 वर्षांचे आहेत.
त्यांनंतर मणिपाल ग्रुपचे मालक रंजन पै आहेत. त्यांचं वय 44 आहे.
चौथ्या क्रमांकावर आचार्य बालकृष्ण आणि पाचव्या क्रमांकावर फायस्टर डायमंडचे अध्यक्ष नीरव मोदी आहेत.
या यादीत अल्केम लॅबोरटरीजचे मालक संप्रदा सिंह हे सगळ्यांत ज्येष्ठ उद्योगपती आहेत. ते 91 वर्षांचे असून त्यांचा यादीत 43 वा क्रमांक लागतो.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








