लक्ष्मी विलास बँक प्रकरण : तुमचे पैसे बँकेत सुरक्षित ठेवायचे असतील तर घ्या ही काळजी

नोटा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी

केंद्र सरकारनं लक्ष्मी विलास बँकेतून पैसे काढण्यासाठी मर्यादा निश्चित केली आहे.

ही मर्यादा 16 डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. तोपर्यंत बँकेचे खातेदार एका खात्यातून किमान 25 हजार रुपये काढू शकतात.

केंद्र सरकारनं हा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या शिफारशीनंतर घेतला आहे.

लक्ष्मी विलास बँकेच्या आधी पीएमसी आणि येस बँकेतून रक्कम काढण्यासंबंधी निर्बंध लागू केले होते.

लक्ष्मी विलास बँक ही एक व्यावसायिक बँक आहे. या बँकेच्या 563 शाखा आहेत आणि जवळपास 974 एटीएम आहेत.

लक्ष्मीविलास बँक

फोटो स्रोत, WWW.LVBANK.COM

खाजगी क्षेत्रातील लक्ष्मी विलास बँकेच्या संचालक मंडळाच्याऐवजी आता रिझर्व्ह बँकेनं प्रशासकाची नियुक्ती केली आहे.

काही विशिष्ट परिस्थितीमध्ये खातेदार 25 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढू शकतात. पण त्यासाठी त्यांना रिझर्व्ह बँकेकडून परवानगी घ्यावी लागेल. आजारपणावरील उपचार, उच्च शिक्षण किंवा लग्नासारख्या प्रसंगासाठी खर्च करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून परवानगी घेता येईल.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे, "लक्ष्मी विलास बँक लिमिटेडच्या आर्थिक परिस्थितीत सातत्यानं घसरण होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून या बँकेला तोटाच होत आहे. कोणत्याही योग्य नियोजनाअभावी आणि वाढणाऱ्या नॉन परफॉर्मिंग असेटमुळे बँकेच्या तोटा अजून वाढण्याचीच शक्यता आहे."

बँक खातं वापरताना...

पीएमसी बँक, अर्थकारण
फोटो कॅप्शन, पीएमसी बँक

सर्टिफाईड फायनान्शियल प्लानर असणारे गणेश शानबाग याविषयी सांगतात, "कधीही एकाच बँक खात्यावर अवलंबून राहू नये, वा एकाच खात्यातून सर्व व्यवहार करू नयेत. प्रत्येकाची किमान दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती असावीत. यामधलं एक खातं हे मोठ्या सार्वजनिक बँकेत वा मोठ्या खासगी बँकेत असावं. आणि दुसरं खातं सहकारी बँकेमध्ये असायला हरकत नाही."

पण एखादी बँक वा संस्था देत असलेला जास्त व्याजदर पाहून तिथे गुंतवणूक करू नये, असं शानबाग सांगतात.

"बहुतेकदा सहकारी बँकांमध्ये व्याजदर जास्त असल्याने तिथे अनेकजण गुंतवणूक करतात. पण जर मोठ्या बँकांना चढा व्याजदर देणं शक्य होत नसेल, तर एखाद्या लहान बँकेला वा क्रेडिट सोसायटीला हे करणं कसं शक्य होतंय, याचा विचार गुंतवणूकदारांनी करायला हवा.

"ठेवीदारांना जास्त व्याजदर देणाऱ्या संस्था या सहसा कर्जही इतरांपेक्षा चढ्या व्याजदराने देतात. आणि ज्यांचा सिबिल (CIBIL) स्कोअर चांगला नसतो, ज्यांना इतर ठिकाणांहून स्वस्त कर्ज मिळणं शक्य नसतं, तेच लोक चढ्या दराने कर्ज घेण्याची तयारी दाखवतात. म्हणजे ही कर्ज बुडण्याची शक्यताही जास्त असते. म्हणून गुंतवणूकदारांनी त्या बँकेचा NPA तपासत किंवा त्यांच्याकडून कर्ज घेणारे कोण आहेत, हे पाहत काळजी घ्यावी," असं ते सांगतात.

एखाद्या व्यक्तीची कर्ज घेण्यासाठी पत किती आहे, याचा निर्देशांक म्हणजे CIBIL स्कोअर.

पीएमसी बँक, अर्थकारण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, PMC बँकेचा प्रातिनिधिक फोटो

आणि जोखिम कमी करायची असेल तर अशाकाही बेसिक गोष्टींकडे लक्ष द्या -

  • सोयीची आहे, घराजवळच शाखा आहे, म्हणून एकाच बँकेतल्या खात्यावर अवलंबून राहू नका.
  • खातं उघडण्याची प्रक्रिया सोपी आहे म्हणून किंवा फक्त चांगला व्याजदर आहे, म्हणून बँकेची निवड करू नका.
  • खर्च, गुंतवणूक, कर्जाचे हफ्ते यांचे व्यवहार विविध बँक खात्यांमधून करा.
  • नवरा - बायकोचा जॉइंट अकाऊंट असला तरी त्यांची स्वतंत्र खातीही असावीत. काही व्यवहार एकत्र खात्यातून तर काही स्वतंत्र खात्यांतून करावेत.
  • कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची बँक खाती एकाच बँकेत नको.
  • मुलांसाठीची बचत करताना त्यांचं स्वतंत्र खातं उघडावं.

गुंतवणूक करताना

पीएमसी बँक, अर्थकारण

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पैसा

बँकेतली गुंतवणूक हीच एकमेव सुरक्षित गुंतवणूक किंवा जास्त व्याजदर देणारीच गुंतवणूक योजना आकर्षक वा फायद्याची असते, हे समज चुकीचे असल्याचं सर्टिफाईड फायनान्शियल प्लानर असणारे गणेश शानबाग सांगतात. ते म्हणतात, "गुंतवणुकीचे अनेक सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत. पण कोणताही पर्याय कितीही सुरक्षित वाटला तरी त्यातच सगळी गुंतवणूक करणं चूक.

"नेहमी आपली गुंतवणूक विविध पर्यायांमध्ये करावी. म्हणजे यातली एक गुंतवणूक असणारा पर्याय जरी डळमळीत झाला, तरी आयुष्यभराची कमाई त्याने धोक्यात येत नाही, किंवा रोजच्या आयुष्यावर त्याचा बिकट परिणाम होत नाही. PMC बँकेमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचे पैसे होते. पण सरकारनेही सिनियर सिटीझन स्कीमसारख्या अनेक चांगल्या योजना आणलेल्या आहेत. याचाही विचार करावा. मुलांच्या शिक्षणासाठीची तरतूद करण्यासाठी लिक्विड फंडासारख्या पर्यायांचा विचार करावा."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)