स्पॅम कॉल्स : 'हॅलो, तुमचं 5 लाखांचं कर्ज मंजूर झालंय' असा फोन आला तर?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पूर्णिमा तम्मीरेड्डी
- Role, बीबीसीसाठी
तुम्हाला ऑफिसमध्ये खूप काम असतं आणि या कामाच्या रेट्यात कोणाचा तरी कॉल यावा म्हणून तुम्ही आतुरतेने वाट पाहत असता, इतक्यात तुमचा फोन वाजतो आणि तुम्ही तो उचलता...
समोरून एक व्यक्ती बोलते, "तुम्हाला पर्सनल लोन हवंय का? सध्या आमच्याकडे स्पेशल ऑफर सुरू आहे.."
किंवा मग
"अमुक एका भागात सेलसाठी ओपन प्लॉट आहेत...फक्त एक ते दोन मिनिटांत तुम्हाला माहिती देतो..प्लिज ऐकून घ्या.."
किंवा
"मॅम आमच्याकडे फक्त पाचशे रुपयात लाईफ इन्शुरन्स मिळतोय.."
"तुमचे केस खूप गळतायत का? तुम्हाला टक्कल पडतंय का?.."
"मी अनाथाश्रमातून बोलते आहे, तुम्ही कृपया काही दान करू शकता का.."
आता हे असतात प्रमोशनल कॉल्स. आणि आपल्याला जर समजलं की, समोरून यासाठी कॉल आलाय तर आपली चिडचिड होत राहते.
आम्हाला या सेवांची गरज नाहीये तरी हे कॉल करून आम्हाला का त्रास देतात? किंवा आमचा नंबर यांच्यापर्यंत पोहोचलाच कसा असे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात.
आणि आपण किती जरी नंबर ब्लॉक केले तरी इतर नंबरवरून हे कॉल्स येतच राहतात.
कधीकधी हे कॉल्स आपण टाळायचा प्रयत्न करतो पण मग खरोखरच एखादा महत्वाचा कॉल मिस होईल म्हणून आपण हे कॉल्स उचलतो.
प्रमोशनल कॉल्स वाईट नसतात...

फोटो स्रोत, Getty Images
लोकल सर्कलने (localcircles.com) केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, भारतातील दर एका व्यक्तीला दररोज 4 ते 5 स्पॅम कॉल येतात.
यातले बहुतेक कॉल्स हे आर्थिक सेवा (पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड इ.), रिअल इस्टेटशी संबंधित असतात. (ओपन प्लॉटस, फ्लॅट विक्री)
या आकडेवारीवरून समजतं ते म्हणजे प्रकरण किती गंभीर आहे. हल्ली प्रत्येक सेवेसाठी नोंदणी करताना, एखादी वस्तू खरेदी करताना, अॅप डाउनलोड करताना फोन नंबर देणं बंधनकारक आहे.
जेव्हा डेटा चोरी होते तेव्हा हे नंबर पब्लिक डोमेन मध्ये येतात. त्यानंतर कोणीही हा नंबर मिळवून आपल्या कॉल करू शकतं. ही वाटते छोटीशी गोष्ट पण यातून होणारा त्रास खूप जास्त आहे.
प्रमोशनल कॉल्स ब्लॉक करायचे आहेत? मग DND सर्व्हिसला सबस्क्राईब करा.
प्रत्येक टेलिसर्व्हिस कंपनी जसं की, एअरटेल, जिओ या कंपन्या असे प्रमोशनल कॉल्स ब्लॉक करण्याचं आश्वासन देतात. पण यासाठी तुम्हाला एका विशिष्ट क्रमांकावर एसएमएस करावा लागतो.
जर तुम्हाला खूपच प्रमोशनल कॉल्स येत असतील तर DND सर्व्हिसला सबस्क्राईब करणं केव्हाही चांगलं.
पण बरेचजण सांगतात की, अशा सर्व्हिसला सबस्क्राईब करून देखील मार्केटिंग कॉल येतच राहतात. मात्र काही प्रमाणात ते कमी होतात हे ही तितकंच खरं आहे.
ही सर्व्हिस कशी ऍक्टिव्हेट करणार?
तर तुमचं SMS अॅप ओपन करा, यात न्यू मॅसेज ऑप्शनवर जा आणि तिथे START टाइप करा
हा मॅसेज 1909 या क्रमांकावर पाठवा
तुमचा सर्व्हिस प्रोव्हायडर तुम्हाला काही कॅटेगरी पाठवेल.

फोटो स्रोत, Getty Images
जसं की, बँकिंग, हॉस्पिटॅलिटी
ज्या कॅटेगरी मधील कॉल्स तुम्हाला नको आहेत त्याचा कोड पुन्हा पाठवा.
तुमच्या नंबरवर 24 तासांच्या आत DND सर्व्हिस सुरू होईल.
थर्ड पार्टी अॅप्स वापरा
ट्रू कॉलर सारखे थर्ड पार्टी अॅप्स वापरल्याने स्पॅम नंबर ओळखायला सोपं जातं.
या अॅपमध्ये दोन ऑप्शन्स आहेत, एक म्हणजे फ्री आणि दुसरे म्हणजे पेड अॅप्स.
जर तुम्हाला एखाद्या माहीत नसलेल्या नंबरवरून कॉल आला तर तो कोणाचा आहे आणि इतर किती लोकांनी त्याला "स्पॅम" म्हणून मार्क केलंय हे तुम्हाला दिसतं. हे सगळे डिटेल्स बघून फोन उचलायचा की नाही हे तुम्ही ठरवू शकता.
पण हे अॅप्स वापरताना सुद्धा थोडी काळजी घ्या. त्या अॅप्सला सर्व परमिशन देऊ नका. नाहीतर हे अॅप्स सुद्धा तुमचा डेटा ऍक्सिस करून तुम्हाला नुकसान पोहचवू शकतात.
त्यामुळे अॅप स्टोअर वरून हे अॅप्स डाऊनलोड करताना त्यांचे याचे रेटिंग आणि रिव्ह्यू चेक करा. अॅपला गरजेच्याच परमिशन द्या.

फोटो स्रोत, Getty Images
रोबो कॉल्सला मार्किंग करा
अलीकडे, रोबो कॉल्सचा देखील ताप वाढू लागलाय. यासाठी काही टिप्स देता येतील. विशिष्ट नंबर ब्लॉक करा : हे थोडं त्रासाचं काम आहे पण त्यामुळे सतत सतत एकाच नंबरवरून कॉल येण्याची शक्यता कमी होईल. यासाठी रोबोकॉल डिटेक्शन अॅप्स वापरा : सध्या या अॅप्सला सुद्धा मर्यादा आहेत, मात्र हे अॅप्स काही प्रमाणात हे रोबो कॉल्स रोखू शकतात.
स्पॅम/मार्केटिंग कॉल विरूद्ध खबरदारी
सध्याच्या परिस्थितीत स्पॅम कॉल्स येऊ न देणं खूपच कठीण आहे. कारण बऱ्याच ठिकाणी नोंदणीसाठी फोन नंबर द्यावा लागतो. त्यानंतर हा नंबर कुठे आणि कोणाकडे जाऊन पाहोचेल हे काही सांगता येत नाही. मात्र आपण थोडीफार खबरदारी घेऊ शकतो.
शक्य असेल त्या ठिकाणी नोंदणी करताना फोन नंबर देऊ नये. विशेषत: माहिती नसलेल्या वेबसाइटवर तर कधीच नंबर टाकू नये.
बँकिंग, हॉस्पिटल, सरकारी नोंदी यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी एक नंबर आणि उर्वरित ठिकाणी दुसरा नंबर देता येऊ शकतो.
जर तुम्ही एखादी सर्व्हिस वापरत नाहीये किंवा ती सर्व्हिस अनसबस्क्राईब करायची असेल तर ते तातडीने करा. यामुळे तुमचा नंबर रेकॉर्डमधून हटवला जाईल आणि अनावश्यक कॉल्स येणार नाहीत. स्पॅम कॉल्स उचलायचे नसतात तेव्हा...

फोटो स्रोत, Getty Images
कधीकधी आपण अशा परिस्थितीत असतो की आपल्याला ते स्पॅम कॉल येऊ नयेत असं वाटतं...तेव्हा शक्य असल्यास अनोळखी नंबरवरून फोन उचलू नका. थर्ड पार्टी अॅप्स स्पॅम नंबर नेहमीच अचूकपणे ओळखू शकत नाहीत.
त्यामुळे अशा अॅप्सवर पूर्णपणे विसंबून राहू नका.
तुम्हाला स्पॅम कॉल आला आणि तो अनावश्यक आहे हे कळताच तो कट करा.
कोणत्याही परिस्थितीत फोनवर तुमचा वैयक्तिक तपशील (नाव, जन्मदिनांक, क्रेडिट कार्ड इ.) देऊ नका.
माहिती द्या म्हणून समोरचा व्यक्ती तुम्हाला गुंडाळत असेल तर ताबडतोब कॉल कट करा. तुम्हाला जाळयात ओढण्याची त्यांना घाई झालीय हे लक्षात असू द्या.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








