अंजली केस : दिल्लीतल्या 'हिट अँड रन' प्रकरणातले 'हे' प्रश्न अजूनही अनुत्तरित

अंजली सिंह

फोटो स्रोत, Social Media/Anjali Singh

    • Author, दिलनवाज पाशा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

2022चं वर्ष सरताना म्हणजेच 31 डिसेंबरच्या रात्री उत्तर पश्चिम दिल्लीतील सुलतानपुरी भागात अंजली नामक 20 वर्षीय तरुणीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी केलेला प्राथमिक तपास आणि त्यांच्या वक्तव्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पोलिसांच्या मते, अंजलीचा मृत्यू हा चारचाकी गाडीत अडकल्यामुळे झाला. हा अपघात सुलतानपुरीच्या कृष्णा विहार भागात झाला असून या परिसरापासून सुमारे 14 किमी अंतरावर असलेल्या जौंता गावात तिचा मृतदेह आढळून आला. हे गाव कंझावला पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं.

ही बातमी पसरल्यानंतर अवघ्या काही तासांतच दिल्ली पोलिसांनी अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं. या निवेदनात हा अपघात असल्याचं म्हटलं. सोबतच गाडीतील पाच जणांना अटक केल्याची माहिती देण्यात आली. या सर्वांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आता केवळ पाच नाही तर सात आरोपी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

याआधी या घटनेत सीसीटीव्ही फुटेज किंवा साक्षीदार नसल्याचं सांगितलं गेलं. मात्र मंगळवारी (3 जानेवारी) निधी नामक तरुणी माध्यमांसमोर आली. निधीने दावा केला की, अपघाताच्या वेळी ती स्कूटी चालवत होती आणि घाबरून तिने ही गोष्ट कोणालाच सांगितली नव्हती.

निधीचं म्हणणं आहे की, अपघातात मृत्युमुखी पडलेली अंजली तिची मैत्रिण होती. अपघातादिवशी स्कूटी आणि कारची धडक होऊन अंजली गाडीखाली आली.

अपघात नेमका कुठं झाला? अपघाताचे CCTV फुटेज का नाही?

दिल्ली हिट अँड रन केस

एफआयआरनुसार ही घटना सुलतानपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील कृष्ण विहार परिसरात घडली. बीबीसीने घटनास्थळी भेट दिली. इथं आम्हाला बरेच प्रत्यक्षदर्शी भेटले ज्यांनी पोलिसांना इथूनच स्कूटी उचलताना पाहिलं होतं. तिथंच काही ठिकाणांवर स्कूटीचे पार्टस पडल्याचं काही लोकांनी पाहिलं. सुलतानपुरी पोलीस स्टेशन पासून 900 मीटर अंतरावर हा अपघात घडला.

कृष्ण विहार भागातील ही गल्ली जवळपास 190 मीटर लांब असून तिथं चार सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.

बीबीसीने या कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले आणि घटनेचं कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न केला.

या चारही सीसीटीव्ही फुटेजवर वेगवेगळे टाईम स्टॅम्प आहेत. पण जेव्हा तुम्ही फ्रेम बाय फ्रेम फुटेज पाहता तेव्हा काही गोष्टी समोर येतात.

दिल्ली हिट अँड रन केस

एकतर सर्व सीसीटीव्ही फुटेजवर वेगवेगळे टाईम स्टॅम्प आहेत आणि वेळ मागे पुढे आहे. त्यामुळे फुटेजवरील टाईम स्टॅम्पच्या आधारे हा अपघात नेमका कोणत्या वेळी व कुठं झाला हे निश्चितपणे सांगणं कठीण आहे.

पण एका सीसीटीव्ही फुटेजचा टाईम स्टॅम्प आणि पोलिसांनी सांगितलेली वेळ मॅच होते. त्यानुसार रात्री 2 वाजून 05 वाजता हा अपघात झाला असं म्हणता येईल.

अपघाताच्या आधीचे आणि नंतरचे काही फुटेज आहेत ज्यात स्कूटीवर बसलेल्या दोन मुली आणि बलेनो कार तिथून पास होताना दिसतात. पण असं कोणतंच फुटेज सापडत नाही ज्यात कारची आणि स्कूटीची थेट धडक झालीय असं दिसतं.

अपघात झालाय हे दिसेल असं कोणतंही सीसीटीव्ही फुटेज ही बातमी लिहिपर्यंत समोर आलेलं नाही. त्यामुळे अपघात कसा घडला किंवा अपघात घडल्यानंतर नेमकं काय झालं हे प्रश्न अनुत्तरित राहतात.

घटनास्थळी बलेनो कारखाली सापडलेली मुलगी का दिसली नाही?

दिल्ली हिट अँड रन केस सीसीटीव्ही फुटेज

ज्या ठिकाणी अपघात झाला तिथून 20 मीटर आणि 50 मीटर अंतरावर असणारे सीसीटीव्ही फुटेज बीबीसीने तपासले. यात एकबाजूने स्कुटीवर बसलेल्या दोन मुली येताना दिसतात तर दुसऱ्या बाजूने बलेनो कार येताना दिसते.

अपघातापासून अगदी काही पावलांवरचे हे व्हिडिओ आहेत. म्हणजेच अपघात घडल्यानंतर अवघ्या काही सेकंदानंतरचे हे व्हिडिओ आहेत. या व्हिडिओमध्ये बलेनो कारच्या खालच्या बाजूला किंवा साइडला मुलगी दिसून येत नाही.

हे सीसीटीव्ही फुटेज फारसे स्पष्ट दिसत नाहीत. पण फ्रेम बाय फ्रेम चेक करून देखील मुलगी गाडीखाली आल्याचं कुठं दिसत नाही. म्हणजे मुलगी त्या वेळी गाडीखाली आली असेल तर तिचा कोणताच भाग फुटेजमध्ये दिसत नाही.

पीसीआरने बलेनोचा पाठलाग का केला नाही?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पीसीआरने बलेनोचा पाठलाग का केला नाही?

बीबीसीने जे सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात असं दिसतंय की, घटना घडली तेव्हा तिथं जवळच पोलिसांची पीसीआर व्हॅन उभी होती.

बऱ्याच न्यूज चॅनेल्सवर हे पीसीआर व्हॅनचे फूटेज दाखवलं जातंय. अपघाताच्या वेळी जर व्हॅन जवळपासच होती तर पोलिसांनी तात्काळ हालचाल का केली नाही असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

या गल्लीतील जे सीसीटीव्ही फुटेज आहे त्यात सरळ दिसतंय की, बलेनो कार या गल्लीतून पुढं गेल्यावर अवघ्या 30 सेकंदात पीसीआर कारही याच गल्लीतून पुढे जाताना दिसते.

सीसीटीव्हीच्या टाईम स्टॅम्पनुसार, बलेनो रात्री 2 वाजून 37 सेकंदांनी उजव्या बाजूने गल्लीत प्रवेश करते. पीसीआर व्हॅन रात्री 2 वाजून 1 मिनिट आणि 07 सेकंदांनी डाव्या बाजूने आत येते. म्हणजेच संशयित बलेनोच्या तीस सेकंदानंतर पीसीआर व्हॅन त्या गल्लीत प्रवेश करते.

ज्या ठिकाणी अपघात घडला तिथून सुमारे 20 मीटर अंतरावर असलेल्या आणखीन एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा पीसीआर व्हॅन दिसते. पण व्हॅन कधी आली हे त्या टाईम स्टॅम्पवरून स्पष्ट होत नाही.

दिल्ली पोलिसांच्या मते याच मार्गावर अपघात झाला

फोटो स्रोत, Google maps

उपलब्ध असलेल्या एकाही फुटेजमध्ये पोलीस त्या बलेनोचा पाठलाग करताना दिसत नाही.

गुरुवारी (5 जानेवारी) दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. यात असं सांगण्यात आलं की, 'पोलिसांच्या भूमिकेबाबत इंटरनल एन्क्वायरी सुरू आहे. ही घटना ह्यूमन एरर आहे की प्रोसेस एरर आहे याबाबत चौकशी सुरू आहे. जो काही निकाल येईल त्या आधारे कारवाई केली जाईल.'

मात्र पीसीआर व्हॅनच्या चुका झाल्याचं पोलिसांनी पत्रकार परिषदेत मान्य केलं नाही.

पोलिसांचं म्हणणं आहे की, "पीसीआरने घटनास्थळी स्कूटी पाहिली. स्कुटीच्या नंबरच्या आधारे पोलीसांनी घराचा पत्ता शोधून काढला. त्यानंतर मुलीचा मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी तिच्या आईला बोलावून मृतदेहाची ओळख पटवली.

अंजलिच्या मैत्रिणीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

या घटनेची एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि अंजलीची मैत्रीण असल्याचा दावा करणाऱ्या निधीमुळे प्रकरण खूप गुंतागुंतीचं झालंय.

 निधी सुलतानपुरी पोलिस स्टेशनपासून 300 मीटर आणि घटनास्थळापासून 1100 मीटर अंतरावर राहते.

अपघातानंतर आपण घाबरलो होतो आणि त्यामुळेच कोणाला काहीही न सांगता घरी गेल्याचं निधीने सांगितलं.

घटनेला दोन दिवस उलटून गेलेतरी भीतीपोटी मी हे कोणाला सांगितलं नव्हतं, असा दावा निधीने केला.

बलेनो कार याच पार्किंगमध्ये मिळाली होती
फोटो कॅप्शन, बलेनो कार याच पार्किंगमध्ये मिळाली होती

सीसीटीव्ही फुटेजमध्ये ओयो हॉटेलच्या बाहेर अंजलीसोबत दुसरी एक मुलगी दिसली होती. आणि ही दुसरी मुलगी निधी असल्याचं मानलं जातंय.

निधी सुलतानपुरीच्या सी-1 ब्लॉकमध्ये एकटीच राहते. बुधवारी ती घराबाहेर पडलीच नाही, माध्यमांशीही ती बोलली नाही.

ती बऱ्याच दिवसांपासून एकटी राहात असल्याची माहिती तिचे शेजारी देतात.

बऱ्याच वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झालंय. ते काय करायचे याविषयीही शेजाऱ्यांना फारशी काही माहिती नाही.

दुसरीकडे अंजलीच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, त्यांना निधीबद्दल कोणतीही माहिती नाही किंवा निधी कधीच त्यांच्या घरी आलेली नाही.

निधी खोटं बोलत असल्याचे आरोप अंजलीच्या कुटुंबीयांनी बीबीसीशी बोलताना केलेत.

दिल्ली पोलिसांनी गुरुवारी सांगितलं की, 'प्रत्यक्षदर्शी असलेल्या निधीचा आणि आरोपींचा कोणताही संबंध नाही. तिचं म्हणणं कोर्टात रेकॉर्ड करून घेण्यात आलंय, मात्र त्याबाबत आत्ताच काही माहिती देता येणार नाही.'

आतापर्यंत स्पष्ट झालेल्या गोष्टी

बीबीसीने 31 डिसेंबरच्या रात्रीचं आणि 1 जानेवारीच्या सकाळचं कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.

अंजली संध्याकाळी घरातून निघाली आणि आपण रात्री उशिरा येऊ असं आईला सांगितलं होतं. रात्री 8 वाजून 29 मिनिटांनी ती तिच्य आईशी शेवटचं बोलली.

हॉटेलचं जे फुटेज आहे यात असं दिसतंय की, अंजली आणि तिच्यासोबत आणखीन एक मुलगी ओयो हॉटेलमध्ये आली होती. हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय त्याप्रमाणे या दोघींमध्ये बाचाबाची झाली होती. रात्री 1 वाजून 32 मिनिटांनी या दोघी ओयो हॉटेलमधून बाहेर पडल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय.

रात्री दोनच्या सुमारास अंजली आणि दुसरी मुलगी स्कूटीवर जाताना दिसतात. ओयो हॉटेल आणि अपघात स्थळामध्ये सुमारे अडीच किलोमीटर एवढं अंतर आहे. अगदी याचवेळी घटनास्थळाजवळ संशयास्पद बलेनो कार आणि पोलिसांची पीसीआर व्हॅन दिसते आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय त्याप्रमाणे, आरोपी कांझावाला पासून जौंता गावाच्या दिशेने जात आहेत. एका फुटेजमध्ये पहाटे 3 वाजून 17 मिनिटांनी ही कार यू-टर्न घेताना दिसते. यावेळी गाडीखाली काहीतरी दिसत आहे.

दिल्ली हिट अँड रन

काही प्रत्यक्षदर्शींनी बलेनो कारखाली मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना पीसीआर कॉल केले. पहाटे 3.30 च्या सुमारास घटनास्थळापासून 13.1 किलोमीटर अंतरावर यू-टर्न घेत असताना बलेनो कारपासून अंजलीचा मृतदेह वेगळा होतो. काही वेळाने कांझावाला पोलिसांना रस्त्यावर मृतदेह पडल्याची माहिती मिळते.

आरोपींनी पहाटे 4 वाजून 51 मिनिटांनी रोहिणी सेक्टर-1 च्या पार्किंग मध्ये गाडी पार्क केली. हे ठिकाण मृतदेह पडलेल्या जौंती गावापासून 14.5 किलोमीटर अंतरावर आहे.

सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी पोलिसांची एक टीम पार्किंगमध्ये असलेल्या कारजवळ पोहोचते. त्यानंतर जवळपास दीड तासाने एफएसएलची टीम घटनास्थळी जाऊन कारमधून फॉरेन्सिक पुरावे गोळा करते.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दिल्ली पोलिसांच्या एका टीमने या भागात कसून चौकशी केली आहे.

याच दरम्यान दिल्ली पोलिसांनी कारमध्ये असणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतलं. ही कार रोहिणी सेक्टर 1 मध्ये राहणाऱ्या आपल्या मित्राकडून घेतली असल्याचं आरोपींनी सांगितलं.

मेडिकल बोर्डने पोस्टमार्टम रिपोर्ट दिला असून यात अंजलीवर बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार झालाय असं म्हटलेलं नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)