'उपहार सिनेमागृहाच्या मालकांना गोळ्या घालण्याची माझी इच्छा आहे'

फोटो स्रोत, Mansi Thapliyal
- Author, अपर्णा अल्लुरी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
नीलम कृष्णमृर्ती यांच्या मुलांना चित्रपट बघायला खूप आवडायचं. मात्र एके दुपारी त्यांची ही आवड त्यांच्या जिवावर बेतली आणि नीलम यांच्यासमोर उभा राहिला तो अविरत संघर्ष.
त्यांच्या या संघर्षावर Trial and fire ही सीरिजा नुकतीच येऊन गेली. नीलम कृष्णमूर्ती आणि शेखर यांच्या संघर्षाची ही कथा.
तो क्षण आणि तो दिवस
13 जून 1997 च्या सकाळी नीलम कृष्णमृर्ती यांनी दिल्लीच्या उपहार सिनेमागृहात फोन केला आणि बॉर्डर चित्रपटाची दोन तिकिटं विकत घेतली. 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धावर बेतलेला या सिनेमात अनेक प्रथितयश अभिनेते होते.
त्या दिवशीच तो चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या. उन्नती (17) आणि उज्ज्वल (13) यांना तो चित्रपट बघायचा होता.
“उन्नतीला चित्रपट बघण्याची अतिशय आवड होती.तिला पहिल्याच दिवशी तो चित्रपट बघायचा होता. म्हणून मी तिला तिकीट काढून द्यायचं आश्वासन दिलं,” नीलम सांगतात.
त्या दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र जेवलं. त्या दिवशी नीलम यांचे पती शेखर यांनी चिकन करी केली होती. चित्रपटाला जाण्याच्या आधी उन्नतीने नीलम यांचा गालावर मुका घेतल्याचं त्यांना आजही लख्ख आठवतं. त्यांनी मुलांना त्या क्षणी शेवटचं पाहिलं.
4 वाजून 55 मिनिटांनी चित्रपटगृहाच्या पार्किंग लॉटमध्ये आग लागली. थोड्याचवेळात ही आग जिन्यात पसरली आणि सिनेमा हॉलपर्यंत पोहोचली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ग्राऊंड फ्लोरवर लोक बाहेर आले. त्यांच्यापैकी पहिल्या मजल्यावर असणाऱ्या लोकांनी खिडक्यांची तावदानं फोडली आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी दिल्लीच्या ग्रीन पार्क भागात ट्रॅफिक जाम असल्यामुळे मदत पोहोचण्यास अंमळ उशीर झाला आणि लोक तिथेच अडकून पडले.
काही तास कृष्णमूर्तींना त्यांच्या मुलांबरोबर काय झालंय ते कळलंच नाही. AIIMS च्या स्ट्रेचर भरलेल्या खोलीत त्या नक्की किती वाजता गेल्या हे त्यांना आठवत नाही.
त्यांनी उन्नतीच्या मृतदेहाची ओळख पटवली. काही अंतरावर दुसऱ्या स्ट्रेचरवर उज्ज्वलचा मृतदेह होता.
“त्या दिवशी आमचं संपूर्ण विश्व उद्धवस्त झालं.” त्या सांगतात, “सगळं संपलं होतं....सगळं.”
या दुर्घटनेत 59 लोकांचा मृत्यू झाला, त्यात 23 लहान मुलं होती. अगदी एक महिन्याचं बाळही त्यात होतं. शेकडो लोक जखमी झाले. उपहार सिनेमाची दुर्घटना ही भारतातल्या सगळ्या दु:खद घटनांपैकी एक आहे.
या दुर्घटनेत आपली मुलं वाचू शकली असती असं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांचा न संपणारा लढा सुरू झाला. कधी तो शक्तिशाली विकसकांविरुद्ध, कधी कोर्टात, तर स्वत:च्याच अव्यक्त दु:खाविरोधात.

फोटो स्रोत, Getty Images
या घटनेआधी....
कृष्णमूर्तींच्या दिवाणखाण्यात उज्ज्वल आणि उन्नतीच्या वाढदिवसाचे अनेक ग्रीटिंग कार्ड आणि फोटो आहेत. त्यापैकी एका फोटोत नीलमने त्यांना मायेने जवळ घेतल्याचं दिसत आहे. दोघंही त्यात हसताना दिसत आहेत.
नीलम यांनी टेबलवरून एक अल्बम हातात घेतला आणि पानं उलटायला सुरुवात केली.
“उज्जवलचा 11 वा वाढदिवस होता.” त्या खेदाने म्हणाल्या. केक कापतानाचा त्याचा फोटो दाखवला. नीलमही त्या फोटोत आहेत.
त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि त्या पलंगावर बसल्या होत्या. घरी मित्रमैत्रिणी आले होते. तरीही आईच्या खोलीत केक कापण्याचा आग्रह त्याने त्या दिवशी धरला होता.
नीलम सांगतात की ते एक छोटेखानी आणि सुखी कुटुंब होतं. त्यांना बाहेर खायची आवड होती. त्यांनी बराच प्रवास केला आहे.
प्रत्येक वाढदिवस आणि लग्नाचे वाढदिवस त्यांनी साजरे केले होते. त्यांची मुलं मायाळू, मैत्रीपूर्ण आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते.
1997 च्या उन्हाळ्यात उन्नतीचं शालेय शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तिला कॉलेजला जायची उत्सुकता होती. उज्ज्वल शाळेत होता. त्याला शाळेत जायला आवडायचं.
कृष्णमूर्ती या घटनेनंतर नव्या घरी रहायला गेलेत. मात्र नीलम यांनी त्यांच्या मुलांची खोली त्या दिवशी जशी होती तशीच सजवली आहे. बाहेरच्या लोकांना या खोलीत प्रवेश नाही.
मात्र त्या दोघांच्या सगळ्या वस्तू तिथे आहे. अगदी उज्ज्वल ची टोपीसुद्धा त्या दिवशी सोडून गेला होता तशीच तिथे ठेवली आहे.
त्या म्हणतात की त्या अजूनही मुलांच्या खोलीत सकाळ संध्याकाळी जातात. “जेव्हा मला उदास वाटतं तेव्हा मी त्या खोलीत जाते. बराच वेळ तिथे घालवते.”
त्या दिवशीची सगळ्यात विदारक आठवण म्हणजे त्या चित्रपटाची तिकीटं आजही जपून ठेवली आहेत.
एका काळ्या रंगाच्या पर्समधून त्या ती तिकिटं बाहेर काढतात. त्यांनी उज्ज्वल दिलेली ती भेट होती.
त्या दिवशी उन्नती ने जी पर्स नेली होती, ती पर्सही त्यांच्याकडे आज आहे.
ती तिकिटं, ती पर्स आजही उत्तम स्थितीत आहेत. कारण त्या आगीत उन्नती आणि उज्ज्वल दोघंही भाजले नव्हते.
दुर्घटनेनंतर...

फोटो स्रोत, Mansi Thapliyal
या धक्क्यातून सावरल्यावर त्या दिवशी उपहार सिनेमागृहात काय झालं होतं याचा विचार करू लागल्या.
“मी विचार केला की फक्त बाल्कनीतले लोक का मेले असतील?”
उन्नती, उज्जवल आणि इतर पीडित लोक बाल्कनीत बसले होते.
“जेव्हा मी पेपर वाचले तेव्हा मला कळलं की आग खूप आधी लागली होती. चित्रपट सुरूच राहिला. वर बसलेल्या लोकांना माहिती नव्हती. दारं बंद झाले होते. गेटकीपर आधीच पळाला होता. मला असं वाटलं, ते मरायला नको होते.”
जेव्हा या प्रकरणाची चौकशी झाली होती तेव्हाही हेच तथ्य समोर आलं होतं.
थिएटरच्या मालकांनी बाल्कनीत 52 अतिरिक्त जागा निर्माण झाल्या होत्या. त्यांनी बाहेर जायचा मुख्य मार्ग बंद केला होता आणि बाकीचा रस्ता छोटा केला होता.
तिथे कोणतेही आपात्कालीन लाईट नव्हते. बाल्कनीत बसलेले जे लोक वाचले त्यांनी कोर्टाला सांगितलं की ते अंधारात वाट काढण्याचा प्रयत्न करत होते.
काहींनी बंद दार तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उघडताच त्यांचा सामना धुराशी झाला आणि ते चक्कर येऊन पडले. आतले लोक कार्बन मोनोक्साईडच्या धुरामुळे मेले.
नीलम यांच्या 22 वर्षांच्या संघर्षाचा हा थोडक्यात सारांश आहे. उपहार सिनेमागृहात झालेले मृत्यू मानवनिर्मित अपघातामुळे झाले होते. मोडलेले नियम आणि प्रशासनाच्या गलथानपणाचा हा परिपाक होता.
बेसमेंटमध्ये असलेल्या ट्रान्सफॉर्मर मुळे आग लागल्याचंही तपासात समोर आलं आहे. तो नीट बसवला नव्हता. त्यामुळे आगीचा धोका वाढला. त्यामुळे तिथे आधी एक आग लागली होती. ती लवकर विझवण्यात आली. मात्र ते दुरुस्तीचं काम नीट न झाल्याने दुसरी आणि जीवघेणी आग लागली.
नीलम यांना जितकी अधिक माहिती मिळाली तितका त्यांना अधिकाधिक राग येऊ लागला. आपल्या मुलांसाठी लढा द्यायलाच हवा हा त्यांचा निश्चय अधिकाधिक दृढ होऊ लागला.
“मी शेखरला सांगितलं की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या लोकांना मला तुरुंगात पाठवायचं आहे.”
भारतात अशा प्रकारच्या दुर्घटना होणं दुर्दैवाने फारच सामान्य आहे. मात्र पीडितांच्या घरच्यांनी कोणालातरी जबाबदार धरणं तसं पाहिलं तर दुर्मिळ आहे.
त्यामुळे नीलम आणि शेखर यांनी पीडितेच्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. एखादं मुल असेल तर आयुष्यात पुढे पाहता येईल, असंही काही लोकांनी त्यांना सुचवलं. मात्र त्यांना हा पर्याय मान्य नव्हता.
“जेव्हा मुलं जिवंत असतात तेव्हापर्यंत आपण त्यांच्यासाठी सगळं करतो. मग जेव्हा ते नाहीत तेव्हा त्यांच्यासाठी आपण का करू नये?” नीलम सांगत होत्या.
उपहार सिनेमा दुर्घटनेसाठी 16 लोकांना जबाबदार धरण्यात आलं. त्यात थिएटरचे कर्मचारी, बिल्डिंगच्या सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणारे सुरक्षा निरीक्षक, यांचा समावेश होता. मात्र थिएटरचे मालक सुशील आणि गोपाल अन्सल यांना या प्रकरणात दोषी धरण्यात आलं.

फोटो स्रोत, Mansi Thapliyal
दोषींना शिक्षा व्हावी म्हणून शेखर आणि नीलम यांनी एक संस्था स्थापन केली. नीलम यांनी स्वत: सगळं शिकायला सुरुवात केली. अगदी, क्रिमिनल लॉ, चित्रपटगृहांमध्ये सुरक्षेची खबरदारी, अगदी सगळं.
मात्र केसेसच्या ओझ्यांनी वाकलेल्या कोर्टात नीलम यांच्या शिक्षणाचा काहीही फायदा झाला नाही.
दहा वर्षानंतर 2007 मध्ये 16 व्यक्तींना दोषी ठरवण्यात आलं. त्यापैकी चार लोकांचा आधीच मृत्यू झाला होता. सात महिने ते सात वर्षं अशा विविध कालखंडाच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. काही आरोपींवर दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला.
काही आरोपींवर अन्य काही आरोप निश्चित करण्यात आले. अंसल बंधूना दोन वर्षं कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांच्यावर निश्चित केलेल्या आरोपासाठ ही सर्वाधिक शिक्षा होती.
“59 लोकांचा जीव घेणाऱ्या लोकांना दोन वर्षांची शिक्षा झाली हे ऐकून मला प्रचंड धक्का बसला,” नीलम म्हणाल्या.
थिएटरच्या मालकांना आणखी शिक्षा व्हावी, त्यांच्यावर आणखी कलमं लागावी यासाठी त्या आणखी लढत राहिल्या.
मात्र जेव्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाला त्यांनी दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं तेव्हा या मालकांची शिक्षा वाढण्याच्या ऐवजी कमी झाली.
“ते लोक शिक्षित आहेत, त्यांना समाजात प्रतिष्ठा आहे असं कारण आम्हाला दिलं गेलं.” असं नीलम म्हणाल्या.
“मला ही कारणं अतिशय संतापजनक वाटली. कारण तुम्ही सुशिक्षित असाल तर तुम्ही नियमांचं आणखी योग्य पद्धतीने पालन करायला हवं होतं.”
म्हणून या निर्णयाला त्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. कोर्टाने 2015 मध्ये निर्णय दिला. आता अन्सल बंधूंची शिक्षा माफ करण्यात आली. त्यांना मोठा दंड आकारण्यात आला.
“त्याक्षणी माझ्या हातात असलेली सगळी कागदपत्रं फेकली. मी कोर्टाच्या बाहेर आले आणि जोरजोरात रडायला लागले. मी पहिल्यांदा सार्वजनिकरित्या रडले, ” त्या दिवसाची आठवण सांगताना नीलम भावूक झाल्या.
त्या दिवशी नीलम आणि शेखर मुलांच्या खोलीत जाऊ शकल्या नाही असं त्या सांगतात. त्या दिवशी त्यांनी पूर्ण रात्र हॉलमध्ये बसून काढली. आपण आणखी काय करू शकलो असतो असा विचार ते दोघं करत राहिले.
या निर्णयामुळे नीलम यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला. मात्र त्या आणखी एक अपील घेऊन सुप्रीम कोर्टात गेल्या.
यावेळी कोर्टाने गोपाल अन्सल यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली. सुशील अन्सल शिक्षा सुनावली तेव्हा 77 वर्षांचे होते. त्यांना वयाचं कारण देऊन सोडण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
हे सगळं 2017 मध्ये झालं. नीलम यांची आणखी एक याचिका कोर्टात होती. त्यांनी कोर्टात अपील केलं की अन्सल बंधुंनी त्यांना सुनावलेली दोन वर्षांची मूळ शिक्षा पूर्ण करावी कारण दोघांनीही ती पूर्ण केली नव्हती. कोर्ट या याचिकेवर कधी सुनावणी घेईल याची त्यांना कल्पना नाही.
इतक्या वर्षानंतर त्यांना या प्रकरणातील प्रत्येक ऑर्डर, अपील, निकाल तोंडपाठ आहेत. त्यांनी घरातच तयार केलेल्या ऑफिसच्या खोक्यांमध्ये ही सगळी कागदपत्रं खच्चून भरली आहेत.
“मी प्रत्येक डॉक्युमेंट वाचलं आहे.” त्या म्हणाल्या., “मुख्य खटल्याचीच 50 हजार पानं आहेत.”
शेखर आणि नीलम यांनी कितीदा कोर्टात सुनावणीला गेले याची काही गणना नाही. अजूनही ते कोर्टात कितीतरी दिवस घालवत आहेत.
प्रत्येक गोष्टीच्या त्या नोट्स घेत असतात. त्यांना प्रत्येक घडामोडींची माहिती असावी, कधी वकिलांना ती माहिती पुरवावी म्हणून त्या कोर्टात जात असतात.
त्यांनी मुलांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे त्या लढू शकतात असं नीलम म्हणतात. आपण मुलांना न्याय मिळवून देऊ शकलो नाही असं त्यांना अनेकदा वाटतं आणि त्यांचं दु:ख आणखीच वाढतं.
“मला हा लढा पुन्हा द्यायचा झाला तर माझ्या मुलांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या लोकांना गोळ्या घालेन. मला हे दु:ख सहन होणार नाही. त्यांना मारल्यावर मी स्वत:ला मारेन, म्हणजे मला त्याचा त्रास होणार नाही. इतकं साधं आहे हे.”
उपहार थिएटर अजूनही मोडकळीला आलेल्या अवस्थेत उभं आहे. 26 वर्षांपूर्वी झालेल्या दुर्घटनेच्या खुणा आजही या वास्तूवर आहेत. नीलम यांच्या शेवटच्या याचिकेवर निर्णय दिल्याशिवाय ते पाडता येणार नाही.
“मी जेव्हा इथे येते तेव्हा मी त्या बिल्डिंगकडे न पाहण्याचा प्रयत्न करते.” असं नीलम म्हणतात.
सिनेमागृहात पाठ करून त्या म्हणतात. “माझी बँक इथेच आहे. मी गेली 12 वर्षं इथे आलेले नाही.”
उपहारच्या बाजूला एक बाग आहे. तिथे एक ग्रॅनाईटचा दगड आहे. या दुर्घटनेत मरण पावलेल्या लोकांचं एक स्मारक तिथे उभारण्यात आलं आहे. या लोकांच्या जन्मतारखा आणि त्यांची नावं इथे आहेत.
नीलम या पार्कात प्रत्येक वर्षी तीनदा येतात. त्यांच्या मुलांच्या वाढदिवसाला आणि घटनेच्या स्मृतीदिनी त्या तिथे जातात. त्या थेट स्मारकावर जातात. उन्नती आणि उज्ज्वलच्या स्मारकावर जातात, हात जोडतात आणि डोळे बंद करतात.
“मी तिथे प्रार्थना करते कारण मला असं वाटतं की ते या जागी इथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि अजूनही त्यांच्या आत्म्याला शांती मिळालेली नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








