कमला मिल आग : 'आगीला गरीब आणि श्रीमंत यांतला फरक कळत नाही'

Mumbai

फोटो स्रोत, SEBASTIAN D'SOUZA/Getty Images

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मृतांची संख्या हा एक आकडाच असतो. पण त्या प्रत्येक आकड्यामागे असते एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीची कहाणी एक अशी गोष्ट, जी अचानकच संपून गेली.

पत्रकार म्हणून अशा गोष्टी आम्हाला सांगत राहायला हव्यात. हे असं बोलून मी दरवेळी स्वतःचीच समजूत काढते.

आणि प्रयत्न करते, शांत राहण्याचा. शांत, न डगमगता, अलिप्तपणे, तरीही माणूस असल्याची जाणीव ठेवून, मनात भावना आणि संवेदना जाग्या ठेवून.

पण कधीकधी एखादी कहाणी, एखादी दुर्घटना मन हेलावून टाकते.

यंदाचं वर्ष अशाच गोष्टींनी भरलं होतं आणि त्यामुळंच या महानगराच्या भविष्याविषयी मला जास्तच चिंता वाटू लागली आहे.

हे माझं शहर आहे. मुंबई, माझं घर.

Mumbai

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE/GETTY Images

खरं तर जमिनीच्या या तुकड्याला, माझं घर म्हणावंसं वाटण्यासाठी बराच काळ जावा लागला. पण मी मुंबईच्या प्रेमात पडले आणि आता या शहराची दुरवस्था पाहून मनाला त्रास होतोच.

कधीकधी इथं सगळीकडे फक्त अनागोंदी दिसते.

mumbai

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE/Getty Images

अगदी काही सेंटीमीटर पाऊसही मुंबईची गती रोखण्यासाठी पुरेसा ठरतो आजकाल.

शहरातला उकाडा कुठल्याही मोसमात असह्य बनतो. आणि हे कमी होतं म्हणून की काय, यंदा धुरक्यानंही हजेरी लावली.

लोकल ट्रेन कायमच गर्दीनं ओसंडून वाहतात. रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नेहमीचीच झाली आहे.

विमानतळावरील उशीरही नित्याची बाब बनली आहे.

Mumbai

फोटो स्रोत, Getty Images

इथं दाटीवाटीनं उभी घरं मोकळा श्वास घेण्यासाठी धडपडतात.

इथल्या अत्यावश्यक सेवांवरचा ताण आधीच वाढला आहे. कित्येक वर्षांपूर्वी उभारलेल्या पायाभूत सुविधा अपुऱ्या ठरू लागल्या आहेत.

मुंबईत कुठल्याही नाक्यावर एक दुर्घटना घडण्याची वाट पाहात असते, असं म्हणतात.

आणि माणसं त्या दुर्घटनांचा सामना करतात, यावर मात करतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात आणि जगणं सुरू राहतं.

पण दरवेळी जेव्हा एखादी दुर्घटना घडते, तेव्हा संताप येतो आणि हळहळही वाटते.

नुकतंच दोन ठिकाणी आग लागली आणि रागही उफाळून आला.

Mumbai

फोटो स्रोत, Getty Images

१८ डिसेंबरच्या पहाटे साकिनाक्याला फरसाण फॅक्टरीला लागलेल्या आगीत १२ जणांचा मृत्यू झाला आणि शुक्रवारी, २९ डिसेंबरला मध्यरात्री कमला मिल कंपाऊंडमधील रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत १४ जणांचा बळी गेला.

मुंबईच्या दोन विरोधाभासी परिसरातील दोन वेगवेगळी औद्योगिक क्षेत्र. देशाच्या आर्थिक राजधानीतल्या दोन वेगळ्या मुंबईंचं प्रतिकच जणू.

पण गरीब आणि श्रीमंत, कष्टकरी आणि पार्टीगोअर्स. आगीला यांतला फरक कळत नाही.

तरीही दोन्ही दुर्घटनांमधला मोठा फरक जाणवलाच. विशेषत: या घटनांचं देशातील माध्यमांमध्ये उमटलेलं प्रतिबिंब वेगवेगळं होतं.

दोन्ही घटनांमध्ये केवळ दहा दिवसांचं अंतर. 'मृतांचा आकडा'ही जवळपास सारखाच.

पण गुजरातच्या निवडणूक निकालांच्या दिवशी साकिनाक्याची आग ही दुय्यम घटना ठरली. तर बातम्यांच्या दृष्टीनं संथ शुक्रवारी कमला मिलची आगच चर्चेत राहिली.

कमला मिलमध्येच काही माध्यमांची कार्यालयं असल्यामुळे तर तिथल्या आगीची धग माध्यमाना एवढी जाणवली असावी का?

असावं कदाचित. कारण जवळपास सगळ्या माध्यमांचे प्रतिनिधी तिथं दाखल झाले आणि आग विझून कित्येक तास झाल्यावरही तळ ठोकून होते.

Mumbai

फोटो स्रोत, @CMOMaharashtra

फोटो कॅप्शन, म़ख्यमंत्र्यांची भेट आणि माध्यमांची उपस्थिती

कमला मिलची आग मोठी होतीच. पण त्यावरची माध्यमांची आणि सरकारची प्रतिक्रिया ठळकपणे जाणवली.

तिथं रेडियो जॉकी आपल्या माईकमध्ये तावातावानं ओरडत होते. घटनेच्या साक्षीदारांसोबत लाईव्ह करण्यासाठी काही पत्रकारांमध्ये चढाओढ सुरू होती. काही अँकर मंडळींनी तर तिथूनच बुलेटिन्सही केली.

एवढं कव्हरेज मिळाल्यावर राजकारण्यांचीही रिघ लागली. स्वतः मुख्यमंत्र्यांनीही येऊन पाहणी केली.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

पंतप्रधान, राष्ट्रपतींनी खंत व्यक्त केली, लोकसभेतही चर्चा झाली.

सर्व स्तरांवर प्रश्न विचारत होते लोक.

कशामुळे? आगीविषयी जागरुकता वाढल्यामुळे? की यावेळी कमला मिलमध्ये आग लागल्यामुळे?

शेवटी कमला मिल हा उच्चभ्रू भागातला, चकचकीत कॉर्पोरेट परिसर.

साकिनाक्यातली फॅक्टरी तर एका किचाट, डाऊनमार्केट भागात होती.

तिथं कामगार झोपेतच धुरानं गुदमरून मारले गेले त्यावर इतकी प्रतिक्रिया उमटली नाही सोशल मीडियात.

तरी लोक म्हणालेच तेव्हा- कशाला राहतात माणसं अशा ठिकाणी? अडकून मरायला?

दुसरीकडे कमला मिल्सच्या आगीनंतर माझ्या सोशल मीडियाच्या भिंती शोकाकुल प्रतिक्रियांनी भरून गेल्या.

तरी काही लोकांनी नाक वाकडं केलंच - कशाला जायला हवं या लोकांना पबमध्ये?

टीव्हीवरच्या कव्हरेजचं सोशल मीडियातलं हे प्रतिबिंब म्हणायचं, की सोशल मीडियावरच्या ट्रेण्ड्सचं टीव्हीवरचं प्रतिबिंब? काही का असेना.

mumbai

फोटो स्रोत, PAL PILLAI/Getty images

प्रश्न विचारले जात आहेत.

प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न. ते थांबवून चालणार नाही, ते सोडवावेच लागतील.

प्रश्न थांबणार नाहीत यापुढेही, पण त्यांची उत्तरंही मिळायला हवीत.

अशी उत्तरं जी या शहराला वाचवू शकतील.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)