इस्लामिक स्टेट काश्मीरमध्ये पाय रोवत आहे?

काश्मीरमधील आंदोलन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, बीबीसी मॉनिटरिंग
    • Role, बीबीसी मराठीसाठी

कथित इस्लामिक स्टेट (IS) काश्मीरमध्ये पाय रोवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ISशी संबंधित काही ऑनलाईन अकाऊंट्सवर 'काश्मीरमधील मुजाहिदीनां'ना संघटनेला समर्पित करण्याची शपथ घेताना दाखवणारा एक व्हीडिओ शेअर केला जात आहे.

13 मिनिट 46 सेंकदांचा हा व्हीडिओ 25 डिसेंबरला ISच्या 'नाशिर न्यूज नेटवर्क' कडून टेलेग्राम या मेसेजिंग अॅपवर 'विलायत काश्मीर' (#Wilayat Kashmir) या हॅशटॅगसह पाठवण्यात आला होता.

यात चेहरा झाकलेला एक व्यक्ती उर्दू बोलताना दिसतो. या व्यक्तीची ओळख अबु-अल-बारा अल कश्मिरी अशी पटवण्यात आली आहे. ही व्यक्ती अबु-बकर अल बगदादीवर निष्ठा ठेवण्याचं आवाहन करत आहे.

अशाच प्रकारचं आवाहन, तो इतर जहालवादी संघटनांनाही करताना दिसतो आहे.

'अल काश्मिरी'ने काही दिवसांपूर्वीच 'अल कायदा'शी संबंधित जिहादी गट स्थापन करण्याबद्दल मांडणी केली होती. तर दुसरीकडे 'गजावत उल हिंद'चे नेतृत्व जाकीर मुसा करत असून तो 'खिलाफत'मध्ये सहभागी होण्याचं आवाहन करत आहे.

या व्हीडिओतील हा व्यक्ती पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि जिहादी असल्याचा दावा करणाऱ्या इतर स्थानिक संघटनांची निंदा करताना दिसतो. हा व्यक्ती 'हिज्ब लष्कर जैश तहरीक' नावाच्या एका संघटनेला खोटी ठरवत असल्याचही दिसतो.

व्हीडिओच्या अखेरीस ही व्यक्ती इतर संघटनांना शिव्या देत ISचा झेंडा उंचावते आणि अबु बकर अल बगदादीच्या समर्थनात घोषणा देताना दिसते.

ISचा झेंडा

फोटो स्रोत, Getty Images

या व्हीडिओमध्ये 'निदा हक' आणि 'अल करार' या माध्यम समूहांचे लोगो दिसतात. 'अल करार' काश्मीर केंद्रीत माध्यम संस्था असून ती जम्मू काश्मीरमध्ये 'इस्लामिक खिलाफत' आणि 'मुजाहिदीनां'साठी काम करत असल्याचा दावा करते.

या संघटनेने काही दिवसांपूर्वी 'टेलिग्राम'च्या माध्यमातून भारतावर हल्ला करण्याची धमकीही दिली होती.

गेल्या काही महिन्यात काश्मीरमध्ये ISचे समर्थन करणाऱ्या माध्यमांची संख्या वाढलेली आहे. त्यातून काश्मीरमध्ये ISच्या समर्थकांची संख्या वाढत असल्याची शंका व्यक्त होत आहे. याशिवाय सरकार विरोधी आंदोलनात ISचा झेंडा फडकवण्याचे प्रकार पूर्वी दिसून आले आहेत.

जून महिन्यात ISने काश्मीरमध्ये रस दाखवणारा आणि तरुणांना भरतीसाठी आवाहन करणारा लेख प्रसिद्ध केला होता.

या लेख प्रसिद्ध झाल्यानंतर स्वतःला IS समर्थक म्हणवणारी 'अंसारुल खिलाफह जम्मू काश्मीर' ही संघटना पुढे आली होती. या संघटनेने काश्मीरमधील IS समर्थकांना एकत्र येण्याची आणि युद्धाला सज्ज राहण्याचं आवाहन केले होते.

काश्मीरमधील आंदोलन

फोटो स्रोत, Getty Images

तर या महिन्यात अल कायदाशी संबंधित 'अंसार गजावत उल हिंद' नावाची संघटना पुढं आली आहे.

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या एका हल्ल्याची जबाबदारी ISने घेतली होती. ISने या हल्ल्याला 'कमांडो ऑपरेशन' म्हटलं होतं. या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता.

2015पासून ISने तिच्या नव्या शाखेची घोषणा केलेली नाही. भूतकाळात जर पाहिले तर असं लक्षात येतं की, यासाठी ISने विशेष प्रक्रिया पाळलेली आहे. काश्मीरमध्ये पसरवल्या जाणाऱ्या या व्हीडिओतून या प्रक्रियेची साक्ष मिळते.

अशा व्हीडिओतून IS आणि नेत्यांच्या प्रती समर्पणाची भावना व्यक्त केली जाते. त्यानंतर IS समर्थकांतून प्रमुखाची निवड केली जाते आणि त्यानंतर ISच्या नव्या शाखेची घोषणा केली जाते.

(बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)