इस्लामिक स्टेटच्या नव्या ऑडियोत म्होरक्या बगदादीचा आवाज असल्याचा दावा

इस्लामिक स्टेट, अबू बगदादी

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, इस्लामिक स्टेटच्या नव्या ऑडियोत म्होरक्या अबू बगदादीचा आवाज असल्याची चर्चा आहे.

कथित इस्लामिक स्टेट अर्थात ISने एक ऑडियो प्रसिद्ध केली आहे, ज्यात या जहालवादी संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल-बगदादीचा आवाज असल्याचा मानलं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून बगदादीच्या मृत्यूसंदर्भात अनेक बातम्या पसरल्या होत्या. बगदादीचा शेवटचा ऑडियो साधारण वर्षभरापूर्वी जाहीर करण्यात आला होता. मात्र कथित इस्लामिक स्टेटनं जाहीर केलेल्या ताज्या ऑडियोमध्ये उत्तर कोरियानं जपान आणि अमेरिकेला दिलेल्या धमक्यांचा उल्लेख आहे.

या ऑडियोमध्ये ISचा बालेकिल्ला असलेल्या इराकच्या मोसूल शहरातील लढाईचाही उल्लेख आहे. जुलै महिन्यात इराक सैन्यानं जोरदार आक्रमण करत मोसूलवर ताबा मिळवला होता.

जुलै 2014 नंतर कोणीही बगदादीला सार्वजनिक ठिकाणी पाहिलेलं नाही. त्याला पकडून देणाऱ्याला अमेरिकेनं अडीच कोटी डॉलरचं इनाम जाहीर केलं आहे.

तीन वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या व्हीडिओमध्ये बगदादी होता, ज्यात तो मोसूलच्या अल नूरी मशिदीत आपल्या समर्थकांना संबोधित करताना दिसत होता.

इराक सैन्याने मोसूलवर केलेल्या कारवाईला बगदादीने खिलाफत म्हणून घोषित केले होते.

इस्लामिक स्टेट, अबू बगदादी

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, मोसूल शहरातले दृश्य

बगदादीचा मृत्यू झाल्याचे पुरावे नसल्याने तो जिवंत आहे असाच विश्वास ठेवावा लागतो, असं अमेरिकेच्या लष्कराचे प्रवक्ते रायन डिल्लन यांनी सांगितलं.

दरम्यान, नवा ऑडिओमधील आवाज बगदादीचाच आहे की नाही, हे तपासण्याचं काम सुरू आहे. मात्र तो आवाज बगदादीचाच आहे, असं अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेचं म्हणणं आहे.

सामान्य नागरिक आणि कैद्यांना क्रुर वागणूक देणाऱ्या इस्लामिक स्टेटला मोसूलमधला मोठा भाग गमवावा लागला होता.

46 मिनिटांचा ऑडिओ

IS शी संलग्न एका वेबसाइटनं 46 मिनिटांचा हा ऑडियो पोस्ट केला आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच IS तर्फे ऑडियो पोस्ट करण्यात आला आहे.

मोसूलच्या लढाईव्यतिरिक्त या ऑडियोमध्ये सीरियामधील रक्का आणि हामा तसंच लिबियातल्या शहरांमध्ये झालेल्या संघर्षाचा उल्लेख आहे.

ज्यांनी रक्त सांडलं, ते योगदान वाया जाणार नाही, असं या ऑडिओमधील व्यक्ती म्हणते. रशियाच्या पुढाकारानं सीरियाप्रश्नी सुरू झालेल्या शांती चर्चेचा संदर्भ या ऑडियोत आहे. उर्वरित रेकॉर्डिंगमध्ये धार्मिक गोष्टींचा उल्लेख आहे.

इराक-सीरियाच्या सीमेवरील ISचं वर्चस्व असलेल्या भागात अल बगदादीनं आश्रय घेतल्याचं समजतं.

मोसूल, इस्लामिक स्टेट,

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, मोसूलवरी कारवाईचा क्षण

ताहीर इन्स्टिट्यूट फॉर मिडल इस्ट पॉलिसी संस्थेचे हासन हसन यांनी नुकताच बीबीसीकरता याच विषयावर लेख लिहिला होता. अबू बगदादी कुठे आहे, याची माहिती अगदीच थोड्या लोकांना आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

हान यांच्यानुसार बगदादीला शोधून काढण्यासाठी अमेरिकेने सैन्याची विशेष तुकडी तयार केली आहे. मात्र तो नक्की कुठे आहे, हे ठाऊक नसल्यानं अमेरिकेसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

यंदा 28 मे रोजी रशियाने सीरियातील रक्का शहरावर आक्रमण केलं होतं. त्यात बगदादी मारला गेला असल्याचं रशियानं म्हटलं होतं.

बगदादीचा मृत्यू झाला आहे, असं काही दिवसांनंतर इराकच्या सैन्याने सांगितलं होतं.

बगदादीच्या मृत्यूसंदर्भात अनेक उलटसुलट दावे करण्यात आले. मात्र या दाव्यांवर अमेरिकेनं प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

सुरक्षाविषयांचे बीबीसी प्रतिनिधी फ्रँक गार्डनर यांच्यामते या ऑडियोद्वारे असं म्हणता येईल की बगदादी जिवंत आहे. ऑगस्ट पर्यंत तो जिवंत होता असं तरी किमान म्हणता येईल.

पाश्चिमात्य देशातील गुप्तहर संघटना आणि इराक सरकारने बगदादी मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही.

फ्रँक यांच्या मते बगदादी जिवंत असेल तर चहूबाजूंनी कोंडी झालेल्या इस्लामिक स्टेटच्या सदस्यांचे मनोधैर्य वाढेल. मात्र यामुळे IS च डावपेचांमध्ये बदल होण्याची शक्यता नाही.

अल कायदाचा म्होरक्या डॉ. अयमन अल जवाहिरी यांच्याप्रमाणे बगदादीला आश्रय घेणे आवश्यक आहे. कोणत्याही मोहिमेसाठी थेट बगदादी सूचना देईल किंवा डावपेच ठरवेल अशी शक्यता फारच कमी आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)