टेररिस्तान आहे पाकिस्तान : भारताचं UN मधल्या टीकेला प्रत्युत्तर

भारताच्या इनम गंभीर

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, भारतातर्फे इनम गंभीर यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानात उत्तर दिलं

ओसामा बिन लादेन आणि मुल्ला ओमारसारख्या कुख्यात जहालवाद्यांना आश्रय देणारा पाकिस्तान हा खरं तर टेररिस्तान आहे, असं सडेतोड प्रत्युत्तर भारतानं पाकिस्तानच्या टीकेला संयुक्त राष्ट्र परिषदेत दिलं आहे.

"पाकिस्तान म्हणजे दहशतवाद, हे समीकरण आता पक्कं झालं आहे. मात्र तो स्वत:ला पीडित असल्याचं भासवतो आहे. ज्या देशाचा अर्थच पवित्र भूमी असा होतो तोच देश आता दहशतवाद्यांचे आगार झाला आहे. पाकिस्तान आता टेररिस्तान झालं आहे," भारताने .

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांनी संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणात पाकिस्तानातील जहालवादी कारवायांमध्ये भारत सामील असल्याचा आरोप केला होता. भारताला पाकिस्तानाबरोबर शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करायचेच नाहीत, असेही ते म्हणाले होते.

काश्मीर प्रश्न शांततेनं सोडवायला हवा आणि त्याकरिता काश्मीरसाठी अतिरिक्त दूताची नेमणूक करावी, असा सल्लाही अब्बासी यांनी दिला होता.

भारत, पाकिस्तान, संयुक्त राष्ट्रं, दहशतवाद

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, भारत-पाकिस्तान सीमा

पण ज्या देशानं दहशतवादी गटांना आश्रय दिला आहे, तोच राष्ट्र आता पीडित असल्याचं भासवत आहे, असं भारतानं म्हटलं आहे.

हे आहेत भारताच्या प्रत्युत्तरातले महत्त्वाचे मुद्दे

  • या देशात दहशतवादी तयार होतात. या देशात प्रशिक्षण घेतलेले दहशतवादी जगभरात हल्ले घडवतात. दहशतवाद्यांना समर्थन दिल्यामुळं पाकिस्तानची अवस्था भीषण झाली आहे. त्यांनी जगाला मानवाधिकार आणि लोकशाहीचे धडे शिकवू नयेत.
  • लष्कर-ए-तय्यबा ही दहशतवादी संघटना आहे, असं संयुक्त राष्ट्र संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या संघटनेचा म्होरक्या हफिझ मोहम्मद सईद पाकिस्तानात आहे. त्याचा पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवाराने लाहोरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाग घेतला. हफिझने राजकीय पक्ष काढणार असल्याची जाहीर केलं आहे. असा माणूस पाकिस्तानमध्ये राजरोसपणे वावरतो.
  • दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात आणणं, जागतिक स्तरावरील दहशतवाद्यांना देशात आश्रय देणं तसंच त्यांना राजकारणात स्थिरावण्यासाठी मदत करणे, हेच पाकिस्तानचं दहशतवादविरोधी धोरण आहे.
भारत, पाकिस्तान, संयुक्त राष्ट्रं, दहशतवाद

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी संयुक्त राष्ट्र परिषदेत बोलताना.
  • जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि सदैव राहील. सीमेपल्याडहून दहशत पसरवण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी भारताच्या अखंडतेला जराही धक्का लागणार नाही.
  • पाकिस्तान एकीकडे शांततेची मागणी करत आहे आणि दुसरीकडे दहशतवाद्यांकरीता पायाभूत व्यवस्था निर्माण करण्यासाठी लक्षावधी रूपये खर्च करत आहे. या दुतोंडी वागण्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागत आहे.
  • पाकिस्तानमुळेच दहशतवादाचं जागतिकीकरण झालं आहे. पाकिस्ताननं कोणत्याही प्रकारच्या गैरसमजुतीत राहू नये.
  • पाकिस्ताननं आपल्या विनाशकारी धोरणाबाबत पुनर्विचार करायला हवा. पाकिस्तान मानवता आणि शांततेविषयी कटिबद्ध असल्याचं दिसलं तरच अन्य देशांकडून त्याला सन्मानपूर्वक वागणूक मिळू शकेल.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)

आणखी वाचा