डोनाल्ड ट्रंप संयुक्त राष्ट्रांच्या सभेत कडाडले

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिका आणि मित्रराष्ट्रांच्या वाटेला गेल्यास उत्तर कोरिया बेचिराख करून टाकू, असा कडक इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला.
मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेसमोर केलेल्या पहिल्या भाषणात ट्रंप यांनी उत्तर कोरिया, इराण यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला चढवला.
इराणमधील 'भ्रष्ट हुकूमशाही'ला पश्चिम आशियातील वातावरण अस्थिर करायचं आहे, अशी टीका ट्रंप यांनी केली.
इराणसोबत ओबामा यांच्या काळात झालेल्या अणू करारावर टीका करताना या करारामुळे नाचक्की झाल्याचंही ते म्हणाले.
'रॉकेट मॅन'
आत्महत्येच्या मार्गावर निघालेला 'रॉकेट मॅन' असा किम जाँग उनचा उल्लेख ट्रंप यांनी केला.
उत्तर कोरियात आपल्याच देशातल्या नागरिकांचा छळ करणारं दुराग्रही सरकार आहे.
काही देश आजही उत्तर कोरियाशी व्यापारी संबंध ठेवून आहेत, त्यांना शस्त्रात्र पुरवठा करत आहेत, असा टोलाही ट्रंप यांनी लगावला.
ट्रंप यांनी अमेरिका फर्स्ट धोरणाचं समर्थन करताना, सगळ्यांप्रमाणे मीही माझ्या देशाच्या हिताला प्राधान्य दिलं आहे आणि तसंच ते असायला हवं.
देशातील नागरिकांचं जीवनमान उंचवण्यासाठी राष्ट्र हे उत्तम माध्यम आहे, असंही डोनाल्ड ट्रंप म्हणाले.
अमेरिका नेहमीच जगाचा उत्तम मित्र राहील. अर्थात त्याचा कोणी गैरफायदा उचलू नये अशी अपेक्षा ट्रंप यांनी व्यक्त केली.

फोटो स्रोत, Getty Images
काय म्हणाले ट्रंप?
आंतरराष्ट्रीय राजकारणात शक्तिशाली सार्वभौम देशांचं महत्त्व वाढवणं आवश्यक आहे.
काही देश खड्डयात जात आहेत, संयुक्त राष्ट्रसंघ त्यांना तारू शकेल.
डाव्या विचारसरणीच्या सरकारमुळे व्हेनेझुएलात संकट आलं. अशा वेळी आम्ही बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही.
समाजवादाची निंदा करतांना ते म्हणाले की, "समाजवाद फक्त मनस्ताप, विध्वंस आणि अपयशाचाच धनी आहे"
आपण सगळ्यांनीच कायदा, देशांच्या सीमा आणि संस्कृती यांचा आदर करायला हवा.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








