ट्रंप यांच्या भाषणावर उत्तर कोरियाचा पलटवार, म्हणाले भाषण ‘कुत्र्याच्या भुंकण्या’सारखं

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES
अमेरिका किंवा त्याच्या कोणत्याही सहकारी देशावर हल्ला केला, तर उत्तर कोरिया बेचिराख करू, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेतल्या आपल्या पहिल्या भाषणात दिला होता.
त्यांच्या या भाषणावर उत्तर कोरियाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री री यांग हो यांनी त्यांच्या देशाच्या वतीने ही प्रतिक्रिया दिली.
उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री री यांग हो संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कला गेले आहेत. तिथे त्यांना पत्रकारांनी ट्रंप यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली. ''कुत्रे भुंकत असतात पण त्याकडे लक्ष न देता हत्ती चालत राहतो", या म्हणीचा त्यांनी वापर केला.
संयुक्त राष्ट्राने निर्बंध घालूनही उत्तर कोरियाने अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्रांची चाचणी केली.
"कुत्र्याच्या भुंकण्याने जर आम्ही घाबरू असं त्यांना वाटत असेल तर ते स्वप्न पाहात आहेत", असं री यांग हो म्हणाले.
डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या भाषणात उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन यांचा 'रॉकेट मॅन' असा उल्लेख केला होता. त्याबाबत विचारलं असता री यांग हो यांनी डोनाल्ड ट्रंप यांच्या सहकाऱ्यांची दया येते असं म्हटलं.
अमेरिकेकडून पूर्णपणे बेचिराख करण्याची धमकी मिळाल्यानंतरही उत्तर कोरियाकडून आलेलं हे पहिलं विधान आहे. री यांग हो संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत येत्या शुक्रवारी भाषण करणार आहेत.
दुसरीकडे, दोन वर्षांत पहिल्यांदाच दक्षिण कोरियानं आपण उत्तर कोरियाला मदत पाठवणार असल्याचं गुरुवारी जाहीर केलं आहे. सियोलच्या एकीकरण मंत्रालयाने लहान मुलं, गर्भवती महिला आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतर्गत 80 लाख डॉलरच्या मदतीची योजना आखली आहे.
संयुक्त राष्ट्राने नुकतेच उत्तर कोरियावर नवीन निर्बंध घातले होते. तेलाच्या आयातीवर आणि कापडाच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले आहे. याद्वारे उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची कोंडी करण्याचा संयुक्त राष्ट्रांचा प्रयत्न आहे.
हे प्रतिबंध उत्तर कोरियाने 3 सप्टेंबरला केलेल्या अण्वस्त्र चाचणीनंतर लावले गेले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, उत्तर कोरियाने कमालीच्या वेगाने आघात करणारी लांब पल्ल्याची मिसाईल्स आणि आण्विक शस्त्रं यशस्वीपणे तयार केली आहेत.









