IS विरुद्ध सुरू असलेलं युद्ध संपल्याची इराकची घोषणा

मोसूल, जुलै 2017

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, मोसुलवर ताबा मिळवण्यासाठी झालेल्या लढाईत अतोनात नुकसान झालं.

तथाकथित इस्लामिक स्टेटविरोधात (IS) सुरू असलेलं प्रदीर्घ युद्ध संपल्याची घोषणा इराकनं केली आहे.

संपूर्ण देशावर आता इराकी सैन्याचं नियंत्रण असल्याची माहिती इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबादी यांनी बगदादमधील एका परिषदेत दिली आहे.

नोव्हेंबरमध्ये इराकच्या रावा शहरातून IS चा पाडाव झाला होता. त्यानंतर इराकच्या सीमा क्षेत्रातल्या काही भागांमध्ये IS चा प्रभाव होता. आता तिथूनही IS च्या पाठिराख्यांना हुसकावून लावण्यात इराकला यश आलं आहे.

इराकच्या शेजारी असलेल्या सीरियातून IS ला हुसकावून लावल्याची घोषणा रशियन सैन्यानं दोनच दिवसांपूर्वी केली होती.

या जिहादी गटानं 2014मध्ये सीरिया आणि इराक या दोन्ही देशांमधील मोठ्या प्रदेशावर कब्जा केला होता. त्यावेळी IS ने आपल्या 'खिलाफती'ची घोषणा करत तब्बल एक कोटी लोकांवर राज्य करायलाही सुरुवात केली.

त्यानंतर इराक आणि सीरियानं सुरू केलेल्या लष्करी कारवाईत गेल्या दोन वर्षांपासून तथाकथित इस्लामिक स्टेट्सच्या सैन्याला अनेक पराभवांचा सामना करावा लागला आहे.

इराक

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, गेल्या महिन्यात रावा शहरावर ताबा मिळवणाऱ्या इराकी फौजा.

यावर्षी जुलै महिन्यात इराकमधल्या मोसुलमधून त्यांना हुसकावून लावण्यात आलं. तर गेल्या महिन्यात IS नं राजधानी म्हणून घोषित केलेल्या सीरियातल्या रक्का शहरात त्यांचा पाडाव झाला.

सीरियातले काही IS समर्थक इथल्या काही खेड्यांमध्ये विखुरले, तर इतर टर्की सीमेवरून पळून गेल्याची माहिती समोर येत आहे.

काय म्हणाले हैदर अल-अबादी?

"इराक आणि सीरिया या दोन देशांच्या सीमावर्ती भागांवर आमच्या लष्कराचं संपूर्ण नियंत्रण आहे. त्यामुळे मी घोषणा करतो की, 'दाईश' (IS) विरोधातलं हे युद्ध आता संपलं आहे."

हैदर अल अबादी

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबादी विजयाची घोषणा करताना.

"आमचे शत्रू आमच्या सामान्य नागरिकांच्या जीवावर उठले होते. पण अखेर आमच्यातली एकता, निर्धार आणि शौर्य यांच्या बळावर आम्ही विजय मिळवला आहे."

जागतिक प्रतिक्रिया

जिहादींच्या जुलुमी राजवटीखाली पिचलेले इराकी नागरिक आता स्वतंत्र झाल्याचं अमेरिकेच्या गृह विभागानं जाहीर केलं आहे. पण त्याच बरोबर ISविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही, असंही अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे.

मोसूल

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, फेब्रुवारी 2017 मध्ये मोसुलमध्ये काढलेलं हे छायाचित्र. मोसुलमध्येच जवळपास 40 हजार लोकांचा मृत्यू झालाचा अंदाज आहे.

यूकेच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनीही अल-अबादी यांचं अभिनंदन केलं आहे. पण अद्याप तथाकथित इस्लामिक स्टेट्सचं संकट कायम असून इराकनं जागरूक राहायला हवं, असा सल्लाही त्यांनी दिला.

ISची विचारधारा अजूनही कायम!

इराकमधून IS चं सैन्य हुसकावून लावण्यात लष्कराला यश आलं असलं, तरीही अद्याप ISची विचारधारा संपलेली नाही. यापुढचं आव्हान आता त्या विचारधारेशी लढा देण्याचं आहे, असं मत बीबीसी अरब अफेअर्सचे संपादक सेबॅस्टियन युशर यांनी व्यक्त केलं आहे.

यापुढे IS कडून काही छोट्या स्वरूपाचे हल्ले होतील. आत्मघातकी हल्ल्यांनी इराकची काही शहरं हादरतील, अशी भीतीही युशर यांनी व्यक्त केली.

line

असा मिळवला ISच्या अंकित प्रदेशांवर ताबा

line

इराक विरुद्ध IS

  • जानेवारी 2014 : ISच्या सैन्यानं इराकमधील फलुजा आणि रामादी ही शहरं काबीज केली.
  • जून 2014 : सहा दिवसांच्या युद्धानंतर जिहादींनी मोसूल या इराकमधील मोठ्या शहराचा ताबा घेतला.
  • 29 जून 2014 : अबु बक्र अल-बगदादी याच्या नेतृत्त्वाखाली ISने आपल्या नवीन राजवटीची घोषणा केली.
  • ऑगस्ट 2014 : सिंजारवर आयएसचा ताबा. 20 हजार याझिदी नागरिकांचं पलायन.
  • मार्च 2015 : इराकी सैन्य आणि शिया तुकड्यांनी तिक्रीतवर नियंत्रण मिळवलं.
  • डिसेंबर 2015 : रामादीवर इराकी सैन्याचा ताबा.
  • जून 2016 : इराकी सैन्यानं फजुला परत मिळवलं.
  • ऑक्टोबर 2016 : इराकी सैन्य, शिया तुकड्या, कुर्द यांच्या एकत्रित लष्करानं मोसुलला वेढा घातला.
  • जुलै 2017 : मोसूल जिंकलं.
  • डिसेंबर 2017 : IS विरोधातलं युद्ध संपल्याची पंतप्रधान हैदर अल-अबादी यांची घोषणा

आणखी वाचा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)