ग्राउंड रिपोर्ट: 'अफराजुलची चूक एवढीच की तो मजूर होता, मजबूर होता, मुसलमान होता!'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दिलनवाझ पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी, राजसमंद, राजस्थान
राजस्थानच्या राजसमंदमध्ये दिवसाढवळ्या एका व्यक्तीला कुऱ्हाडीनं निर्दयीपणे ठार करून जाळण्यात आलं. त्याचा व्हीडिओ व्हॉट्सॅपवरून सर्वत्र पसरला, न्यूज चॅनलवरून दिवसभर ते खळबळजनक फुटेज दाखवण्यात आलं. पण जो मेला तो कोण होता? आणि त्याला का मारण्यात आलं?
ते शोधण्यासाठी आम्ही राजस्थानच्या राजसमंदमध्ये एका निर्जन खोलीत प्रवेश केला.
पाहिलं की, त्या खोलीत एका कोपऱ्यात मातीच्या चुलीवर मोठं भांडं ठेवलेलं आहे. बाजूला ठेवलेल्या परातीत दोन पोळ्या होत्या. चुलीच्या मागे एका कोपऱ्यात घमेली आणि फावडी तशीच पडलेली. आणि खोलीत असलेल्या खाटेवर कोणीतरी हिशोबाची वही सोडून गेलं होतं. एका टेबलावर जुना बंद टीव्ही आहे, आणि त्या शेजारीच छोटीमोठी भांडी आहेत.

इथं एकाचवेळी बऱ्याच लोकांचं जेवण शिजवलं जात असणार, याच्याच या खुणा होत्या. खोलीच्या बाहेर घाईघाईत घर सोडून गेलेल्यांच्या चपलांचे बरेच जोड पडलेले दिसतात.
ही खोली आहे 50 वर्षीय अफराजुल या कामगाराची. अफराजुल पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातल्या सय्यदपूर कलियाचक गावातून राजसमंदमध्ये कामासाठी आले होते. पण आता ती रिकामी आहे.

त्या खोलीत अफराजुलचा भाचा इनामुल, जावई मुशर्रफ शेख आणि काही बंगाली कामगारही त्यांच्याबरोबर रहायचे.
अफराजुलच्या हत्येचा व्हीडिओ एव्हाना तुमच्यापर्यंतही पोहोचलाच असेल. त्या व्हीडिओमधल्या त्यांच्या असहाय किंकाळ्याही तुम्ही ऐकल्या असतील. त्या किंकाळ्यांची दहशत अशी पसरली की त्यांच्यासोबत राहणारे कामगारही पश्चिम बंगालला परतले आहेत.
जे अजूनही धाडस करून परतले नाहीत, ते शहराच्या दुसऱ्या भागात राहायला गेले आहेत.

अफराजुलचे घरमालक पंडित खेमराज पालीवाल हेही त्या घटनेमुळे मानसिक धक्क्यात आहेत. "अशा भल्या माणसाबरोबर असं व्हायला नको होतं...," एवढंच जेमतेम ते बोलू शकतात.
गेल्या नऊ-दहा वर्षांपासून रामलाला आपल्या रिक्षातून अफराजुल आणि त्यांच्या कामगार सहकाऱ्यांना कामावर घेऊन जात होते. अफराजुल असे अचानक कसे जाऊ शकतात, याचा त्यांनाही धक्काच पोहोचला आहे.
"तो एक स्वच्छ मनाचा भला माणूस होता. त्यांना चहा आवडायचा आणि मलाही ते चहा पाजायचे," रामलाल सांगतात.
अफराजुलच्या हत्येचा व्हीडिओ पाहण्याची हिंमत रामलाल यांना झालीच नाही. त्यांच्या आठवणीनं त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं.

सुमारे 12-13 वर्षांपूर्वी अफराजुल पश्चिम बंगालमधून राजस्थानमध्ये मजुरीसाठी आले. या 13 वर्षांमध्ये त्यांनी कामगार ते ठेकेदार अशी प्रगती केली होती आणि आता ते रस्त्याची कामंही घेऊ लागले होते. सरकारकडून कंत्राटं मिळवलेली मोठ्या ठेकेदारांसाठी ती कामं अफराजुल मग मजुरीवर करवून घ्यायचे.
नुकतंच उघडलं होतं बॅंक खातं
अफराजुल यांनी एक मोटरसायकल खरेदी केली होती. तिच्या नंबरमध्ये 786 हे अंकही होते.
नुकताच त्यांनी 20 हजार रुपयांचा एक स्मार्टफोनही विकत घेतला होता, तो त्या दिवशी त्यांच्यासोबतच जळाला.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी बँकेत एक खातं उघडलं होतं. त्या खात्याचं ATM कार्ड अजूनही आलं त्याच पाकिटात आहे.

अफराजुल यांचं लग्न झालेलं होतं. त्यांना तीन मुली आहेत, ज्यापैकी दोघींची लग्नं झाली आहेत. त्यांचे एक मोठे जावई मुशर्रफ शेख त्यांच्याबरोबरच राहात होते.
मुशर्रफ शेख अफराजुल यांच्याशी झालेल्या शेवटच्या दिवसाच्या संभाषणाविषयी म्हणाले, "मंगळवारी पाऊस पडल्यानं आम्ही अर्ध्या दिवसातच काम थांबवलं. बुधवारीही पाऊस झाला. त्यामुळे आम्ही काम बंदच ठेवलं होतं. दोन कामगारांनी जेवण बनवलं आणि आम्ही सगळे जेवलो."
"ते चहा घेण्यासाठी म्हणून बाहेर पडले होते. साडे दहाच्या सुमारास त्यांनी मला फोन केला आणि कामगारांचा हिशोब करून पगार द्यायला सांगितलं. 'थोड्या वेळात येतो', असंही म्हणाले."
"त्यांनी साडे अकराच्या सुमारास पुन्हा फोन केला आणि म्हणाले, 'दिवसभर झोपाच काढत राहाल तर कामगारांचे पैसे कधी देणार'."
"त्यानंतर त्यांचं माझं पुन्हा बोलणं झालं नाही. ते म्हणाले होते, दहा मिनिटांत येतो, पण ते आलेच नाहीत. मी झोपूनच राहिलो."
मनात दहशतीचं घर
नंतर मुशर्रफ यांना एका परिचितानं फोन केला, अफराजुल यांचा अपघात झाल्याचं त्यानं सांगितलं.
"मोटरसायकलला अपघात झाला असेल," असं मुशर्रफ यांना वाटलं. पण घटनास्थळी पोहोचल्यावर ते पार हादरून गेले.

"त्यांना पाहताच मी कोसळलो. काही समजतच नव्हतं. मला वाटलं की मी मेलोय! तिकडंच डोकं धरून मी रडू लागलो," मुशर्रफ म्हणाले.
अफराजुल यांच्या हत्येचा व्हीडिओ पाहिल्यापासून मुशर्रफ जेवू शकलेले नाहीत. त्याची एवढी दहशत मनात बसली आहे की, घरमालकानं शब्द दिल्यावरही ते इतर कामगारांसह दुसऱ्या भागात राहायला गेले.
"आम्ही कामगार आहोत. पोट भरण्यासाठी आलो आहोत. कसं तरी आठ-दहा हजार रुपये कमावतो," असं अफराजुल यांचे भाचे इनामुल हतबलतेने सांगतात.
"भारतात आपण कुठेही जाऊन काम करू शकतो. सरकारनं अशा घटना थांबवल्या नाही तर आम्ही कामासाठी बाहेर कसं पडणार?" असा सवाल इनामुल उपस्थित करतात.

"भुकेपोटी आम्ही घरापासून एवढ्या लांब कष्ट करत आहोत. इतरांपेक्षा जास्त वेगानं आणि चांगलं काम करतो, कमी पैशांत करतो, म्हणून आम्हाला काम मिळतं. पण अशा वातावरणात जर आम्ही सुरक्षित नसू तर आम्ही काम कसं करणार?" असंही इनामुल विचारतात.
'आम्ही दुबळे आहोत, बदला काय घेणार'
सर्वांनाच हादरवून सोडणारा तो व्हीडिओ इमानुलनंही पाहिला. "ते पाहिल्यावर आपण किती असहाय आहोत, असं वाटलं. आम्ही दुबळे आहोत. आम्ही काय बदला घेणार?"
"आमच्यावतीनं सरकारनंच बदला घ्यायला हवा. मारेकऱ्यांला फाशी होईल, तेव्हाच आम्हाला सुरक्षित असल्याचं वाटेल. मारेकऱ्यांना जामीन मिळाला तर आम्ही काय करणार? परत निघून जाऊ."
मालदामध्ये अफराजुलच्या गावाजवळच बरकत अली राहतात. ते त्यांच्यासोबतच राजसमंदला आले होते. अफराजुल यांच्या हत्येचा व्हीडिओ पाहिल्यावर त्यांनाही धक्का बसला.
"ते त्यांच्याकडे दयेची भीक मागत होते. पण मारेकऱ्याला काहीही कसं वाटलं नाही? हा व्हीडिओ पाहिल्यापासून रात्री मी झोपू शकत नाही आहे. कोणी एखाद्याशी इतकं वाईट कसं वागू शकतं?"

अफराजुल यांना का मारलं हे मुशर्रफ, इनामुल आणि बरकत अली यांना अजूनही कळलेलं नाही. व्हीडिओमध्ये मारेकऱ्यानं उच्चारलेला 'लव्ह जिहाद' हा शब्दच त्यांच्यासाठी नवीन आहे.
बरकत अली म्हणतात, "दोन वेळच्या जेवणासाठी हजारो किलोमीटर दूर आलो आहोत. आमच्यासाठी काय लव्ह आणि काय जिहाद! भूकेसमोर आम्हाला आणखी काही सुचतही नाही."
अफराजुल यांचे कोणत्या महिलेशी संबंध होते का? ते म्हणतात, "असा विचार करणंही गुन्हा आहे."
मग अफराजुलना का मारलं? बरकत अली म्हणतात, "त्याला कोणाला तरी मारायचं होतं. अफराजुल सापडले म्हणून त्यांना मारलं. मी सापडलो असतो तर त्यानं मला मारलं असतं."
राजसमंदच्या मेहता मंगरी भागात अफराजूल राहत होते. तिथल्या काही तरुणांचं म्हणणं आहे की, शंभूलाल नावाच्या एका माणसाला अफराजुलबद्दल काही तक्रार होती. मग तो पोलिसात का गेला नाही?
एका तरुणानं सांगितलं, "अफराजुल यांचा काही गुन्हा असेल, असं मानलं तरी त्यांना मारण्याचा अधिकार कोणी दिला? पोलिसांना सांगायला हवं होतं."
घरमालक खेमराज पालीवाल यांची BA करत असलेली मुलगीही तेच म्हणते, "कोणाकडून काही चूक झाली असेल तर पोलिस आहेत ना! कायदा आहे! कायदा हातात घ्यायची काय गरज?"
अफराजुल यांचं काय चुकलं? इनामुल म्हणतात, "त्यांची चूक एवढीच की ते मजूर होते, असहाय होते, मुसलमान होते."
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








