कोपर्डी निकाल : कोर्टरूममधली ती 8 मिनिटं!

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्राचं सामाजिक, राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या कोपर्डी प्रकरणातील तिन्ही आरोपींना अहमदनगर सत्र न्यायालयानं मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. या निकालाच्या निमित्तानं या परिसरातील घडामोडींचा घटनास्थळावरून घेतलेला आढावा.
अपेक्षेप्रमाणं न्यायालयात आणि आवारात दु:ख, राग, चीड आणि अनेक भावनांचा कल्लोळ उडाला. सकाळपासूनच साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या न्यायालय परिसरात गांभीर्य, तर या दु:स्वप्नासारख्या आलेल्या घटनेच्या सावलीपासून न्यायविधानानं मुक्त होण्याची आस कोपर्डी गावात भरून राहिली होती.
सकाळी धुक्यानं भरलेल्या अहमदनगर शहराच्या प्रत्येक रस्त्यावरच येऊ शकणाऱ्या निकालाची चिन्हं दिसत होती. न्यायालयाकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलीस बंदोबस्त होता.
नुकत्याच नव्यानं उभारण्यात आलेल्या सहा मजली अहमदनगर सत्र न्यायालयाच्या आवारात कोणीही सहज प्रवेश करू शकत नव्हतं. युद्धकाळात लष्करानं सीमेलगतच्या गावांचा घ्यावा तसा ताबा पोलीस दलांनी या इमारतीचा घेतला होता.
तणाव आणि शांतता
प्रत्येक गाडीला, प्रत्येक व्यक्तीला पूर्ण तपासूनच आत प्रवेश दिला जात होता. प्रकरणाची एकूण संवेदनशीलता लक्षात घेता, त्याचे उमटलेले आणि उमटू शकणारे पडसाद पाहता १ अतिरिक्त पोलीस अधीक्षक, दोन उपअधीक्षक, २० अधिकारी, अडीचशे पोलीस कर्मचारी आणि त्यांच्यासोबतच राज्य राखीव दलाच्या आलेल्या अतिरिक्त कुमकीनं न्यायालय परिसराचं रुपांतर एखाद्या लष्करी छावणीत केलं होतं.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
इमारतीसमोर असलेल्या अर्धा एकर मैदानात गाड्या एक तर पोलिसांच्या होत्या, नाहीतर प्रसारमाध्यमांच्या. प्रकरणाचं महत्त्व पाहता देशभरातल्या पत्रकारांचा, कॅमेऱ्यांचा, फोटोग्राफर्सचा गराडा आवाराला पडला होता.
सुनावणी तर ठरल्याप्रमाणं ११ वाजता सुरु होणार होती, पण ज्यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या त्या आरोपींना ९ वाजताच न्यायालयात आणलं जाणार होतं याची कुणकुण पत्रकारांना लागली होती.
त्यांची दृश्यं टिपण्यासाठी सगळे कॅमेरे सरसावून तयार होते. पण पोलिसांनी त्यांना कात्रजचा घाट दाखवला. नऊच्या सुमारास गाड्यांच्या मोठ्या काफिल्यासह एक पोलीस व्हॅन न्यायालयाच्या आवारात आली आणि इमारतीच्या डाव्या प्रवेशाकडे गेली.
सारे फोटोग्राफर्स, कॅमेरामन तिकडे पळाले. पण १० मिनिटांनीही कोणीच बाहेर आले नाही, तेव्हा सगळ्यांना समजलं की या गाडीत दोषी नाहीत. पोलिसांनी त्यांना तेवढ्यात वेगळ्या गाडीतून दुसऱ्या प्रवेशद्वारानं कोर्टरूममध्ये नेलं होतं. सुरक्षेसाठी हे करावं लागलं असं पोलिसांचं म्हणणं होतं आणि त्यावर हतबल हसण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.
हळूहळू न्यायालयाच्या आवारातली गर्दी वाढू लागली. जणू या न्यायालयात दुसऱ्या कोणत्या खटल्याचं कामकाज चालणारच नाही अशी स्थिती होती. इमारतीच्या आतली सारी कार्यालयं मोकळी होती, जिन्यांच्या ताबा पोलिसांनी घेतला होता आणि सगळे वकील पहिल्या मजल्यावरच्या न्यायमूर्ती सुवर्णा केवलेंच्या कोर्टरूमकडे जात होते.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
९.३० च्या दरम्यान कोपर्डीच्या पीडितेच्या आई नातेवाईकांसोबत न्यायालयात आल्या. चेहऱ्यावर आत दाबलेल्या वेदना, दु:ख स्पष्ट जाणवत होतं, पण मोठ्या कष्टानं त्या ते आवरत शांतपणे जिना चढून न्यायाधीशांच्या समोरच्या पहिल्या रांगेत जाऊन बसल्या.
ती 8 मिनिटं
न्यायालयाच्या इमारतीबाहेर आता मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली होती. पण कोणालाही आवारात प्रवेश दिला जात नव्हता. गर्दीतून मध्येच घोषणाही दिल्या जात होत्या. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर संतापासोबत गुन्हेगारांना शिक्षा काय दिली जाते याची चिंताही होती.
कोर्टरूममधली गर्दी आणि तणावही वाढत चालला होता. ११ वाजेपर्यंत दालनात पाय ठेवायलाही जागा उरली नाही. बुलेट प्रूफ जॅकेट घातलेल्या २० पोलिसांचा बंदोबस्त कोर्टरूमध्येही होता. क्वचितच कोणत्या खटल्यासाठी असा बंदोबस्त कोर्टरूमच्या आत ठेवला जातो.
वकील आणि पत्रकारांनी कोर्टरूम भरून गेली होती. पीडितेच्या नातेवाईकांसोबतच कोपर्डी गावातले काही नागरिकही उपस्थित होते. समृद्धी जोशी अहमदनगरची आहे, पण पुण्यात कायद्याची विद्यार्थिनी आहे. तीही चौथ्या रांगेत बसलेली होती.
"मी पहिल्यांदाच अशा खटल्याला उपस्थित राहते आहे. कायद्याच्या विद्यार्थिनीपेक्षा एक मुलगी म्हणून इथं येणं मला आवश्यक वाटलं. या खटल्याचा जो निकाल येईल त्याचा आम्हा साऱ्यांवरच परिणाम होणार आहे," तिनं गर्दीकडे पाहत सांगितलं.
जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिन्ही आरोपींना सकाळीच कोर्टरूममध्ये सर्वात मागे आरोपींच्या जागेत हातकड्या घालून बसवून ठेवण्यात आलं होतं. सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडेही वळत होत्या. त्यांच्या नजरा मात्र निर्विकार होत्या. चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. ते एकमेकांशी न बोलता शांत बसून राहिले होते.
११.१५ वाजता सरकारी वकील उज्वल निकम कोर्टरूममध्ये आले. त्यानंतर दहाच मिनिटांत न्यायाधीश सुवर्णा केवले कोर्टरूमध्ये आल्या. एकच शांतता पसरली. उज्ज्वल निकम उठून उभे राहिले, पण आरोपींचे वकील कुठे होते? न्यायाधीशांनी विचारणा केली.
कोर्टाच्या प्रथेप्रमाणे पुकाराही केला गेला. पण आरोपींचे वकील न्यायालयात आलेच नाहीत. न्यायाधीशांनी मग तिन्ही आरोपींना त्यांच्यासमोर कठड्यात आणायला सांगितलं. ते जसे समोर जाऊन उभे राहिले, कोर्टरूममध्ये हालचाल, कुजबूज वाढत गेली.
आवाज जसा वाढला, तसं न्यायाधीशांनी सगळ्यांना सुनावलं की, जर आता आवाज आला तर तो न्यायालयाचा अवमान समजला जाईल. कोर्टरूममध्ये शांतता पसरली. त्यानंतर फक्त न्यायाधीशांचं शिक्षेसाठीचं न्यायविधान ऐकू येत राहिलं आणि कोर्टरूम ते ऐकत राहिली.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
सर्वप्रथम गुन्हे सिद्ध झालेल्या तिन्ही दोषींना बलात्काराच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. आणि त्यानंतर एकामागोमाग एक तीन वेळा हत्येच्या गुन्ह्यासाठी तिघांसाठीही मृत्युदंडाचं विधान झालं.
कोर्टरूममधला प्रत्येक जण ते निर्णय ऐकून स्वत:ला समजावून सांगतो आहे तेवढ्यात, अवघ्या ८ मिनिटांमध्ये शिक्षेची सुनावणी पूर्णही झाली होती आणि न्यायाधीश ती संपवून उभेही राहिले. मृत्युदंड सुनावलेले तिन्ही दोषी तेव्हाही निर्विकार उभे होते. चेहऱ्यावर ना दु:ख होतं, ना धक्का, ना इतर कोणतीही भावना. पोलिसांनी त्यांना तात्काळ कठड्यातून बाहेर काढलं आणि कोर्टरूमबाहेर नेऊन लगेचच शिताफीनं न्यायालयाच्या आवाराबाहेर नेलं.
न्यायाधीश गेल्यानंतर वकील बाहेर पडले. पत्रकार बातमी ब्रेक करण्यासाठी धावत बाहेर पळाले. अवघ्या पाच मिनिटांत कोर्टरूम रिकामी झाल्यावर लक्ष पहिल्या रांगेकडे गेलं. कोपर्डीच्या पीडितेची आई अजूनही खुर्चीवर बसून होती आणि त्यांच्यासोबत काही नातेवाईक.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
आईच्या भावनांचा इतका वेळ रोखून ठेवलेला बांध हळूहळू फुटायला लागला होता. त्यांनी आता अश्रूंना मोकळी वाट करून दिली आणि सोबत बाकी साऱ्यांनीच.
मुलगा आईचं सांत्वन करू लागला. दहा मिनिटांनंतर त्या कोर्टरूमच्या बाहेर आल्या. विचारलं तेव्हा इतकंच म्हणाल्या, "फाशी झाली. तीच योग्य शिक्षा होती."
...आणि अश्रुंचा बांध फुटला
अश्रू टिपत त्या खाली आल्या, मुख्य इमारतीच्या पायऱ्यांशी. तेव्हा माध्यमं त्यांच्याशी बोलायला गेली. तेव्हा मात्र त्यांचा सारा संयम सुटला. आठवणींचा बांध तुटला आणि त्या हमसून हमसून रडायला लागल्या.
न्यायालयाच्या आवारातल्या महिला वकील त्यांच्याकडे धावल्या आणि सांत्वन करू लागल्या. पण त्या वेळेस सांत्वन करणाऱ्यांनाही अश्रू अनावर झाले. पण आईनं थोड्याच वेळात संयम परत मिळवला आणि माध्यमांना प्रतिक्रिया देऊन त्या न्यायालयाच्या आवाराबाहेर पडल्या .
मृत्युदंडाच्या शिक्षेच्या बातमीनं न्यायालयाबाहेर जमलेल्या गर्दीचा आवाजही मोठा झाला. आता सारे गेटमधून आत आले. अनेक कार्यकर्ते होते, नेते होते. नंतर बराच काळ न्यायालयाच्या आवारात घोषणा होत राहिल्या.
कोपर्डीत काय होत होतं
अहमदनगरच्या न्यायालयापासून 70 किलोमीटर दूर कोपर्डीत मात्र तणावपूर्ण शांतता होती. एका प्रकारची अस्वस्थता होती. जेव्हा आम्ही दुपारी कोपर्डीत पोहोचलो तेव्हा नजरेत गावकऱ्यांपेक्षा पोलिसांची संख्याच अधिक भरत होती.
अडीच हजार वसाहतीच्या या राज्यात सर्वतोमुखी झालेल्या गावात अतिरिक्त पोलीस कुमक सुरक्षेची काळजी म्हणून ठेवण्यात आली होती. पण गाव आलेल्या निर्णयाचं शांततेत स्वागत करत होतं.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
कोपर्डीच्या पीडितेचे कुटुंबीय आणि नातेवाईक तर अहमदनगरला गेले होते, त्यामुळे मुख्य चौकापासून थोडं दूर शेताकडे असलेल्या त्यांच्या घरात फक्त वृद्ध आजी होत्या. घर शांत होतं.
घटना घडल्यापासून सव्वा वर्ष घराबाहेर असलेल्या बंदोबस्ताच्या पोलिसांची राहुटी तशीच शांत होती. आणि समोर रस्ता ओलांडून पलीकडच्या शेतात उभारलेलं या पीडितेचं स्मारकही शांत उभं होतं. कोणी तिथं येऊन गेल्यावर ठेवलेली फुलं फोटोखाली होती. काही तासांपूर्वीच आलेल्या महत्त्वाच्या निर्णयाचा एक गंभीर ठसा फक्त या शांततेवर होता.
निकालाच्या दिवशी पुण्याहून आपली बाईक घेऊन इथं आलेला दिनकर कदम हा विशीतला तरूण या स्मारकापाशी भेटला. तो अगोदर न्यायालयात गेला. तिथं आत जाता आलं नाही म्हणून थेट कोपर्डीला येऊन पोहोचला.
त्याला का यावसं वाटलं आज असं? "आपल्या घरातल्या कोणाही स्त्रीसोबत असं होऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. पण मग इथं जे घडलं त्यानंतर यांच्यासोबत कोण? असं मनाला वाटलं म्हणून मी बाईकवरून थेट इथं आलो," दिनकर म्हणाला.
घरापाशी थोडा वेळ थांबून आम्ही गावातल्या मुख्य चौकात आलो. चौकातल्या एका हॉटेलापाशी पोलिसांसोबत बरेच गावकरी बसले होते.
सकाळपासून अनेक पत्रकारांची वर्दळ त्यांनी गावात पाहिली होती, पण तरीही मोबाईलवर या शिक्षेच्या बातमीचं कव्हरेज ते पाहत बसले होते. त्यांच्याशी बोलायला लागलो.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
कोपर्डीच्या खटल्यातले एक साक्षीदार असलेले नवनाथ पाखरे त्यांच्यातच होते. "आमचं गाव तसं कोणत्याही तंट्याबखेड्याशिवाय असलेलं. सगळे मिळूनमिसळून राहतात. या दुर्दैवी घटनेनं मात्र ते अशा प्रकारे ओळखलं जायला लागलं. पण आज न्याय झाला असं वाटतं. आता गावाला चांगलं म्हटलं जाईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं," पाखरे म्हणाले.
एक नक्की, फक्त कोपर्डी गावासाठी आणि या खटल्यासाठीच नव्हे, तर हा दिवस महाराष्ट्राच्या सामाजिक आणि न्यायालयीन इतिहासात एक महत्त्वाचा दिवस होता.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








