शिक्षणासाठी बंड करत अंजुमनं झुगारलं बालविवाहाचं बंधन
- Author, श्रीकांत बंगाळे आणि अमेय पाठक
- Role, बीबीसी मराठी
अंजुम सय्यद ही अहमदनगरच्या शेवगाव इथ राहते. लग्नानंतर आठच दिवसांनी तिनं घटस्फोट घेतला. कारण, तिला शिकायचं होतं.
अल्लाउद्दीन सय्यद हे अंजुमचे वडील. सततच्या आजारपणामुळं त्यांना कामं करणं शक्य होत नाही. अंजुमची आई मजुरी करुन घर चालवते.
सय्यद यांना एकूण पाच अपत्य. अंजुम त्यातली एक. घरच्या गरिबीमुळं त्यांनी लहान वयात अंजुमचं लग्न केलं.
लग्न करताना अंजुमची मर्जी विचारात घेण्यात आली नाही.
"वयाच्या सतराव्या वर्षी माझं लग्न करण्यात आलं," असं अंजुम सांगते.
मेंदी, हळद आणि लग्न हे सर्व काही एका दिवसात उरकण्यात आले. अंजुम सासरी गेली.
लग्नानंतरचं आयुष्य
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पतीला रातांधळेपणा असल्याचं अंजुमच्या लक्षात आलं. यामुळे तिच्या मनावर जबरदस्त आघात झाला.

एकतर मनाविरुद्ध झालेलं लग्न आणि दुसरं म्हणजे नवऱ्याच्या आजाराविषयी न दिलेली कल्पना यामुळं ती हादरून गेली. आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं.
पण याही अवस्थेत ती नवऱ्यासोबत नांदायला तयार होती.
कारण लग्नानंतर तिचं शिक्षण सुरू ठेवण्याचं आश्वासन नवऱ्याच्या घरच्यांकडून तिला देण्यात आलं होतं.
पण अंजुमनं आपल्या शिक्षणाचा विषय काढताच, 'आता आपलं लग्न झालं आहे. आता काय गरज शिकायची? इथून पुढं मी जे म्हणेन तेच तू करायचं,' असं तिला नवऱ्याकडून सांगण्यात आलं.
तेव्हा मात्र लग्नाच्या जाचातून सुटण्याचा निर्णय अंजुमनं घेतला.
लग्नातून सुटका
अंजुमने तिच्या आई-वडिलांना नवऱ्याच्या रातांधळेपणाबद्दल सांगितलं. तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. कारण, लग्नापूर्वी त्यांनाही नवऱ्या मुलाच्या घरातून याबाबत काहीच कल्पना देण्यात आली नव्हती.
'तुला नवऱ्याच्या घरी राहायचं आहे का?' असं अंजुमच्या वडिलांनी तिला विचारलं. त्यावर तिनं ठामपणे 'नाही' म्हणून सांगितलं.
मग वडिलांनीही तिला पाठिंबा देत तिचा घटस्फोट घडवून आणला.
आई-वडिलांची बदलली मानसिकता
गरिबीमुळे अंजुमच्या आई-वडिलांनी तिचं लग्न केलं होतं. पण लग्नानंतर मुलीची अवस्था बघून त्यांना आपल्या निर्णयाचा पश्चाताप झाला.
नुसताच पश्चाताप नाही तर त्यांची मानसिकताही बदलली.

लग्नाबद्दल तिचे वडील सांगतात, "लहान वयात मुलीच्या लग्नाचा निर्णय योग्य नव्हता. तो निर्णय आम्ही घ्यायला नको होता. त्यामुळे मुलीचं नुकसान झालं."
तिचे वडील पुढे सांगतात, "आज ती शिकते आहे. तेव्हा आम्हाला तिचा अभिमानच वाटतो आहे. आता मला वाटतं... मला मुलं नसती, सगळ्या मुलीच असत्या तरी चाललं असतं. माझं चांगलंच झालं असतं."
पालकांनी मुलींना शिकवायला हवं, असंही ते आग्रहाने सांगतात.

"आई म्हणून जेव्हा मी लेकीकडे बघते, तेव्हा मला तिचा अभिमान वाटतो. आज मुलाच्या ठिकाणी मुलगीच माझा अभिमान ठरली आहे," असं अंजुमची आई सुलताना सय्यद सांगतात.
अंजुमचा मोठा भाऊ कमावता झाल्यानंतर आई-वडिलांना आणि भांवंडाना सोडून दुसरीकडे राहायला गेला. म्हणूनच तिच्या आई-वडिलांना आज मुलापेक्षा मुलीचा अभिमान वाटतो. ते त्यांच्या बोलण्यातूनही दिसून येतं.
पुन्हा शिक्षणास सुरुवात
घरी परतल्यानंतर अंजुमला लवकरात लवकर शिक्षण सुरू करायचं होतं. पण घरच्या परिस्थितीमुळे तिला ते शक्य होत नव्हतं.

नंतर एके दिवशी मलाला युसुफझाईच्या आयुष्यावरील 'ही नेम्ड मी मलाला' हा चित्रपट अंजुमनं पाहिला.
मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी स्नेहालय या संस्थेनं अंजुमच्या गावात या सिनेमाचं स्क्रीनिंग आयोजित केलं होतं. तिथं अंजुमनं तो सिनेमा पाहिला आणि तिचा आत्मविश्वास उंचावला.
"मलाला एवढी छोटी असूनसुद्धा इतकं धाडस दाखवू शकते, तर तिच्यापेक्षा मोठी असलेली मीसुद्धा काहीही करू शकते," असं तो सिनेमा बघून वाटल्याचं अंजुम सांगते.
त्यानंतर लगेच तिनं स्नेहालय संस्थेशी संपर्क साधून त्यांच्यासमोर शिक्षणाची इच्छा व्यक्त केली.
याच संस्थेच्या मदतीनं सध्या ती राहुरी इथल्या आशीर्वाद नर्सिंग स्कूलमध्ये शिकत आहे.
इतर मुलींना संदेश
संकटांचा सामना करणाऱ्या मुलींना अंजुम सांगते, "संकटाने कधीच खचून जाऊ नका. नेहमी हिंमत ठेवा. सोपे मार्ग सहजासहजी कुणालाही सापडतात."
"आपण लकी आहोत, म्हणून आपल्याला अवघड मार्ग सापडलाय. कारण त्याच्यातून निघूनच आपण दाखवू शकतो की आपल्यामध्ये हिंमत आहे."
"देव असा डायरेक्टर आहे, जो अवघड रोल बेस्ट अॅक्टरलाच देतो. त्यामुळं तुम्ही असं समजा की, आपण बेस्ट अॅक्टर आहोत. आणि आपण जगामध्ये बेस्टच करून दाखवणार आहोत." अंजुम मुलींना सांगते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









