पाहा व्हीडिओ : पहिल्या महायुद्धातल्या भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी अंत्यसंस्कार
- Author, राहुल जोगळेकर
- Role, बीबीसी प्रतिनिधी, लंडन
फ्रान्सच्या लवंटी गावात त्या दिवशी वेगळंच वातावरण होतं. तयारी सुरू होती दोन शहीद जवानांच्या अंत्यसंस्काराची.
पण हे दोन सैनिक फ्रेंच नव्हते. ते भारतीय सैनिक होते आणि शंभर वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्या महायुद्धात ब्रिटनसाठी लढताना धारातीर्थी पडले होते.
2016 मध्ये उत्तर फ्रान्सच्या लवंटी शहरात एका नाल्याचं रुंदीकरण सुरू होतं आणि त्यावेळी इथं काही अवशेष सापडले. ते कुणाचे, कळूच शकत नव्हतं, कारण कित्येक दशकांपासून जमिनीखाली असल्यानं त्या मृतदेहांचं काहीच उरलं नव्हतं. फक्त काही हाडं, आणि एक '39' क्रमांकाचा बिल्ला.
त्यावरून अंदाज बांधण्यात आला. आणखी काही पुरावे सापडले आणि स्पष्ट झालं की हे मृतदेह सैनिकांचे होते. एकेकाळा त्यांच्यावर गणवेश होता.
त्या बिल्ल्यामुळे त्यांची ओळख पटली. ते एका भारतीय रेजिमेंटचे होते. आणि मग त्यांच्यावर नुकतंच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
39 रॉयल गढवाल रेजिमेंट
हे सैनिक 39व्या रॉयल गढवाल रायफल्स रेजिमेंटचा भाग होते. गढवाल रेजिमेंटच्या दोन तुकड्या ब्रिटन सरकारनं 1914-15मध्ये फ्रान्स आघाडीवर पाठवल्या होत्या.
गढवाल रायफल रेजिमेंटचं भारतात आजही अस्तित्व आहे. फ्रान्सनं त्यांना या शोधाबद्दल संपर्क केला. एका शतकाहून अधित काळ लोटल्यानंतर अशी कुणाचीतरी खबर येणं अनपेक्षित आणि फारच दुर्लभ होतं.
या रेजिमेंटचे सध्याचे प्रमुख इंद्रजीत मुखर्जी जातीनं फ्रान्सला गेले. आणि त्यांच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय युद्ध नियमांनुसार तिथंच या सैनिकांवर अंत्यसंस्कार झाले.

पंरपरेनुसार भारतीय तिरंग्यात शवपेटी गुंडाळण्यात आली होती. हिंदू पुजाऱ्यांनी मंत्रपठण केलं. गढवाल रेजिमेंटच्या बॅगपाईपर्सनी अधिकृत धून वाजवली.
मोजकेच भारतीय नागरिक, फ्रान्समधले भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा आणि भारतातून अंत्यविधीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनी या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. काही अनिवासी भारतीयही या अनोख्या क्षणाचे साक्षीदार झाले.
'द लास्ट पोस्ट'
अंत्यविधीला उपस्थित भारतीय वंशाचे फ्रान्सचे नागरिक वेदप्रकाश म्हणाले, "युद्ध म्हणजे वाईट प्रवृत्तींचा नायनाट. त्यासाठी प्राणांची आहुती दिलेले हे दोन वीर आहेत. अशा सर्व सैनिकांच्या प्रती श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही इथं जमलो आहोत."
प्रथेप्रमाणे सैनिकांच्या अंत्यविधीसाठी 'द लास्ट पोस्ट' ही धून वाजवण्यात आली. जवानांचे मृतदेह सापडले त्या ठिकाणची माती आठवण म्हणून भारतीय सैन्याला देण्यात आली.
पहिल्या महायुद्धात ब्रिटनच्या बाजूनं जवळपास दहा लाख सैनिक युद्धात उतरले होते. यात जवळपास 60 हजारांना वीरमरण आलं. युद्धाच्या काळात सर्वाधिक जीवितहानी फ्रान्समध्ये झाली जिथं अनेक निर्णायक लढाया झाल्या. यात भारतीय सैनिकही सहभागी झाले होते.
त्यामुळेच लवंटी बरोबरच न्यू चॅपेल भागातही भारतीय सैनिकांच्या स्मृती जपण्यात आल्यात.
इथल्या स्मारकावर शहीद भारतीय सैनिकांची नावं कोरण्यात आली आहेत. आणि दरवर्षी इथं स्मृतीदिन पाळला जातो. त्यादिवशी शहिदांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येतो.
उत्तर फ्रान्समध्ये झालेल्या या युद्धात गब्बर सिंग नेगी सहभागी झाले होते. युद्धातल्या पराक्रमासाठी त्यांना व्हिक्टोरिया क्रॉसही मिळालं. आज त्यांच्या घराण्यातली तिसरी पिढी भारतीय लष्करात कार्यरत आहे.

'द कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह्ज कमिशन'च्या अधिकाऱ्यांशी आम्ही या संदर्भात संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू वे चॅपलमध्ये 10 ते 13 मार्च 1915 दरम्यान घनघोर लढाई झाली. या लढाईत भाग घेतलेल्या आणि शहीद झालेल्या भारतीय सैनिकांचे मृतदेह जवळच्या दफनभूमीत दफन करण्यात आले आहेत.
"शंभर वर्षांपूर्वी झालेलं हे युद्ध आहे. या सैनिकांबद्दल आम्हाला आदर आहे. इतर युरोपीय सैनिकांच्या बरोबरीनं एक हजार पेक्षा जास्त भारतीय सैनिकांच्या समाधी इथं आहेत," ग्रेव्ह्ज कमिशनच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
न्यू वे चॅपेलमधलं सैनिकी स्मारक
इथं झालेल्या युद्धात मित्र सैन्यांच्या तुकड्यांचं नेतृत्व सर डग्लस हेग यांनी केलं. सुरुवातीला भारतीय सैनिक प्रत्यक्ष युद्धात नव्हते. पण, हळूहळू तेही युद्धभूमीवर उतरले.
तुंबळ युद्धात निम्म्या भारतीय सैनिकांनी प्राणांची आहुती दिली. दर वर्षी इथं जेव्हा सैनिकांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम होतो तेव्हा इथले भारतीय वंशाचे नागरिकही त्यात मोठ्या संख्येनं सहभागी होतात.
या अंत्यसंस्कारावेळी हजर रणजीत सिंग यांनी बीबीसीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या, "भारतीयांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. सैनिकांच्या स्मृती आम्हाला इतिहासाशी जोडतात. शंभर वर्षांपूर्वी भारतीय सैनिक या भूमीवर युद्ध लढले होते. आपल्या इतिहासाच्या पु्स्तकात याची नोंद नाही. पण इथं प्रत्यक्ष आम्ही त्यांचा इतिहास पाहतो आहोत."
आणखी वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









