'कोपर्डी असो वा खैरलांजी, महिलेची जात न पाहता तिला जलद न्याय मिळावा'

फोटो स्रोत, Swati Nakhate
- Author, अॅड. स्वाती नखाते
- Role, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी तीनही आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे. जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांना येत्या 22 तारखेला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. याविषयी लिहीत आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र समन्वयक अॅड. स्वाती नखाते :
कोपर्डी इथल्या एका 14 वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. 13 जुलै 2016 पासून ते 18 नोव्हेंबर 2017 असा बराच काळ उलटून गेला. या काळात महाराष्ट्रात अन्यायाविरोधात आवाज उठवणारे व न्याय मागणारे बरेचसे मराठा क्रांती मोर्चे निघाले.
याची सुरुवात औरंगाबाद इथून झाली. बघता बघता कोपर्डीच्या ताईसाठी एकामागून एका जिल्ह्यात मोर्चे निघू लागले. बघता बघता महाराष्ट्राबाहेरही ही क्रांती न्याय मागण्यासाठी उसळू लागली. भारतातच काय, परदेशातूनही मूक मोर्चे निघाले.
कोर्ट प्रक्रियेनुसार हा खटला विलंब न लावता उज्ज्वल निकम साहेब लढत होते. पण अशा घटना फास्ट ट्रॅक कोर्टात येऊनही दीड वर्ष लागत असेल, तर त्या मुलीला न्याय लवकर मिळाला, असं कसं म्हणता येईल?
माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. एक वकील म्हणून मी समाधानी आहे. इतर केसेसमध्ये पाच-पाच वर्षं आरोपपत्रसुद्धा येत नाही. त्या तुलनेत या प्रकरणी जलद न्याय मिळाल, असं म्हणायला हवं.
पण एक व्यक्ती म्हणून मला वाटतं की यापेक्षाही कमी वेळात त्यांना शिक्षा सुनावली जायला हवी होती.

फोटो स्रोत, Swati Nakhate
या दोषींना न्यायव्यस्थेनुसार शिक्षा व्हावी. सर्वसामान्य लोकांची आणि समाजाची अपेक्षा आहे की त्यांना फाशीची शिक्षा व्हावी.
महिलेला जात नसते
हेच प्रकरण का, महिलांवर अन्याय झालेली सर्व प्रकरणं फास्ट ट्रॅक केली पाहिजेत. अन्याय झालेल्या महिलेची जात न पाहता ती महिला आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे.
कोपर्डी असो वा खैरलांजी, महिलेची जात न पाहता तिला जलद न्याय मिळावा.
पण एवढं सगळं होऊनही राज्यातल्या राज्यातल्या महिलांना सुरक्षित वाटेल, असं कोणतंही पाऊल शासनाने उचललं नाही. मुंबईसारख्या शहरात महिलेवर अत्याचार होत असताना तिला जीव वाचवण्यासाठी चालत्या ट्रेनमधून उडी मारावी लागते.
महिलांना घरामध्ये सुरक्षित वाटत नाही. ग्रामीण भागात शालेय मुलीवर अत्याचार करून, तिला मारून दरीत फेकलं जातं. त्यामुळे मला वाटतं की गेल्या दीड वर्षात सुरक्षा वाढण्याऐवजी कमी झाली आहे.
मराठा आंदोलन पुनरुज्जीवित होणार?
मराठा क्रांती मोर्चे हे जगावेगळ्या पद्धतीने निघाले आणि सगळ्या जगाने त्यांची दखल घेतली. या मूक आंदोलनाची पद्धत आणि रचना इतर चळवळींपेक्षा वेगळी होती.

फोटो स्रोत, VAISHALI GALIM
या मोर्चांचं नेतृत्व करायला मोठे नेते नव्हते. पण तरीही प्रचंड जनसमुदाय सहभागी झाला. आम्हाला 60 टक्के यश मिळालं आहे. चळवळीच्या आत अनेक गोष्टी होत असल्याने बाहेरच्या लोकांना दिसून येत नाहीत.
हळूहळू का होईना आंदोलन पूर्ण यशस्वी होणारच. आमच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करून घेणारच.
मराठा आंदोलन ज्या मागण्यांसाठी सुरू झालं, त्या अजून साध्य झाल्या नाहीत. त्यामुळे मराठा आंदोलन नक्कीच पुनरुज्जीवित होईल.
हे जेव्हा पुनरुज्जीवित होईल, तेव्हा त्याचे स्वरूप नक्कीच पहिल्यापेक्षा वेगळं असेल.
या आंदोलनामुळे मराठा आणि दलित समाजात कुठलीही दरी निर्माण झालेली नाही. काही राजकीय लोक राजकारणासाठी नक्कीच दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. त्यापासून सगळ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे.
मराठा समाज स्वतःचा हक्क आणि न्याय मागत आहे. दलित समाज त्यांना जे वाटतं ते मागत आहे. शेवटी आपला पूर्ण समाज हा एकच आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








