पाहा व्हीडिओ – हिंगोली : पवार कुटुंबातल्या चौघांना मारणारे तीन वर्षांनंतरही मोकाट!
- Author, अमेय पाठक
- Role, बीबीसी मराठीसाठी
महाराष्ट्रात गेल्या पंधरवाड्यात दोन मोठी प्रकरणं न्यायालयानं मार्गी लावली - नितीन आगे खून खटल्यात सर्व आरोपींची सबळ पुराव्यांअभावी सुटका झाली तर कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणात तीनही आरोपींना नगरच्या एका न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. मात्र राज्यात अशी अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत आणि पीडितांच्या कुटुंबीयांना न्यायाची प्रतीक्षा आहे.
हिंगोलीचं पवार कुटुंबही गेल्या तीन वर्षांपासून कुटुंबातल्या गमावलेल्या चौघांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत आहेत. याप्रकरणी आरोपी मोकाट आहेत आणि पवार कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
अहमदनगरच्या कोपर्डी घटनेनंतर राज्यातल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. कोपर्डीच्या पीडित बालिकेवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध अनेक आंदोलनं झाली. त्यामुळेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात गेलं, आरोपींवरचे गुन्हे सिद्ध झाले आणि न्यायालयानं त्यांना फाशीची शिक्षाही सुनावली.
आपल्या मुलाबाळांना गमावल्याचं दु:ख कधीच भरून निघत नाही. पण किमान दोषींना शिक्षा झाल्यानं त्यांच्यात न्याय मिळाल्याची भावना तरी आहे. पण कित्येक पीडित आणि त्यांचे कुटुंबीय आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत न्यायालयाच्या पायऱ्या आपल्या अश्रूंनी झिजवत आहेत.

शहरी झगमगाटापासून 15 किलोमीटर दूर हिंगोली जिल्ह्यातलं जोडतळ हे छोटंसं गाव. इथली लोकसंख्या जेमतेम हजार आहे. आणि याच गावात फासेपारधी समाजाचं प्रतिनिधित्व करणारं पवार हे एकमेव कुटुंब.
सुंदरसिंग पवार या कुटुंबात कर्ते पुरुष होते. चार मुली, दोन मुलं आणि पत्नी मंगलबाई यांच्यासह सुंदरसिंग गावाजवळच्या गायरान (गाईंना चरण्यासाठी अलिखितपणे वापरली जाणारी जमीन) जमिनीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा.
12 जून 2014च्या रात्री या कुटुंबातल्या तीन तरुण मुली आणि त्यांच्या वडिलांचा खून झाला. संपूर्ण जिल्हा हादरवून सोडणाऱ्या या भीषण हत्याकांडामागे ज्यांचा हात होता, ते अद्यापही मोकाट आहेत.
आता या कुटुंबीयांपैकी आई, दोन मुलं आणि एक मुलगी हयात आहे.

मंगलबाई पवार यांच्यानुसार गायरान जमीन कसत असल्यानं गावकरी पवार कुटुंबीयांचा राग करायचे. पारधी समाजापासून धोका होऊ शकतो, अशी भीती गावकऱ्यांच्या मनात आहे.
यातूनच गावकरी आणि पवार कुटुंबीयांमध्ये वाद व्हायचे. या वादाचं पर्यवसन वैयक्तिक भांडणात झालं, आणि मग सुंदरसिंग यांची धाकटी मुलगी कोमल या संघर्षाची पहिली बळी ठरली.
19 जानेवारी 2014ला 14 वर्षांच्या कोमलचा विनयभंग करण्यात आला. पवार कुटुंबीयांनी गावातल्याच संदीप कराले, मारुती जाधव आणि लखन जाधव यांच्याविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पण काहीच निष्पन्न झालं नाही.
अखेर सुंदरसिंग यांनी चारही मुलींना मुंबईत नातेवाईकांकडे पाठवलं. तिथं मंदाकिनी आणि पूनम पोलीस भरतीसाठी तयारी करत होत्या.
घटनेच्या दरम्यान दोघी सुट्टीत गावी आल्या होत्या. सरावासाठी त्या घराजवळ असलेल्या तलावात पोहायला जायच्या.
ती काळरात्र
पूनम, मंदाकिनी, पूजा आणि त्यांचे दोन्ही भाऊ देवानंद आणि गोपाळ घराजवळच्या तलावात पोहायला गेले होते. त्यातच मंदाकिनी, पूजा आणि पूनम या तिघी बुडाल्या. या तिघींना वाचवण्यासाठी सुंदरसिंग आले आणि त्यातच या चौघांचाही मृत्यू झाला.
दोघा भावांनी घटनास्थळाहून पळ काढल्यामुळे ते बचावले. केवळ हेच दोघं या घटनेचे साक्षीदार आहेत.
गोपाळ आणि देवानंद यांच्या म्हणण्यानुसार सुनील जाधव आणि त्याच्या दोन साथीदारांनी तिन्ही बहिणींना पाण्यात बुडवलं. आणि त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या त्यांच्या बाबांनाही मग जीवे मारण्यात आलं.
आता काय स्थिती?
घटनेनंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. भीतीपायी पवार कुटुंबीयांनी गाव सोडलं.
प्रकरण न्यायालयात गेलं. तीनही आरोपी निर्दोष असल्याचा अहवाल पोलिसांकडून हिंगोली न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

आज तीन वर्षांनंतरही पवार कुटुंबीयांना न्यायाची प्रतीक्षा आहे.
मंगलाबाई सांगतात, "आम्ही काय गुन्हा केला? माझ्या मुलींना का मारलं? माझ्या पतीलाही जबर मारहाण करून मारण्यात आलं. आमच्यावर अन्याय झाला आहे!"
"आम्ही गायरानात राहतो. पारधी समाजाची माणसं आम्हाला नकोत, असं गावकऱ्यांनी सांगितलं. 'तुम्हाला जीवे मारू!' अशा धमक्या देत होते."
"कोमलच्या छेडछाडीविरुद्ध तक्रार दाखल केल्यामुळे सातत्याने धमकावलं जातं की, "चार जणांना मारलं. तुम्हालाही सोडणार नाही!" भटका समाजातून असल्यानं आमच्यावर खोटा आळ घेतला जातो," मंगलाबाई यांनी केला.
"त्यावर्षी (2014च्या) जून महिन्यात मराठवाड्यात, हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ असताना चार जण बुडतील, एवढं पाणीही तलावात नव्हतं. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तिन्ही मुली पोहण्यात तरबेज होत्या," त्या सांगतात.
"कोमलच्या विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत ही घटना घडली. असं का?"
पवार कुटुंबीयांच्या मनातले असे अनेक प्रश्नं अनुत्तरित आहेत. "न्याय कागदावरच असतो का?" असा सवाल मंगलबाई करतात.

कोपर्डीच्या पीडितेप्रमाणं आता त्यांनाही न्याय मिळावा, यासाठी आता त्यांनी मुख्यमंत्र्यांनासुद्धा साकडं घातलं आहे.
दरम्यान, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं हिंगोली जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी सांगितलं.
पोलिसांनी याप्रकरणाचा तपास पूर्ण केला असून पुरावे नसल्याचं अंतिम अहवालात स्पष्ट केलं आहे. तो अहवाल त्यांनी हिंगोली सत्र न्यायालयात पाठवला आहे.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









