विश्लेषण : गुजरात निवडणुकीत विकास आधी पागल झाला आणि मग धार्मिक!

फोटो स्रोत, FACEBOOK/RAHUL GANDHI
- Author, पारस के. झा
- Role, बीबीसी गुजराती
गुजरात निवडणुकीत प्रचार सुरू झाला तो विकासाच्या मुदद्यावर. '#विकास_पागल_झाला_आहे' आठवतं? मग ऐन मतदानाच्या तारखेपर्यंत पोहोचता पोहोचता मंदिरं, जात आणि जानव्यावरून राजकारण झालं, आणि "विकास धार्मिक होत गेला"!
आता लोक पागल झालेल्या विकासाला मत देतात की धार्मिक झालेल्या विकासाला, हे 18 डिसेंबरला लागणाऱ्या निकालातूनच कळेल.
गुजरात निवडणूक प्रचारात अनेक नवीन आणि आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या.
काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाच्या मुद्दयावर पुढे जात राहिली आणि भाजपनं विकासाच्या मुद्द्याला बाजूला सारत शेवटी राम मंदिर, तीन तलाक आणि राहुल गांधींच्या धर्मासारखे मुद्दे समोर आणण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसनं गुजरात आणि गुजरातच्या नेत्यांबरोबर अन्याय केला, या गोष्टीचा देखील भाजपनं प्रचार केला.
या निवडणुकीत लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की, पंतप्रधान मोदींच्या सभेपेक्षा हार्दिक पटेलच्या सभांना जमलेल्या गर्दीमुळे भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण दिसून आलं.
हटके प्रचार
सरदार पटेल विद्यापीठातल्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख बलदेव आग्जा यांनी सांगितलं की, या निवडणुकीत गेल्या 13 निवडणुकांपेक्षा वेगळा प्रचार बघायला मिळाला.
काँग्रेसनं अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करण्याच्या प्रतिमेतून बाहेर पडत सॉफ्ट हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला. राहुल गांधींचे प्रचार दौरे अनेक मंदिरांभोवती केंद्रीत होते. काँग्रेसनं शहरी मध्यमवर्ग आणि हिंदुत्वाबरोबर स्वत:ला जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
प्रा. आग्जा पुढे सांगतात की, भाजपनं त्यांचा प्रचार विकासाच्या मुद्दयावर सुरू केला. पण तो विकास समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत कधी पोहोचलाच नाही. त्यामुळे लोकांना त्याचा प्रभाव दिसला नाही.
म्हणून सुरुवातीच्या 10 दिवसात विकासाच्या आधारावर असलेला प्रचार हिंदुत्वाच्या मार्गानं वळला आणि विकास शेवटी धार्मिक झाला.
ते पुढे म्हणतात, "गुजरात हे विविध घटनांमुळे प्रभावित होणारं राज्य आहे. इथं होणाऱ्या घटनांचा लोकांच्या मनावर लगेच परिणाम होताना दिसतो. म्हणून 2015 साली सुरू झालेलं पाटीदार समाजाचं आंदोलन या निवडणुकीत भाजपच्या विरोधात गेलं आहे."
विकास हा मुद्दाच नाही
विकास हा भाजपच्या दृष्टीनं प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल, पण गुजरातच्या जनतेला तसं वाटत नाही. भाजपनं विकासाच्या मुद्दयांवर बोलण्याऐवजी, 1979 साली मोरबीच्या दुर्घटनेनंतर कसा इंदिरा गांधींनी नाकावर रुमाल ठेवला होता, असले विषय उकरून काढले.
भाजपला मात्र त्याचा अपेक्षित फिडबॅक जनतेकडून मिळताना दिसला नाही.

फोटो स्रोत, AFP
याबाबतीत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक उर्विश कोठारी सांगतात, "निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात कोणत्याही पक्षानं केली नव्हती. #विकास_पागल_झाला_आहे हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि माझ्यामते तोच एक निर्णायक क्षण होता. या ट्रेंडची सुरुवात पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे झाली होती."
"गुजरातच्या निवडणुकीत आधी कधीच असं झालं नाही की, जनतेनं एखादा मुद्दा उपस्थित केला किंवा लोकांचा असंतोष इतक्या स्पष्टपणे दिसून आला. मग विरोधी पक्षानं त्याच मुद्द्याचा निवडणुकीच्या प्रचारात वापर केला."
ते पुढे सांगत होते की, "काँग्रेसला याच मुद्द्याचं भांडवल करायचं होतं आणि ते त्यांनी अगदी योग्य प्रकारे केलं. काँग्रेसला नेहमीप्रमाणे प्रचारासाठी उशीरा जाग आली. #विकास_पागल_झाला_आहे हा ट्रेंड जेव्हा सुरू झाला तेव्हासुद्धा काँग्रेसला जाग आली नव्हती. पण जेव्हा काँग्रेसनं प्रचार सुरू केला तेव्हा राहुल गांधींना एका उत्तम कॉपीराईटरची साथ लाभल्याचं स्पष्टपणे दिसून येत होतं. त्यांच्या भाषणात एक अशी ताकद दिसली जी यापूर्वी कधीही नव्हती."
"निवडणुकांच्या वेळी अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करण्यासाठी काँग्रेस बदनाम आहेच. ते चूक की बरोबर, हा विषयच वेगळा. पण गुजरातमध्ये यंदा राहुल गांधी यांनी हे सोपस्कार करण्यापासून एक सोयीस्कर अंतर राखलं होतं. त्यामुळेही विरोधी पक्षाला जो मुद्दा हवा होता तो त्यांना मिळाला नाही."
प्रचारादरम्यान काय-काय झालं?
कोठारी पुढे म्हणाले की, "भाजपला #विकास_पागल_झाला_आहे या ट्रेंडला विरोध करावा लागला. कारण ज्या विकासाच्या 'गुजरात मॉडेल'वर त्यांनी देशात सत्ता मिळवली होती, तोच मुद्दा आता गुजरातमध्ये पणाला लागला होता.
"एकाबाजूला गुजरातमध्ये खरंच विकास झाला आहे, हे सिद्ध करायचं आहे. तर दुसऱ्या बाजुला काँग्रेस आधीसारखीच डागाळलेली आहे, ती फार भ्रष्टाचारी आहे, हे सुद्धा भाजपला सिद्ध करायचं आहे."
भाजपनं निवडणुकीच्या प्रचारात विकासाच्या मुद्दयावर बचावात्मक भूमिका घेतली. पण जेव्हा ते बाकी मुद्दयांवर आक्रमक झाले तेव्हा काही न काही कारणांमुळे त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहचलाच नाही.
मागच्या एक महिन्यात भाजपनं 15-20 वेळा वेगवेगळ्या मुद्यांना आक्रमकतेनं पुढे आणण्याचा प्रयत्न केला. पण एकाही मुद्दयामुळे हवा भाजपच्या दिशेनं वाहताना दिसली नाही. हे मागच्या निवडणुकांपेक्षा वेगळं आहे.
यापूर्वी निवडणुकांच्या आधी भाजपचे लोक एक मुद्दा पुढे करायचे. त्यामुळे लोकांमध्ये एक लाट निर्माण व्हायची, जिच्यावर स्वार होऊन लगेच निवडणुकांच्या आधीच निकाल निश्चित व्हायचे. पण यंदा असं चित्र निर्माण करण्यात भाजपला अपयश आल्याचं दिसत आहे.
सोशल मीडियावर भाजप अयशस्वी
कोठारी सांगतात की, मैदानात उतरून प्रत्यक्ष प्रचारातच नव्हे तर तगड्या सोशल मीडियाच्या बळावरही भाजपला आपलं पारडं जड करता आलं नाही.
तिकडं काँग्रेस आधी लोकांच्या समस्यांबद्दल बोलत नव्हती. पण आता त्यांच्या प्रचाराच्या व्हीडिओंमध्ये ते लोकांच्या मुद्दयांवर बोलताना दिसत आहेत. मग ती गुजरातची अस्मिता असो वा बेरोजगारी किंवा महिलांच्या सुरक्षेसारखे मुद्दे.
याबाबतीत बोलताना निवडणूक विश्लेषक डॉ. आय. एम. खान सांगतात, "राहुल गांधी सध्या सॉफ्ट हिंदुत्वाकडे वळले आहेत. बहुसंख्य मतदारांना समोर ठेवून आधी भाजपचे लोक जे बोलायचे, तेच आता ते बोलत आहेत. मुस्लीम हे काँग्रेसचे निष्ठावान मतदार आहेतच. पण यामुळे आता त्यांचा हा प्रश्न आहे की राहुल प्रचारासाठी मंदिरात गेले, मग मशिदीत का गेले नाहीत?"
ते पुढे सांगतात की, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी जादुगार लोकांनी प्रचार केला होता. तोच प्रयोग गुजरातमध्ये परत केला आहे.
"पण हा प्रयोग आता अल्पउत्पन्न गटात किती यशस्वी होतो, हे बघावं लागेल. भाजपनं GST आणि नोटाबंदी या निर्णयाच्या बचावात तसंच महागाईबाबत काहीही म्हटलेलं नाही. भाजपनं आता गुजरात आणि गुजरातीचा मुद्दा उचलून धरला आहे."
या सर्व घडामोडींमध्ये लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की, कोणताच पक्ष यावेळी धार्मिक ध्रुवीकरणाबद्दल बोलत नाही आहे. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा राम मंदिराचा उल्लेख केला, पण तो कपिल सिब्बल यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात केला. आणि तरी त्यांनी त्याला धर्मनिरपेक्षतेचा रंग दिला नाही.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)










