'टीम राहुल' मध्ये कुणाकुणाचा नंबर लागणार?

फोटो स्रोत, PTI
राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणार हे निश्चित आहे. त्यांच्या टीममध्ये नक्की कोण कोण असेल, याबाबत आता कयास बांधले जात आहेत.
काँग्रेसमध्ये अनेक गट पडले आहेत. जुने नेते स्वतःला ओल्ड गार्ड म्हणवतात आणि युवा नेता म्हणवून घेणाऱ्यांचीही पक्षात कमतरता नाही.
राहुल गांधींच्या नव्या टीममध्ये भारताच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या समाजांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांचा समावेश असावा असा तर्क आहे.
मग असे कोणते चेहरे आहेत ज्यांची 'टीम राहुल' मध्ये वर्णी लागेल? याबाबत बीबीसीने ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवईंशी चर्चा केली.
1. अजय माकनः माजी केंद्रीय मंत्री अजय माकन राहुल गांधींच्या जवळचे मानले जातात. माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे विरोधक असूनही त्यांना दिल्ली काँग्रेसचं अध्यक्षपद मिळालं होतं.

फोटो स्रोत, FACEBOOK @AJAYMAKEN
2014 साली लोकसभा निवडणूकांपूर्वी त्यांना प्रसामाध्यमांची जबाबदारी दिली गेली. रशीद किडवईंच्या मते अजय माकन राहुल गांधींचे नवे राजकीय सचिव होऊ शकतात.
अहमद पटेल गेली अनेक वर्ष सोनियांचे राजकीय सचिव आहेत. या पदावरच्या व्यक्तीला पक्ष आणि अध्यक्षांमध्ये समतोल राखण्याबरोबरच इतर राजकीय पक्षांबरोबर ताळमेळ राखण्याचंही काम असतं. अजय माकन यांचे काका ललित माकन यांची ऐंशीच्या दशकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
2. कनिष्क सिंह:
राजकीय सचिवाबरोबरच दुसरं महत्त्वाचं पद आहे कोषाध्यक्षांचं. त्यांच्याकडे पक्षनिधीच्या हिशोबाचं मोठं काम असतं. सीताराम केसरी, मोतीलाल वोरांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी हे पद यापूर्वी सांभाळलं आहे.
रशीद किडवईंच्या मते कनिष्क सिंह या पदाचे प्रमुख दावेदार आहेत. त्यांनी जागतिक बँकेत काम केलं आहे आणि गेली अनेक वर्षं ते राहुल बरोबर आहेत.
रशीद किडवई म्हणतात, "कनिष्क यांनी बराच काळ मोतीलाल वोरांबरोबरही काम केलं आहे. काँग्रेसचे अनेक ट्रस्ट आहेत. असं ऐकिवात आहे की कनिष्क यांनी या काळात ट्रस्टमध्ये काम करण्याची पद्धत शिकून घेतली आहे."
3. दिव्या स्पंदना:
असं मानलं जातं आहे की दिव्या स्पंदना ऊर्फ रम्याने काँग्रेसच्या सोशल मीडियाची जबाबदारी उचलल्यापासून राहुल गांधींच्या प्रतिमेत बदल झालाय. काँग्रेसची सोशल मीडियावरची पकड मजबूत झाली आहे. दिव्या स्पंदना २०१३ साली कर्नाटकमधून संसदेत निवडून आल्या आणि सुत्रांच्या मते, राहुल गांधींनी स्वतः त्यांची सोशल मीडिया प्रमुखपदी निवड केली.

फोटो स्रोत, FACEBOOK @RAMYAACTRESSOFFICIAL
रशीद किडवई म्हणतात, "पुढल्या वर्षी कर्नाटकात निवडणुका आहेत. दिव्या निवडणुक लढवतील की त्यांना राहुल गांधींच्या टीममध्ये महत्त्वाची जागा मिळेल याबाबत चर्चा सुरू आहे."
4. सुष्मिता देव, शर्मिष्ठा मुखर्जी:
सुष्मिता देव या माजी काँग्रेस नेते आणि मंत्री संतोष मोहन यांच्या कन्या आहेत. शर्मिष्ठा मुखर्जी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या आहेत.

फोटो स्रोत, FACEBOOK/SUSHMITA DEV
रशीद किडवईंच्या मते या दोघींचा राहुल गांधींच्या टीममध्ये समावेश होऊ शकतो.
5. मिलिंद देवरा, सचिन पायलट, जितेन प्रसाद, ज्योतिरादित्य सिंधिया:
हे चारी युवा नेते गेली अनेक वर्षं राहुल गांधींचे निकटवर्ती आहेत. रशीद किडवईंच्या मते यांना टीम राहुलमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.
किडवईंच्या मते राहुलच्या नेतृत्वाखाली नव्या काँग्रेस वर्किंग कमिटीत अहमद पटेल,गुलाम नबी आझाद आणि कमल नाथ यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांना स्थान दिलं जाऊ शकेल.
सोनियांचं पक्षातलं भवितव्य
रशीद किडवई असं मानतात की, सोनिया गांधींनी पक्षात कोणतंही पद स्वीकारू नये, कारण त्यामुळे राहुल यांच्या कामात अडचणी येऊ शकतात. सोनियांचं पदावर असणं पक्षात दोन सत्ताकेंद्र निर्माण करेल.

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/AFP/GETTY IMAGES
किडवई सांगतात, "सोनिया जर निवृत्तीचा गांभीर्याने विचार करत असतील तर त्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा द्यावा."
"त्या काँग्रेसच्या खासदार राहू शकतात, किंवा काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्याही राहू शकतात, पण त्यांना पक्षात पद दिलं गेलं तर त्यांच्या कामात अडचणी येऊ शकतील."
दिग्विजय सिंग यांनी महासचिवपद का सोडलं?

फोटो स्रोत, MANPREET ROMANA/AFP/GETTY IMAGES
दिग्विजय सिंग यांचं भवितव्य
किडवईंच्या मते, दिग्विजय सिंग काँग्रेसच्या राजकारणाच्या परिघावर आले आहेत.
किडवई म्हणतात, "दिग्विजय सिंग नर्मदा यात्रा करत आहेत. ते चार महिन्यांनंतर परत येतील तेव्हा त्यांची अशी इच्छा असेल की, पुढल्या वर्षी मध्य प्रदेशात होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना सक्रिय भूमिका मिळेल."
"त्यांना काँग्रेस वर्किंग कमिटात स्थान मिळालं तर त्यांच्यासाठी ते चांगलंच ठरेल नाहीतर राजकीयदृष्ट्या ते परिघावर गेले आहेत."

फोटो स्रोत, FACEBOOK @DIGVIJAYASINGHOFFICIAL
सचिन राव एन एस यू आय आणि युवा काँग्रेसचं काम सांभाळतात तर कौशल विद्यार्थी हे ऑक्सफर्डमध्ये शिकले आहेत.
किडवई असं मानतात की, "सचिन राव, अलंकार, कैलाश सारख्या लोकांचं राहुल गांधींच्या गोटात महत्त्वाचं स्थान असू शकेल. जर काँग्रेस अध्यक्षांचं कार्यालय तयार झालं तर कदाचित या लोकांना तिथे महत्त्वाच्या भूमिका मिळतील."
किडवईंच्या मते, या नेत्यांना काँग्रेस वर्किंग कमिटीत जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. पण पक्षाच्या अनुसूचित जाती शाखेच्या के. राजू यांचं महत्त्व वाढू शकतं अशी शक्यता ते व्यक्त करतात.
तुम्ही ही क्विझ सोडवली आहे का?
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








