मुंबई चेंगराचेंगरी : डेडलाईनच्या गर्तेत अडकले मुंबई लोकलचे प्रकल्प

फोटो स्रोत, BBC
- Author, रोहन टिल्लू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
एल्फिन्स्टन रोड स्थानकात पुलावर शुक्रवारी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आता या प्रकरणाची चौकशीचे आदेश रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहेत.
पण अशा प्रकरणाच्या चौकशीचे आदेश रेल्वेमंत्र्यांना वारंवार द्यावे लागतील, अशी परिस्थिती सध्या मुंबईत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे अर्थसंकल्पांमध्ये मुंबईकरांना वेगवेगळ्या मोठमोठ्या प्रकल्पांचं गाजर दाखवत मुंबईकरांची भलामण केली गेली. पण या प्रकल्पांपैकी जेमतेम 30 ते 40 टक्के प्रकल्पच पूर्ण झाले आहेत.
पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्येही मुंबईच्या वाहतुकीची दिशा बदलण्याची क्षमता फारच कमी होती. त्यामुळे आता या रेल्वेच्या अपूर्ण वचनांमुळेच मुंबईकरांची वाताहत सुरू आहे, असं बोललं जात आहे.
अंधेरी ते गोरेगाव हार्बर मार्गाचे विस्तारीकरण या अनेक वर्षं रखडलेल्या प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या दिवशीच ही घटना घडली हे विशेष उल्लेखनीय आहे.

मुंबईकरांचा प्रवास सुरळीत करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (MRVC) मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (MUTP) राबवले जात आहेत.
सध्या या प्रकल्पाचा तिसरा टप्पा सुरू आहे. पण या तिसऱ्या टप्प्याची कामं सुरू होण्यापूर्वी दुसऱ्या टप्प्यातले अनेक महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत.
रखडलेले प्रकल्प
- पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी लाइन
- अंधेरी-गोरेगाव दरम्यान हार्बर मार्गाचे विस्तारीकरण
- सीएसएमटी-कुर्ला यांदरम्यान पाचवी-सहावी लाइन
- ठाणे-दिवा यांदरम्यान पाचवी-सहावी लाइन
- सीएसएमटी-पनवेल उन्नत जलद मार्ग
- वांद्रे-विरार उन्नत मार्ग
- प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे
- एसी लोकल
- परळ टर्मिनस
या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये सीएसएमटी-कुर्ला पाचवी-सहावी लाइन आणि ठाणे-दिवा पाचवी-सहावी लाइन या दोन प्रकल्पांचा समावेश आहे. या दोन प्रकल्पांमुळे मध्य रेल्वेच्या 43 लाख उपनगरीय प्रवाशांना दिलासा मिळणार आहे
या मार्गावर लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी स्वतंत्र लाइन तयार होतील आणि लोकल गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या वाढेल. ठाणे-दिवा या प्रकल्पासाठी 2019ची डेडलाइन ठेवण्यात आली आहे. तर सीएसएमटी-कुर्ला हा प्रकल्प पूर्ण होण्यात अनेक अडचणी आहेत
अडचणींचा डोंगर
दोन्ही प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने भूसंपादन ही मोठी अडचण आहे. दिवा-ठाणे यांदरम्यान मुंब्र्याजवळ बोगदा बांधण्याचं, मुंब्रा खाडीवर पूल बांधण्याचं काम पूर्ण झाले असले, तरी कळवा आणि मुंब्रा यांदरम्यान असलेल्या अनेक झोपड्यांमुळे हा प्रकल्प रखडल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येते.

हे मोठे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मोठा कालावधी लागत असताना गेल्या वर्षभरापासून मुंबईत एसी लोकल कुर्ला कारशेडमध्ये पडून आहे. ही गाडी मध्य रेल्वेवर चालवायची की पश्चिम रेल्वेवर या मुद्द्यावर आधी खल झाला. त्यानंतर या गाडीच्या चाचण्या सुरू झाल्या खऱ्या, पण अजूनही ही गाडी प्रवाशांच्या सेवेत आली नाही.
मुंबईतल्या पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील उन्नत जलद मार्गांचीही हीच अवस्था आहे. या मार्गांसाठीचा विस्तृत प्रकल्प अहवालही अद्याप तयार झालेला नाही.
आजची दुर्घटना जिथे घडली, तिथेच परळ टर्मिनस उभारण्यात येणार आहे. त्या टर्मिनसच्या आराखड्यातच इथल्या पादचारी पुलाच्या बांधकामाचा समावेश आहे. हे काम सुरू झालं असलं, तरी ते पूर्ण होण्यासाठी 2019 ची डेडलाइन रेल्वेने स्वत:समोर ठेवली आहे.

फोटो स्रोत, BBC
रेल्वेच्या प्रकल्पांचा इतिहास बघता, हे काम तेवढ्याच काळात पूर्ण होईल, याची सुतराम शक्यता नाही, असं मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे नंदकुमार देशमुख यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
या सगळ्या प्रकल्पांची कामं ठरलेल्या वेळेनुसार चालली आहेत. काही ठिकाणी भूसंपादनात अडचणी येत असल्यानं काही प्रकल्प रखडले आहेत.
पण त्या सर्व अडचणींवर तोडगा काढण्याचे प्रयत्न विविध पातळ्यांवर सुरू आहेत, असं मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सांगितलं.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)
.








