कारसोबत फरपटत गेलेल्या मुलीसोबत त्या रात्री काय घडलं?- ग्राउंड रिपोर्ट

- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कंझवाला प्रकरणााची चौकशी करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी मंगळवारी (3 जानेवारी) पत्रकार परिषद घेतली आणि त्यात एक नवीन माहिती समोर आली आहे.
दिल्ली पोलिसांचे विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सागर प्रीत हुड्डा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, “पीडित युवतीबरोबर आणखी एक मुलगी होती. अपघातात तिला कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर ती उठून चालायला लागली.”
ते म्हणाले, “आमच्याकडे जे प्रत्यक्षदर्शी आहेत ते पोलिसांना सहकार्य करत आहेत. कलम 164 नुसार त्याची साक्ष नोंदवली जात आहे. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.”
विशेष पोलीस आयुक्त हुड्डा यांनी दावा केला, “आरोपींना शिक्षा देण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं ठरेल. दिल्ली पोलिसांचा तपास लवकरच पूर्ण होईल. गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होईल.”
मृत युवतीचं शवविच्छेदन दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये केलं जात आहे. पोलिसांनी याबद्दल कोणतीही अतिरिक्त माहिती दिलेली नाही.
त्या रात्री काय झालं होतं?

फोटो स्रोत, ANI
त्या दिवशी रात्री 8 वाजून 29 मिनिटांनी फोनवर मुलीच्या आईने घरी कधी येणार असं विचारलं तेव्हा ती म्हणाली यायला उशीर होईल.
त्यानंतर मायलेकीची कोणतीही चर्चा झाली नाही. दुसऱ्या दिवशी एका महिला पोलिसानी फोन करून आईला सांगितलं की, "तुमच्या मुलीचा अपघात झाला आहे. पोलीस ठाण्यात या.”
कंझावला घटनेत जीव गमावणाऱ्या मुलीची आई रस्त्यातच होती जेव्हा तिला पोलिसांची गाडी घ्यायला आली. आधी त्यांना घटनास्थळी आणि मग सुल्तानपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.
मुलीची आई सांगते, “माझ्या मुलीबरोबर काय झालं हे मला सांगितलं नाही. मी पोलिसांना विनवणी करत राहिले, पण माझ्या मुलीला दाखवण्यात आलं नाही.”
त्यांच्या 20 वर्षांच्या मुलीचा 31 डिसेंबरच्या रात्री संदिग्ध स्थितीत मृत्यू झाला. ती तिच्या घरी एकटी कमावणारी होती. दोन दिवस उलटले तरी त्या रात्री काय झालं होतं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दिल्ली पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि त्यांनी या प्रकरणी 'हिट अँड रन'चा खटला दाखल केला आहे.
पोलिसांच्या मते सुल्तानपुरीच्या कृष्ण विहार भागात स्कुटीवर बसलेल्या एका मुलीचा अपघात झाला. तिचं शरीर कारमध्येच अडकलं आणि तब्बल 12 किलोमीटर घासलं गेलं. या अपघातात तिच्या शरीराचा एक भाग घासला गेला.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुलीचा मृतदेह दिल्लीच्या जौंती गावात नग्नावस्थेत सापडला. तिचे कपडे घासून फाटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घरात कमावणारी एकटीच
दिल्लीच्या मंगोलपुरी भागात एका अत्यंत छोट्या घरात मुलीची आई विषण्ण होऊन बसली आहे. या घटनेनंतर तिने काहीही खाल्लेलं नही.
मुलीची आई म्हणते, “आमच्याकडे दहा रुपये सुद्धा नाही. मुलीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही. माझी मुलगी एकटी कमावणारी होती.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
तिच्या नवऱ्याचा आठ वर्षांपूर्वी अशा संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाला होता. तिच्या मते तिच्या नवऱ्याची हत्या झाली होती. मात्र पोलिसांनी हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचं सांगितलं आहे.
नवऱ्याच्या मृत्यूनंतर सहा मुलांना ती एकटीच सांभाळत होती. मात्र दोन वर्षांपूर्वी त्या गंभीररित्या आजारी पडल्या.
त्यानंतर मुलीला त्यांनी कुटुंब चालवण्याची जबाबदारी दिली. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने आईन त्यांच्या दोन मुलींचे लग्न कमी वयातच लावून दिलं.
त्या सांगतात, “माझी मुलगी अतिशय हसतमुख होती. ती समाजमाध्यमांवर सक्रिय होती.नेहमी आनंदी असायची.”
कुटुंबाच्या मते मुलगी 'वेलकम गर्ल' म्हणून काम करायची. ती लग्न समारंभात पाहुण्यांचं स्वागत करायला जात असे. ती रोजचे पाचशे रुपये कमवायची. तिच्यामुळे आमचं कुटुंब चालायचं.
मात्र ती कोणत्या इव्हेंट कंपनीत काम करायची याची कोणालाही माहिती नव्हती. 31 डिसेंबरला ती कुठे गेली होती याचीही कोणाला माहिती नव्हती.
मुलीची आठवण करत तिच्याशी झालेलं शेवटचं बोलणं आठवून त्या म्हणाल्या, “तिने फक्त सांगितलं की तिला यायला उशीर झाला होता. इव्हेंट कुठे आहे हेही सांगितलं नाही.”
पोलिसांविरुद्ध आंदोलन

सोमवारी (2 जानेवारी) दिल्लीच्या सुलतानपुरी पोलीस ठाण्याच्या बाहेर स्थानिक लोकांनी पोलिसांच्या विरोधात आंदोलन केलं.
आंदोलक पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांसाठी न्याय मागत होते.
मुलीच्या मृत्यूने या परिसरातील सगळ्याच लोकांना प्रचंड धक्का बसला आहे. निदर्शनासाठी आलेल्या ओमवती म्हणाल्या, “आम्हाला असं वाटतंय की पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपींना शिक्षा मिळायलाच हवी.”
निदर्शकांनी दिल्ली पोलिसांच्या विरोधात घोषणा दिल्या आणि ठाण्याच्या बाहेर आरोपींपैकी एकाचं पोस्टर लागलं होतं. तेही फाडण्यात आलं.
पाच लोकांना अटक
दिल्ली पोलिसांना पाच लोकांना अटक केली आहे. हे सर्व लोक मंगोलपुरीत राहणारे आहेत.
पोलिसांच्या मते दीपक खन्ना नावाचा युवक कार चालवत होता. त्यात अमित खन्ना, मनोज मित्तल, मिथुन, आणि कृष्णा हे लोकही बसले होते.
पोलिसांच्या मते सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर कारची ओळख पटवली गेली आणि आरोपींना अटक करण्यात आली.
दीपक खन्ना व्यवसायाने ड्रायव्हर आहे. अमित खन्ना बँकेत काम करतात. कृष्णा स्पेनच्या संस्कृती केंद्रात काम करतात आहे.

फोटो स्रोत, DELHI POLICE
मिथून हेयर ड्रेसर आहे. मनोज मित्तल सुल्तानपुरी केपी ब्लॉकमध्ये राशनचं दुकान चालवतो.
स्थानिक लोकांच्या मते मनोज मित्तल भाजपाशी निगडीत आहेत. सुल्तानपुरी आणि मंगोलपुरीमध्ये त्यांना भेट देणारे पोस्टर लागले आहेत.
सुल्तानपुरी ठाण्याच्या बाहेर मनोज मित्तलचे होर्डिंग लागले होते. निदर्शकांनी ते पोस्टर फाडलं होतं.
सर्व आरोपी मंगोलपुरीला राहणारे आहेत. पीडित मुलगी याच भागात रहायची. तिचं घरं आणि आरोपी यांच्या घरात दीड ते दोन किलोमीटरचं अंतर आहे.
पोलिसांवर गंभीर प्रश्नचिन्ह
या घटनेशी निगडीत अनेक प्रत्यक्षदर्शी समोर आले आहेत. त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सुलतानपुरी भागात राहणाऱ्या एका डिलेव्हरी बॉय विकास मेहरा यांनी 31 डिसेंबरच्या रात्री कारच्या खाली मुलीचा मृतदेह पाहिल्याचा दावा केला आहे.
विकास मेहरा सांगतात, “रात्री सव्वा दोन वाजताची वेळ असेल. मी कंझावला रस्त्याच्या बाजूने येत होतो. पुढे पोलीस चौकी पाहून अचानक एक कार वेगाने वळली आणि मी त्याला धडकता धडकता वाचलो. त्या कारच्या खाली मला एका मुलीचं डोकं दिसलं.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
विकास दावा करतात, “मी याबाबतीत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मला विचारलं की तुला कुठे लागलेलं नाहीये ना, तू घरी जा, गाडीचं आम्ही पाहून घेऊ.”
विकासचे वडीला दावा करतात की, पोलिसांनी त्यांच्या मुलाला प्रसारमाध्यमांशी न बोलण्याची धमकी दिली होती.
आणखी एका प्रत्यक्षदर्शीने कारच्या खाली मुलीला पाहिल्याचा दावा केला आहे.
‘एकही पोलीस आला नाही’
दीपक दिल्लीच्या लाडरपूर गावात राहतात आणि दुधाचं काम करतात.
दीपक सांगतात, “रात्री 3 वाजून 18 मिनिटांनी मी दुकान उघडलं होतं. त्याचवेळी मंद वेगाने एक बलिनो कार येत होती.”
"टायर फाटल्यावर जसा आवाज येतो तसा आवाज आला. कंजावला भागातून येणारी ती गाडी कुतुबगढच्या दिशेने हळूहळू जात होती. मी पाहिलं की त्याच्या समोरच्या टायरच्या खाली एक बॉडी फसली होती.”
दीपक सांगतात, “रात्री साडेतीन वाजता ती गाडी पुन्हा फिरून आली. मी पोलिसांना फोन करून सांगितलं की आता ही गाडी कंझावलाकडे डात होती. गाडीचं लोकशन सांगून मी स्कुटीने गाडीच्या मागे गेलो. ती गाडी वेगानेही जात नव्हती आणि थांबतही नव्हती.”
दीपक दावा करतात की, ते पोलिसांना गाडीबद्दल सांगत राहिलो. पण कोणीही आलं नाही.

दीपक सांगतात, “पोलिसांनी सांगितलं की आम्ही बॅरिकेड लावून गाडी थांबवून घेऊ.”
दीपकच्या मते गाडी लाडपूर आणि जौंती गावाच्या दरम्यान दोनवेळा गेली. दुसऱ्यांदा गाडी परत येऊन कंझावलाच्या दिशेने आली तेव्हा त्याच्या खाली तो मृतदेह नव्हता.
दीपक सांगतात, “दुसऱ्या फेरीच्या वेळी आम्ही पिक अप कार ने तिच्या मागे गेलो. कंझावलाच्या बाजूला असलेल्या पीसीआरला त्याबद्दल माहिती दिली. मात्र पीसीआर ने त्या गाडीला थांबवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही.”
सकाळी कामाला जाताना लोकांना जौंती गावाच्या जवळ रस्त्यावर तिचा मृतदेह दिसला. तिचे कपडे फाटले होतो. पँटचा काही भाग शिल्लक होता.
ही घटना कुठे घडली?
FIR नुसार ही घटना रात्री दोन वाजता कृष्णविहारच्या शनिबाजार रोडवर झाली. हा परिसर सुल्तानपुरी पोलीस ठाण्याच्या एक किलोमीटर भागातच आहे.
पोलिसांनी हीच स्कुटी जप्त केल्याचा दावा FIR मध्ये केला आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने बीबीसीला सांगितलं, “साडेचार-पावणेपाच वाजता माझ्या आईने काहीतरी आवाज ऐकला तेव्हा तिने खिडकी उघडली आहे. मी पण जागे झाले. पोलीस स्कुटी घेऊन इथे जात होते. स्कुटीचं हँडल तुटलं होतं.”
प्रत्यक्षदर्शीच्या मते स्कुटी त्यांच्या घराच्या मागच्या गल्लीत उभी होती. हा रस्ता शनिबाजार मार्गातून निघतो.
बीबीसीला कृष्णा विहारच्या शनिबाजार भागात सीसीटीव्ही फुटेज दिसले आहेत. त्यात या दुर्घटनेत असलेली बलिनो कार रात्री 1वाजून 53 मिनिटानी दिसते.

या सीसीटीव्हीत एक स्कुटीही दिसते. मात्र ते फुटेज धूसर आहे. त्यामुळे पीडितच त्यावर बसली होती असं नक्की सांगता येत नाही.
याच रस्त्यावर राहणारे अंकुर शर्मा सांगतात की या घटनेबद्दल त्यांना काहीही माहिती नाही.
अंकुर शर्मा सांगतात, “सकाळी साडेचार वाजता स्कुटी दिसली. रात्री 1 वाजून 54 मिनिटांनी ही गाडी संदिग्ध अवस्थेत आमच्या गल्लीत दिसली. आम्हाला असं वाटतं की मुलीबरोबर काहीतरी अघटित झालं आहे. तिला न्याय मिळायला हवा.”
कृष्ण विहार ते जौंती गाव 14 किमी अंतरावर आहे. तिथून जौंती गावाला जाईपर्यंत 35 मिनिटांचा वेळ लागतो. आम्ही कृष्ण विहार ते जौंती गावातून कार येताना आणि जाताना पाहिलं. दोन्ही बाजूंनी पस्तीस मिनिटांचा वेळ लागला.
अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की 1 वाजून 54 मिनिटांनी गाडी कृष्ण विहारमध्ये दिसत आहे. ती चालवणारे लोक घाबरून तिथे पळत होते तर जौंती गावापर्यंत जाण्यासाठी त्यांना दीड तास कसा लागला?
पोलिसांच्या मते ताब्यात घेतल्यावर आरोपींनी स्वीकारलं की कृष्ण विहार येथे अपघात झाल्यावर भीतीमुळे ते कंझावलाच्या दिशेने पळाले.
बलात्कार आणि हत्येचा आरोप
मुलीच्या घरच्यांना आणि आंदोलकांना अशी शंका आहे की मुलीवर बलात्कार झाला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.
मुलीची आई सांगते, “पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलं की प्रत्येक बाजूने तपास केला जाईल. शवविच्छेदनात काही समोर आलं तर आणखी कलमं जोडली जातील.”
पोलिसांनी या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा आणि निष्काळजीपणे गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दिल्ली पोलिसांचे विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सागर प्रीत हुड्डा यांनी मात्र बलात्काराची शक्यता नाकारली आहे.
शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात मृत्यूचं कारण शॉक आणि अंतर्गत रक्तस्राव असल्याचं दिसतंय. शरीरावर लैंगिक अत्याचाराच्या खुणा नाहीत, असं हुड्डा यांनी म्हटलं.
दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे?
दिल्ली पोलिसांनी मंगळवारी (2 जानेवारी) कंझावला प्रकरणात एक नवीन माहिती दिली आहे. त्यानुसार घटनेच्या वेळी मुलगी एकटी नव्हती. ANI या वृत्तसंस्थेनुसार दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, “जेव्हा आम्ही रस्त्याची तपासणी केली तेव्हा कळलं की, ती त्या स्कुटीवर एकटी नव्हती.” “घटनेच्या वेळी एक मुलगी तिथे होती. ती जखमी झाली आणि घटनास्थळावरून निघून गेली. मात्र पीडितेचा पाय गाडीत फसला आणि त्यामुळे ती गाडीत घासत गेली.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
गाडीच्या खाली शरीर घासत गेल्याने तिच्या डोक्याचा मागचा भाग आणि शरीराचा मागचा भाग सोलला गेला.
दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सागरदीप हुड़्डा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, “मुलीला 10-12 किलोमीटर घासत नेलं.”
हुड्डा पुढे म्हणाले, “आतापर्यंतच्या चौकशीच्या आधारावर पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. शवविच्छेदनाच्या अहवालाच्या आधारावर पुढील तपास करण्यातक येईल. फॉरेन्सिक आणि लीगल टीम्सची मदत घेतली जात आहे."
दिल्ली पोलिसांच्या अनेक टीम्स या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्या सुमन नलवा यांनी बीबीसीला सांगितलं, “तपास अधिकाऱ्यांच्या मते प्राथमिकदृष्ट्या हा रस्ते अपघात वाटतो. तपास सुरू आहे. आणखी कलमं लावायची वेळ आली तर ते लावण्यात येतील.”
हेही वाचलं का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









