'डॉक्टर असूनही मला नोकरी मिळत नव्हती, माझ्याकडून उपचार करून घ्यायला पेशंट तयार नसायचे, कारण...'

- Author, बाला सतीश
- Role, बीबीसी तेलुगू प्रतिनिधी
"मी फ्रेशर्स पार्टीला साडी नेसून गेले होते. तिथे मी माझ्याबद्दल सांगितलं. कोणी माझ्याशी बोलेल की नाही बोलणार यापेक्षाही मला माझी ओळख सगळ्यांसमोर सांगायची होती,” प्राची सांगत होत्या. आपली ट्रान्सजेंडर ही ओळख त्यांनी सगळ्यांसमोर मांडली होती.
तेलंगणामध्ये दोन ट्रान्सजेंडर्सची सरकारी डॉक्टर म्हणून नेमणूक झाली आहे आणि सध्या ते प्रॅक्टिस करत आहेत.
डॉ. प्राची राठोड आणि डॉ. रुथ जॉन या सध्या उस्मानिया हॉस्पिटलच्या ART क्लिनिकमध्ये काम करत आहेत.
डॉ. प्राची या निझामाबादच्या आहेत, तर डॉ. रुथ या खम्मम जिल्ह्यातल्या. या दोघीही अनुक्रमे 29 आणि 28 वर्षांच्या तरूण डॉक्टर आहेत.
त्यांच्या लैंगिकतेमुळे येणाऱ्या अडचणींवर मात करत या दोघींनी त्यांनी आधी त्यांचं एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं, नंतर एमडी, एमएस पण केलं.
जेव्हा या दोघी उस्मानिया हॉस्पिटलमध्ये रुजू झाल्या, तेव्हा सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं.
पहिल्यांदा जेव्हा स्वतःबद्दल कळलं...

“मी जेव्हा पाच वर्षांची होते, तेव्हा पहिल्यांदा आपलं शरीर वेगळं असल्याचं जाणवलं. पण त्या वयात आपल्याला फारसं काही कळत नसतं. पण वय वाढलं, तसं गोष्टी अधिक जाणवत गेल्या.
जेव्हा मी एमबीबीएसला प्रवेश घेतला, तेव्हा सगळ्या जगासमोर येऊन माझी ओळख सांगितली...मी ट्रान्स वुमन असल्याचं सगळ्यांना सांगितलं,” प्राची सांगतात.
" एमबीबीएसच्या सुरुवातीला मी फ्रेशर्स पार्टीला साडी नेसून गेले होते. तिथे मी माझ्याबद्दल सांगितलं. कोणी माझ्याशी बोलेल की नाही बोलणार यापेक्षाही मला माझी ओळख सगळ्यांसमोर सांगायची होती.”
प्राची यांनी आदिलाबाद इथल्या राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधून एमबीबीएस केलं आहे.
“जेव्हा मी सात वर्षांची होते, तेव्हा मला मुलांसोबत खेळायला आवडायचं नाही. मी मुलींमध्ये खेळायला जायचे. मला त्यांच्यासोबत आवडायचं. मला मुलींसारखे कपडे घालायलाही आवडायचं. पण जेव्हा मला समाजातल्या धारणा लक्षात येत गेल्या, ट्रान्सजेंडर्सना मिळणारी वागणूक कळाली, तसं मी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं.
मी अभ्यासात प्रगती केली आणि जेव्हा 2017 मध्ये माझं एमबीबीएस पूर्ण झालं तेव्हा माझ्या कुटुंबियांना मी ट्रान्स असल्याचं सांगितलं. तेव्हापासून सगळ्यांना मी माझी खरी ओळख सांगते,” डॉ. रुथ यांनीही आपला अनुभव शेअर केला.
सगळं काही माहीत असणाऱ्या डॉक्टरांकडूनही भेदभाव

डॉक्टरांना माणसांमधल्या शारीरिक-मानसिक वैविध्याबद्दल इतरांपेक्षा अधिक जाण असते, असं आपल्याला वाटतं. पण या दोन ट्रान्सजेंडर डॉक्टरांना आलेला अनुभव वेगळा होता. त्यांना मेडिकल क्षेत्रातच सर्वाधिक भेदभावाला सामोरं जावं लागलं.
"खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांमध्ये जेंडर सेन्सिटिव्हिटी कमी असल्याचं आम्हाला जाणवलं. LGBTQ म्हणजे नेमकं काय हे अनेकांना माहीतच नसायचं. केवळ ट्रान्सजेंडर असल्याच्या कारणावरूनही मी माझी नोकरी गमावली होती,” प्राची सांगतात.
"मी माझी सर्टिफिकेट घेऊन अनेक हॉस्पिटल्समध्ये कामासाठी फिरायचे. पण मला कोणीही काम दिलं नाही. आम्ही तुम्हाला कळवू, एवढंच सांगायचे. मला कधीकधी प्रश्न पडायचा की, आपलं कसं होणार, चरितार्थ कसा चालणार? मी अनेकदा रडायचे. एकवेळ तर अशी आली की, मला आत्महत्या करावीशी वाटायची.”
“मी एकाच हॉस्पिटलमध्ये काम मागायला तीन तीन वेळाही गेली आहे,” रुथ सांगतात.
या दोघीही ट्रान्स लोकांसाठी काम करणाऱ्या धर्मादाय संस्थेत काम करायच्या. उस्मानिया हॉस्टिलमधे तेलंगाणा एड्स कंट्रोल सोसायटीकडून व्हायरल डिसीजेस क्लिनिक चालवलं जातं. तिथे मेडिकल ऑफिसरच्या जागा निघाल्या. तेव्हा दोघींनीही त्यासाठी अर्ज केला. इंटरव्ह्यू झाल्यावर त्यांची निवड झाली.
आता 24 नोव्हेंबरपासून प्राची आणि रुथ इथे काम करतात.
पेशंटकडून कसा प्रतिसाद मिळाला?

पेशंटना तपासायला सुरुवात केली, तेव्हाचा अनुभव आणि उपचार घेतल्यानंतर पेशंटच्या दृष्टिकोनात पडणारा फरक यावरही या दोघींनी त्यांचे अनुभव सांगितले.
"मी काही काळ स्वतःचं क्लिनिक चालवायचे. लोक माझ्याकडे यायला बिचकायचे. पण नंतर माझ्या उपचारांनी फरक पडायला लागल्यावर, ते पुन्हा यायचे. आमच्याकडून उपचार घेऊन बरं वाटल्याचं सांगायचे,” रुथ सांगतात.
आमच्याकडे येण्याबद्दल साशंक असलेले हेच लोक नंतर आमच्याशी बोलायचे, आमच्या उपचारांबद्दल बोलायचे.
“मी सुरुवातीला एका खाजगी हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये काम करायचे. सुरुवातीला काही जणांनी मला त्रास दिला. पण नंतर इमर्जन्सीमध्ये उपचारांसाठी त्यांना माझ्याकडे यावं लागलं आणि त्यांचे विचार बदलले. उपचारांनी फरक पडल्याने ते समाधानी होते,” प्राची यांनी सांगितलं.
ते आमच्याकडे प्रेरणा म्हणून पाहात असल्याचं प्राची यांनी सांगितलं.
उस्मानियामध्येही डॉक्टर आणि नर्स पहिले काही दिवस अंतर राखून वागत होते, पण आता आमच्याकडे ते आदराने पाहतात.
घर, कॉलेज, हॉस्पिटल...सगळीकडे सारखाच अनुभव

फोटो स्रोत, Getty Images
रुथ आणि प्राची यांना सुरुवातीपासूनच अभ्यासात गती होती, पण त्यांची बुद्धिमत्ता किंवा कौशल्य यापेक्षा त्यांच्या शरीराचीच चर्चा अधिक व्हायची.
वयाची तिशी गाठेपर्यंत त्यांना अनेक अपमानास्पद अनुभवांना सामोरं जावं लागलं.
या सगळ्या अनुभवांमुळे तुम्हाला रडू यायचं का, यावर उत्तर देताना प्राचीने म्हटलं, ‘अनेकदा.’
“मी शाळा-कॉलेजात होते, तेव्हा ‘थर्ड जेंडर’ अशी संकल्पना फारशी माहीतच नव्हती. त्यामुळे जास्तच भेदभाव व्हायचा. त्यामुळे शाळा-कॉलेजात मला खूप चिडवलं गेलं. जेव्हा मी एमबीबीएसला प्रवेश घेतला तेव्हा मी इतरांपासून अलिप्त राहायचे. कोणामध्ये मिळून-मिसळून राहात नव्हते. एमबीबीएसची वर्षं अशीच गेली,” रुथने सांगितलं.
“2017 मध्ये जेव्हा मी माझी ओळख सर्वांना सांगितली, तेव्हा अनेकांनी मला मनापासून स्वीकारलं. माझ्याशी चांगलं वागायचे. पण काही जणांनी माझ्याशी बोलणंही बंद केलं,” रुथ यांनी सांगितलं.
“शाळा-कॉलेजात मला अनेक वाईट अनुभव आले. लोक माझ्या पाठीमागे खूप चेष्टा करायचे, हसायचे. ते सगळं खूप कठीण होतं,” प्राचीने सांगितलं.
प्राची यांचे कुटुंबीय अजूनही त्यांच्याशी बोलत नाहीत.
त्या म्हणतात, “माझा त्यांच्यावर राग नाहीये. आपण त्यांचीही परिस्थिती समजून घ्यायला हवी.”
“ट्रान्सजेंडर्सने त्यांची ओळख सांगितली तरी अडचण असते आणि नाही सांगितली तरीही...जरी तुम्ही कोणाशी काही बोलला नाहीत, तरी लोक पाठीमागे तुमची टिंगल करतच असतात. मी जेव्हा ट्रान्सजेंडर म्हणून माझी ओळख सांगितली, तेव्हा एका खाजगी रुग्णालयानेही मला कामावरून काढून टाकलं होतं,” प्राची सांगतात.
“अनेक ट्रान्स लोक हे भीक मागून, नाचून पोट भरतात. त्यांना दोष देऊ नका. समाजही तसाच आहे. जर मी शिकले नसते, तर कदाचित माझ्यावरही तीच वेळ आली असती. ट्रान्स व्यक्तींबद्दलचा दृष्टिकोण बदलण्याची वेळ आली आहे.
मी डॉक्टर आहे, हे सांगूनही मला घर मिळत नव्हतं. वर्षभर मला घर शोधायला वणवण करावी लागली. एकदा मी तिथे राहायला गेल्यावर मात्र लोकांनी मला आदरानेच वागवलं.”
पीजी करतानाही रुथ यांना अडचणी आल्या.
NEET परीक्षेमध्ये थर्ड जेंडर हा कॉलम असतो. पण तेलंगणा काऊंन्सिलिंगमध्ये हा कॉलमच नाहीये.
“मला गायनॅकॉलॉजीमधे पीजी करायचं होतं. NEET मध्ये चांगली रँकही होती. पण थर्ड जेंडर अंतर्गत काऊंन्सिलिंग नव्हतं. मला माझी ओळख लपवून प्रवेश घ्यायचा नव्हता. मला माझी ओळख लपवून प्रवेश नको होता. त्यासाठी आम्ही लढा देत आहोत,” रुथने सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








