LGBTQ : कन्व्हर्जन थेरपी काय आहे? समलैंगिकतेवर असे 'उपचार' करणं योग्य आहे?

समलैंगिकता

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"एखादा माणूस डावखुरा आहे, तर तुम्ही त्याला सगळं उजव्या हातानं करायला भाग पाडाल का? त्याला ते जमेल का? मग समलैंगिकतेचंही तसंच आहे."

मुंबईत राहणारे सुमित (नाव बदलले आहे) 'कन्व्हर्जन थेरपीविषयी' सांगतात. एक समलैंगिक पुरुष म्हणून सुमित यांना अशा उपचारांना सामोरं जावं लागलं होतं.

'कन्व्हर्जन थेरपी' म्हणजे एखाद्या व्यक्तीची लैंगिक ओळख किंवा लैंगिकतेकडचा कल बदलण्याच्या इराद्यानं केले जाणारे प्रयत्न. एखादा समलैंगिक भावना दाबून टाकणे हा त्यामागचा मुख्य हेतू असतो. त्यासाठी बहिष्कार, हिंसाचार, अन्नपाणी न देणं, सततचा ब्रेनवॉश असे अघोरी आणि घातक प्रकारही होतात.

समलैंगिकतेविषयी भ्रामक कल्पनांमधून केल्या जाणाऱ्या या थेरपीवर आता मद्रास हायकोर्टानं बंदी घातली असून देशभरातील LGBTQ हक्कांचं समर्थन करणाऱ्या व्यक्तींनी त्याचं स्वागत केलं आहे.

सुमित यांचाही त्याला अपवाद नाही. ते म्हणतात "हायकोर्टाचा निर्णय हे खूप चांगलं पाऊल आहे. अजून बरीच मजल गाठायची आहे, पण ही एक चांगली सुरूवात आहे.

सुमित पुढे सांगतात "एखाद्यानं आपण समलैंगिक असल्याचं जाहीर केलं तर आजही अनेकांची पहिली प्रतिक्रिया असते, ही काही तरी विकृती आहे, तुझ्या डोक्यात काहीतरी बिघाड झालाय, हे बरं होईल वगैरे. पालकांच्या डोक्यात असतं त्याला कुठेतरी यानं खीळ बसेल."

ओळख स्वीकारण्याचा संघर्ष

कॉलेजमध्ये असताना सुमित यांना त्यांच्या भावनांविषयी नेमकी जाणीव झाली होती. पण आपली ओळख मान्य करण्यासाठी त्यांना काही वर्ष लागली.

"मी माझ्या भावना नाकारत होतो. मला वाटायचं ही एक फेज आहे, निघून जाईल. आपल्याकडे पुरुषार्थाच्या संकल्पनांचा पगडा एवढा आहे की, अनेकदा पुरुष स्वतःची ओळख मान्यही करत नाहीत."

एक दिवस धाडसानं त्यांनी आईवडिलांसमोर आपलं मन मोकळं केलं. सुरुवातीला त्यांची समलैंगिक ओळख पुसण्याचाही प्रयत्न झाला.

समलैंगिकता

फोटो स्रोत, Getty Images

"ते सगळं खूप त्रासदायक होतं. मी स्वतः माझ्या भावना नाकारत होतो. मी काही मुलींसोबत डेटवर जाण्याचा प्रयत्न केला. ते पाहिल्यानं पालकांचा आणखीनच गोंधळ उडायचा. तुला मैत्रिणी आहेत तर तू हे असं कसं म्हणतोस, असं ते विचारायचे."

भावनांचा गुंता सुटावा म्हणून सुमित यांनी काही 'उपचार'ही घेऊन पाहिले. पण तो अनुभव जास्तच त्रासदायक असल्याचं ते सांगतात.

"कन्व्हर्जन थेरपीमध्ये काही जणांना शॉक ट्रिटमेंट वगैरेलाही सामोरं जावं लागलं आहे. नशीबानं मला तशा गोष्टीतून जावं लागलं नाही. पण असे अनेक जण भेटले जे माझी समलैंगिकता म्हणजे विकृती आहे, असं मानायचे. काही आयुर्वेदिक डॉक्टरांनी औषधं वगैरे दिली. त्यांचं म्हणणं असायचं की तू जे सांगतोयस ते नैसर्गिक नाही.

"कुणाला सांगायला गेलं तर त्यांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलायचा. तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं अशा प्रतिक्रिया मिळाल्या."

हे सगळं एवडं असह्य होऊ लागलं, की त्यांच्या मनात टोकाचे विचार येऊ लागले. "माझी चीडचीड होऊ लागली, राग यायचा. बाकीच्या लोकांमध्ये मी फिट होत नव्हतो. मनात आत्महत्येचाही विचार डोकावायचा."

सुमित यांना मानसिक आजार असावा असं त्यांच्या आईवडिलांना वाटत होतं. "मानसिक आजार आणि लैंगिकता यात त्यांची गल्लत व्हायची. ते विचारायचे, तुला डिप्रेशन येतंय का, म्हणून तुला असं समलिंगी आकर्षण वाटतं का? पण मी डिप्रेशनमुळे असा वागत नव्हतो, तर माझी ओळख स्वीकारली जात नाही हे पाहून मला नैराश्य येऊ लागलं."

"नशीब म्हणजे आईवडिलांनी माझ्यावर लग्नाचा दबाव टाकला नाही. कारण त्यातून वेगळेच प्रश्न निर्माण होऊ शकतात हे त्यांना पटलं. मी काहींच्या बाबतीत तसं झालेलं पाहिलं आहे. निदान मला तेवढी तरी मोकळीक मिळाली. पालक म्हणून त्यांनी पूर्णपणे समजून घेतलं नसलं, तरी निदान तसा प्रयत्न तरी ते करतायत हळूहळू."

समलैंगिकता

फोटो स्रोत, Getty Images

"नशीबानं मला चांगले समुपदेशकही भेटत केले. मला जाणीव झाली की मी जसा आहे, ते चूक नाही.

"माझा गोंधळ उडाला होता, तेव्हा पुण्याच्या समपथिक ट्रस्टमध्ये डॉक्टरांनी मला एक चांगली गोष्ट सांगितली होती. तू स्वतःला एका साच्यात कोंबण्याचा प्रयत्न का करतो आहेस की, मी गे आहे की बायसेक्शुअल आहे? काळ पुढे सरकेल तसं तुझं तुलाच कळेल की तू कोण आहेस.

"त्रिकोणी खाचेत चौकोन बसवायला गेलं तर तो तिथे बसणार नाही. आणि नंतर तुला असंही कळू शकतं की तू त्रिकोण पण नाहीस, चौकोन पण नाहीस आणि तू वर्तुळ आहेस. त्यामुळेच स्वतःवर दबाव टाकू नकोस."

सुमित मग हळूहळू स्वतःची ओळख स्वीकारत गेले. आता वयाच्या चौतिसाव्या वर्षी ते मुंबईत एका आयटी कंपनीत टीम लीडर म्हणून काम करतायत आणि आत्मविश्वासानं आयुष्याला सामोरं जातायत.

पण प्रत्येकालाच तशी संधी मिळत नाही.

कन्व्हर्जन थेरपीचे बळी

मानसशास्त्रज्ञ हेमांगी म्हाप्रळकर सांगतात, "मानसशास्त्रानुसार कन्व्हर्जन थेरपी ही एखाद्या बिहेवियर थेरपीसारखी आहे. म्हणजे एखाद्याला मानसिक आजार असेल, तर त्याच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी तिचा वापर होऊ शकतो."

पण मुळात समलैंगिकता हा आजार नाही आणि त्यावर असे उपचार केले तर त्याचे अगदी गंभीर टोकाचे परिणाम होऊ शकतात असंही त्या नमूद करतात.

"कधी अघोरी उपायांचाही आधार घेतला जातो, म्हणजे बाबा-गुरूंकडे जाऊन झाडफूक वगैरे करण. अशातून उलट वेगळ्या मानसिक समस्या निर्णाण होऊ शकतात."

गेल्या वर्षी केरळमध्ये अंजना हरीष या बायसेक्शुअल मुलीच्या आत्महत्येनंतर कन्व्हर्जन थेरपी किती हानीकारक आहे याची भारतात पुन्हा चर्चा सुरू झाली. मृत्यूपूर्वी अंजनानं फेसबुकवर एक व्हीडियो पोस्ट केला होता ज्यात तिला ज्या अघोरी प्रकारांना सामोरं जावं लागलं, त्याचं वर्णन तिनं केलं होतं.

समलैंगिकता

फोटो स्रोत, Getty Images

आपल्याला एका ख्रिश्चन संस्थेतल्या कोठडीत कोंडण्यात आलं होतं आणि अनेक औषधं देऊन रोबोटसारखं बनवण्यात आलं होतं, असा आरोप तिनं केला होता.

ती म्हणते "माझ्या स्वतःच्या कुटुंबियांनीच ही वागणूक दिली याचं जास्त दुःख वाटतं. माझं रक्षण करायचं सोडून त्यांनी माझा छळ केला."

अंजनाच्या कुटुंबियांनी तेव्हा हे आरोप नाकारले होते, पण या घटनेनंतर केरळमधल्या आणि पर्यायानं भारतातल्या कन्व्हर्जन थेरपीवर पुन्हा टीका झाली होती.

अशा उपचारपद्धतींविषयी महाराष्ट्रातही समाजात किती गैरसमज आहेत याचा अंदाज अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या मुलाखतीनंतर आला होता. त्या मुलाखतीतील वक्तव्यांबद्दल त्यांनी नंतर स्पष्टीकरण दिलं होतं.

पण सर्रास आजही कोणी वेगळी लैंगिक ओळख जाहीर केली, तर अशा उपचारांचा सल्ला दिला जातो, हे वास्तव आहे.

इतर देशात काय परिस्थिती आहे?

परदेशातली स्थितीही वेगळी नाही. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मांत भिन्नलिंगी व्यक्तींमधल्या वैवाहिक संबंधांपलिकडचे कुठलेही लैंगिक संबंध हे निषिद्ध मानण्याची परंपरा आहे. त्यामुळे आजही अगदी युरोप आणि अमेरिकेतही समलैंगिक संबंधांना विरोध आणि कन्व्हर्जन थेरपीचा पुरस्कार करणारे अनेक जण आहेत.

दुसरीकडे जर्मनी, कॅनडा, मेक्सिको, माल्टा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतली काही राज्य इथं कायद्याने कन्व्हर्जन अमान्य आहे.

भारतात तर समलिंगी संबंधांना अगदी तीन वर्षांपूर्वीपर्यंत गुन्हा मानलं जात होतं. सर्वोच्च न्यायालयानं 6 सप्टेंबर 2018 रोजी ऐतिहासिक निकाल देत समलैंगिकता हा गुन्हा नसल्यचं जाहीर केलं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

आणि आता चेन्नई कोर्टानं दिलेला निर्णयही ऐतिहासिकच आहे.

कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

मदुराई शहरातील दोन मुलींमधल्या समलैंगिक संबंधांना विरोध करून त्यांचे घरचे कन्व्हर्जन्स थेरपी करण्यासाठी दबाव आणत होते. तेव्हा मुली घरातून पळून चेन्नईला आल्या.

पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलींना पकडलं तेव्हा त्यांना पोलिस चौकशीत भलते सलते प्रश्न विचारण्यात आले. अखेर मुलींनी पोलिस चौकशीत झालेला छळ आणि घरून कन्व्हर्जन थेरपीसाठी येत असलेला दबाव याच्या विरोधात मद्रास हायकोर्टात दाद मागितली.

समलैंगिकता

फोटो स्रोत, Getty Images

सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती एन आनंद वेंकटेश यांनी एक ऐतिहासिक भाष्य केलं, 'LGBTQ समाजातील लोकांनाही आपली लैंगिकता गुप्त ठेवण्याचा अधिकार आहे तसंच आपली लैंगिकता ठरवण्याचा, ती चारचौघांमध्ये उघड करण्याचा, आपल्या लैंगिक भावना मोकळेपणाने मांडण्याचा आणि आपल्याला हवा तसा जोडीदार निवडण्याचाही अधिकार आहे. त्यांना सामाजिक सन्मान मिळाला पाहिजे.'

कोर्टाने या निकालादरम्यान कन्व्हर्जन थेरपीवर ताशेरे ओढले आणि अशी थेरपी करणाऱ्या डॉक्टरांचं लायसन्स रद्द करण्याचा निर्णयही दिला.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लैंगिकता किंवा लिंग ओळखीच्या बाबतीत नेहमीच्या चौकटीत न बसणाऱ्या मुलांना समजून घ्यायचा प्रयत्न व्हावा, त्यासाठी शाळेत पालक-शिक्षक संघटनांची मदत घेता येईल असं कोर्टाच्या गाईडलाईन्स सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

हेमांगी यांनाही हा मार्ग महत्त्वाचा वाटतो. "आपल्या आधीच्या पिढीला समलैंगिकता या विषयावर मोकळेपणानं बोलणंही अजून कठीण जातं, हे समजून घ्यायला हवं. पालकांनी आपल्या मुलांचा ते जसे आहेत तसा स्वीकार करणं ही महत्त्वाची बाब आहेच, पण स्वतः त्या व्यक्तींनीही आधी स्वतःला स्वीकारणं गरजेचं आहे. त्यांना तेवढी मोकळीक द्यायलाच हवी."