'शेत मजुरीपेक्षा फटाका कारखान्यात शे-दोनशे जास्त मिळतात म्हणून तिथे काम करतो'

'शेतातल्या मजुरीपेक्षा फटाका कारखान्यात शंभर- दोनशे जास्त मिळतात म्हणून तिथे काम करतो'

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR

    • Author, मानसी देशपांडे
    • Role, बीबीसी मराठीसाठी, बार्शीहून

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या पांगरी गावात 1 जानेवारीला दुपारी एक भीषण घटना घडली. पांगरीत सुरू असलेल्या फटाकाच्या कारखान्याला आग लागली.

या कारखान्यात तयार केलेले फटाके ठेवले होते. या दुर्घटनेत चार महिलांचा मृत्यू झाला. तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. तिथे काम करत असलेल्या दोन महिला सुदैवाने वाचल्या. त्या दिवशी नेमकं काय झालं?

इतक्या धोकादायक परिस्थितीतल्या विना परवाना कारखान्यात या महिला काम का करायच्या? फटाका कारखान्यात काम करताना त्यांच्या जीवाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जायची का?

आनंद आणि जल्लोषाच्या वेळी उडवल्या जाणारे फटाके, शोभेची आतषबाजी जिथे तयार होते त्या कारखान्यांत कामगारांची काय परिस्थिती असते हे बीबीसी मराठीने पांगरीमध्ये जाऊन जाणून घेतलं.

1 जानेवारीचा स्फोट आणि हाहा:कार 

रविवारी एक जानेवारीला सगळीकडे नवीन वर्षाचं स्वागत करण्याचा उत्साह असताना, पांगरी गावावर मात्र शोककळा पसरली.

पांगरी गावापासून दोन-तीन किलोमिटरच्या अंतरावर गावाबाहेरच्या रानात इंडियन फायरवर्क्स हा फटाके बनवायचा कारखाना होता.

या कारखान्याचे मालक युसुफ हाजी मनियार हे पण पांगरी गावातलेच रहिवासी आहेत.

मनियार यांचा रस्त्याच्या एका बाजूला फटाके बनवण्याचा कारखाना होता आणि दुसऱ्या बाजूला फटाके आणि ठेवण्याचं गोडावून होतं. दोन्ही पण पत्र्यापासूनच बनवलेलं होतं. 

या कारखान्यात दररोज 50-60 कामगार असतात अशी माहिती स्थानिकांनी दिली. यामध्ये पांगरी आणि उक्कलवाडीइथल्या महिलांची संख्या लक्षणाय होती. एक जानेवारीला रविवार होता.

रविवारी पांगरी आणि उक्कलवाडी इथला आठवडी बाजार असतो. तसंच वर्षाचा पहिलाच दिवस असल्याने अनेक कामगार त्या दिवशी कारखान्यात आले नाहीत.

फक्त दहा-अकरा लोक तिथे आले होते. यामध्ये सात महिला होत्या. 

'शेतातल्या मजुरीपेक्षा फटाका कारखान्यात शंभर- दोनशे जास्त मिळतात म्हणून तिथे काम करतो'

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR

रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास कारखान्यात आग लागली. ही जेवायच्या सुट्टीची वेळ असल्याने काही कामगार जेवायला बाहेर गेले होते.

आग लागल्याची दिसताच तिथे उपस्थित महिला जीव वाचवण्यासाठी महिलांनी पळ काढला. आगीने लपेटलेल्या दोन महिला जवळच्या कांद्यांच्या शेतात आल्या. तिथे त्या कांद्यांच्या पातीवर लोळून त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. पण त्यात यश आलं नाही. त्यातील एका महिलेने तिथे तडफडून जीव सोडला. तर दुसरी महिला गंभीर झाली. सोलापूरच्या शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. तर ज्या महिलांना कारखान्यापासून दूर जाण्यात यश आलं नाही त्यांचा मात्र स्फोटांची मालिका सुरू असणाऱ्या कारखान्याजवळच मृत्यू झाला.

गंगाबाई मारुती सांगळे वय 45, सुमाबाई जाधव वय 55, मिना मगर वय 42, मोनिका भालेराव वय 30 यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

मध्यरात्रीपर्यंत स्फोटांची मालिका 

कारखान्यात आग लागण्याच्या मागचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही.

तिथे काम करणाऱ्या एका महिला कामगाराने सांगितलं की कारखान्याच्या पत्र्याच्या बाजूला जेसीबीचं काम सुरु होतं. तिथून ठिणगी आल्याचं दिसलं.

या ठिणग्यांमुळेच फटाका कारखान्यातल्या ज्वलनशील पदार्थांनी पेट घेतला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. 

कारखान्यात आग लागल्यावर स्फोटांची मालिका सुरू झाली. त्या आवाजाने गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली. स्फोट सुरू असतानाच धुराचे प्रचंड प्रमाणात लोट परिसरात पसरू लागले.

'शेतातल्या मजुरीपेक्षा फटाका कारखान्यात शंभर- दोनशे जास्त मिळतात म्हणून तिथे काम करतो'

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्रीपर्यंत स्फोट सुरुच होते. सुरुवातीला अर्ध्या पाऊण तासाने बार्शीवरुन एक अग्निशमन दलाची गाडी आली.

त्यानंतर आग आटोक्यात येत नसल्याने अधिकच्या गाड्या बोलावण्यात आल्या. काही स्फोटकांवर पाणी पडताच अजून जोरात स्फोट व्हायचा असं स्थानिकांनी सांगितलं.

मध्यरात्रीनंतर आग विझवण्यात यश आलं. इतकी भीषण आग लागलेली असतानाही अग्निशमन दलाची गाडी पोहोचण्यास विलंब लागल्याचं स्थानिकांनी सांगितलं. 

'मला आवाज आला, पळा... आणि मी मागे वळून न बघता पळत सुटले'

पांगरी गावातल्या 36 वर्षांच्या शकुंतला कांबळे गेल्या पाच-सहा वर्षांपासून या कारखान्यात काम करत होत्या. रविवारी त्या कारखान्यात गेल्या.

कारखान्याच्या बाहेर त्या दारू चाळायचं काम करत असताना त्यांना आवाज ऐकू आला की पळा... शकुंतला सांगतात की तो आवाज ऐकल्यानंतर त्या हातातलं सगळं टाकून शेजारच्या शेतात पळत सुटल्या. "मी जोरात धावत होते. पायाला काय टोचतंय काय लागतंय काही कळत नव्हतं. मी मागे वळून न बघता धावत होते. कानावर ब्लास्ट झाल्यासारखे आवाज येत होते. त्या आवाजामुळे माझ्या डोळ्यासमोर अंधारी यायला लागली. मी शेतात पडले. पुढचं मला काही आठवत नाही. मी शुद्धीवर आली तेव्हा आजुबाजूला भरपूर गर्दी झाली होती. माझ्या अंगावर कुणीतरी पाणी टाकलं होतं. या सगळ्या प्रकारत माझ्या पायाला जखम झाली आहे," असं शकुंतला कांबळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. 

'शेतातल्या मजुरीपेक्षा फटाका कारखान्यात शंभर- दोनशे जास्त मिळतात म्हणून तिथे काम करतो'

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR

50 वर्षाच्या सकू बगाडे पण त्या दिवशी कारखान्यात गेल्या होत्या. त्या पण बाहेर काम करत होत्या. जेसीबीजवळून ठिणगी पाहिल्याचं त्यांनी सांगितलं. "जेसीबीनं काम सुरू होतं. तिथं मला ठिणगी पाहिल्याचं आठवतंय. नंतर मलाही, पळा. असा आवाज ऐकू आला. मी पण वाट दिसेल तिकडे पळत सुटली. चक्कर आल्याने एका ठिकाणी कोसळली. काही वेळाने सगळे लोकं गोळा व्हायला सुरुवात झाले," असं सकू बगाडे यांनी सांगितलं. पांगरी गावात बगाडे वस्ती आहे. याच वस्तीतल्याच बहुतांश महिला त्या कारखान्यात कामावर जातात असं त्यांनी सांगितलं. रविवारमुळे कामगारांची संख्या कमी होती. नाहीतर मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होण्याची शक्यता होती असं स्थानिकांनी सांगितलं. 

सोयी-सुविधांचा अभाव असलेला पत्र्याचा फटाका कारखाना

या कारखान्याची अवस्था आणि तिथे काम करतानाची परिस्थिती याबद्दल कामगार महिलांनी आणि कारखान्याच्या बाजूला शेती असलेल्या शेतकऱ्यांनी माहिती दिली. 

बार्शी

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR

पत्र्यापासून बनवलेल्या या कारखान्यात वेगवेगळ्या प्रकारचे फटाके, रोषणाई बनवली जायची. दारू चाळण्यापासून ते वेगवेगळ्या आकारच्या डब्यांमध्ये भरण्यापर्यंत सगळी कामं केली जायची.

तिथे कामावर आल्यावर कामगार सोबत आणलेले दुसरे कपडे घालायचे. कारण दारू पूर्ण अंगावर उडायची.

डोळे सोडता संपूर्ण शरीर त्या स्फोटक पावडरने भरलेलं असायचं. कामाची वेळ संपली की, कपडे बदलून दारूने माखलेले कपडे घरी आणायचे आणि घरी धुवून ठेवायचे. परत दुसऱ्या दिवशी तेच घालायचे. तिथे काम करणाऱ्या महिलांनी सांगितलं की, पहिल्या वर्षी त्यांनी हातात घालायला ग्लोव्ह्ज आणि डोळ्यांवर चष्मा वगैरे दिला होता. पण नंतर नंतर काहीच नव्हतं.

बाराही महिने, बाराही दिवस तिथे काम चालायचं.

'शेतातल्या मजुरीपेक्षा फटाका कारखान्यात शंभर- दोनशे जास्त मिळतात म्हणून तिथे काम करतो'

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR

सकू बगाडे म्हणाल्या की मालकाने सांगितलं होतं की दारू गरम झाली की त्यावर माती टाकायची. त्याने काही नाही होत.

बाकी अपघात रोखण्याचे किंवा अशी काही परिस्थिती उद्भवलीच तर त्यावर लवकर नियंत्रण मिळवता येईल अशी कोणतीही गोष्ट तिथे नव्हती. 

"आग विझवण्याचा डबा असं काही नव्हतं तिथे. कामापुरतेचं पाण्याचे एक दोन पिंप भरून ठेवलेले असायचे. जास्तीची माती वगैरे काही नव्हतं. आम्ही चार-पाच वर्षांपासून तिथे काम करतो. आम्हाला कधी वाटलं नाही की, असं काही होईल. आम्ही कुटुंब समजून तिथे काम करायचो," असं रुक्मिणी बगाडे यांनी सांगितलं.

त्या दिवशी रुक्मिणी कारखान्यात गेल्या नव्हत्या. बाजारहाट करायचा म्हणून त्या घरीच थांबल्या होत्या. स्फोटांचे आवाज ऐकून त्या घटनास्थळी गेल्या. 

इतक्या धोकादायक परिस्थितीमध्ये तिथे काम का करतात?

अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्येही कामगार या फटाकाच्या कारखान्यात काम करत होते. यामागचं प्रमुख कारण होतं की शेतीतल्या मजूरीपेक्षा कारखानातल्या कामात दिवसाला शंभर-दिडशे रुपये जास्त मिळायचे. "कारखान्यात टार्गेटवर पैसे मिळायचे. जितकं जास्त काम केलं तेवढे पैसे मिळायचे. त्यामुळे आठ-दहा तास काम करुन दिवसाला तीनशे-चारशे रुपये सुटायचे. शेतीच्या कामात एका दिवसाला एवढे पैसे मिळत नाहीत. तसंच रोज शेतीची मजूरी मिळेल असंही नाही. कधी काम असतं, कधी नसतं.

"कारखान्यातलं काम रोज असायचं. त्यामुळे दिवस भागायचा. आमचं हातावर पोट आहे. जर मजुरी मिळाली नाही तर घर कसं चालणार? नवऱ्याला दारुचं व्यसन आहे. मलाच घर चालवावं लागतं. त्यामुळे रोजीरोटीसाठी जावंचं लागतं," मनिषा चव्हाण यांनी सांगितलं.

1 जानेवारीला त्यांच्या मुलीने त्यांना कारखन्यात जाऊ दिलं नाही. त्यामुळे माझा जीव वाचला असं मनिषा सांगतात. 

'शेतातल्या मजुरीपेक्षा फटाका कारखान्यात शंभर- दोनशे जास्त मिळतात म्हणून तिथे काम करतो'

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR

मनिषा चव्हाण यांनी सांगितलेली परिस्थितीच इतरांनीही सांगितली. "आता कारखाना तर संपला. आम्हाला नवीन काम शोधावं लागेल. घरी बसून कसं चालेल? रोजी रोटीसाठी कुठेतरी काम शोधावं लागेल. शेतातल्या कामातून थोडेफार का होईना पैसे मिळवावे लागतील. जखम झाली म्हणून घरी बसून नाही राहू शकत," असं सकू बगाडे यांनी सांगितलं.

'नवऱ्याच्या व्यसनामुळे धोकादायक कामं करावे लागतात'

पांगरी गावातल्या बगाडे वस्तीतल्या अनेक महिला या फटाकाच्या कारखान्यात कामासाठी जात होत्या. या महिलांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, नवऱ्याच्या दारुच्या व्यसनामुळे घर चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. यामुळे धोकादायक असो किंवा नसो मिळेल ते काम करण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय नाहीये. 

"रात्री नवऱ्याचा मार खायचा. सकाळी घरातले सगळे कामं आटपून मजुरीला जायचं असं चालतं. नवऱ्याने काम केलं तरीही त्याची मजुरी तो दारुवर उडवतो. मग घर कसं चालणार? चूल पेटवण्यासाठी, पोरांची शिक्षणं सुरू ठेवण्यासाठी आम्हाला काम करावंचं लागतं. जर रोज मजुरी मिळत असेल तर ते धोकादायक असो किंवा नसो ते काम करावंचं लागतं," असं बगाडे वस्तीतल्या एका महिलेने सांगितलं. 

कारखाना मालकाला अटक

या प्रकरणात पोलिसांनी युसुफ हाजी मणियार आणि नाना पाटेकर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

यातील युसुफ हाजी मनियार यांना अटक करण्यात आली आहे. पण इतक्या धोकादायक परिस्थतीत मागच्या 6-7 वर्षांपासून हा कारखाना सुरु असताना त्यावर काहीच कशी कारवाई केली गेली नाही हा प्रश्न उपस्थित होतो.

यावर या कारख्यान्याच्या परवाना आणि इतर नियमांच्या उल्लंघनाची चौकशी केली जाईल असं सोलापुरचे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितलं.

या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री मदत निधीनी सहकार्य केलं जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का?

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)