नाशिकजवळच्या जिंदाल कारखान्यात बॉयलरचा स्फोट; दोन महिलांचा मृत्यू

नाशिकजवळच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म प्रकल्पात बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे तर 14 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.
महिमा (20) आणि अंजली (27) अशी या महिलांची नावं आहेत. या दोघींना नाशिक आयसीयू अँड ट्रॉमा सेंटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
जालीम कुमार प्रजापती, लवकुश कुशवाह या दोघांवर उपचार सुरू आहेत.
आगीचे स्वरूप इतके भीषण आहे की, तिच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नाशिक महानगरपालिका, विविध नगरपालिकांसह देवळाली लष्करी छावणीतून अग्निशमन दलांचे सुमारे 25 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दुपारपर्यंत गंभीर जखमींना बाहेर काढण्यात आले. उर्वरितांना बाहेर काढण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जात असताना रासायनिक टाक्यांचे पुन्हा स्फोट होऊन संपूर्ण कारखाना आगीच्या कचाट्यात सापडल्याने पाण्याचे बंबही या परिसरातून सुरक्षितस्थळी न्यावे लागले.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक इथे जाऊन या दुर्घटनेत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली.
“मुंढेगाव इथल्या कंपनीत भीषण आग लागली. 17 जण जखमी झाले. दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. पालकमंत्री तात्काळ पोहोचले. विविध यंत्रणांशी मी सातत्याने संपर्कात होतो. कंपनीत वरच्या भागात अडकलेल्या दोघांची सुटका करण्यात आली आहे. जखमींना मी भेटलो. डॉक्टरांशी भेटलो. जखमींवर सर्वोत्तम उपचार केले जातील. सरकार याचा खर्च उचलेल. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्यात येईल”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

सुमारे साडेपाच एकर क्षेत्रातील हा प्रकल्प पॉलीफिल्म निर्मितीचे जगातील सर्वात मोठे केंद्र म्हणून ओळखला जातो. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कारखान्यातील एका रासायनिक बॉयलरचा स्फोट झाला आणि आग भडकली.
आगीचे लोळ अतिशय दूरवरून दिसत होते. सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरलं आहे. आगीचं रौद्र रुप पाहून नाशिक महापालिका, एमआयडीसी, आसपासच्या नगरपालिका, लष्करी छावणी मंडळ अशा सर्व भागातून अग्निशमन दलासह पाण्याचे बंब मागविण्यात आले.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे हे देखील सिल्लोड दौऱ्यावर न जाता मुंढेगावकडे रवाना झाले. 14 जणांना नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
“नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरीतील मुंढेगाव येथे जिंदाल कंपनीच्या प्लांटला आग लागल्याची घटना भीषण आहे. प्लांटमध्ये अडकलेल्या कामगारांची सुखरुप सुटका व्हावी. जखमी कामगारांना त्वरित चांगले उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री महोदय यांनी संबंधितांना निर्देश द्यावेत. आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन, पोलीस, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना यश मिळो अशी प्रार्थना करतो”, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अद्याप आगीत किती जण अडकले आहे, याची स्पष्टता झालेली नाही. कारखान्याच्या बाहेर 20 ते 25 रुग्णवाहिकांचा ताफा तैनात आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








